Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

मैनपुरी (उत्तरप्रदेश) येथे धर्मांतराला विरोध करणार्‍या हिंदुत्ववाद्यांना धर्मांध ख्रिस्त्यांकडून मारहाण !

ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी धर्मांध ख्रिस्त्यांच्या या आक्रमणाच्या संदर्भात तोंड 
उघडणार नाहीत; कारण तसे करणे हे धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात ठरेल !
     मैनपुरी - येथील नगला रामसिंह गावात ख्रिस्त्यांकडून हिंदूंच्या धर्मांतराला विरोध करण्यासाठी जमलेल्या हिंदुत्ववाद्यांवर ख्रिस्त्यांनी आक्रमण केले. या आक्रमणात अनेक जण घायाळ झाले. घटनेची माहिती दिल्यानंतर एका घंट्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. (अशा पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांच्या वरिष्ठांकडे केली पाहिजे ! - संपादक) त्यामुळे धर्मांध ख्रिस्ती आक्रमण करून पळून गेले. या घटनेनंतर गावात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
१. येथील संजय नावाच्या तरुणाने ३ वर्षांपूर्वी पंजाबमध्ये जाऊन ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता. २७ मार्चला इस्टर संडेच्या निमित्ताने त्याने गावातील ३०-४० हिंदूंना घर आणि अन्य प्रलोभने दाखवून ख्रिस्ती करण्यासाठी सिद्ध केले होते. यासाठी २७ मार्चला फिरोजाबाद येथून एक पाद्री आणि अन्य १० जण आले होते.
२. या घटनेची माहिती सरपंच शैलेंद्र यादव यांनी बजरंग दल, विश्‍व हिंदु परिषद, रा.स्व. संघ आदी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना दिली. त्यामुळे १२ हून अधिक कार्यकर्ते येथे पोेहोचले.
३. त्यांनी धर्मांतराला विरोध केल्यावर संजय, पाद्री आणि अन्य ख्रिस्ती यांच्यात वाद झाला. त्यातच संजयच्या कुटुंबातील लोकांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर लाठीकाठीद्वारे आक्रमण केले आणि त्यांना मोठ्या प्रमाणात मारहाण केली.

धर्मांधांनी अल्पवयीन हिंदु विद्यार्थिनीची काढलेली छेड हेच नंदुरबार दंगलीमागील कारण ?

वासनांधांपासून हिंदु मुलींचे रक्षण होण्यासाठी हिंदु राष्ट्र्र स्थापन करणे अपरिहार्य !
      नंदुरबार - शहरातील माळीवाडा भागामध्ये एका किरकोळ कारणावरून हिंदु आणि मुसलमान यांच्यामध्ये २२ मार्च या दिवशी दंगल झाली होती. या दंगलीमागे प्रथम हिंदु आणि मुसलमान विद्यार्थ्यांमध्ये नक्कल (कॉपी) करण्याप्रकरणी वादावादी झाली आणि त्याचे पर्यावसान दंगलीमध्ये झाले, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र धर्मांधांनी एका अल्पवयीन हिंदु विद्यार्थिनीची छेड काढल्यामुळे ही दंगल झाली असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
१. २२ मार्च या दिवशी एक अल्पवयीन हिंदु विद्यार्थिनी १० वीची परीक्षा देण्यासाठी परीक्षाकेंद्रावर जात होती. त्या वेळी २ धर्मांध युवकांनी त्या विद्यार्थिनीला परीक्षाकेंद्रावर जाण्यापासून अडवले. त्या वेळी त्या विद्यार्थिनीने त्या धर्मांधांना परीक्षेला जाऊ देण्यासाठी विनवणी केली.
२. त्या वेळी ते धर्मांध वेगवेगळ्या बाजूला जाऊन त्यांनी तिला जाण्यासाठी वाट करून दिली. ती पुढे जात असतांना त्या दोन्ही धर्मांधांनी तिला अचानकपणे दोन्ही बाजूने कचाट्यात पकडले. त्या वेळी त्या विद्यार्थिनीने निसटून जाण्याचा प्रयत्न केला असता, त्या धर्मांधांनी तिची ओढणी खेचली.
३. एका हिंदु युवकाने हा सर्व प्रकार घडत असतांना पाहिला.

बांगलादेशमध्ये इस्लामविषयीची याचिका रद्दबातल !

      ढाका (बांगलादेश) - इस्लाम हा देशाचा अधिकृत धर्म असल्याचा नियम रहित करावा, या मागणीची याचिका येथील उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवली. देशभरात धर्मांध इस्लामी गटांकडून होत असलेल्या अत्याचारांकडे पहाता देशातील निधर्मी संघटनांनी वरील याचिका प्रविष्ट केली होती. वर्ष १९८८ मध्ये बांगलादेशचा अधिकृत धर्म म्हणून इस्लामला मान्यता देण्यात आली होती. उच्च न्यायालयाने या संदर्भात याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकून न घेताच हा निर्णय दिला.


जेएन्यूमध्ये आता जश्‍न-ए-आझादी या विषयावर चर्चासत्राचे आयोजन !

कन्हैया कुमार, उमर खालिद आणि अनिरुद्ध भट्टाचार्य पुन्हा गरळओक करणार ?
      नवी देहली - संसदेवर आक्रमण करणार्‍या महंमद अफझलच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेल्या वादग्रस्त कार्यक्रमानंतर आता जेएन्यूमध्ये (जवाहरलाल नेहरू विद्यापिठामध्ये) डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी गटाकडून जश्‍न-ए-आझादी या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. इतिहासकार बिपीनचंद्र यांच्या स्मरणार्थ होणार्‍या या कार्यक्रमामध्ये विविध वक्ते सहभागी होणार आहेत. यामध्ये बिपीनचंद्र लिखित पुस्तकांवरील विविध विषयांवर मते मांडण्यात येणार आहेत. या चर्चासत्रात देशद्रोहाचा आरोप असलेले कन्हैया कुमार, उमर खालिद आणि अनिरुद्ध भट्टाचार्य हे तिघेही ताज्या घडामोडींविषयी भाष्य करणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमातून पुन्हा देशविरोधी गरळ ओकली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जेएन्यूमध्ये यापूर्वी देण्यात आलेल्या देशद्रोही घोषणांच्या प्रकरणी चौकशी समितीने कन्हैया कुमारची विद्यापिठातून हकालपट्टी करण्याची शिफारस केली आहे. त्याविषयी अद्याप कार्यवाही झालेली नाही.
नवनिर्माण सेनेकडून कन्हैया कुमारला ठार मारण्याची धमकी
      नवी देहली - कन्हैया आणि त्याचा मित्र उमर खालिद यांनी दुर्गाष्टमीपूर्वी म्हणजे ३१ मार्चपर्यंत देहली सोडली नाही, तर जेएन्यू परिसरामध्ये महिषासुरांचा अंत करू, अशी चेतावणी उत्तरप्रदेशातील नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमित जानी यांनी त्यांच्या फेसबूकवरून दिली आहे.

भारतातील अल्पसंख्यांक मुसलमान दंगल आणि बलात्कार करतात, तर बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदू असा विचारही करू शकत नाहीत !

बांगलादेशी लेखिका तसलीमा नसरीन यांचे ट्विट
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंवर टीका करणारे तसलीमा नसरीन यांच्या
अभिव्यक्ती स्वातंत्र्याद्वारे व्यक्त केलेल्या विचारांकडे नेहमीच दुर्लक्ष करतात !
      देहली - भारतात अल्पसंख्यांक मुसलमान दंगल आणि बलात्कार करतात, बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदू असा विचारही करू शकत नाहीत, असे ट्विट प्रसिद्ध बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांनी केले आहे. अन्य एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, धार्मिक स्तरावर अल्पसंख्य समुदायाच्या प्रती सहानुभूती ठेवणे, हे धर्मनिरपेक्ष म्हणवून घेण्यासाठी पुरेसे नाही. तुम्ही धर्मनिरपेक्ष व्यक्ती आहात याचा अर्थ असा होतो की, तुमचे कोणत्याही धर्माशी देणेघेणे नाही. (भारतात याच्या उलट असते. भारतात मुसलमान, ख्रिस्ती आदी अल्पसंख्यांकांविषयी सहानुभूती आणि हिंदूंना विरोध, याचा अर्थ धर्मनिरपेक्ष असा होतो ! - संपादक)

जाट आरक्षण विधेयकास हरियाणाच्या मंत्रीमंडळाची संमती !

आरक्षणाचा भस्मासुर !
     चंदीगड - हरियाणाच्या मंत्रीमंडळाने जाट आरक्षण विधेयकास संमती दिली आहे. हे विधेयक लगेचच विधानसभेत मांडले जाणार आहे. अखिल भारतीय जाट आरक्षण समितीचे अध्यक्ष यशपाल मलिक यांनी शासनाला राज्यशासनाने शब्द दिल्याप्रमाणे जर ३१ मार्चपर्यंत जाट समाजाला आरक्षण दिले नाही, तर जाट समाजाकडून सर्वांत मोठे आंदोलन केले जाईल, अशी चेतावणी दिली होती. शासकीय नोकरी आणि शैक्षणिक संस्था यांमध्ये १० टक्के आरक्षणाच्या मागणीसाठी जाट समाजाने फेब्रुवारीमध्ये ९ दिवस हिंसक आंदोलन केले होते. या आंदोलनात ३० जण ठार झाले होते. या आंदोलनाचा फटका राजस्थानमधील रोहतक, झज्जर, कॅथल, जींद, सोनीपत, भिवानीसह अनेक जिल्ह्यांना बसला होता.


केंद्रशासनाने स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देऊन काँग्रेसचे तोंड बंद करावे ! - उद्धव ठाकरे

    मुंबई - स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतीकारकांचे शिरोमणी होते. त्यांचा अवमान करून काँग्रेसने सर्वच क्रांतीकारकांचा अवमान केला आहे. त्यामुळे केंद्रशासनाने सावरकर यांना तात्काळ भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करून काँग्रेसचे तोंड बंद करावे, अशी मागणी शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी आज केली.
     स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अवमानाविषयी काँग्रेसने क्षमा मागावी अन्यथा मुंबईत काँग्रेस आमदारांच्या घराबाहेर आंदोलन करण्याची चेतावणी भाजपने दिली आहे. याचा संदर्भ देत श्री. ठाकरे पुढे म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देऊन त्यांच्याविरुद्ध चालू असलेल्या मोहिमेचे ढोंग बंद पाडा म्हणजे आंदोलनाची आवश्यकता भासणार नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची हिंमत मोदी सरकारने दाखवायला हवी. याआधी सावरकरांच्या अवमानाच्या विरोधात शिवसेनेने अनेकदा आंदोलने केली. मणिशंकर अय्यरला जोडे मारले. संसद ठप्प केली. तेव्हा या आमच्या आंदोलनापासून लांब राहिलेले आज सावरकरांसाठी आंदोलने करत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. आता भारतरत्न देऊन सावरकरांचा सन्मान करण्याचे धैर्य भाजपने दाखवावे.

लाहोरमधील आत्मघाती आक्रमण ख्रिस्त्यांना लक्ष्य करण्यासाठी !

आतंकवाद्यांना धर्म असतो आणि ते अन्य धर्मियांना लक्ष्य करतात !
      लाहोर - २७ मार्च या दिवशी पाकच्या लाहोर शहरातील गुलशन-ए-इकबाल पार्कमध्ये झालेल्या आत्मघातकी आक्रमणात ७२ जण ठार, तर ३०० हून अधिक लोक घायाळ झाले. ठार झालेल्यांमध्ये १४ ख्रिस्ती आहेत. या आक्रमणाचे दायित्व पाकिस्तान तालिबान संघटनेपासून वेगळे झालेल्या जमात उल् एहरार या संघटनेने घेतले आहे. या संघटनेचा प्रवक्ता एहसानुल्लाह एहसान याने म्हटले की, आमचे लक्ष्य ख्रिस्ती होते. आम्ही पंतप्रधान नवाज शरीफ यांना संदेश देऊ इच्छित होतो की, आम्ही लाहोरपर्यंत घुसलो आहोत. या प्रकरणी ५० तालिबान्यांना अटक करण्यात आली आहे. या आक्रमणानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवाज शरीफ यांच्याशी दूरभाषवरून संपर्क करून आक्रमणाविषयी दुःख व्यक्त केले.


कन्हैया कुमारला महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेड आणि वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद संरक्षण देणार !

संभाजी ब्रिगेड आणि वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद यांचे खरे स्वरूप !
देशविरोधी घोषणा देणार्‍यांना संरक्षण मिळणारा जगातील एकमेव देश भारत !
      संभाजीनगर - जेएन्यूमध्ये (जवाहरलाल नेहरू विद्यापिठात) देशद्रोही घोषणा दिल्याचा आरोप असणार्‍या कन्हैया कुमारला काही विद्यार्थी संघटना पुण्यामध्ये बोलावणार आहेत. यामुळे काही संघटनांनी कन्हैया कुमारला जिवे मारण्याची धमकी दिली आहे. त्याचसमवेत अभाविपसह अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी कन्हैया कुमारला विरोधही दर्शवला आहे. यामुळे संभाजी ब्रिगेड आणि वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद कन्हैया कुमारला महाराष्ट्रात संरक्षण देईल, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ता डॉ. शिवानंद भानुसे यांनी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली. भानुसे पुढे म्हणाले की, कन्हैया जर दोषी असेल, तर त्याला कायदा शिक्षा करील; परंतु त्याच्यावरील आरोप सिद्ध झाले नाहीत. आम्ही देशहिताचा विचार करून त्याला पाठिंबा दिला आहे. (देश आणि सैनिक यांच्या विरोधात विधाने करणार्‍यांकडून देशहित कसे साध्य होईल ? - संपादक) देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्यामुळे त्याला येथे येण्यापासून कुणी रोखू शकत नाही. जातीयवादी संघटनांनी काही केले, तर संभाजी ब्रिगेड आणि वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद त्यांना धडा शिकवेल, असेही त्यांनी सांगितले.

१९६२ च्या युद्धात सत्ताधारी नेते आणि सैन्याधिकारी यांनी निराश केले ! - केंद्रीय राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंह

नेहरू यांच्या गांधीवादी भूमिकेमुळे १९६२ मध्ये भारताला पराभूत 
व्हावे लागले, हा काँग्रेसचा देशद्रोहच होय !
     चंडीगड - वर्ष १९६२ च्या चीनसमवेत झालेल्या युद्धात सैनिकांनी शौर्य दाखवले; मात्र राजकीय नेते आणि सैन्याच्या नेतृत्वाने आम्हाला निराश केले. जे लोक इतिहासातून धडा घेत नाहीत, त्यांना अशाच संकटांना सामोरे जावे लागते, असे प्रतिपादन केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री तथा माजी सैन्यप्रमुख जनरल व्ही.के. सिंह यांनी केले. ते पंजाब विश्‍वविद्यालयात १९६२ च्या भारत-चीन युद्धावर आयोजित चर्चासत्रात बोलत होते. 
    जनरल व्ही.के. सिंह पुढे म्हणाले की, युद्धाच्या वेळी सैन्याला निर्णय घेण्यापासून दूर ठेवण्यात आले. सत्ताधार्‍यांनी सैन्याला वेगळे ठेवून देशाची सुरक्षा वार्‍यावर सोडून दिली. सैनिकांना कनिष्ठ दर्जाची शस्त्रे दिली गेली. बंदूक आणि दारूगोळा देण्यात आला नव्हता. त्यांना दुर्गम डोंगरामध्ये युद्ध करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले नव्हते.
    सेवानिवृत मेजर जनरल राजेंद्र नाथ यांनी सांगितले की, युद्धाच्या वेळी आम्ही अलिप्ततावादी धोरणांवर चाललो, त्याची फळे आम्हाला भोगावी लागली. त्या वेळचे आपले परराष्ट्र धोरण अयोग्य होते. आपल्या सीमा स्पष्ट नव्हत्या. चीनने आधीच युद्धाचा कट रचला होता. आपण मात्र पंचशील सिद्धांत आणि हिंदी-चीनी भाई भाईच्या घोषणा देत बसलो आणि चीनने आक्रमण केले.

पालमिरा शहरावर पुन्हा सिरियाचे नियंत्रण !

पालमिरा शहर इसिसच्या कह्यातून मुक्त
     लंडन - सिरियाच्या सैन्याने इसिस अर्थात् आय.एस्.आय.एस्. या जिहादी आतंकवादी संघटनेच्या कह्यात असलेल्या शहराला मुक्त करून त्यावर पुन्हा नियंत्रण मिळवले आहे. सिरियातील पालमिरा या ऐतिहासिक शहरामधून इसिसला हुसकावण्यात सिरियाच्या सैन्याला यश आले आहे. या लढाईत इसिसची मोठी मनुष्यहानी झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
    इसिसविरुद्धच्या या लढाईत रशियाने सिरियन सैन्याला हवाई पाठबळ पुरवले होते. पालमिरा शहर हे युनेस्कोने आंतरराष्ट्रीय वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. पर्यटकांचे मुख्य आकर्षण केंद्र असलेले हे शहर इसिसने मे २०१५ मध्ये कह्यात घेतले होते. 
     तथापि हे शहर जिहादी आतंकवाद्यांच्या कह्यात गेल्यानंतर त्यांनी तेथील टेम्पल ऑफ बेल हे २ सहस्र वर्षांपूर्वीचे मंदिर उद्ध्वस्त केल्याचे निदर्शनास आले. या मंदिरात फोनेशियन संस्कृतीच्या देवता असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही मंदिरे इस्लामच्या शिकवणुकीविरोधी असल्याची इसिसची भूमिका होती.

मुसलमानांचे विचार जगाच्या विचारांशी जुळत नाहीत ! - ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर

भारतातील ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी असे विचार कधीही व्यक्त करणार नाहीत; 
कारण असे विचार व्यक्त करणे म्हणजे धर्मनिरपेक्षतेचा विरोध करण्यासारखे !
      लंडन - लक्षावधी मुसलमानांची अशी विचारसरणी आहे की, ती आजच्या जगाशी जुळत नाही, असे विधान ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी केले आहे. ब्लेअर पुढे म्हणाले, इसिसला पराजित केले पाहिजे. त्याला ठेचलेच पाहिजे. यासाठी अरब सैन्याला अधिकाधिक साहाय्य केले पाहिजे. आतंकवाद्यांशी कुठेही सामना करून त्यांना पराजित करतील, इतकी सैैन्य क्षमता आपल्याला विकसित करावी लागेल. हे पाश्‍चात्त्यांसाठी आव्हान आहे.

भारताने बांधून दिलेल्या अफगाणिस्तानच्या संसदेवर रॉकेटद्वारे आक्रमण

      काबूल - भारताने बांधून दिलेल्या अफगाणिस्तानच्या संसदेच्या नव्या इमारतीवर २८ मार्चला सकाळी रॉकेट डागून आक्रमण करण्यात आले. अफगाणिस्तानच्या संसद सदस्यांना माहिती देण्यासाठी संरक्षण दलाचे अधिकारी संसदेच्या इमारतीत प्रवेश करत असतांनाच हे आक्रमण करण्यात आले. यात जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. संसदेची ही इमारत भारतानेच बांधून दिली होती. मार्च २०१५ मधे संसदेच्या या इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते.


खडकवासला जलाशय रक्षण मोहिमेची यशस्वी सांगता

जलाशय रक्षण मोहिमेत सहभागी कमिन्स इंडियाचे कर्मचारी आणि समितीचे कार्यकर्ते
     पुणे, २८ मार्च (वार्ता.) - धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी रंग खेळून खडकवासला जलाशयात उतरल्याने होणारे पाण्याचे प्रदूषण रोखले जावे, या उद्देशाने राबवण्यात आलेली खडकवासला जलाशय रक्षण मोहीम संपूर्ण यशस्वी झाली. रंगपंचमीच्या दिवशी (२८ मार्च) सायंकाळी ६ वाजता या मोहिमेची यशस्वी सांगता करण्यात आली. या मोहिमेच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि कमिन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या आस्थापनाचे अधिकारी, कर्मचारी जलाशयाभोवती मानवी साखळी करून उभे होते. 'नको प्रदूषित पाणी, नको धर्महानी, सण साजरा करूया आनंद घेऊनी', 'जर आज केली जलाशयाची हानी, उद्या पत्करावी लागेल आणीबाणी', 'स्वच्छ आणि निर्मळ पाणी म्हणजे जीवन' अशा प्रबोधनात्मक घोषणा असलेले फलक कार्यकर्त्यांनी हातात धरले होते. 

व्यष्टी साधनेत सातत्य ठेवून भावपूर्ण सेवा करणारे मिरज येथील श्री. महादेव जाधवकाका (वय ६४ वर्षे) !

श्री. महादेव जाधव यांचा सत्कार करतांना (डावीकडे) पू. जोशीआजोबा
     श्री. महादेव जाधव (वय ६४ वर्षे) हे मिरज केंद्रातील साधक आहेत. ते आधी शिक्षक होते. काका वर्ष १९९८ मध्ये साधनेत आले. ते ४ - ५ वर्षांपासून पूर्ण वेळ साधना करत आहेत. मला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.
१. सातत्य
     काका प्रतिदिन आश्रमात सकाळी पूजेसाठी फुले द्यायला येतात. यात कधीही खंड पडला नाही, तसेच ते फुले वेळेत आणून देतात.
२. सकारात्मक राहून भावपूर्ण सेवा करणे
     काका मिरज केंद्रातील एका विभागाची सेवा बघतात. त्यांना कधीही आणि कोणतीही सेवा सांगितली, तरी ते नकार देत नाहीत. एके दिवशी कोल्हापूरला विशेषांक पाठवायचे होते. उत्तरदायी साधकांनी ही सेवा काकांना सांगितली. तेव्हा काकांनी मला जमेल का ?, असा विचार न करता सेवा पूर्ण केली. त्या वेळी त्यांनी देवाने सेवा दिली आहे, तर तोच करवूनही घेईल, या भावाने सेवा केली.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना गद्दार म्हणणार्‍यांना हद्दपार करा ! - मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

चलवेनहट्टी (जिल्हा बेळगाव) येथे हिंदु धर्मजागृती सभा 
हिंदु धर्मजागृती सभेस उपस्थित ग्रामस्थ

 धर्मरथावर सेवा करणारे बालसाधक

     बेळगाव - सध्या देशात क्रांतीवीरांचा अवमान केला जात आहे. या संदर्भात संघटित होऊन खडसवायला हवे. काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा 'गद्दार' असा उल्लेख केला. अशांना राजकीय पटलावरून कायमचे हद्दपार करा, असे आव्हान श्री. मनोज खाडये यांनी येथील चलवेनहट्टी येथे आयोजित केलेल्या सभेत केले. १३ मार्च २०१६ या दिवशी झालेल्या बेळगाव येथील हिंदु धर्मजागृती सभेतून प्रेरणा घेऊन चलवेनहट्टी येथील धर्माभिमानी युवकांनी स्वयंस्फूर्तीने आयोजित केलेल्या धर्मजागृती सभेत श्री. खाडये बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या सौ. शिल्पा कोठावळे याही उपस्थित होत्या. 

तीव्र पाणीटंचाईमुळे श्री काळाराम मंदिर संस्थानच्या वतीने पाणीबचतीचा संकल्प

     नाशिक - येथे तीव्र पाणीटंचाईची समस्या असल्याने श्री काळाराम मंदिर संस्थानच्या वतीने पाणीबचतीचा संकल्प करण्यात आला आहे, असे श्री महंत सुधीरदासजी महाराज यांनी सांगितले. 
     संस्थानच्या वतीने रामनवमी वासंतिक नवरात्रीनिमित्त काळाराम मंदिर न धुण्याचा निर्णय घेण्यात आला. केवळ गाभार्‍याची स्वच्छता करण्यात आली असून त्यासाठी मंदिरातील आडाच्या (विहिरीच्या) पाण्याचा वापर करण्यात आला. प्रतीवर्षी गुढीपाडव्यापासून रामनवमी कार्यक्रमास आरंभ होतो. यापूर्वी अग्निशमन दलाचे बंब मागवून मंदिराच्या परिसराची स्वच्छता करण्यात यायची. उत्सवापूर्वी मंदिर धुण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे; मात्र पाणीटंचाईअभावी त्याला फाटा देण्यात आला आहे. (आडाच्या पाण्याने मंदिराचीही स्वच्छता करता आली नसती का ? - संपादक)

जळगाव येथे शिवजयंती उत्साहात साजरी !

प्रबोधनात्मक फलक
      जळगाव - २६ मार्च या दिवशी जळगाव येथे विविध संघटनांच्या वतीने तिथीनुसार शिवजयंती साजरी केली. या शिवजयंतीच्या निमित्ताने विविध संघटनांनी मिरवणुकांचेे आयोजन केले होते. यामध्ये शिवसेना, स्वराज्य निर्माण सेना, श्री गुरुदेव दत्त उत्सव समिती यांनी मिरवणुकांचे आयोजन केले होते. यामध्ये लेझीम पथक, ढोल पथक, गोफ पथक, छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी, सिंहासनावर आरुढ छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, तसेच छत्रपती शिवाजी महाराज, जिजाबाई आणि मावळे यांची वेशभूषा केलेले खडके चाळ येथील बालगोपाल सहभागी झाले होते. स्वराज्य निर्माण सेनेच्या वतीने प्रबोधनपर फलक मिरवणुकीमध्ये ठेवले होते. त्यामध्ये हिंदु संस्कृतीनुसार आचरण करण्याविषयीचे, देशाच्या विरोधात बरळणार्‍यांचा धिक्कार करण्याच्या दृष्टीने फलक लावले होते. या मिरवणुकांना मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.
     स्वराज्य निर्माण सेनेच्या वतीने लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा असे शिवकालीन युद्धकलेचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर आरोपपत्र दाखल

     मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या कारवाई पाठोपाठ आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही आरोपपत्र दाखल केले. मुंबई विद्यापीठ सेंट्रल लायब्ररीतील घोटाळ्याच्या प्रकरणी हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. १७ सहस्र ४०० पानांच्या या आरोपपत्रात छगन भुजबळ आणि त्यांचे लेखापरीक्षक (सीए) रवींद्र सावंत यांच्यासह सात जणांच्या नावांचा समावेश आहे. (भ्रष्ट नेते आणि अधिकारी यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना आजन्म कारावासात टाकायला हवे ! - संपादक) महाराष्ट्र सदनासह अन्य आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांमध्ये अटकेत असलेले छगन भुजबळ सध्या आर्थर रोड कारागृहातील 'अंडासेल'मध्ये आहेत.

इसिसशी लढणे हे विश्‍वकल्याणाचे कार्य ! - श्री. मिलिंद धर्माधिकारी

आंबेगाव (जिल्हा पुणे) येथे हिंदु धर्मजागृती सभा 
डावीकडे श्री. संदेश कदम आणि श्री. मिलिंद धर्माधिकारी
      अवसरी (ता. आंबेगाव, जि. पुणे) - संपूर्ण विश्‍वभर जिहादी इस्लामिक राज्य स्थापन करणार्‍यांच्या विरोधात लढण्याची भाषा केल्यास कथित मानवतावादी गळे काढतात. युद्ध आणि लढाई मानवतेच्या विरोधात असल्याचे सांगणार्‍या या कथित मानवतावाद्यांना इसिसच्या आतंकवाद्यांकडून निष्पापांच्या केल्या जाणार्‍या हत्या मानवताविरोधी वाटत नाहीत का, असा परखड प्रश्‍न उपस्थित करून हिंदु जनजागृती समितीचे श्री. मिलिंद धर्माधिकारी यांनी इसिसशी लढणे हे विश्‍वकल्याणाचे कार्य असल्याचे प्रतिपादन केले. येथील समस्त ग्रामस्थ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बाजारतळ येथे शिवजयंतीच्या दिवशी हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. समितीचे श्री. संदेश कदम यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. सर्वश्री चंद्रकांत हिंगे, अवसरीचे उपसरपंच अशोक हिंगे, माजी ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र टाव्हरे, रमाकांत हिंगे, शिवसेनेच्या सौ. मनिषाताई फल्ले आदी मान्यवरांसह २५० हून अधिक धर्माभिमानी हिंदु धर्मजागृती सभेला उपस्थित होते.

आता दूरध्वनीवरूनही रेल्वेचे आरक्षित तिकीट रहीत करता येणार !

     नवी देहली - १ एप्रिलपासून दूरध्वनीवरूनही रेल्वेचे आरक्षित तिकीट रहीत करता येणे शक्य होणार आहे. यासाठी संबंधित प्रवाशांना १३९ क्रमांकावर दूरध्वनी करावा लागणार आहे. प्रवाशांनी आरक्षित तिकिटाची संपूर्ण माहिती दिल्यानंतर त्यांना एक पासवर्ड दिला जाईल. प्रवाशांनी त्याच दिवशी तिकीट खिडकीवर जाऊन तो 'पासवर्ड' सांगितल्यानंतर तिकिटाचे पैसे परत मिळणार आहे, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.

विधानसभेत विरोधकांचा सभात्याग

मंत्रालयासमोर शेतकर्‍याने आत्महत्या केल्याच्या प्रकरणी सभागृहात गदारोळ 
     मुंबई, २८ मार्च - नांदेड येथील माधव कदम या शेतकर्‍याने मंत्रालयासमोर केलेली आत्महत्या ही राज्यासाठी लाजिरवाणी गोष्ट असून त्या शेतकर्‍याला सभागृहात श्रद्धांजली वाहिली पाहिजे, तसेच या विषयावर चर्चा करून न्याय दिला पाहिजे, या मागणीसाठी विधानसभेत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी गदारोळ करत सभात्याग केला. 

नंदुरबार येथे प्रथमच शिवजयंतीनिमित्त विराट शोभायात्रा

सहस्रो युवकांचा सहभाग
       नंदुरबार - येथे शिवजयंती साजरी करण्यासाठी भाजपचे श्री. विजय चौधरी, शहराध्यक्ष श्री. मोहन खानवानी, विश्‍व हिंदू परिषदेचे श्री. रवींद्र पवार, शिवसेनेचे डॉ. विक्रांत मोरे, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी १५ दिवसांपासून बैठका घेत प्रयत्न केले. होळीच्या वेळेस दोन दिवस दंगल झाली होती. त्याचा तणाव असल्यामुळे प्रत्यक्ष शिवजयंतीच्या दिवशीही पोलीस प्रशासनाने अनुमती दिलेली नव्हती; पण शोभायात्रा काढायचीच, या जिद्दीवर मंडळांनी प्रयत्न केले. विजय चौधरी यांनी बाजू लावून धरली. त्यामुळे २६ मार्च या दिवशी सकाळी ११ नंतर पोलिसांनी मिरवणुकीला अनुमती दिली.

चवदार तळ्याचे पूजन आणि अन्य सूत्रे यांवरून विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित

सभागृहाचे कामकाज वारंवार बंद पाडणारे लोकप्रतिनिधी जनतेची कामे कधी तरी करतील का ? 
आमदार श्री. भरत गोगवले
मुंबई, २८ मार्च - चवदार तळ्यावर शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी केलेले जलपूजन, मंत्रालयासमोर शेतकर्‍याने केलेली आत्महत्या, फर्ग्युसन विद्यापीठात 'जय भीम'च्या घोषणा देणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा, अकोल्यात धम्म परिषदेच्या कार्यक्रमातील मान्यवरांवर आक्रमण इत्यादी विषयांवर शासनाने भूमिका स्पष्ट करावी, या मागणीसाठी विरोधी पक्षांनी आग्रही भूमिका घेतली. परिणामी सभागृहात झालेल्या गोंधळामुळे विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.
     विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, महाड येथील चवदार तळ्यावर आमदार भरत गोगावले यांनी पूजन न करता शुद्धीकरण केले आहे. राज्याला आणि देशाला काळीमा फासणारी घटना आहे. अस्पृश्यता दूर करण्याचे काम ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले, त्यांच्या १२५ व्या जयंती वर्षी ही घटना घडणे म्हणजे राष्ट्रपुरुषांसह आंबेडकरी चळवळीचा अवमान आहे. शासनाने जाहीर क्षमा मागावी.

नंदुरबार येथे दंगलग्रस्त भागात शिवजयंती साजरी !

शिवजयंती उत्सवात सहभागी महिला
      नंदुरबार - गेल्या आठवडयात येथे सलग २ दिवस माळीवाड्यात दंगल झाली. त्या माळीवाड्यातील महिलांनी पुढाकार घेऊन शिवजयंती साजरी केली. या वेळी १०० महिला उपस्थित होत्या. हिंदूंच्या प्रत्येक सणाच्या पार्श्‍वभूमीवर दंगली घडवू पहाणार्‍या धर्मांधांचा डाव या महिलांनी उधळला.

स्वधर्म आणि स्वभाषा यांच्यामुळे मुसलमान जगभर दबाव आणू शकतात, तर स्वधर्म अन् स्वभाषा सोडल्यामुळे जगात काय भारतातही हिंदूंची किंमत शून्य झाली आहे !

फलक प्रसिद्धीकरता

अल्पसंख्यांकांकडून बहुसंख्य हिंदूंवर किती दिवस अत्याचार होत रहाणार ?
१. महाराष्ट्रातील नंदुरबार येथे २ धर्मांधांनी एका अल्पवयीन हिंदु विद्यार्थिनीची छेड काढल्याने दंगल झाली.
२. उत्तरप्रदेशच्या मैनपुरी जिल्ह्यातील नगला रामसिंह गावात हिंदूंच्या धर्मांतराला विरोध करणार्‍या हिंदूंवर धर्मांध ख्रिस्त्यांनी आक्रमण केले.


हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Nandurbar, Maharashtrame dharmandhone Hindu ladkiko chednese danga. Mainpuri, UPme bhi Isaiyonka Hinduopar akraman. - Kya ye Asahishnuta nahi ?
जागो !
नंदुरबार, महाराष्ट्र में धर्मांधों ने हिन्दू लडकी को छेडने से दंगा. मैनपुरी (उत्तरप्रदेश) में भी ईसाइयों का हिन्दुआें पर आक्रमण. - क्या ये असहिष्णुता नहीं ?
चार दिवसीय संरक्षण प्रदर्शनाला नाकेरी, बेतूल (गोवा) येथे शानदार प्रारंभ

संरक्षणमंत्री पर्रीकर यांच्या हस्ते 'डिफेन्स प्रोक्युरमेंट प्रोसिजर' योजना कार्यान्वित 
     पणजी - नाकेरी, बेतूल येथे चार दिवसीय संरक्षण प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय संरक्षणमंत्री मा. मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते एका शानदार सोहळ्याद्वारे करण्यात आले. या प्रसंगी व्यासपिठावर केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु, केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार) श्रीपाद नाईक, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री राव इंद्रजित सिंग, गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. या प्रदर्शनामध्ये ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, इजिप्त, फीनलँड, फ्रान्स, जर्मनी, इस्रायल, जपान, रशिया, स्विडन, इंग्लंड आणि अमेरिका या प्रमुख देशांसह ४७ देशांतील १ सहस्र ३५ आस्थापनांनी सहभाग घेतला आहे. हा सहभाग आयोजकांच्या अपेक्षेपेक्षा २५ टक्के जास्त आहे. यामध्ये देशातील ५१० आस्थापनांनी सहभाग घेतला आहे. हा आकडाही मागील प्रदर्शनाच्या तुलनेत सुमारे दुप्पट आहे. या वेळी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर म्हणाले, 'डिफेन्स प्रोक्युरमेंट प्रोसिजर' (डीपीपी) योजनेमुळे 'मेक इन इंडिया' संकल्पना पुढे नेण्यास हातभार लागण्याबरोबरच संरक्षणविषयक उत्पादने जलदगतीने मिळवण्यास साहाय्य होणार आहे.

(म्हणे) 'पुण्यात कन्हैया कुमारच्या कार्यक्रमाला कुलगुरूंनी अनुमती नाकारल्यास सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम करणार !' - विद्यार्थी संयुक्त मंच

देशविरोधी घोषणा देणार्‍यांचे उदात्तीकरण रोखण्यासाठी शासन काही कृती 
करणार का ? अशा प्रकारच्या देशविरोधी प्रवृत्तींना आळा बसण्यासाठी 'हिंदु राष्ट्र' आवश्यक ! 
     पुणे, २८ मार्च - 'जेएनयू'च्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारच्या कार्यक्रमाला कुलगुरूंनी विद्यापीठ आणि शैक्षणिक परिसरात अनुमती नाकारल्यास आम्ही सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम आयोजित करू. आम्हाला त्याचे विचार ऐकण्याचा हक्क आहे. त्यामुळे कन्हैया कुमारला आम्ही पुण्यात बोलावणारच, असे प्रतिपादन विद्यार्थ्यांच्या 'संयुक्त मंचा'च्या सदस्यांनी पत्रकार परिषदेत केले. या वेळी राकेश शुक्ला, लक्ष्मण खोत, हर्षल लोहकरे, भूषण राऊत आणि कल्याणी माणगावे आदी विद्यार्थी उपस्थित होते. 

नाथांच्या वाड्यातील पवित्र रांजण भरला

     पैठण, २८ मार्च - २५ मार्चला तुकारामबीजच्या शुभमुहूर्तावर नाथांच्या पवित्र रांजणामध्ये गोदावरीचेे अमृतमय जल टाकण्यात प्रारंभ झाला होता. हा रांजण आज २८ मार्चला सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास औरंगाबाद येथील नाथभक्त श्रीराम भगवंतराव कुलकर्णी यांच्या हस्ते भरला. भगवान श्रीखंड्या म्हणून त्यांचा नाथवंशज रघुनाथ बुवा पांडव पालखीवाले यांनी विधीवत् सत्कार केला. 
     २८ मार्चला दुपारी १२.३० वाजल्यापासून प्रतिष्ठान नगरीच्या चारही दिशांहून भानुदास एकनाथांचा गजर करत असंख्य दिंड्या येत आहेत. मंगळवार, २९ मार्चला मानाच्या दिंडीचे आगमन होणार असून तिच्या स्वागताची जय्यत तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. 

पैठण (जिल्हा संभाजीनगर) येथील संत एकनाथ महाराजांच्या काळातील देवतांच्या जागृत मूर्ती आणि चैतन्यमय वस्तू

आज संत एकनाथषष्ठी !
     संत ज्ञानेश्‍वरांच्या नंतर सुमारे २५० वर्षांनी संत एकनाथांचा जन्म झाला. अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती. यवनांचे राज्य होते. याच दरम्यान विजयनगरचे हिंदु साम्राज्य बुडाले होते. स्वधर्म, स्वराष्ट्र, स्वराज्य यांविषयी सर्वत्र अज्ञानाचे वातावरण होते. कर्मकांड, कर्मठपणा यांवर अधिक भर होता. भर दिवसा स्त्रिया बाटवल्या जात होत्या. धर्मावर अत्याचार होत होता. अशा बिकट समयी नाथांनी समाज सुधारण्यासाठी जगदंबेला साद घातली. बये दार उघड असे म्हणत नाथांनी भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली. संत एकनाथ हे संतकवी होते. रंजन आणि प्रबोधन करत अध:पतित समाजाला त्यांनी सन्मार्गावर आणले, महाराष्ट्राचा पुरुषार्थ जागवला. एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे. फाल्गुन कृष्ण पक्ष षष्ठी, शके १५२१ (वर्ष १५९९) या दिवशी संत एकनाथांनी देह ठेवला आणि ते अनंतात विलिन झाले.
     अनेक रचना, अभंग, गवळणी असे स्फुट लेखन एकनाथांनी केले. एकनाथी भागवत हा त्यांचा ग्रंथ लोकप्रिय आहे. हे अतिशय प्रासादिक (व्यासकृत) काव्य आहे. नाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे ४० सहस्र ओव्या आहेत. त्यांचे रुक्मिणीस्वयंवर अत्यंत लोकप्रिय आहे. नाथांची दत्ताची आरतीही (त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा) प्रसिद्ध आहे. जातीभेद दूर करण्यासाठी यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.

छत्रपती शिवरायांचा आदर्श ठेवून हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याचा हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था यांसह धर्माभिमान्यांचा दृढ निश्‍चय !

संपूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा !
     २६ मार्च या दिवशी शिवजयंतीनिमित्त महाराष्ट्रात विविध ठिकाणी विविध शिवप्रेमी संघटना आणि हिंदू धर्माभिमानी यांकडून अत्यंत उत्साहामध्ये शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवामध्ये जनप्रबोधन करण्यासाठी ठिकठिकाणी सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना वक्ता म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. या वेळी छत्रपती शिवरायांचा आदर्श ठेवून हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचा दृढ निश्‍चय उपस्थित धर्माभिमानी आणि शिवप्रेमी संघटना यांच्याकडून व्यक्त करण्यात आला. सर्वांमध्ये शिवजयंतीच्या निमित्ताने उत्साह आणि आनंद जाणवत होता. हिंदु संस्कृतीनुसार तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करून महाराष्ट्रभरातील या मावळ्यांनी सर्वांपुढे आदर्श निर्माण केला आहे. अनेक ठिकाणी सनातनने प्रकाशित केलेल्या ग्रंथांचे, तसेच सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे प्रदर्शनही लावण्यात आले होते. तसेच क्रांतीकारक आणि राष्ट्र्रपुरुषांचे फ्लेक्स यांचेही प्रदर्शन लावले होते. अनेकांनी याचा लाभ घेतला. अनेक गावांमधील धर्माभिमान्यांनी गावात धर्मशिक्षण वर्ग चालू करण्याची मागणी केली.

नव्या विद्यापीठ कायद्यातील धोके !

     राज्यातील विद्यापिठे सध्या त्यांचे संचलन करणार्‍या १९९४ च्या कायद्याला अनुसरून चालू होती. सध्या त्या कायद्याला ३१ ऑगस्ट २०१५ पासून स्थगिती दिली आहे. नवा विद्यापीठ कायदा येणार म्हणून गेले ७ मास विद्यापिठांमध्ये संशोधन, अभ्यासक्रम, चाकरभरती असे अनेक निर्णय होत नाहीत. विद्यापिठांच्या कुलगुरूंना केवळ दैनंदिन कामकाज करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येत नाही. याचे मुख्य कारण, म्हणजे उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारावा, यासाठी राज्य शासन राज्यातील सर्व अकृषी विद्यापिठांसाठी लवकरच विद्यापीठ कायदा २०१५ आणणार आहे. यासाठी शासनाने डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. शासनाच्या म्हणण्यानुसार या कायद्यामध्ये पालटत्या काळानुसार शिक्षणक्षेत्रामध्ये आवश्यक असलेले पालट, सुधारणा आणि नाविन्यपूर्ण असे काही उपक्रम यांचा समावेश असणार आहे.

मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांचा फेब्रुवारी २०१६ मधील हिंदु जनजागृती समितीच्या प्रसारकार्याचा आढावा

१. मुंबई जिल्हा
१ अ. वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्रांतील समितीचा सहभाग 
१. ८ फेब्रुवारी २०१६ या दिवशी टी.व्ही. ९ महाराष्ट्र या मराठी वृत्तवाहिनीवर बुवाबाजीला कधी बसणार आळा ? या विषयावरील चर्चासत्रात हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र प्रवक्ता श्री. अरविंद पानसरे हे सहभागी झाले. 
२. २४ फेब्रुवारी २०१६ या दिवशी मी मराठी या मराठी वृत्तवाहिनीवर कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरातील प्रसाद महिला बंदिवानांनी बनवणे याविषयीच्या चर्चासत्रात हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र प्रवक्ता श्री. अरविंद पानसरे हे सहभागी झाले.

रत्नागिरी येथील धर्मजागृती सभेच्या सेवेतील धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांचा उल्लेखनीय सहभाग

१. हिंदु धर्मजागृती सभेसाठी धर्माभिमान्यांनी केलेले साहाय्य 
अ. रत्नागिरी येथे २० फेब्रुवारी २०१६ या दिवशी झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेत श्री. योगेश मुळ्ये यांनी विनामूल्य चित्रीकरणासह पडदा (स्क्रीन) लावला आणि पडद्यावरील चलचित्राखाली सनातनचे ग्रंथ आणि अन्य माहिती यांची तळपट्टी दाखवली. सभेत असा अभिनव प्रयोग पहिल्यांदाच करण्यात आला.
आ. अंबर हॉलचे श्री. सुहास ठाकूरदेसाई यांनी २० 10 आकाराची २ आणि अन्य मिळून १० होर्डिंग्ज् स्वखर्चाने छापून शहरात लावली. त्यांनी व्हॉटस् अ‍ॅप आणि लघुसंदेश पाठवण्याची सेवाही केली. 
इ. माजी आमदार आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री. बाळ माने यांनीही साहाय्य केले.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

गोप्रेमींनो, विषप्राशनाचा, तसेच उपोषणाचा शासनावर परिणाम होणार नाही, हे लक्षात घ्या !

     गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा आणि देशात गोमांसबंदी व्हावी, यांसाठी राजकोट (राजस्थान) येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात ८ गोप्रेमींनी विष प्राशन केले. यांपैकी हिंदाभाई वांबाडिया या गोप्रेमीचा मृत्यू झाला असून अन्य ७ जणांवर विषप्राशनाचा गंभीर परिणाम झाला.

अशी मागणी का करावी लागते ? शासनाकडून स्वत:हून कृती होणे अपेक्षित आहे !

     वर्ष २०१३ मध्ये उत्तरप्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये झालेल्या दंगलीवर आधारित मुझफ्फरनगर अभी बाकी है हा लघुपट (डॉक्युमेन्ट्री) काही धर्मांधांनी सिद्ध केला असून डाव्या विचारांच्या संघटनांच्या वतीने महाराष्ट्रात तो दाखवण्यात येत आहे. त्याच्यावर बंदी आणण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने १९ मार्च २०१६ या दिवशी महाराष्ट्राचे गृहनिर्माणमंत्री श्री. प्रकाश मेहता यांची भेट घेऊन केली.

साधकांनी कारागृहात राहून केलेली साधना

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
साधकांनी केलेल्या साधना, धर्म आणि राष्ट्र विषयक कविता 
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिकेच्या अंतर्गत आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना कशी केली, हे पहात आहोत. आज साधकांना कारागृहात असतांना स्फूरलेल्या कविता येथे पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

साधकांसाठी महत्त्वाची सूचना

कोणत्याही जिज्ञासूने पूर्वी प्रकाशित केलेल्या 
सनातनच्या ग्रंथांची मागणी केल्यास त्या विषयाचे नव्याने 
विभाजित केलेले ग्रंथ त्यांना तत्परतेने उपलब्ध करून द्या !
१. पृष्ठसंख्या अधिक असलेल्या ग्रंथांचे 
विभाजन करून त्यांच्या नावात पालट करण्यात येणे
        वर्ष १९९५ पासून आतापर्यंत सनातन संस्थेने धर्म, साधना, राष्ट्ररक्षण, आयुर्वेद आदी विषयांवरील २८४ ग्रंथ आणि लघुग्रंथ यांच्या १५ भाषांमध्ये एकूण ६३ लाख ७६ सहस्र प्रती प्रकाशित केल्या आहेत. यांतील अनेक ग्रंथांत त्या विषयाशी संबंधित नवीन माहिती, अध्यात्मशास्त्रीय ज्ञान आदींची भर पडल्याने त्या ग्रंथांची पृष्ठसंख्या बरीच वाढली आहे. यामुळे अशा ग्रंथांचे विषयांनुसार विभाजन करून त्यांंच्या नावांत पालट करण्यात आला आहे. ग्रंथांचे विभाजन केल्यामुळे ग्रंथ सुटसुटीत होऊन सर्वसामान्य वाचकाला ते आर्थिकदृष्ट्याही परवडणार आहेत, तसेच असे ग्रंथ इतरांना भेट देणे किंवा त्यांचे प्रायोजक बनवणेही सोयीचे होणार आहे.

सौ. अभया उपाध्ये यांना प.पू. गुरुदेवांप्रती वाटलेली कृतज्ञता आणि शिकायला मिळालेली सूत्रे !

सौ. अभया उपाध्ये
       मुलाला पडलेल्या स्वप्नामुळे आपत्काळाची तीव्रता लक्षात येणे आणि या काळात प.पू. गुरुदेव करत असलेल्या रक्षणाविषयी कृतज्ञता वाटणे : माझा मुलगा कु. अथर्व उपाध्ये याला रात्री २.३० वाजता स्वप्न पडले. स्वप्नात त्याला पुढील दृश्य दिसले, नव्या मुंबईत ९ रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. सगळ्या इमारती पडल्या आहेत. त्या वेळी आम्ही बाहेरगावी गेलो होतो. आम्ही रहात असलेल्या एफ् विंगमधील तिसर्‍या माळ्यापर्यंत इमारत आहे. बाकी सर्व इमारती भूकंपामुळे पडल्या आहेत. चारचाकी आणि दुचाकी वाहने त्या भागात नसल्याने त्यांनाही काही झाले नव्हते. केवळ एक दुचाकी पडली होती. बाकी सर्व इमारतींतील वाहने चेपली होती. सर्वत्र प्रेते पडली होती. ९० टक्के लोक अपघातग्रस्त झाले होते.
        सकाळी उठल्यावर अथर्व मला स्वप्नाविषयी सांगत होता. आपत्काळात गुरुदेवच साधकांची काळजी घेणार आहेत. ते आपल्याला आपत्काळाविषयी सांगत आहेत; पण आपण त्यांच्या चरणांशीच रहायचे आहे, असे मला वाटले. या प्रसंगातून मुलालाही साधनेचे महत्त्व पटले. आपण साधना करतो; पण गुरुदेव आपल्या सर्व कुटुंबावर कृपा करत आहेत, याविषयी कृतज्ञता वाटली.

असा झाला पू. स्वातीताईंच्या सद्गुरुपदी विराजमान होण्याचा भावानंद सोहळा आणि संत अन् साधक यांनी मनोगतातून घडवलेले पू. (कु.) स्वातीताईंमधील सुंदर गुणमोत्यांचे दर्शन !

        साधकांना साधनेतील प्रगतीची आनंदवार्ता अनपेक्षितपणे देऊन अचंबित करणार्‍या सनातनच्या पू. (कु.) स्वाती खाडये यांना २३.९.२०१५ या दिवशी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी अचंबित केले. निमित्त ठरले ते पू. स्वातीताईंनी सद्गुरुपदी विराजमान होण्याचे ! नाशिक येथील सिंहस्थपर्वात आज एक संत - हरिगिरी महाराज येणार; म्हणून साधकांनी भावपूर्ण सिद्धता केली. संतांचे आगमन होण्यापूर्वी पू. (कु.) स्वातीताई यांनी गुरुमाऊलींची मानसपूजा करवून घेतली. या वेळी उपस्थित सर्वच साधकांना गुरुमाऊलींचे अस्तित्व जाणवणे, भाव दाटून येणे, अशा प्रकारच्या अनुभूती आल्या. तेव्हा याचे गुपित पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी उलगडले. सर्व साधकांमध्ये भाव निर्माण करून सिंहस्थपर्वाचे यशस्वी आयोजन करणार्‍या पू. (कु.) स्वातीताई सद्गुरुपदी विराजमान झाल्याचे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी घोषित केल्याचे पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी सांगितले. सनातनच्या संत पू. (कु.) स्वाती खाडये यांची गुरुपौर्णिमेला ७७ टक्के आध्यात्मिक पातळी होती. त्यांच्या तळमळीच्या प्रयत्नांमुळे केवळ ३ मासांतच ती वाढून ८० टक्के झाली. ही सुवार्ता ऐकताच पू. ताईंसह सर्व साधक भावानंदाने न्हाऊन निघाले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी व्यष्टी साधनेसंदर्भात सांगितलेली मार्गदर्शक सूत्रे

प्रश्‍न : शेकडो वेळा स्वयंसूचना दिल्यावर स्वभावदोष जातो. असे असतांना सर्व साधकांनी दिवसातून स्वयंसूचना सत्रे करण्यासाठी किती वेळ द्यायला हवा ?
प.पू. डॉक्टर : २ - ३ घंटे !
प्रश्‍न : दिवसभरात अनेक प्रार्थना करतो. त्यामध्ये सर्वांत जास्त महत्त्व कोणत्या प्रार्थनेला देऊन ती प्रार्थना करायला हवी ?
प.पू. डॉक्टर : जे तीन स्वभावदोष निवडले आहेत, ते जाण्यासाठी प्रार्थना करावी. तो दोष दूर करण्यासाठी मानसिक स्तरावर स्वयंसूचना दिल्यामुळे आणि आध्यात्मिक स्तरावर केलेल्या प्रार्थनेमुळे देवाकडून साहाय्य मिळून दोष पटकन दूर होतो.
- कु. गायत्री बुट्टे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

सनातनचे पू. रमेश गडकरीकाका यांची माघ शुक्ल पक्ष द्वितीया (१०.२.२०१६) या दिवशी झालेली विचारप्रक्रिया

१. आपत्काळाची स्वप्ने पडण्याचे प्रमाण वाढूनही ईश्‍वरच 
आपले रक्षण करणार आहे, असा विचार स्वप्नातसुद्धा मनात असणे 
पू. रमेश गडकरी
         सध्या स्वप्ने पडण्याचे प्रमाण वाढले आहे. या स्वप्नांमध्ये आपत्काळाची स्वप्ने अधिक प्रमाणात असतात. प्रत्येक वेळी धर्मांधांच्या घोळक्यात आपण एकटेच सापडलो आहोत, अशा प्रकारची स्वप्ने असतात. ठिकाण वेगवेगळे असते; पण त्या वेळी मनात भीती नसते, तर ईश्‍वर आपल्यासमवेत असून तोच आपले रक्षण करणार आहे, असा विचार मनात असतो.
२. स्वतःतील रजोगुण अल्प झाल्याचे वाटणे
        पूर्वी जसे एक एक सेवा लवकर संपवून दुसरी सेवा करूया, असे वाटायचे, तसे आता न वाटता प्रत्येक सेवा परिपूर्ण अन् अजून चांगली कशी करता येईल ?, सेवेत अजून काय करता येईल ?, असा विचार अधिक असतो. रजोगुण अल्प झाला आहे, असे वाटते.

दैवी प्रवासामागील रहस्य !

महर्षींची शिकवण आणि कार्य ! 
पू. (सौ.) अंजली गाडगीळ
 पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांचे तीर्थयात्रेतील अनुभव
महर्षींनी विविध नाडीवाचनांतून आम्ही 
करत असलेल्या दैवी प्रवासामागील रहस्य अनेक 
उदाहरणांतून स्पष्ट करणे आणि त्यातील काही सूत्रे
१. आध्यात्मिक शक्ती काय असते, हे दाखवण्याची वेळ आता जवळ आली आहे. तुझा (पू. सौ. अंजली गाडगीळ यांचा) प्रवास हा त्यासाठीच आहे. अध्यात्माची पुनर्स्थापना करण्यासाठी हा प्रवास आहे.
२. अध्यात्माला मानणार्‍या लोकांचे रक्षण करण्यासाठी हा प्रवास आहे.
३. पुढे अनेक नैसर्गिक आपत्ती येतील. भूकंप, वीज, अतीवृष्टी असे होत असतांना तुझा प्रवास हा दुष्प्रवृत्तींच्या निर्मूलनासाठी आहे.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

हरि ॐ तत्सत

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
हे असे आहे का ? ते तसे आहे का ? हे असेही नाही, तसेही 
नाही. ते कशात नाही ? मग ते असेही आहे आणि तसेही आहे.
भावार्थ : हे असे आहे का ? मधील हे मायेविषयी आहे. ते तसे आहे का ? मधील ते ब्रह्मासंबंधी आहे. हे असेही नाही, तसेही नाही, म्हणजे म्हटले तर ही म्हणजे माया, असेही नाही म्हणजे दिसते तशी नसून ब्रह्म आहे आणि तशीही नाही म्हणजे ब्रह्म म्हटले तर ब्रह्मस्वरूपातही नाही. ते कशात नाही ? म्हणजे ब्रह्म सर्वत्र आहे, मायेतही आहे. मग ते असेही आहे आणि तसेही आहे म्हणजे माया व ब्रह्म दोन्ही एकच आहेत.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     कुठे विदेशातून येऊन भारतावर राज्य करणारे मुसलमान आणि ख्रिस्ती, तर कुठे स्वातंत्र्यापासून आतापर्यंत भारतातील असूनही भारतावर राज्य करता न येणारी आतापर्यंतची शासने ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

चुकांकडे कसे पहावे ?
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     इतरांच्या चुका दाखवणे सोपे असते; पण इतरजन सुधारावेत, असे खरोखरच वाटत असेल, तर नुसत्या चुका न दाखवता त्या कशा सुधारायच्या, तेही सांगावे ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

आसामची निवडणूक

संपादकीय 
      आसाम, पश्‍चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुका घोषित झाल्या आहेत. अन्य राज्यांमध्ये भाजपला विशेष काही हातात लागण्यासारखे नसले, तरी आसाम राज्यात सहकारी पक्षांसह शासन स्थापन होऊ शकते, अशी भाजपला आशा आहे. आसाम राज्यात गेल्या १५ वर्षांपासून काँग्रेसचे शासन आहे. काँग्रेसच्या राजवटीत बांगलादेशातून सातत्याने होत असलेली घुसखोरी, घुसखोरांमुळे निर्माण झालेले जटील प्रश्‍न, स्थानिक प्रश्‍नांवर काँग्रेसची बोटचेपी भूमिका, ३४ प्रतिशतहून अधिक मुस्लिमांची सतत वाढणारी लोकसंख्या, अन्य राज्यांच्या तुलनेत आसामचा न झालेला विकास, स्वतंत्र बोडो लॅण्डसाठी होणारा रक्तरंजित संघर्ष, नक्षलवादाची समस्या, अशा अनेक समस्यांनी आसाम चिंताग्रस्त आहे. बांगलादेशी घुसखोरांची समस्या इतकी जटील झाली आहे की, आसाम दुसरा बांगलादेश होतो की काय, इतपत बिकट स्थिती आहे.

लोकराज्याची निरर्थकता !

संपादकीय
गेले आठवडाभर चाललेल्या नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर २७ मार्चला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी उत्तराखंड येथे राष्ट्रपती राजवट घोषित केली आहे. २६ मार्चला केंद्रीय मंत्रीमंडळाने राष्ट्रपती राजवटीवर निर्णय घेतला होता आणि अपेक्षेप्रमाणे राष्ट्रपतींनीही विशेष आढेवेढे न घेता त्यावर शिक्कामोर्तब केले. केवळ ६७ आमदार असलेल्या या राज्यात काँग्रेसकडे अन्य घटकपक्षांसह मिळून केवळ ३६ जागांचे काठावरचे बहुमत होते; मात्र त्यातील ९ आमदारांनी काँग्रेसची साथ सोडल्याने काँग्रेसचे शासन अल्पमतात आले. काँग्रेसकडे बहुमत नाही, हे लक्षात येताच ९ बंडखोर आमदारांना काँग्रेसच्या सभापतींनी अपात्र ठरवल्याने तेथील गुंतागुंत आणखीन वाढली. अरुणाचल प्रदेशापाठोपाठ उत्तराखंड येथील राजकीय घडामोडी पहाता, ज्याला आपण प्रगल्भ लोकराज्य म्हणतो ते हेच का ? असा प्रश्‍न निर्माण होत आहे. आमदारांच्या खरेदीचा आरोप, शासन बनवण्यासाठी सर्व त्या मार्गांचा अवलंब, आमदारांची पळवापळवी, राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी कोणत्याही थराला जाणे, हे सर्व पहाता लोकांच्या हितासाठी राज्य चालवण्यात कोणालाही रस नसून सर्वकाही सत्तास्थापनेसाठीच आहे, हे वारंवार सिद्ध होते. यातूनच लोकराज्याची निरर्थकता स्पष्ट होते !
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn