Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।


आज कोजागरी पौर्णिमा

सनातन आश्रमासमोरून अश्‍लील भाषेत ओरडत जाणार्‍या समाजकंटकांवर कारवाई करावी !

सनातन संस्थेची गोव्याचे मुख्यमंत्री 
आणि पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे मागणी 
       रामनाथी (गोवा), १४ ऑक्टोबर - येथील सनातन आश्रमासमोरील रस्त्यावरून अश्‍लील भाषेत ओरडत जाणार्‍या समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी सनातन संस्थेने एका निवेदनाद्वारे गृहमंत्री या नात्याने गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे केली आहे. या निवेदनाच्या प्रती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री, तसेच मडकईचे आमदार श्री. सुदिन ढवळीकर आणि गोव्याचे पोलीस महासंचालक यांनाही देण्यात आल्या आहेत.
       या निवेदनात म्हटले आहे की, सनातन संस्था ही अध्यात्मप्रसार करणारी संस्था असून रामनाथी, फोंडा येथे या संस्थेचा आश्रम आहे. सनातनच्या रामनाथी आश्रमाच्या समोरील रस्त्यावरून समाजकंटकांकडून आश्रमातील साधकांना शिवीगाळ करणे, अश्‍लील भाषेत ओरडत जाणे, असे प्रकार वारंवार घडत असतात. याविषयी काही ताज्या घटनांचा उल्लेखही या निवेदनात करण्यात आला आहे.

डॉ. तावडे यांच्या अधिवक्त्यांनी दिलेल्या अर्जावर उत्तर देण्यास विलंब का लागतो ?

न्यायालयाने केंद्रीय 
अन्वेषण यंत्रणेला फटकारले !
        पुणे, १४ ऑक्टोबर (वार्ता.) - डॉ. वीरेंद्र तावडे यांच्या अधिवक्त्यांनी दिलेल्या अर्जावर केंद्रीय अन्वेषण यंत्रणेला (सीबीआयला) उत्तर द्यायला वेळ का लागतो, अशा शब्दात येथील जिल्हा सत्र न्यायाधीश पी.वाय. लाडेकर यांनी फटकारले. न्यायालयाने अन्वेषण यंत्रणेला उत्तर देण्यासाठी ७ दिवसांची मुदत देत सदर अर्ज प्रकरणाची सुनावणी २१ ऑक्टोबर या दिवशी ठेवली.
१. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने ५ सप्टेंबर या दिवशी न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट केले होते. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयात चालू झाली.
२. १ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी संशयित म्हणून अटक केलेले सनातनचे साधक डॉ. वीरेंद्र तावडे यांच्या वतीने अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांनी खटल्याची सुनावणी त्वरित चालवावी. त्यासाठी पुरावा म्हणून असलेल्या बंदुकीच्या गोळ्या जर स्कॉटलंड यार्डला पाठवल्या नसतील, तर त्या संदर्भातील पुरावा प्रारंभी नोंदवून घ्यावा आणि नंतर त्या विदेशात पाठवल्या जाव्यात, अशा स्वरूपाचा अर्ज दिला होता; परंतु त्या दिवशी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या वतीने कोणी अधिवक्ता अथवा अधिकारीही उपस्थित नसल्याने त्यावर १४ ऑक्टोबर या दिवशी सुनावणी झाली.

तमिळनाडूत हिंदुद्वेष्ट्या राजकीय पक्षांनी रावणलीला साजरी करून श्रीरामाच्या चित्रांचे दहन केले !

  • रावणाचे वंशज असल्याप्रमाणे रावणलीला करणार्‍यांवर कारवाई होण्यासाठी रामभक्तांनी सरकारवर दबाव निर्माण करावा !
  • हिंदुविरोधी राजकीय पक्षांवर बंदी घालण्याची शिवसेनेची मागणी !
        चेन्नई - तमिळनाडूतील थंदै पेरीयार द्रविड कळघम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी १२ ऑक्टोबरला सायंकाळी ५ वाजता विजयादशमीच्या निमित्त रावणलीला साजरी करून कोट्यवधी हिंदूंचे आराध्य दैवत प्रभु श्रीरामाच्या चित्राचे विडंबन करून ते चित्र जाळले.
        या समाजकंटकांनी या अश्‍लाघ्य घटनेचे पूर्वनियोजन केले होते. या कार्यक्रमाची माहिती देणारे भित्तीफलक करणे, भिंतीवर आक्षेपार्ह लिखाण करणे, पोलीस खाते आणि प्रसारमाध्यमे यांना पूर्वसूचना देणे इत्यादी कृती आधीच केली होती; मात्र प्रशासनाने आणि पोलिसांनी हा कार्यक्रम थांबवण्यासाठी कुठलीच कारवाई केली नाही. (अशा पोलिसांवर आणि प्रशासनातील संबंधितांवर कारवाई होण्यासाठी धर्माभिमान्यांनी त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार केली पाहिजे ! - संपादक) उलट या कार्यक्रमाचा निषेध करण्यासाठी गोळा झालेल्या हिंदूंनांच पांगवण्यात आले. त्यांच्या ५ नेत्यांना अटक करून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली. (तमिळनाडूत रावणराज्य आहे, हेच या घटनेतून दिसून येते ! - संपादक)

पाकिस्तानी कलावंत असलेले कोणतेही चित्रपट दाखवणार नाही !

  • राष्ट्रहितैशी निर्णय घेणार्‍या सर्वच राष्ट्रप्रेमी संघटनांचे अभिनंदन ! शत्रूराष्ट्राला अशा प्रकारे सर्वच स्तरांवर विरोध केल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरच होईल !
  • सिंगल स्क्रीन मालक असोसिएशनचा निर्णय
       मुंबई - पाकिस्तानी कलावंत असलेले कोणतेही चित्रपट दाखवणार नाही, असा निर्णय सिंगल स्क्रीन मालक असोसिएशनने घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि कर्नाटक या राज्यांतील सिंगल स्क्रीन आणि मल्टिप्लेक्स मालकांनी पाकिस्तानी कलाकार असलेले चित्रपट न दाखवण्याचे ठरवले आहे. त्यामुळे २८ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार्‍या ए दिल है मुश्किल, तर पुढील वर्षी २६ जानेवारीला प्रदर्शित होणार्‍या रईस या चित्रपटांविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.
पुणे येथेही पाक 
कलाकारांच्या चित्रपटांना विरोध !
       पुणे येथेही पाकिस्तानी कलाकार फवाद खानचा ए दिल है मुश्किल चित्रपट प्रदर्शित करणार नाही, अशी घोषणा सिनेमा ओनर्स अ‍ॅण्ड एक्झिबिटर्सचे अखिल भारतीय उपाध्यक्ष विक्रम चव्हाण आणि पुणे-मुंबई सिने ओनर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष दीपक कुदळे यांनीही केली आहे.

केवळ हिंदुद्वेषामुळे मला जातीय तणाव निर्माण करायचा होता ! - तक्रारदार वरुण कश्यप याची स्वीकृती

गोरक्षकांची अपकीर्ती करण्याचा होणारा प्रयत्न केंद्र सरकार लक्षात घेईल का ?
गायीच्या चामड्याची बॅग असल्याची दमदाटी करून खोटी पोलीस तक्रार केल्याचे प्रकरण
     मुंबई - विज्ञापन क्षेत्रात काम करणार्‍या वरुण कश्यप या व्यक्तीने गेल्या ऑगस्ट मासात पोलिसात तक्रार करून त्याच्या जवळ असलेली बॅग गायीच्या चामड्याची असल्याचा आरोप करून त्याला इतरांनी दमदाटी केल्याची तक्रार प्रविष्ट केली होती. पोलिसांनी केलेल्या चौकशीत वरील तक्रार खोटी असल्याचे आढळून आल्याने कश्यप यांना अटक करून त्याचा जबाब नोंदवला. त्यात कश्यप यांनी मी हिंदूंचा द्वेष करत असल्याने खोटे बोललो, मला जातीय तणाव निर्माण करायचा होता, अशी स्वीकृती दिली आहे.

केरळ राज्यातील इसिसच्या गटाला सलाफी विचारसरणीने एकत्र आणले !

आतंकवाद्यांना धर्म असतो, हे जाणा !
     कोची - केरळमधून २ ऑक्टोबर या दिवशी इसिसच्या ६ आतंकवाद्यांना पोलिसांनी अटक केली होती. या आतंकवाद्यांनी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला (एन्.आय.ए.ला) माहिती देतांना स्वीकारले की, त्यांच्या एकत्र येण्यामागे इस्लामची सलाफी (शुद्ध इस्लाम) विचारसरणी कारणीभूत होती. डॉ. झाकीर नाईक आणि एम्.एम्. अकबर यांच्या भाषणांचाही त्यांच्यावर प्रभाव होता. (डॉ. झाकीर नाईक यांच्यावर कारवाई करण्यासाठी शासनाला आणखी किती पुराव्यांची आवश्यकता आहे ? - संपादक)

डॉ. झाकीर नाईक यांच्या शाळेतील अभ्यासक्रमात धर्मांधतेला खतपाणी घालणारा मजकूर आढळला !

डॉ. झाकीर नाईक यांच्याविरोधात अद्याप कारवाई न होणे, 
हे सरकारचे अपयश कि अल्पसंख्यकांचे लांगूलचालन ?
    कोची (केरळ) - येथील डॉ. झाकीर नाईकप्रणित पीस इंटरनॅशनल स्कूलमधील दुसर्‍या वर्गाच्या क्रमिक पुस्तकांत मुलांमध्ये धार्मिक असहिष्णुता वाढवणे, धर्मनिरपेक्षताविरोधी भावना निर्माण करणे आणि मुलांना इस्लाम धर्माचा स्वीकार करण्यास बाध्य करणे, अशा आशयाचा आक्षेपार्ह मजकूर आढळून आला आहे. त्याविषयी पोलीस अधिक चौकशी करत आहेत. 
     या शाळेत कनिष्ठ के.जी. ते ८ व्या वर्गापर्यंत वर्ग भरवण्यात येतात. शाळेचा अभ्यासक्रम बनवण्यामागे डॉ. झाकीर नाईक यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींचा हात असावा, असा पोलिसांना संशय आहे. या शाळेतील वर्गांमधील क्रमिक पुस्तकांत इस्लामसाठी प्राणार्पण करण्यास विद्यार्थ्यांना उद्युक्त करण्यात येते. इस्लाम युद्धात यशस्वी का होतो ? कारण त्यासाठी प्राणांचा त्याग केला जातो असा मजकूर देण्यात आला आहे. तसेच मुसलमानेतर विद्यार्थ्यांचे धर्मांतर कसे करावे? याचेही शिक्षण देण्यात येते.

चंदू चव्हाण आमच्याच कह्यात ! - पाकची स्वीकृती

खोटारड्या पाकमध्ये झालेला सकारात्मक (?) पालट !
      नवी देहली - उरी येथील आक्रमणानंतर चुकून नियंत्रण रेषा ओलांडून पाकध्ये गेलेले राष्ट्रीय रायफल्सचे सैनिक चंदू चव्हाण पाकच्याच कह्यात असल्याची पाकने स्वीकृती दिली आहे. पाकच्या डीजीएम्ओने ही स्वीकृती दिली. भारताने पाककडे चंदू चव्हाणविषयी विचारणा केली होती. त्यावर तो आमच्याकडे नाही, असे पाककडून सांगण्यात आले होते. चंदू चव्हाण पाकच्या कह्यात असल्याचे अधिकृतपणे स्पष्ट झाल्यावर त्याला परत आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने अंबरनाथ येथे पाकिस्तानच्या विरोधात आंदोलन

देशाच्या विरोधात बोलणार्‍याच्या घरी सर्जिकल स्ट्राईक करण्याची चेतावणी 
पुतळ्याला काळे फासतांना कार्यकर्ते 
     अंबरनाथ (ठाणे) (वार्ता.) - सर्जिकल स्ट्राईकनंतर अनेक दिग्गजांनी पाकिस्तानची बाजू घेतल्याने राष्ट्रप्रेमींच्या भावना दुखावल्या. या देशद्रोह्यांच्या विरोधात राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या जवळ आंदोलन करण्यात आले. कोणी देशाच्या विरोधात बोलल्यास त्याच्या घरी सर्जिकल स्ट्राईक करण्यात येईल, अशी चेतावणी राष्ट्रीय छावा संघटनेच्या देण्यात आली. (प्रखर राष्ट्रप्रेमी असलेल्या राष्ट्रीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! - संपादक) आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रीय छावा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष श्री. निखिल गोळे यांनी केले. आंदोलनात १०० पेक्षा अधिक राष्ट्रप्रेमी सहभागी झाले होते.
       आंदोलनाच्या वेळी पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ, पाकप्रेमी ओम पुरी, सलमान खान, संजय निरुपम आणि करण जोहर यांच्या पुतळ्यांना काळे फासून पायांनी तुडवण्यात आले.

(म्हणे) पाकिस्तानी कलाकार फवाद खानला चित्रपटात घेणार !

बेनेगल यांना पाकिस्तानविषयी एवढा पुळका असेल, तर त्यांनी तेथे निघून जावे !
चित्रपट दिग्दर्शक बेनेगल यांना पाकिस्तानी कलाकारांचा पुळका
      मुंबई - भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात सध्या तणाव वाढला आहे; मात्र असे असतांनाही प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी ये रास्ते है प्यार के या आगामी चित्रपटासाठी पाकिस्तानी कलाकार फवाद खानला मुख्य भूमिकेसाठी विचारले असल्याचे वृत्त आहे. बेनेगल हे भारत-पाकिस्तान मैत्री आणि शांततेला चालना देण्यासाठी चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून त्याची निर्मिती हर्ष नारायण करत आहेत. (आतापर्यंत शांततेची चर्चा केल्यामुळेच काश्मीरची स्थिती अत्यंत विदारक झाली आहे, हे बेनेगल लक्षात घेतील का ? - संपादक) सध्याचे वातावरण निवळल्यावर चित्रपटात काम करण्याविषयीचा निर्णय फवाद खान कळवणार आहे.

कमळ चिन्हाचा ब्रिक्स परिषदेचा लोगो म्हणून वापर करण्यास काँग्रेसचे खासदार शांताराम नाईक यांचा आक्षेप !

नाईक यांनी आक्षेप घेतलेले हेच ते चिन्ह
      पणजी, १४ ऑक्टोबर (वार्ता.) - काँग्रसचे राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांनी कमळाचे चिन्ह ब्रिक्स परिषदेचा लोगो (बोधचिन्ह) म्हणून वापर करण्यास आक्षेप घेतला आहे. कमळ हे चिन्ह भाजपचे निवडणूक चिन्ह आहे. गोव्यासह ५ राज्यांची विधानसभा निवडणूक येत्या ६ महिन्यांत होणार आहे. त्यामुळे निवडणूक चिन्हाचा गैरवापर केल्यामुळे निवडणूक आयोगाने संबंधितांवर कारवाई करावी आणि ब्रिक्स समितीच्या आयोजकांना हे बोधचिन्ह पालटण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करणारे निवेदन काँग्रेसचे गोव्यातील राज्यसभा खासदार नाईक यांनी १२ ऑक्टोबर या दिवशी गोवा राज्य निवडणूक आयोगाला दिले.

गुजरातमध्ये शेकडो दलितांनी घेतली बौद्ध धर्माची दीक्षा !

हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देण्याशिवाय पर्याय नाही !
     कर्णावती (अहमदाबाद) - गुजरातमधील कर्णावती, कलोल आणि सुरेंद्रनगर येथील बौद्ध दीक्षा समारंभात शेकडो दलितांनी नुकतीच बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. या समारंभांचे आयोजन गुजरात बौद्ध महासभा आणि गुजरात बौद्ध अकादमी यांनी केले होते.
     काही दिवसांपूर्वी राज्यातील वेरावलच्या उना गावात पशूंचे चामडे काढणार्‍या काही दलित युवकांना मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर अप्रसन्न दलितांनी गुजरातमध्ये मोठे आंदोलन केले होते. (गेल्या अनेक दशकांमध्ये हिंदूंना धर्मशिक्षण न दिल्या गेल्यामुळे ते हिंदु धर्माच्या अद्वितियतेपासून अलिप्त आहेत. त्यामुळे त्यांना पर धर्मात जातांना संकोच वाटत नाही ! - संपादक)

बिकानेर येथे विश्‍व हिंदु परिषदेचा चिनी उत्पादनांच्या विरोधात मोर्चा

  • आता सरकारनेच चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकावा !
  • चिनी उत्पादनांची विक्री न करण्याचे व्यापार्‍यांना आवाहन !
      बिकानेर (राजस्थान) - चीनकडून पाकला करण्यात येत असलेल्या आर्थिक आणि सैनिकी साहाय्याच्या विरोधात विश्‍व हिंदु परिषदेच्या वतीने शहरात मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात परिषदेच्या पदाधिकार्‍यांसह मोठ्या संख्येने शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. या वेळी देशाच्या सैन्याच्या समर्थनार्थ चिनी उत्पादनांची विक्री न करण्याचे व्यापार्‍यांना आवाहन करण्यात आले. चिनी उत्पादनांचा मुख्य आयातदार भारतच आहे. त्यामुळे देशाने चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकल्यास चीनवर दबाव निर्माण करता येईल, असे परिषदेचे शहर अध्यक्ष मुकेश शर्मा यांनी सांगितले.थायलंडच्या राजाचे निधन !

      नवी देहली - थायलंडमध्ये भगवान श्रीरामासमान समजले जाणारे राजा भूमिबोल अदुल्यादेज यांचे १३ ऑक्टोबरला निधन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. राजा भूमिबोल यांना जगात सर्वाधिक अधिक काळ राज्य करणारे सम्राट म्हणून ओळखले जातात. त्यांना थायलंडमध्ये एका देवासमान पुजले जात होते.

ब्रिक्स परिषदेला आज प्रारंभ, परिषदेत होणार महत्त्वपूर्ण घोषणा

      पणजी, १४ ऑक्टोबर (वार्ता.) - दक्षिण गोव्यातील मोबोर, केळशी येथील पंचतारांकित हॉटेलच्या परिसरात ब्रिक्स परिषद १५ आणि १६ ऑक्टोबर या दिवशी, तर परिषदेच्या अनुषंगाने १६ ऑक्टोबर या दिवशी बिमस्टेक परिषद होत आहे. या परिषदांमध्ये ब्रिक्स (ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) आणि बिमस्टेक (बांगलादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, भूतान आणि नेपाळ) या राष्ट्रांमध्ये व्यापार, उद्योग, आर्थिक साहाय्य आणि इतर व्यवहारांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा आणि करार होणार आहेत. विशेष म्हणजे जगाला भेडसावणार्‍या आतंकवादाच्या विरोधात संयुक्त लढा उभारण्याच्या दृष्टीने परिषदेत महत्त्वाची घोषणा होणार आहे. परिषदेच्या समारोपानिमित्त गोवा घोषणा होणार असून या निमित्ताने गोव्याचे नाव जागतिक नकाशावर झळकणार असल्याची आशा गोवा शासनाने व्यक्त केली आहे. या संमेलनासाठी एकूण ७० कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांची निर्मिती दक्षिण गोव्यात करण्यात आली आहे. या संमेलनांच्या सुरक्षेसाठी उपस्थित असलेल्या पोलिसांच्या जेवणखाणावरच ६० लक्ष रुपये खर्च होणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिली.

(म्हणे) भारत-पाकिस्तान वाद हा युद्धाने नव्हे, बुद्धाच्या मार्गाने सुटेल !

बौद्ध राष्ट्र असलेल्या श्रीलंकेने एल्टीटीई आतंकवादी 
संघटनेला संपवल्याविषयी अभिनेता गगन मलिक काही बोलतील का ?
अभिनेता गगन मलिक यांचा तथाकथित शांततेचा अनाहूत सल्ला
      नागपूर - गौतम बुद्धाने शांतीचा मार्ग सांगितला आणि ते युद्धाच्या विरोधात होते. आज भारत-पाकिस्तानच्या संदर्भात युद्धाच्या गोष्टी होतात, तेव्हा वाईट वाटते. हा प्रश्‍न शांतीच्याच मार्गाने सुटू शकतो. (मग ६९ वर्षे हा प्रश्‍न न सुटता वाढत का गेला ? - संपादक) गौतम बुद्धांनी समाजातील पालट शांततेच्या मार्गाने होऊ शकतात, हे सिद्धही करून दाखवले. भारत-पाकिस्तान वादावरही युद्धाने नव्हे, तर बुद्धाच्याच मार्गाने तोडगा निघू शकतो, असे मत प्रभु श्रीराम आणि गौतम बुद्ध यांची भूमिका साकारणारा सुप्रसिद्ध अभिनेते गगन मलिक यांनी व्यक्त केले. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ते पत्रकारांशी बोलत होते.

(म्हणे) पाकने जिहादचा मार्ग अनुसरावा !

पाक आताही जिहादचाच मार्ग अनुसरत आहे; त्यात त्याला भारतातील काही देशद्रोही साहाय्य करत 
आहेत ! केंद्र सरकारने पाकचा जिहाद संपवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यावा !
जैश-ए-महंमदचा प्रमुख मसूद अझर याचे फुत्कार
     इस्लामाबाद - जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझर याने पाकला जिहादी मार्ग अनुसरण्याचा सल्ला दिला आहे. तसेच देशातील जिहादी गटांना काश्मीरमध्ये अधिक सक्रिय होण्याची सूचना केली आहे. पाककडून योग्य निर्णय घेण्यास विलंब झाल्यास तो काश्मीरमधील ऐतिहासिक संधी गमावून बसेल, असेही त्याने म्हटले आहे. अल-कलाममध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखामध्ये त्याने हे म्हटले आहे. अल-कलाम हे जैशचे मुखपत्र आहे. जानेवारीत पठाणकोटमध्ये झालेले आक्रमण जैशनेच घडवून आणले होते.

म्यानमारमध्ये गायींची तस्करी केल्याप्रकरणी ३ धर्मांधांवर गुन्हा प्रविष्ट !

म्यानमारमध्ये बौद्ध भिक्षू गोरक्षण करतात, तसे भारतात किती हिंदू करतात ?
गोतस्करीच्या विरोधात बौद्ध भिक्षूकडून पोलीस तक्रार
     म्यानमार - मागील मासात बकरी ईदच्या वेळी ९० हून अधिक गायींची तस्करी केल्याप्रकरणी म्यानमारमध्ये ३ धर्मांधांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. पुढील सुनावणीपर्यंत सर्व संशयित आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी आणखी ३० संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.
        बकरी ईदनिमित्त होणार्‍या पशुहत्येच्या विरोधात तेथील अनेक बौद्ध भिक्षू सातत्याने आंदोलन करतात. गेल्या सप्टेंबर मासात अवैधपणे ९२ गायींची तस्करी करण्यात येत असल्याविषयी एका बौद्ध भिक्षूने पोलिसांकडे तक्रार केली होती. एएफ्पी या वृत्तसंस्थेने यातील दोन गायींचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. इतर ९० गायींना सध्या रंंगून येथील एका फुटबॉल मैदानात ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी मुसलमान धर्माला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याचा आरोप येथील मुसलमान नेत्यांनी केला आहे.

जर्मनी विस्थापितांसाठी कठोर नियम असलेला कायदा करण्याच्या सिद्धतेत !

जर्मनीने राष्ट्रहितासाठी विस्थापितांच्या विरोधात त्वरित कायदा करण्याची प्रक्रिया चालू केली. 
भारतात मात्र राजकारण्यांकडून कोट्यवधी बांगलादेशी घुसखोरांकडे व्होट बँक म्हणून पाहिले जाते !
     बर्लिन (जर्मनी) - जर्मनीकडून विस्थापितांना आश्रय देण्याविषयी कठोर नियमांची तरतूद असलेला नवीन कायदा करण्यात येत आहे. वृत्तपत्र डिए वेल्टनुसार या संदर्भातील विधेयकाचा मसुदा अंतर्गत प्रकरणांचे मंत्री थॉमस डी मॅजिएरे यांनी सिद्ध केला असून तो अन्य मंत्रालयांना वितरितही करण्यात आला आहे. 
    गेल्या जुलै मासात इसिसशी संबंधित विस्थापितांकडून ब्रुसेल्स आणि पॅरिस येथे जिहादी आक्रमणे करण्यात आली होती. त्यानंतर जर्मनीत विस्थापितांच्या विरोधात तीव्र रोष व्यक्त करण्यात आला होता. या कायद्यात जर्मनीचे कायदे तोडणार्‍या आणि देशाच्या सुरक्षेसाठी धोका निर्माण करणार्‍या विस्थापितांना देशाबाहेर काढण्यासाठी नवीन नियम बनवण्यात येणार आहेत. या मसुद्यानुसार ओळख किंवा नागरिकत्व यांविषयी प्रशासनाची दिशाभूल करणार्‍या विस्थापितांना देशात रहाता येणार नाही. डिए वेल्टनुसार ३१ ऑगस्ट पर्यंत जर्मनीतील २१ लक्ष २०९ विस्थापितांनी देश सोडणे अपेक्षित होते. यातील १ लक्ष ५८ सहस्र १९० लोकांना मर्यादित काळासाठी रहाण्याची अनुमती देण्यात आली आहे.जिहादी आरोपीच्या अधिवक्त्यांकडून त्याचा बचाव करण्यास नकार !

असे भारतात घडले असते, तर कथित मानवाधिकार संघटनांनी आरोपीसाठी रान उठवले असते !
पॅरिस येथील जिहादी आतंकवाद्यांनी आक्रमण केल्याचे प्रकरण 
      पॅरिस - पॅरिस आक्रमणातील मुख्य संशयित आरोपी सलेह अब्देसलामच्या दोन्ही अधिवक्त्यांनी त्याचा न्यायालयीन बचाव करण्यास नकार दिला आहे. याविषयी अधिवक्ता फ्रॅन्क बेर्टन त्यांची सहकारी अधिवक्ता स्वेन मेरीसह एका दूरचित्रवाहिनीशी बोलतांना म्हणाले, तो बोलेल असे आम्हाला वाटत नाही. तो गप्प रहाण्याच्या अधिकाराचा वापर करील. आम्ही पूर्वीच सांगितले होते की, आमचा अशील शांत राहिल्यास आम्ही त्याचा बचाव सोडून देऊ.

अकोला येथे मूर्ती विसर्जन मिरवणुकीतील कार्यकर्त्याला पोलिसांकडून मारहाण

  • मुसलमानांच्या मिरवणुकीत अशा प्रकारे मारहाण करण्याचे धैर्य पोलिसांनी केले असते का ?
  • श्री. श्रीकांत पिसोळकर
        बोरगाव मंजू (जिल्हा अकोला) - येथे नवदुर्गा मूर्ती विसर्जन मिरवणुकीत रात्री १० नंतर पोलिसांनी एका कार्यकर्त्याला मारहाण केली. त्या वेळी मंडळाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी रात्री १२ पर्यंत मिरवणूक थांबवून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. तेथे आलेल्या राज्य राखीव दलाच्या सैनिकांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या लाठीमारात ३ हिंदू घायाळ झाले. (हिंदूंनो, पोलिसांकडून मार खावा लागू नये, यासाठी हिंदु राष्ट्र स्थापा ! - संपादक) पोलीस अधिकार्‍यांनी मंडळाच्या अध्यक्षांशी चर्चा करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिल्याने मिरवणुकीला रात्री १२ वाजता पुन्हा प्रारंभ झाला. या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी गावांतील सर्व दुकाने दुसर्‍या दिवशी बंद ठेवली, तसेच मूक मोर्चाही काढला. मोर्चा सोपिनाथ महाराजांच्या मंदिराजवळ गेल्यावर त्याचे सभेत रूपांतर झाले. या वेळी सर्वांनी पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.

केरळमध्ये माकप कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी संघाच्या २ स्वयंसेवकांना अटक !

कम्युनिस्टांच्या राज्यांतील हुकूमशाही !
      कन्नूर (केरळ) - कन्नूर जिल्ह्यात १० ऑक्टोबरला ४० वर्षीय माकप कार्यकर्ता के. मोहनन् यांच्या हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी रा.स्व. संघाच्या रूपेश आणि राहुल या स्वयंसेवकांना संघाच्या कन्नूर येथील कार्यालयातून अटक केली आहे. या हत्येच्या प्रकरणी ७ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मोहनन् यांच्या हत्येच्या दुसर्‍या दिवशी भाजपच्या २५ वर्षीय कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली. भाजपने माकपवर हत्येचा आरोप केला आहे. मात्र अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. (सत्ताधारी माकपच्या राज्यात कधीतरी त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक होईल का ? - संपादक)

भारत रशियाकडून भेदक क्षेपणास्त्रप्रणाली खरेदी करणार !

       मॉस्को - भारत संरक्षणसज्जतेसाठी रशियाकडून एस्-४०० ट्रिम्फ ही भेदक क्षेपणास्त्रप्रणाली खरेदी करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यातील चर्चेनंतर या कराराला अंतिम रूप देण्यात आले आहे. १५ ऑक्टोबरला गोव्यात याविषयीच्या करारावर स्वाक्षर्‍या केल्या जाणार आहेत. या क्षेपणास्त्र खरेदीबरोबरच भारत-रशिया संयुक्तपणे कामोव्ह हेलिकॉप्टर्सचीही निर्मिती करणार आहे.
       एस्-४०० ट्रिम्फ ही ३ प्रकारातील क्षेपणास्त्रे असून शत्रूची विमाने हवेतच भेदण्याची, तसेच ४०० कि.मी. अंतरावरील लक्ष्याचा वेध घेण्याची क्षमता यामध्ये आहे. विशेष म्हणजे एकाच वेळी ३६ निरनिराळ्या लक्ष्यांना हे क्षेपणास्त्र टिपू शकते. चीनने गेल्या वर्षीच रशियाकडून ही क्षेपणास्त्रे विकत घेतली आहेत.

पाकला संवेदनशील माहिती पुरवणार्‍या काश्मीरमधील पोलीस अधिकार्‍याला अटक !

पाकच्या हस्तकांनी पोखरलेले काश्मीरमधील 
पोलीस दल ! अशा पोलिसांवर देशद्रोहाखाली 
शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे !
      श्रीनगर - पाकच्या गुप्तचर विभागातील अधिकार्‍यांना जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेविषयी दूरभाषवरून गुप्त आणि संवेदनशील माहिती पुरवणार्‍या तन्वीर अहमद या पोलीस उपअधीक्षकाला अटक करण्यात आली आहे. त्याला याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. काश्मीर खोर्‍यात तणावाचे वातावरण असतांनाच पोलीस उपअधीक्षक तन्वीर अहमद यांच्यावर पाकच्या हस्तकांना गुप्त माहिती पुरवल्याचा आरोप आहे.

कॅनडामधील चिनी उच्चायुक्त कार्यालयाबाहेर बलुची नागरिकांची निदर्शने !

       व्हँकुअर (कॅनडा) - बलुची नागरिक आणि मानवाधिकार कार्यकर्ते यांनी येथील चिनी उच्चायुक्त कार्यालयाबाहेर ३ दिवस मूकनिदर्शने केली. चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिकेचा विरोध करण्यासाठी आणि बलुचिस्तानमधील मानवाधिकारांच्या होत असलेल्या उल्लंघनाच्या विरोधात ही निदर्शने करण्यात आली.

कचराकुंडीत नव्हे, तर रस्त्यावर कचरा टाकल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात !

यालाच म्हणायचे का स्वच्छ भारत अभियान ?
      सातारा, १४ ऑक्टोबर (वार्ता.) - येथील राजवाडा परिसरातील भाजीमंडईमध्ये प्रतिदिन मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. कचर्‍याच्या साठवणीसाठी सातारा नगरपालिकेच्या वतीने कचराकुंडी ठेवण्यात आली आहे; मात्र मंडईतील भाजी विक्रेत्यांकडून कचरा बाहेरच टाकला जातो. त्यामुळे तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. भटकी कुत्री, गायी आदींकडून रस्त्यावरील कचरा विस्कटला जातो. यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भारतीय संस्कृतीला आतंकवादी संबोधून राष्ट्रपुरुषांविषयी आक्षेपार्ह विधाने करणार्‍या कवयित्री प्रज्ञा पवार यांच्यावर कडक कारवाई करा !

सातारा येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी 
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. संदीप पाटील
यांना निवेदन देतांना कार्यकर्ते
     सातारा, १४ ऑक्टोबर (वार्ता.) - भारतीय संस्कृतीला आतंकवादी संबोधून राष्ट्रपुरुषांविषयी आक्षेपार्ह विधाने करणार्‍या राष्ट्रद्रोही कवयित्री प्रज्ञा पवार यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करून कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. संदीप पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या वेळी हिंदु महासभेचे श्री. उमेश गांधी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. भीमराव साळुंखे, रणरागिणी शाखेच्या सौ. रूपा महाडिक आणि सनातन संस्थेच्या सौ. वसुंधरा मोरे उपस्थित होत्या. निवेदनाला वारकरी संप्रदाय, विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल या संघटनांनीही पाठिंबा दर्शवला आहे.

पाकिस्तानची पाठराखण करणार्‍या चीनच्या निषेधार्थ नंदुरबार येथे आज निदर्शने आणि चिनी उत्पादनांची होळी

हिंदु जनजागृती समितीचा उपक्रम
निदर्शनाचा विषय : चिनी वस्तूंवर बहिष्कार घालणे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे २३ गडकोट खासगी मालकीतून काढून शासनजमा करावेत ! 
स्थळ : सुभाष चौक, नंदुरबार 
वेळ : सकाळी १० 
लोकहो, चीनच्या निषेधार्थ या निदर्शनामध्ये सहभागी व्हा !

३०० जण पोलिसांच्या कह्यात, तर २३ जणांवर गुन्हे प्रविष्ट

या प्रकरणातील दोषी धर्मांधांवर पोलिसांनी 
लवकरात लवकर कठोर कारवाई करावी, हीच हिंंदूंची अपेक्षा ! 
भिवंडी येथील दंगल प्रकरण
      ठाणे - भिवंडी येथे मोहरमच्या मिरवणुकीत धर्मांधांनी नवरात्रीची कमान तोडून दंगल केल्याप्रकरणी पोलिसांनी ३०० जणांना कह्यात घेतले असून २३ जणांवर गुन्हे प्रविष्ट केले आहेत. या वेळी धर्मांधांनी दुर्गादेवीची चित्रेही पायदळी तुडवली होती. तसेच त्यांनी हनुमान आणि शंकर यांच्या मंदिरावरही दगडफेक केली. देवीची चित्रे पायाखाली घेतांना लाज वाटत नाही का, असे हिंदूंनी धर्मांधांना विचारल्यावर त्यांनी हिंदूंच्या अंगावर पेट्रोल बॉम्बही फेकले.

पोलिसांच्या संदर्भातील कटू अनुभव !

नरेंद्र मोदी यांच्या शासनाची अपकीर्ती 
करण्यासाठी न्यायालयात खोटी कागदपत्रे 
सादर करणारे कायदाद्रोही पोलीस अधिकारी !
       भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस्) निलंबित अधिकारी संजीव भट्ट यांनी गुजरात शासनाला अपकीर्त करण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केली, असे विशेष अन्वेषण पथकाने सांगितले. गुजरातमध्ये वर्ष २००२ मध्ये झालेल्या दंगलप्रकरणी तपास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विशेष अन्वेषण पथकाची स्थापना केली होती. दंगलीत काँग्रेसचे खासदार एहसान जाफरी यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात संजीव भट्ट यांना साक्षीदार म्हणून बोलावण्यात आले होते. या प्रकरणी न्यायदंडाधिकार्‍यांपुढे झालेल्या सुनावणीत पथकाने भट्ट यांचा खोटारडेपणा उघड केला.
पोलिसांविषयी चांगले आणि वाईट अनुभव असल्यास 
वाचकांनी नजीकच्या दैनिक कार्यालयात कळवावेत !

गुन्हेविषयीचे वार्तांकन करतांना वार्ताहरास किमान माहिती असावीत, अशी काही कलमे !

      एखाद्या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा कोणत्या कलमांतर्गत प्रविष्ट केला आहे, यालाही अधिक महत्त्व आहे. यासाठी काही कलमांची माहिती असणे आवश्यक आहे. यातील काही कलमे तुम्हाला माहितीही असतील. भारतीय दंड विधान (इंडियन पीनल कोड), मुंबई पोलीस अ‍ॅक्ट, सीआर्पीसी (कोड ऑफ क्रिमीनल प्रोसिजर) याला मराठीत फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणतात, यांच्या अंतर्गत गुन्हे नोंद केले जातात.
१. ३४ : एकापेक्षा अधिक जणांनी गुन्हा करणे
२. १२० ब : कट रचणे
३. १४४ : जमावबंदी. (या कलमानुसार ५ जणांनी एकत्र येण्यावर प्रतिबंध असतो. याचे उल्लंघन करणार्‍यास पोलीस अटक करू शकतात.)
४. १४७/१४८ : सशस्त्र दंगल घडवणे, मारामारी करणे
५. १४९ : कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्‍न उद्भवू नये, यासाठी प्रतिबंधात्मक आणि सतर्कतेचा आदेश देणे 
६. २९५ : अवमान करणे, मानहानी करणे
७. २९५ अ : धार्मिक भावना दुखावणे
८. ३०२ : हे कलम एखाद्याची हत्या करण्यात आली असेल, तेव्हा वापरतात.
९. ३०७ : सदोष मनुष्यवध - जाणीवपूर्वक न केलेली. उदा अपघात.
१०. ३७५ : बलात्कार
११. ३८७ : खंडणी उकळणे

गुन्हेविषयीचे वार्तांकन कसे कराल ?

वार्ताहर प्रशिक्षण
      वार्ता मिळवून देणार्‍या प्रत्येक क्षेत्राला पत्रकारितेच्या भाषेत बीट असे म्हणतात. गुन्हेविषयक वृत्त देणार्‍या वार्ताहराला पत्रकारितेच्या क्षेत्रात क्राईम रिपोर्टर म्हणून ओळखले जाते. काल आपण वर्तमानपत्रांत लक्षवेधी ठरणार्‍या गुन्हेविषयक वार्तांचे संकलन कसे करावे, हे पाहिले आज वार्तांकनासाठी उपयुक्त असलेले पोलिसांचे विभाग कुठले, ते पाहूया.
श्री. चेतन राजहंस, उपसंपादक, सनातन प्रभात

पाकला दुबळे करण्याची संधी !

     पैशांपेक्षा देशप्रेमाला महत्त्व देत पाकला भाजीपाला पुरवठा न करण्याचा निर्णय घेणार्‍या गुजरातमधील भाजीपाला व्यापार्‍यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. गुजरातमधून प्रतिदिन ५० ट्रकमधून १० टन भाजीपाला वाघा सीमेवरून पाकमध्ये पाठवण्यात येतो. शेतमालाचा व्यापार करण्यासाठी भारताला पाक नाही, तर दुसरा देश निश्‍चित मिळेल; पण आपल्या कुकृत्यांमुळे जागतिक स्तरावर एकटे पडत चाललेल्या पाकला भारताच्या व्यापार्‍यांच्या निर्णयाचा फटका सोसावा लागल्यावर अधिकच दुबळेपणा येणार आहे. सर्जिकल स्ट्राईककरून देशाच्या शूर सैनिकांनी पाकला हादरवून सोडले; त्यास देशभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, याची पोचपावती म्हणजे गुजरातच्या भाजीपाला विक्रेत्यांनी आपल्या परीने ठोस पावले उचलत पाकच्या उदरावरच ठोसा लगावला आहे.

हिंदूंच्या संरक्षणासाठी श्रीलंकेत शिव सेनाई संघटनेची स्थापना !

श्रीलंकेतील ज्येष्ठ हिंदुत्वनिष्ठ श्री. मारावानपुलावू सच्चिदानंदन् हे संघटनेचे मुख्य संघटक
श्री. सच्चिदानंदन्
     कोलंबो - श्रीलंकेतील अल्पसंख्य असलेल्या हिंदु समाजावर अन्य धर्मियांकडून होणार्‍या अत्याचारापासून हिंदूंचे संरक्षण करण्यासाठी श्रीलंकेत शिव सेनाई या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. श्रीलंकेच्या उत्तर भागातील तमिळबहुल वायुनिया या शहरात आयोजित एका समारंभात शिव सेनाईच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली. तेथील हिंदुत्वनिष्ठ श्री. मारावानपुलावू सच्चिदानंदन् हे या संघटनेचे मुख्य संघटक आहेत. श्री. सच्चिदानंदन् यांचा आध्यात्मिक स्तर ६४ टक्के असून ते गेली काही वर्षे हिंदु जनजागृती समिती आयोजित करत असलेल्या अखिल भारतीय हिंदु अधिवेशनात सहभागी होत आहेत.

हिंदु जनजागृती समितीच्या 'प्रथमोपचार प्रशिक्षणवर्ग' या नवीन उपक्रमाविषयी सूचना

     'प्रथमोपचार' म्हणजे रुग्णाला वैद्यकीय उपचार मिळेपर्यंत त्याच्यावर केले जाणारे प्राथमिक उपचार ! भावी आपत्काळाचा, अर्थात् भविष्यात होऊ शकणारे महायुद्ध, नैसर्गिक आपत्ती, दंगली आदींचाही विचार करता समाज आणि राष्ट्र यांच्याप्रतीचे कर्तव्य म्हणून प्रथमोपचार प्रशिक्षण प्रत्येक नागरिकाने घेणे आवश्यक झाले आहे. यासाठी सनातनने 'प्रथमोपचार प्रशिक्षण' ही तीन भागांची ग्रंथमालिका प्रकाशित केली आहे. भावी आपत्काळात नागरिकांचे रक्षण व्हावे, यासाठी हिंदु जनजागृती समिती लवकरच सर्वत्र निःशुल्क 'प्रथमोपचार प्रशिक्षणवर्ग' हा उपक्रम चालू करणार आहे. सनातन-निर्मित प्रथमोपचार प्रशिक्षण ग्रंथमालिका हाच या प्रशिक्षणवर्गांचा अभ्यासक्रम असणार आहे. 

अन्याय होत असलेल्या ठिकाणी छत्रपती शिवरायांप्रमाणे आम्हालाही बळ दे, असे आमचे देवीकडे मागणे ! - शुभम गोवेकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

      कल्याण (वार्ता.) - दुर्गामातेचा आशीर्वाद घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण येथूनच आरमार उभारणी चालू केली. इथेच स्वराज्याच्या आरमाराची गलबते बनली. जेव्हा आपले पूर्वज दास्यत्वात होते, आया-बहिणी यांच्यावर अत्याचार व्हायचे, तेव्हा आई जिजाऊ देवीला साकडे घालायच्या. त्या सांगायच्या, या गुलामीच्या बेड्या तोडणारा, माय-भगिनींचा रक्षक माझ्या पोटी जन्माला येऊ दे. नवरात्रीच्या निमित्ताने समस्त सृजनशील अशा स्त्रीशक्तीने देवीला असे साकडे घालण्याची वेळ आज आली आहे.' ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी जिथे अन्याय होईल, तिथे मुसंडी मारली, तसेच बळ आम्हालाही दे, हे मागणे आपण देवीकडे मागूया', असे मार्गदर्शन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. शुभम गोवेकर यांनी व्यक्त केले.

मुंबई जिल्ह्यातील हिंदु जनजागृती समितीच्या सप्टेंबर २०१६ मधील धर्मप्रसाराच्या कार्यात धर्माभिमान्यांचा सहभाग !

१. सनातन पंचांग वितरण चळवळ : नालासोपारा येथे सनातन पंचांग वितरण चळवळ राबवण्यात आली. ही चळवळ नालासोपारा येथील चाणक्यनगरी विभागात २४.९.२०१६ आणि २५.९.२०१६ या दिवशी राबवण्यात आली. या चळवळींतर्गत पंचांगाचे वितरण करण्यात आले. या चळवळीत धर्माभिमानी आणि साधक सर्वश्री प्रसाद काळे, वैभव राऊत, अशोक जाधव, प्रशांत वैती, सौ. रेखा वैती, सौ. लक्ष्मी राऊत अन् सौ. अस्मिता पाडेकर हे सहभागी झाले होते.
२. पत्रलेखनाच्या माध्यमातून जागृती : या सप्ताहात राष्ट्र आणि धर्म या विषयांवरील एकूण १४ (७ मराठी, २ हिंदी, ३ गुजराती आणि २ इंग्रजी) पत्रे विविध मराठी, हिंदी, गुजराती आणि इंग्रजी वृत्तपत्रांना पाठवली गेली. यातील ६४ मराठी, १२ हिंदी, ७ इंग्रजी आणि ३ गुजराती पत्रे प्रसिद्ध झाली. या सप्ताहात सर्वश्री विलास पुंडले आणि किशोर औटी या साधकांनी पत्रलेखनाची सेवा केली. सौ. उर्वी मूळम यांनी हिंदी भाषेतील पत्र गुजराती भाषेत, तर श्री. विनोद पालन यांनी हिंदी पत्र इंग्रजी भाषेत अनुवादीत करण्याची सेवा केली.
- श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, मुंबई, ठाणे आणि रायगड


अभ्यास कसा करावा ?

परीक्षेच्या पार्श्‍वभूमीवर मुलांना मार्गदर्शक अशी लेखमालिका
      आजकाल बहुतेक मुले आईच्या आग्रहामुळे, बाबांच्या भीतीपोटी अन् एकमेकांमध्ये असलेल्या चढाओढीमुळे काहीशा तणावाखालीच अभ्यास करतांना दिसतात. अशा वेळी अभ्यास मनापासून होतोच, असे नाही. त्यामुळे परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नाही की, दुःख होते. त्यामुळे मुलांनो, अभ्यास करण्यामागील योग्य दृष्टीकोन समजून घेतला, तर अभ्यास कंटाळवाणा न वाटता आनंददायी वाटेल. अभ्यास करण्याच्या विशिष्ट पद्धती आहेत. त्याप्रमाणे अभ्यास केल्यास अभ्यास चांगला होतो. परीक्षेची भीती कशी घालवावी, उत्तरपत्रिका आत्मविश्‍वासाने कशी लिहावी, अभ्यासात एकाग्रता कशी साधावी आदींची माहिती सांगणारा हा लेखप्रपंच...

ऑक्टोबर २०१६ मध्ये एर्नाकुलम् (केरळ) येथे हिंदु जनजागृती समितीने नवरात्रीनिमित्त आयोजित केलेल्या प्रवचनाला उत्तम प्रतिसाद !

     केरळच्या एर्नाकुलम् जिल्ह्यातील कडवंतरा येथील उदयनगर मंदिरात उत्तर भारतीय संघटनेच्या (नॉर्थ इंडियन असोसिएशनच्या) वतीने होणार्‍या नवरात्रोत्सवात हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना प्रवचन करण्याची संधी मिळाली. नवरात्रीचे महत्त्व आणि त्या संबंधित आचार या विषयावर कु. रश्मी परमेश्‍वरन् यांनी तेथे आलेल्या भाविकांना मार्गदर्शन केले. या प्रवचनाचा लाभ ७० जणांनी घेतला. त्यांना विषय फार आवडला. त्यांनी पुढील कार्यक्रमात समितीच्या कार्यकर्त्यांना बोलावणार असल्याचे सांगितले. संघटनेच्या एका व्यक्तीने त्यांच्या समाजातील लोकांच्या नावांची सूची समितीच्या कार्यकर्त्यांना देणार असल्याचे सांगून त्यांना संपर्क करू शकता, असेही सांगितले. - कु. अदिती सुखटणकर, केरळ

नाशिक शहरातील शाळा, बससेवा चालू; मात्र इंटरनेट सेवा बंदच

      नाशिक, १४ ऑक्टोबर - जिल्ह्यातील त्र्यंबकेश्‍वरमधील तळेगाव (अंजनेरी) येथील ५ वर्षांच्या बालिकेचे लैंगिक शोषण केल्याच्या घटनेनंतर येथे ८ ऑक्टोबरपासून तणाव निर्माण झाला होता. त्या वेळी काही काळासाठी बंद केलेली बससेवा, शाळा आणि महाविद्यालये १३ ऑक्टोबर या दिवशीपासून चालू करण्यात आली आहेत. (परिस्थिती आटोक्यात आणणे आणि सेवा पूर्ववत चालू होणे, यांसाठी एवढा कालावधी लागणे, हे कायदा-सुव्यवस्थेचे अपयश नव्हे का ? - संपादक)

आज जळगाव येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

विषय : छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची दुरवस्था रोखण्यासाठी शासनाने लक्ष देणे आणि दिवाळीमध्ये फटाक्यांद्वारे होणार्‍या प्रदूषणाला विरोध करणे
स्थळ : जळगाव महानगरपालिकेच्या समोर
वेळ : सकाळी १०

विज्ञापनदात्यांनी वर्ष २०१८ च्या सनातन पंचांगासाठी आताच आगाऊ आरक्षण करण्यास सांगणे, ही त्यांच्या मनातील पंचांगाविषयीच्या विश्‍वासार्हतेची पोचपावती !

     सर्वांगस्पर्शी ज्ञान उपलब्ध करून देणारे सनातन पंचांग म्हणजे राष्ट्र, धर्म आणि साधना यांचा सुरेख संगम आहे. अनेक जण प्रतिवर्षी हेच पंचांग विकत घेण्यास इच्छुक असतात. सध्या वर्ष २०१७ च्या सनातन पंचांगाचे वितरण चालू आहे. या पंचांगासाठी विज्ञापने दिलेल्या विज्ञापनदात्यांना पंचांग द्यायला साधक गेले असता काही जणांनी पुढील वर्षीच्या (वर्ष २०१८ च्या) पंचांगासाठीही आम्ही विज्ञापन देऊ. तुम्ही आताच त्याचे आगाऊ आरक्षण (अ‍ॅडव्हान्स बूकिंग) करा, असे सांगितले. समाजात अमूल्य विचारधन पोचवणार्‍या सनातन पंचांगाचे महत्त्व विज्ञापनदात्यांना पटल्याने ते या राष्ट्र-धर्म कार्यात खारीचा वाटा उचलत आहेत, हेच यावरून लक्षात येते.

व्हॉट्स अ‍ॅपवर आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी एकाला अटक !

     पुणे, १४ ऑक्टोबर (वार्ता.) - व्हॉट्स अ‍ॅपवर आक्षेपार्ह लिखाण करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी प्रवीण जाधव आणि अशोक सागरे यांना येथील पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी युवराज शेलार यांनी तक्रार दिली होती. जाधव यांनी समाजात तेढ निर्माण करणारा मजकूर कोणतीही निश्‍चिती न करता व्हॉट्स अ‍ॅपवरील अन्य गटात पाठवला होता. त्यांच्याकडून दुर्गामातेच्या संदर्भात अश्‍लील पोस्ट टाकण्यात आली होती.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन !

शस्त्रपूजन करतांना पोलीस उपविभागीय 
अधिकारी सदाशिव वाघमारे
     चोपडा - येथील शिवाजी चौकात विजयादशमीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शस्त्रपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी भाजपचे माजी शहराध्यक्ष राजू शर्मा यांनी प्रभु श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. नंतर शस्त्रपूजन राजू शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे यांनीही शस्त्रपूजन केले. या वेळी चोपडा नगर परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपनराध्यक्ष जीवन चौधरी, पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे,पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, ग्रामीणपोलीस निरीक्षक बाळासाहेब केदारे, साहाय्यक पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार, रोहिदास सोमवंशी, निकम साहेब, ठाकरे साहेब, मनसेचे माजी नगरसेवक धर्मेंद्र सोनार, अनिल वानखेडे, गजेंद्र जयस्वाल युवा शक्ती संघटनाचे संस्थापक सागर ओतारी, अलोक शर्मा, सतीश पाटी, जितू शिंपी, सागर बडगुजर, तसेच समितीचे कार्यकर्ते आणि सहस्रो संख्येने हिंदु धर्माभिमानी सहभागी झाले होते. 
      जोपर्यंत माझे घर जळत नाही, तोपर्यंत मी उठणार नाही, ही मानसिकता हिंदूंनी त्यागायला हवी ! 
- ह.भ.प. शिवणीकर महाराज, पंढरपूर, जिल्हा सोलापूर

मन स्थिर होण्यासाठी देवाने प्रसंग घडवणे

कु. मेघा बांदेकर
१. रामनाथी आश्रमात पंचांगसेवेसाठी जाण्याचे रहित झाल्यामुळे
रडायला येणे आणि नंतर सकारात्मक विचार करणे
    काही दिवसांपूर्वी आमचे सहसाधक श्री. गणेशदादा यांनी मला सांगितले, तुला आणि रश्मीला पंचांगसेवेसाठी रामनाथी आश्रमात जायचे आहे. नंतर काही दिवसांनी दादा मला म्हणाले, तुझे रामनाथीला जायचे रहित झाले, तर तुला वाईट वाटणार नाही ना ? त्या वेळी मी ते स्वीकारले; परंतु नंतर मला त्या विचाराने सतत रडायला येत होते. माझ्यातील नकारात्मक विचारांचे प्रमाण वाढले आणि मी ५ मिनिटे रडत होते. नंतर माझ्या मनामध्ये सकारात्मक विचार आले, मी आणि रश्मी एकच आहोत. तिच्या आनंदातच माझा आनंद आहे. शेवटी आपण एकाच ब्रह्माकडे जाणार आहोत. गुरुदेवा, तुमच्याकडे (ब्रह्माकडे) येण्यासाठी मी पुष्कळ प्रयत्न करीन.

जीवनात आज्ञापालनाचे महत्त्व

   लहानपणी आई-वडिलांच्या आज्ञेत, गुरुप्राप्तीनंतर गुरूंच्या आज्ञेत आणि गुरूंच्या देहत्यागानंतर ईश्‍वराच्या आज्ञेत राहिल्यानेच मनुष्य जन्माचे सार्थक होते. त्यामुळे हिंदु धर्मात आज्ञापालनाला महत्त्व आहे, स्वैराचाराला नाही.
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.३.२०१६)

हिंदु ऐक्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या !

English : www.hindujagruti.org  
हिंदी : www.hindujagruti.org/hindi/ 
मराठी : www.hindujagruti.org/marathi/

रायगड येथे सनातनच्या वतीने नवरात्रोत्सवात जनप्रबोधन

     रायगड - येथे नवरात्रोत्सवानिमित्त जनप्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. नवरात्रोत्सवातील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्ह्यात पोलिसांना निवेदन देण्यात आले. ११ नवरात्रोत्सव मंडळांना निवेदन देऊन उत्सव आदर्श पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. काही मंडळांनीही आध्यात्मिक माहिती देणारे सनातन संस्थेचे १७ फ्लेक्स फलक प्रायोजित केले. १८ ठिकाणी लावलेल्या ग्रंथप्रदर्शनात सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ४९४ ग्रंथांचे वितरण झाले. साधकांनी २३ ठिकाणी नवरात्रोत्सवाविषयी माहिती सांगणारी प्रवचने घेतली. धुतुम (ता. उरण) येथे महिलांनी प्रवचन ऐकल्यावर आणखी १ घंटा मार्गदर्शन करण्याची विनंती केली. या महिलांनी व्यासपीठ फुलांनी सजवून भावपूर्ण सिद्धता केली होती.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा. 
प्रारंभ - आश्‍विन शुक्ल पक्ष चतुर्दशी (१५.१०.२०१६) दुपारी १.२६ वाजता 
समाप्ती - आश्‍विन पौर्णिमा/कृष्ण पक्ष प्रतिपदा (१६.१०.२०१६) 
सकाळी ९.५३ वाजता उद्या पौर्णिमा आहे.

फलक प्रसिद्धीकरता

पाकनिष्ठ काश्मिरी पोलीस अधिकार्‍याला सरकारने जन्माची अद्दल घडवावी ! 
      पाकच्या गुप्तचर विभागातील अधिकार्‍यांना जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेविषयी दूरभाषवरून गुप्त आणि संवेदनशील माहिती पुरवणार्‍या तन्वीर अहमद या पोलीस उपअधीक्षकाला अटक करण्यात आली आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! 
Pak ko gupta aur savedanshil jankari denewale Kashmirke police adhikari Tanvir Ahamad giraftar. 
Aise Rashtradhrohi Policewalo ko Pak bhejo ! 
जागो ! 
 पाक को गुप्त और संवेदनशील जानकारी देनेवाले कश्मीर के पुलिस अधिकारी तन्वीर अहमद गिरफ्तार. 
ऐसे राष्ट्रद्रोही पुलिसवालों को पाक भेजो !

समंजस, मनमिळाऊ आणि इतरांना साहाय्य करणारा ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. दीप संजय जोशी (वय १६ वर्षे) !

कु. दीप जोशी
      आश्‍विन पौर्णिमा (१६.१०.२०१६) या दिवशी कु. दीप जोशी याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आई-वडिलांना त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
कु. दीप याला वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !
१. जन्मापूर्वी
१ अ. बाळ साधना करणारे असावे, असे वाटणे : कु. दीपच्या जन्मापूर्वीपासून आम्ही पूर्णवेळ साधना करत असल्याने होणारे बाळ हे प.पू. गुरुदेवांच्या कृपेने साधनेत जलद उन्नती करणारे, शरीर आणि मनाने निकोप असावे, असे मला वाटायचे.

घोर कलियुगात संकटाच्या वेळी प.पू. डॉक्टर समवेत असल्याने विजय साधकांचाच असल्याचे सांगणारे भावचित्र !

कु. सर्वमंगला मेदी
द्वापरयुगात पांडव वनवास आणि अज्ञातवास यांसारखी संकटे भोगत असतांना त्यांच्याजवळ केवळ अन् केवळ श्रीकृष्णच होता. त्यामुळेच त्यांचा विजय झाला. त्याचप्रमाणे या घोर कलियुगात सनातन संस्थेवर बंदी, साधकांना अटक, अशा अनेक संकटात आमच्यासमवेत केवळ आणि केवळ आपणच (श्रीश्रीजयंत) आहात; म्हणून विजय निश्‍चितच आपला (सनातन संस्थेचा) आहे.
   हे गुरुदेवा, या सर्व अडचणींवर मात करून आपल्या अपेक्षेनुसार आमच्याकडून साधना होऊ दे. या धर्म-अधर्मच्या सूक्ष्मातील युद्धात विजयी होण्यासाठी त्यासाठी आम्हाला शक्ती प्रदान करा, हीच आपल्या चरणी प्रार्थना ! 

६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. बाबू के. यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये, त्यांच्या देहावसानापूर्वी आणि नंतर जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

कै. बाबू के.
   २०.६.२०१६ या दिवशी रायचूर, कर्नाटक येथील साधक कै. बाबू के. यांचे निधन झालेे. हे रामनाथी आश्रमातील श्री. सुदर्शन आणि कर्नाटक येथील साधक श्री. रमेश यांचे वडील होते. यांची पत्नी श्रीमती सरोज बी. यांची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के आहे. बाबू के. यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये, त्यांच्या देहावसानापूर्वी आणि नंतर कुटुंबीय अन् साधिका यांना जाणवलेली सूत्रे, तसेच आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
१. जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१ अ. माझे पती स्वभावाने शांत आणि प्रेमळ होते.
१ आ. लहानपणापासून हनुमानाची भक्ती करणे : देवाविषयी त्यांचा अपार भक्तीभाव होता. लहानपणापासून त्यांची श्री हनुमानावर विशेष भक्ती होती. ते न चुकता प्रतिदिन हनुमानाच्या देवळात जात असत.
१ इ. त्यांनी शिक्षक म्हणून २८ वर्षे नोकरी केली. वेळेचे पालन करण्यावर त्यांचा कटाक्ष होता.
१ ई. सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधनेला प्रारंभ : वर्ष १९९९ मध्ये श्री. बाबू के. यांनी सनातन संस्थेच्या वतीने होणार्‍या सत्संगाला जाण्यास प्रारंभ केला. त्यानंतर घरातील सर्वांना सत्संगाला जाण्यासाठी ते प्रोत्साहन देत. काही काळानंतर मी आणि माझ्या मुलांनी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधनेला प्रारंभ केला.
१ उ. असह्य शारीरिक त्रास होत असूनही नामजप चालू असणे : गेल्या ६ वर्षांपासून अनारोग्यामुळे ते त्रास सहन करत होते. घरी अभ्यासवर्ग होत असतांना ते झोपून असायचे. शारीरिक त्रास असह्य होत असूनही मनातून त्यांचा नामजप चालू असायचा. - श्रीमती सरोज बी. (कै. बाबू के. यांची पत्नी), रायचूर, कर्नाटक.

समष्टीशी मिसळून गेल्यावर चाहूल लागेल तुला संतपदाची !

कु. वैष्णवी घोंगाणे
तुझी नि माझी पहिली भेट ।
आठवायचा प्रयत्न मी करते जेव्हा ॥

डोळ्यांसमोर हळूच येतो ।
रुसुबाईचा चेहरा तेव्हा ॥ १ ॥

लहानपणी चिंगीला (टीप) घेऊन पुष्कळ दंगा ती करायची ।
नकळत सर्वांची ताईही ती व्हायची ॥

काही चुकले की, उठायची लगेच पेटून ।
तिला शांत करता करता आई जायची थकून ॥ २ ॥

प्रांजळ, सेवाभावी आणि शिकण्याची वृत्ती असलेली ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची अन् उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली गोवा येथील कु. मनुश्री साने (वय १२ वर्षे) !

कु. मनुश्री साने
      अश्‍विन शुक्ल पक्ष चतुर्दशी (१५.१०.२०१६) या दिवशी कु. मनुश्री साने हिचा तिथीनुसार वाढदिवस आहे. त्यानिमित्त सहसाधिकांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.
कु. मनुश्री साने हिला वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद !
१. प्रेमभाव
      मी रुग्णाइत असतांना ती मला काही हवे का ?, असे मधूनमधून विचारायची.
२. सेवाभाव 
अ. मनुश्री प्रत्येक सेवा मनापासून आणि भावपूर्ण करते. प्रत्येक सेवा देवाला अपेक्षित अशी होण्याची तिची तळमळ असते.
आ. मनुश्री सेवा करतांना सतत नामजप करते आणि इतरांनाही नामजप करण्याची आठवण करून देते.

स्वेच्छेपेक्षा परेच्छेचे महत्त्व अनुभवणार्‍या पुणे येथील सौ. मानसी अनिरुद्ध राजंदेकर !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
१. प.पू. डॉक्टरांच्या अमृत महोत्सवाच्या सेवेसाठी पतीला बोलावणे
येणे आणि स्वेच्छेपेक्षा ईश्‍वरेच्छा महत्त्वाची असल्याचा मनात विचार येणे
गोव्यातील रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात प.पू. डॉक्टरांचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे चित्रीकरण करण्याच्या सेवेत साधकांची आवश्यकता असल्याने आश्रमातून माझे पती श्री. अनिरुद्ध यांना सेवेसाठी यायला जमेल का ?, असे विचारण्यात आले. तेव्हा मी श्री. अनिरुद्ध यांना म्हटले, अमृत महोत्सवाचा हा सोहळा म्हणजे इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद होईल, असा दिवस आहे. तुम्ही या अमूल्य गुरुसेवेची संधी सोडू नका. आश्रमात सेवेसाठी जातांना केवळ तुम्हालाच जावे लागले, तर तुम्ही जा. आमचा विचार करू नका. आम्ही इथे राहून प्रार्थना करू. त्याप्रमाणे श्री. अनिरुद्ध यांनी होकार कळवल्यावर त्यांच्या सेवेचे नियोजन झाले. आश्रमात बरेच पाहुणे असल्याने मला आणि चि. श्रीयाला जाता येणार नव्हते. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, स्वेच्छेपेक्षा ईश्‍वरेच्छा महत्त्वाची आहे. आपण त्याप्रमाणेच वागायला हवे.

रामनाथी आश्रमात झालेल्या श्री बगलामुखी ब्रह्मास्त्रयागाचे सूक्ष्म-परीक्षण

११.८.२०१६ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमामध्ये महर्षींच्या आदेशावरून श्री बगलामुखी ब्रह्मास्त्रयाग करण्यात आला. या यज्ञाचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण येथे देत आहोत.
१. यज्ञस्थळी असणार्‍या सात्त्विक मूर्ती आणि यंत्र यांद्वारे प्रक्षेपित होणारे तत्त्व 
 
कु. मधुरा भोसले
२. श्री बगलामुखीदेवीचे पूजन करण्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव
    शिवाची समष्टी स्तरावरील निर्गुण-सगुण स्वरूप असणारी मारक शक्ती म्हणजे श्री बगलामुखीदेवी होय.वातावरणातील दूष्ट आणि अनिष्ट शक्ति यांच्या युद्धात समष्टी स्तरावर धर्मावर चालू असणारी अनिष्ट शक्तींची आक्रमणे परतवून लावून त्यांना कडक शासन करण्याचे कार्य प्रामुख्याने बगलामुखीदेवी करत असते. तिची कृपादृष्टी लाभावी आणि तिने प्रसन्न होऊन सढळ हस्ते धर्मकार्याला साहाय्य करावे, यासाठी तिचा याग आयोजित केला होता. देवीला प्रसन्न करण्यासाठी यागाच्या माध्यमातून कर्मकांडात्मक कर्म प्रारंभ करण्याअगोदर उपासनाकांडात्मक भक्तीभावाने ओतप्रोत असणारी आणि समर्पित भावाने युक्त असणारी सरळ-साधी पूजा देवीला अधिक भावते. त्यामुळे यागाचा आरंभ करण्याअगोदर श्री बगलामुखीदेवीचे पूजन करण्यात आले.

महर्षींनी सांगितल्याप्रमाणे नवरात्रीच्या काळात कांचीपूरम् येथे जाऊन कांची कामाक्षीदेवीचे घेतलेले दर्शन आणि नवग्रहांच्या संदर्भात केलेले उपाय

महर्षींची शिकवण आणि कार्य !
१. महर्षींच्या आज्ञेनुसार तिरूपारकडल येथील श्रीविष्णूचे दर्शन घेणे
    महर्षींनी आम्हाला होसूर, तमिळनाडू येथून निघून नवरात्रीच्या दुसर्‍या दिवशी, म्हणजेच २.१०.२०१६ या दिवशी कांचीपूरम् येथे पोेचण्यास सांगितले. महर्षींची आज्ञा मानून आम्ही रात्री कांचीपूरम् येथे पोेचलो. महर्षींनी सांगितले, ३.१०.२०१६ या दिवशी दुपारी ४.३० वाजता तुम्हाला देवदर्शनासाठी निघायचे आहे. यात पहिल्यांदा तिरूपारकडल या गावातील शेषशायी विष्णूचे दर्शन घेऊन त्यानंतर कांची कामाक्षीच्या दर्शनाला जा आणि नंतर शेवटी कार्तिकेयाचे दर्शन घेतल्यानंतरच तुमचे दर्शन पूर्ण होईल. त्याप्रमाणे आम्ही प्रथम भूलोकाचे वैकुंठ मानल्या जाणार्‍या तमिळनाडू येथील तिरूपारकडल या गावातील श्रीविष्णूचे दर्शन घेतले. या ठिकाणी औदुंबर वृक्षातून प्रकटलेली स्वयंभू श्रीविष्णूची मूर्ती आहे. एकूणच भारतातील श्रीविष्णूच्या १०८ दिव्य क्षेत्रांतील हे एक क्षेत्र आहे.
२. मागच्या वेळी येथील दर्शन राहिल्याने महर्षींनी शिक्षा देणे आणि
या वेळी दर्शन घेतांना झालेल्या चुकीबद्दल श्रीविष्णु अन् महर्षि यांच्या चरणी क्षमायाचना करणे
    मागच्या वेळी आमचे येथील दर्शन राहिल्याने महर्षींनी आम्हाला शिक्षा दिली होती, ती म्हणजे ते सांगतील, तेवढी दक्षिणा नाडीशास्त्रींना देणे. तसे आम्ही केले. या क्षेत्री आल्यानंतर आम्ही श्रीविष्णु आणि महर्षि यांच्या चरणी तळमळीने प्रार्थना केली, मागच्या वेळी आमच्याकडून काही कारणाने तुमचे दर्शन राहिले, याबद्दल आम्हाला क्षमा करा आणि परत अशी चूक आमच्याकडून होणार नाही, असा आशीर्वाद आम्हाला द्या.

साधकांनो, येणार्‍या आपत्काळाची तीव्रता लक्षात घ्या आणि आध्यात्मिक उपाय गांभीर्याने करा !

१. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांना झालेले आध्यात्मिक त्रास - तोंडवळा थकल्याप्रमाणे होणे, सेवेनिमित्त चर्चा करतांना गळा पकडल्याप्रमाणे जाणवून बोलणेच अशक्य होणे आणि आध्यात्मिक उपाय केल्यानंतर तीन दिवसांनी थोड्या प्रमाणात बरे वाटणे : हिंदु जनजागृती समितीच्या प्रसारकार्याच्या निमित्ताने मी उत्तर भारतात असतो. पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनासाठी मी गोवा येथील रामनाथी आश्रमात आल्यानंतर एका वृत्तवाहिनीला मुलाखत देण्यासाठी झालेल्या चित्रीकरणामध्ये माझा तोंडवळा पुष्कळ थकल्याप्रमाणे आणि वातावरणात कार्यरत असलेल्या त्रासदायक शक्तीमुळे काळपट झाल्याचे लक्षात आले. काही वेळा सेवेनिमित्त चर्चा करतांना माझा गळा पकडल्याप्रमाणे जाणवून मला बाहेरील रज-तमात्मक वातावरणामुळे बोलणेच अशक्य झाले होते. आध्यात्मिक उपाय केल्यानंतर तीन दिवसांनी मला थोड्या प्रमाणात बरे वाटले. - पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
      धर्मशिक्षण आणि साधना यांच्या अभावी कृतघ्न झालेल्या हल्लीच्या पिढीला आई-बाबांची मालमत्ता हवी असते; पण वृद्ध झालेल्या आई-बाबांची सेवा करायची नसते.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

गुरु-शिष्य नात्याविषयी गुरूंचा दृष्टीकोन

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
'मी कोणाचा गुरु नाही; पण शिष्य केल्याविना सोडणार नाही'. 
भावार्थ १ : 'मी कोणाचा गुरु नाही', यातील मी प्रकृतीतील मीविषयी आहे. 'शिष्य केल्याविना सोडणार नाही', म्हणजे पुरुषतत्त्वाचा किंवा बाबांच्या गुरूंचा, म्हणजे प.पू. अनंतानंद साईश यांचा शिष्य केल्याविना सोडणार नाही किंवा असा नामजप चालू करून देईन की, सर्वजण नामाचे शिष्य होतील.  
भावार्थ २ : गुरु म्हणजे शिव. शिवदशेत मनात विचार येत नाहीत; म्हणूनच 'मी गुरु आहे' हा विचार मनात येऊ शकत नाही. जीवदशेत आल्यावर 'मी शिष्य आहे' एवढाच विचार मनात येतो; म्हणूूनच 'माझ्या गुरूंकडे मी साधकांना घेऊन जाईन, त्यांना माझ्या गुरूंचे शिष्य करीन'. 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.) 

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

योग्य आचार-विचार
मानवाचे रूप अल्प काळाचे असते. रूपाला महत्त्व नसून व्यक्तीचे आचार, 
विचार आणि वागणे यालाच खरे महत्त्व असते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

ब्रिक्स आपल्या राज्यात !

संपादकीय
     ब्रिक्स परिषदेला आज आरंभ होत आहे. यावर्षी ती भारतात आणि विशेष उल्लेख करायचा, तर गोवा राज्यात भरत आहे. ब्राझील, रशिया, इंडिया (भारत), चायना (चीन) आणि दक्षिण आफ्रिका या देशांचे प्रमुख या परिषदेत सहभागी होत आहेत. जागतिक घडामोडीतील ही मोठी गोष्ट आहे; त्यामुळे या ब्रिक्स परिषदेकडे जगाचे लक्ष लागलेले आहे. 
    १५ आणि १६ ऑक्टोबर असे दोन दिवस चालणारी ही परिषद अशा वेळी होत आहे की, जेव्हा भारताने केलेले सर्जिकल स्ट्राईकचे शौर्य आणि अमेरिकी अध्यक्षपदाचा निवडणूक प्रचार या दोन गोष्टी जगभरातील जनतेच्या चर्चेचा विषय आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn