Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

एकात्मतेचा पाया रचत रामराज्य आणता येईल !

विजयादशमीच्या उत्सवात सरसंघचालक मोहन भागवत यांचा आशावाद !
नागपूर, २२ ऑक्टोबर - संपूर्ण मानवजातीचा विचार करण्याच्या मानसिकतेला आपल्याकडे धर्म म्हटले जाते. हिंदु धर्मात संयमाची शिकवण दिली आहे. शाश्‍वत विकास साधण्यासाठी एकात्मतेचा पाया रचत राजकीय, प्रशासकीय संतुलन राखावे लागेल, तेव्हाच आपल्या देशात रामराज्य आणता येईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी संघ मुख्यालयात झालेल्या विजयादशमीच्या कार्यक्रमात स्वयंसेवकांना संबोधित करतांना केले. संघाच्या विजयादशमी उत्सवात दरवर्षीप्रमाणे संचलन, शस्त्रपूजन यानंतर सरसंघचालकांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीयमंत्री श्री. नितीन गडकरी स्वयंसेवकाच्या गणवेशात उपस्थित होते.

सरकारीकरण कायदा सर्व धर्मियांसाठी लागू करा अन्यथा तो रहित करा ! - डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

     विशाखापट्टणम् - सरकारीकरण कायद्याअंतर्गत केंद्र आणि राज्य शासन केवळ मंदिरांचेच सरकारीकरण करत आहे. इतर धर्मियांची प्रार्थनास्थळे या कायद्यापासून मुक्त आहेत. ही दुहेरी नीती आहे. एकतर सरकारीकरण कायदा सर्व धर्मियांसाठी लागू करा अन्यथा तो रहित करा, अशी मागणी भाजपचे वरिष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केली आहे. ग्लोबल हिंदु हेरीटेज फाऊन्डेशन या संघटनेच्या वतीने आंध्र विश्‍वविद्यालयाच्या वाय.व्ही.एस्. मूर्ती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सरकारीकरण कायदा रहित करा या विषयावरील परिषदेत ते मुख्य वक्ते म्हणून बोलत होते. या कार्यक्रमास आमदार वेलागापुडी आणि पी. विष्णु शंकर राजू, भाजपचे नेते श्री. सुधीश रामभोताला, ग्लोबल हिंदु हेरीटेज फाऊन्डेशनचे संस्थापक श्री. वेलागापुडी प्रकाशराव, गझल गायक श्रीनिवास यांच्यासह भाजप, विश्‍व हिंदु परिषद आणि इतर हिंदु संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पेजावर मठाचे श्री विश्‍वेशातीर्थ स्वामी यांच्या सहकार्‍यांच्या वाहनांवर दगडफेक

गोहत्याबंदी कायद्याविषयी प्रबोधन करणार्‍या स्वामीजींच्या सहकार्‍यांच्या 
वाहनांवर दगडफेक करणारे कोण असतील, हे हिंदू जाणून आहेत !
     बेळगाव (कर्नाटक) - टिळकवाडी येथील श्रीकृष्ण मठाच्या प्रदर्शनी भागामध्ये उडुपी येथील पेजावर अदोक्षजा मठाचे श्री विश्‍वेशातीर्थ स्वामी यांच्या सहकार्‍यांनी ठेवलेल्या वाहनांवर अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक करून वाहनांची मोडतोड केल्याची घटना नुकतीच घडली. स्वामीजी गोहत्याबंदी कायद्याविषयी प्रबोधन करत असतात. त्यामुळे त्यांच्या वाहनांवर समाजकंटकांनी आक्रमण केले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी टिळकवाडी पोलिसांकडून स्वत:हून तक्रार दाखल करून घेण्यात आली असून अन्वेषण करण्यात येत आहे.

अमेरिकेनेच निर्माण केले अल्-कायदा आणि आय.एस्.आय.एस्. ! - जिनोम रिसर्च

     वॉशिंग्टन - मध्य-पूर्व आखाती देशांमध्ये फूट पाडून त्यांच्यावर सत्ता गाजवणे आणि इराणचा वाढता प्रभाव निपटणे, याकरता अमेरिकेनेच अल्-कायदा आणि आय.एस्.आय.एस्. या आतंकवादी संघटना निर्माण केल्या असून अमेरिका पूर्वीपासून आतंकवाद्यांना पाठीशी घालत आली आहे, असे वृत्त जिनोम रिसर्चने (जीआर्ने) प्रसिद्ध केले आहे. 
जिनोम रिसर्चने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात पुढे असे म्हटले आहे की,
१. शीतयुद्धाच्या काळात सीआयए या अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने आतंकवादी इस्लामी राष्ट्रांशी संबंध जोडले होते. त्या वेळी अमेरिकेने जगाचे दोन भाग पाडले होते. एका बाजूला रशिया आणि काही तटस्थ राष्ट्रे, तर दुसर्‍या बाजूला पाश्‍चात्त्य राष्ट्रे आणि आतंकवादी इस्लामी राष्ट्रे. या राष्ट्रांच्या साहाय्याने अमेरिकेने रशियाच्या विरोधातील लढा चालू ठेवला होता.

केरळमध्ये १० टक्के लोकांचे मानसिक संतुलन बिघडले !

मानसिक स्वास्थ्य लाभण्यासाठी साधनेविना पर्याय नाही, 
हे जाणून शासनाने जनतेला साधना शिकवावी !
     पलक्कड (केरळ) - साक्षरता आणि विकास यांविषयी आघाडीवर असलेल्या केरळमध्ये ३० लाखांपेक्षा अधिक लोकांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, असे केरळ राज्य मन:स्वास्थ्य प्राधिकरणाने एका अहवालात म्हटले आहे. हा आकडा केरळच्या एकूण लोकसंख्येच्या १० टक्के एवढा आहे. केरळमधील प्रत्येक पाचपैकी एक व्यक्ती मनोरुग्ण झाली आहे, असे या अहवालात म्हटले आहे. वर्ष २०११ मध्ये प्रसिद्ध झालेल्या सीआयटीच्या अहवालात केरळच्या एकूण लोकसंख्येपैकी ६ टक्के लोक सायकोसिस या मानसिक आजाराने पीडित असल्याचे म्हटले होते. केरळ राज्यातील मनोरुग्णांची सरासरी राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे, असे या अहवालात म्हटले आहे. (साम्यवाद्यांनी केरळमध्ये हिंदु धर्म संपवण्याचा प्रयत्न केला. त्याचे हे फलित होय ! - संपादक)

पंजाबमधील नियोजित ६वी जागतिक कबड्डी स्पर्धा रहित

गुरुग्रंथसाहिबच्या विटंबनेमुळे सहस्रावधी शीख शोकमग्न असतांना पंजाबमध्ये 
क्रीडा स्पर्धा भरवणे अनुचित ! - पंजाबचे क्रीडामंत्री सुखबीर बादल
चंडीगड - शिखांचा पवित्र धर्मग्रंथ गुरुग्रंथसाहिबच्या विटंबनेमुळे सहस्रावधी शीख शोकमग्न असतांना पंजाबमध्ये क्रीडा स्पर्धा भरवणे अनुचित आहे, असे सांगत पंजाबचे उपमुख्यमंत्री तथा क्रीडामंत्री सुखबीर बादल यांनी तेथील नियोजित ६वी जागतिक कबड्डी स्पर्धा रहित करण्याची घोषणा केली. गुरुग्रंथसाहिबची काही दिवासंपूर्वी विटंबना झाली. या घटनेच्या निषेधार्थ लुधियाना, अमृतसर, जालंधर आदी अनेक शहरांतील सहस्रावधी शीख रस्त्यावर उतरले असून सबंध पंजाब पेटले आहे. प्रतिदिन ठिकठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

भारताला प्रत्युत्तर देण्यासाठी आमच्याकडे छोटी अण्वस्त्रे !

भारताला चेतावणी देण्याचे पाकचे धाडस होणार नाही, असा धडा भाजप शासनाने
पाकला शिकवावा, अशी जनतेची अपेक्षा आहे !
पाकची भारताला चेतावणी
     वॉशिंग्टन - भारताचे कोल्ड स्टार्ट डॉक्ट्रिन आणि आक्रमणे यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही छोटी अण्वस्त्रे निर्माण केली आहेत, अशी चेतावणी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासह अमेरिकेच्या दौर्‍यावर असलेले परराष्ट्र सचिव एजाज चौधरी यांनी येथील पत्रकारांशी बोलतांना दिली. 
कोल्ड स्टार्ट डॉक्ट्रिन म्हणजे काय?
१. भारतीय सैन्य मोठे आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून आक्रमण झाल्यास त्वरीत प्रत्युत्तर देण्यासाठी लहान गट असावे, याकरता कोल्ड स्टार्ट डॉक्ट्रिनची योजना सिद्ध करण्यात आली होती. या कोल्ड स्टार्ट धोरणाच्या अंतर्गत सैन्य प्रत्युत्तरादाखल त्वरीत कारवाईचे धोरण आखते. भारताने असे ८ स्वतंत्र युद्ध गट सिद्ध ठेवले आहेत. त्यात कधीही प्रत्युत्तर देण्याची क्षमता आहे. 

काश्मीरमध्ये चकमकीत एक आतंकवादी ठार, दोन सैनिक घायाळ

आतंकवादग्रस्त भारत !
     श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात २१ ऑक्टोबरला पहाटे भारतीय सैनिक आणि आतंकवादी यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत सैनिकांनी एक आतंकवाद्याला ठार केले. या आक्रमणात २ सैनिक घायाळ झाले. सैन्याच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार बारामुल्ला जिल्ह्यातील तांगमार्ग भागातील कुंझेर येथे ही चकमक झाली. येथे आतंकवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सैनिक त्यांचा शोध घेत होते. त्या वेळी आतंकवाद्याने गोळीबार केल्याने २ जवान घायाळ झाले. अखेर आतंकवाद्याला ठार मारण्यात आले. त्याच्याकडून शस्त्रास्त्रांचा साठा जप्त करण्यात आला आहे. काश्मीरमध्ये नुकतेच पुँछ जिल्ह्यात पोलीस दलातून पळ काढून आतंकवादी कारवायांत सक्रीय झालेल्या दोघांना ठार मारण्यात आले होते.

इंग्लंडमध्ये हिंदूंकडून दसरा आणि दिवाळी सण साजरे !

     लंडन - इंग्लंडमधील मँचेस्टर शहरात १७ ऑक्टोबर या दिवशी इंग्लंडच्या उत्तर-पश्‍चिम भागातील ८ सहस्र हिंदूंनी शहरातील मध्य भागात असलेल्या अल्बर्ट चौकात एकत्र येऊन दसरा आणि दिवाळी हे सण आधीच साजरे केले. या वेळी हिंदूंकडून उत्स्फूर्तपणे कला, नृत्य, मेजवानी, संगीत आणि आतषबाजीचा आनंद लुटण्यात आला. हा उत्सव भारतीय संघटना आणि मँचेस्टर शहर पालिका यांनी संयुक्तरित्या आयोजित केला होता.
   या उत्सवाच्या प्रारंभी भांगडासारखे नृत्य कार्यक्रम झाले, तसेच कला आणि हस्तकलेच्या कार्यशाळांचेही आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भारतीय अन्नपदार्थ, कपडे, दागिने आणि इतर साहित्यांची विक्री करणारी दुकाने थाटण्यात आली होती. त्याचबरोबर सायंकाळी दिवे घेऊन मिरवणूक काढण्यात आली. मँचेस्टर येथील भारतीय संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती राजश्री दत्ता यांनी हा उत्सव आयोजित करण्यात पुढाकार घेतला होता.

(म्हणे) भारताचे मन उंदराचे आहे !

भाषण स्वातंत्र्याचा अपवापर करणारे लोकप्रतिनिधी ! अशांनी खुशाल पाकिस्तानात जावे ! 
जम्मू-काश्मीरचे आमदार रशीद यांचे राष्ट्रद्रोही विधान 
     नवी देहली - भारताचे मन उंदराचे आहे, असे राष्ट्रद्रोही विधान काश्मीरचे अपक्ष आमदार शेख अब्दुल रशीद यांनी पाकिस्तानच्या शासकीय रेडिओशी संवाद साधतांना केले आहे. काही दिवसांपूर्वी गोमांसाची मेजवानी दिल्यावरून आमदार रशीद यांना काश्मीरच्या विधानसभेत मारहाण करण्यात आली होती, तसेच ते देहलीत आले असतांना त्यांच्या चेहर्‍यावर हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकली होती.

कर्णावती येथे सनातन संस्थेवरील बंदीच्या मागणीच्या विरोधात प्रशासनाला निवेदन सादर

उपजिल्हाधिकारी डी.एम्. पटेल यांना
निवेदन सादर करतांना धर्मप्रेमी
     कर्णावती - सनातन संस्थेवर करण्यात येणार्‍या अन्यायाच्या विरोधात शहरातील मणिनगरमधील देना बँक चौक येथे १८ ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलनांतर्गत विविध धमर्र्प्रेमींनी आंदोलन केले. त्यानंतर प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. या प्रसंगी सनातन संस्थेचे श्री. चंद्रशेखर कद्रेकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पंकजभाई रामी आणि श्री. ध्रुव पंचाल यांनीही त्यांचे विचार व्यक्त केले.

सनातन संस्थेवरील बंदीच्या मागणीच्या विरोधात तमिळनाडू आणि गुजरात राज्यांत हिंदुत्ववादी एकवटले !

चेन्नई येथे विविध हिंदुत्ववादी संघटनांचा सनातन संस्थेला खंबीर पाठिंबा
चेन्नई येथील आंदोलनाच्या वेळी सहभागी झालेले
विविध हिंदुत्ववादी संघटनांचे धर्माभिमानी 
     चेन्नई - हिंदुविरोधी घटकांकडून सनातन संस्थेवर करण्यात येत असलेल्या बंदीच्या मागणीच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांकडून १७ ऑक्टोबर या दिवशी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला अनेक हिंदुत्ववादी संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. या वेळी शिवसेनेचे राज्यप्रमुख श्री. राधाकृष्णन्, समितीच्या सौ. उमा रविचंद्रन्, व्हिजिलनलाईनच्या संपादिका सौ. राधा राजन, यांनी उपस्थितांना संबोधित केले.
     या आंदोलनाला विवेकानंद परवईचे श्री. जलेन्द्रन्, हिंदु युथ अवेअरनेस फोरम्चे श्री. पाला संतोष, भारत हिंदु मुन्नानीचे श्री. आर्.डी. प्रभु, सौ. उमा आनंदन्, श्री. वेणूगोपाल, शिवसेनेचे श्री. यझुमलाई आणि श्री. करण, हिंदु मक्कल कत्छीचे श्री. कुमारवेल आदी सहभागी झाले होते.

लोंढा (कर्नाटक) येथे श्रीराम सेनेच्या सभेत सुमारे २०० धर्मांधांकडून दगडफेक !

श्रीराम सेनेच्या काही कार्यकर्त्यांना अटक
कर्नाटकातील काँग्रेसच्या राज्यात हिंदूंच्या सभेवर होणारी धर्मांधांची आक्रमणे, हे अराजकाचे द्योतक !
धर्मांधांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक शब्द वापरले !
   लोंढा (कर्नाटक), २२ ऑक्टोबर (वार्ता.) - लोंढा येथे श्रीराम सेनेने आयोजित केलेल्या धर्मजागरण सभेत एका वक्त्याच्या भाषणाच्या वेळी सुमारे २०० धर्मांधांनी दगडफेक चालू केली. (हिंदूंच्या सभेत धर्मांध येतात तरी कसे ? धर्मांधांच्या कार्यक्रमात हिंदू गेलेले कधी ऐकले आहे का ? - संपादक) त्यातून तणावाचे वातावरण निर्माण होऊन गावात दगडफेकीचे सत्र चालू झाले; मात्र पोलीस अधिकार्‍यांनी दोन्ही गटांना शांत करून परिस्थिती निवळण्यासाठी प्रयत्न केले. २१ ऑक्टोबर या दिवशी रात्री ८.३० वाजता ही घटना घडली. आता वातावरण निवळले, तरी गावात तणाव आहे. (शासनाने हिंदुत्ववाद्यांच्या सभेत आणि कार्यक्रमात धर्मांधांचे अडथळे येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, ही अपेक्षा - संपादक) सभेस पुरेसा पोलीस बंदोबस्त देण्यात आला नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी श्रीराम सेनेचे श्री. पंडित ओगले, श्री. मारुती सुतार यांच्यासह काही कार्यकर्त्यांना अटक केली आहे. या सभेत माजी आमदार श्री. प्रल्हाद रेमाणी, श्री. बाबुराव देसाई, श्रीराम सेनेचे पदाधिकारी श्री. रमाकांत कोंडुसकर यांची भाषणे झाली.

गड-किल्ले हेच महाराष्ट्राचे खरे वैभव ! - विनायक मेटे

     पुणे - गड-किल्ले हेच महाराष्ट्राचे खरे वैभव असून त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. युवा लेखकांनी इतिहास आणि गड-किल्ल्यांवर अधिक संशोधन अन् लेखन केल्यास महाराष्ट्राच्या आगामी पिढीला शिवरायांच्या आणि महाराष्ट्राच्या पराक्रमांची जाणीव होईल. यातूनच प्रत्येकामध्ये राष्ट्रभावना जागृत होण्यास साहाय्य होईल, असे मत आमदार श्री. विनायक मेटे यांनी व्यक्त केले. एका कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी मेटे म्हणाले, "समुद्रात शिवस्मारक बांधणे महत्त्वाचे असले, तरी महाराष्ट्राचे वैभव असलेल्या गड-किल्ल्यांचे संवर्धन होणे, ही काळाची आवश्यकता आहे."

हिंदूंना शिवछत्रपतींच्या मार्गाचा विसर पडल्यानेच दास्यत्व ! - पू. संभाजीराव भिडे (गुरुजी)

श्री दुर्गामाता दौडीची समाप्ती !
दौडीच्या समारोपप्रसंगी धारकर्‍यांना मार्गदर्शन
करतांना (वर्तुळात) पू. संभाजीराव भिडे (गुरुजी)
     सांगली, २२ ऑक्टोबर (वार्ता.) - छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्यांचे कार्य अतुलनीय होते. जोपर्यंत मराठे आणि हिंदु समाज शिवछत्रपतींच्या मार्गावर चालत होता, तोपर्यंत त्यांचा पराभव कोणी करू शकला नाही; मात्र जेव्हा हिंदूंना या मार्गाचा विसर पडला, तेव्हा आपण दास्यत्वात गेलो. आजही हिंदु समाजास शिवाजी-संभाजी हा मंत्रच तारू शकतो. तेच आपले कार्य आहे आणि हे कार्य संपूर्ण देशात न्यावयाचे आहे, असे मार्गदर्शन पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले. ते श्रीदुर्गामाता दौडीच्या समारोपप्रसंगी धारकर्‍यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. 

संगम पूल (पुणे) येथे किनार्‍यावर आढळून आल्या भग्नावस्थेतील गणेशमूर्ती !

गणेशमूर्ती विटंबनेचा आणखी एक प्रकार उघड ! 
विसर्जन न झालेल्या गणेशमूर्तींचे अवशेष (वर्तुळात)
    पुणे, २२ ऑक्टोबर (वार्ता.) - पर्यावरणरक्षणाच्या नावाखाली पुणे महानगरपालिकेने कृत्रिम हौद बांधून नागरिकांना गणेशमूर्तींचे हौदात विसर्जन करण्याविषयी उद्युक्त केले. या धर्मशास्त्रविरोधी भूमिकेमुळे झालेल्या गणेशमूर्तींच्या विटंबनेचे अनेक प्रकार उघडकीस येत आहे. अनंतचतुर्दशी होऊन तीन आठवडे उलटून गेल्यानंतरही पुणे स्थानक परिसरात असणार्‍या संगम पुलाच्या घाटावर अनेक गणेशमूर्ती भग्नावस्थेत पडल्याचे आढळून आले आहे. 

अमेरिकेला आध्यात्मिक पुनरुत्थानाची आवश्यकता !- बॉबी जिंदाल, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार

वाशिंग्टन - अलीकडे हिंसक चित्रपट आणि दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रम आदी मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहेत. त्यामुळे नैतिक अधःपतन रोखण्यासाठी अमेरिकेला आध्यात्मिक पुनरुत्थानाची आवश्यकता आहे, असे मत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या आगामी निवडणुकीतील रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार बॉबी जिंदाल यांनी ए.बी.सी. न्यूज धिस वीकशी बोलतांना व्यक्त केले.

भारताला हिंदु राष्ट्र घोषित करा ! - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

सनातनवर आरोप सिद्ध होण्याआधीच फासावर लटकवणे हा उरफाटा न्याय !
मुंबई - या देशाला हिंदु राष्ट्र घोषित करा आणि मग कोणाची गाय व्यायली आहे गाय कापायला, ते बघा, असे क्षात्रवृत्तीवर्धक ठाम प्रतिपादन विजयादशमीच्या शिवतीर्थावरील मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी केले.
हिंदुत्ववाद्यांविषयी बोलतांना ते म्हणाले, हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात कुभांड रचले जात आहे. सनातनच्या समीर गायवाडला पकडून त्याचा खटला चालू केला. सनातनवर बंदी घालयची तर अवश्य घाला, पण आमच्या प्रश्‍नाचे उत्तर द्या साध्वी आणि पुरोहित यांना किती वर्ष तुम्ही कारागृहात सडवत ठेवले आहे. त्यांचे खटलेही चालू करत नाही. हे सर्व दोषी असतील, तर त्यांना अवश्य फाशी द्या; परंतु ते निर्दोष सुटले, तर तुम्ही काय करणार आहात, त्याचेही उत्तर द्या.

सिंचन घोटाळ्याच्या प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची ५ घंटे चौकशी !

    अजित पवारांची चौकशी होत असतांना पुरोगामी (अधोगामी), निधर्मी, भारिप, प्रसारमाध्यमे सर्वच शांत आहेत. सनातनचे साधक समीर गायकवाड यांना संशयित म्हणून चौकशीसाठी कह्यात घेतले असतांना सनातनवर बंदी घाला, अशी ओरड करत राष्ट्रवादी काँग्रेससह या सर्वांनी कित्येक दिवस रान उठवले. आता एवढ्या मोठ्या घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची चौकशी होत असतांना या पक्षावर बंदी आणावी, असे म्हटल्यास चूक ते काय ?
मुंबई - कोकण जलसिंचन महामंडळाच्या कोंढाणे प्रकल्पातील घोटाळ्याच्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री तथा माजी जलसंपदामंत्री अजित पवार यांची २१ ऑक्टोबर या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरळी मुख्यालयात ५ घंटे चौकशी करण्यात आली. पुन्हा आवश्यकता भासल्यास सुनील तटकरे यांच्यासह या दोन्ही नेत्यांना एकाच वेळी चौकशीसाठी पाचारण केले जाणार आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे शासन असतांना सिंचनाच्या अनेक प्रकरणांत घोटाळा झाला. या प्रकरणी न्यायालयाने चौकशीचे आदेश दिल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्‍यांनी चौकशीचा फास आवळला आहे.

पाकिस्तानमध्ये सुरक्षेच्या कारणांवरून ४० मौलवींना अटक !

पाकचा हा केवळ देखावा आहे. पाकमधील आतंकवाद मौलवींच्या 
अटकेने थांबत नसतो, असा आजपर्यंतचा जगाचा अनुभव आहे.
लाहोर (पाकिस्तान) - मोहरमच्या पूर्वी सुरक्षेच्या कारणावरून पंजाब प्रांतातील जवळपास ४० मौलवींना पोलिसांनी अटक केली आहे. काही शहरांमध्ये असलेल्या प्रवेश बंदीचे उल्लंघन करणे, ध्वनीक्षेपकाचा अपवापर करणे, आक्षेपार्ह पत्रकांचे वितरण, भिंतींवर आक्षेपार्ह लिखाण करणे, शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन करणे, तसेच पाकिस्तानी कायद्याच्या कलम १४४ च्या इतर तरतुदींचे उल्लंघन केल्याचा आरोप या मौलवींवर लावण्यात आला आहे.

सनातन संस्थेवर होणारे खोटे आरोप आणि वस्तुस्थिती यांविषयी जाहीर जनसंवाद सभा

     कॉ. पानसरे हत्या प्रकरणी जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती, जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज, संत-महंत, हिंदुत्ववादी संघटना यांनी सनातन संस्थेला जाहीर पाठींबा दिला. यामध्ये मा. शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनीही पुढाकार घेत सनातनच्या पाठीशी उभे रहात हिंदुत्वविरोधकांचे तोंड बंद केले. या काळात तथाकथित पुरोगाम्यांकडून बेछूट आणि विद्वेषी आरोप करत सनातन संस्थेवर बंदीची मागणीही करण्यात आली. या खोट्या आरोपांमागील वस्तुस्थिती समाजाला कळावी, या हेतूने ठाणे आणि मुंबई येथे एका जाहीर जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

पुण्याचा कचरा टाकण्यासाठी जागेचा पर्याय द्या ! - उच्च न्यायालय

     मुंबई, २२ ऑक्टोबर - पुणे येथील कचरा टाकण्यासाठीची जागा अपुरी असल्याने अतिरिक्त जागा मिळावी, यासाठी पुणे महानगरपालिकेने वर्ष २०१० मध्ये शासनाच्या तिजोरीत ४ कोटी रुपये जमा केले. असे असतांनाही राज्य शासनाने महानगरपालिकेला पर्यायी किंवा अतिरिक्त जागा दिली नाही. (इतक्या वर्षात कचरा टाकण्यासाठी पर्यायी जागा न मिळणे, हे सर्वपक्षीय राज्यकर्त्यांसाठी लज्जास्पद ! - संपादक) पुणे शहराचा कचरा उरळी देवाची फुरसुंगी येथे टाकला जातो. तो पर्याय बंद केल्यास शहराची अवस्था काय होईल, याची कल्पना केली आहे का, असा प्रश्‍न उच्च न्यायालयाच्या खंडपिठाने राज्य शासनाला केला आहे. तरी महानगरपालिकेला कचरा टाकण्यासाठी अतिरिक्त किंवा पर्यायी जागा देण्याचा विचार करा, अन्यथा पुढील सुनावणीच्या वेळी तसे आदेश देऊ, असे न्या. अभय ओक आणि न्या. विजय अचलिया यांच्या खंडपिठाने म्हटले. पुणे महापालिकेला घनकचरा व्यवस्थापन, २००० मधील नियमांचे पालन किती कालावधीत करणार, हे स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र ३ आठवड्यांत सादर करण्याचे निर्देशही खंडपीठाने १९ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी दिले. (प्रत्येक गोष्टीत न्यायालयाने लक्ष द्यावयाचे असेल, तर प्रशासन हवेच कशाला ? - संपादक)

शिवप्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दुर्गादौडीत हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचा सहभाग


ध्वजाचे पूजन करतांना सौ. विभा चौधरी
     अमरावती - येथील शिवप्रतिष्ठान संघटनेच्या वतीने दुर्गादौडीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांनी सहभाग घेतला. स्थानिक श्री. महेश लडके आणि श्री. अभिषेक दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली दुर्गादौडीचे आयोजन झाले होते. शिवटेकडीवरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून दौडीला प्रारंभ झाला. नंतर समस्त कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्व यांच्या घोषणा देत दौडीमध्ये सहभागी झाले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधानसभा इमारतीचा पायाभरणी शुभारंभ

आंध्रप्रदेशची नवीन राजधानी 'अमरावती' 
     अमरावती (आंध्रप्रदेश) - आंध्रप्रदेशची नवीन राजधानी म्हणून 'अमरावती' या शहराची घोषणा करण्यात आली आहे. दसर्‍याच्या मुहूर्तावर २२ ऑक्टोबर या दिवशी विधासभा इमारत उभारण्यात येणार्‍या जागेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन करून पायाभरणी समारंभ पार पडला. या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, "शहरांचा विकास हे प्रत्येक राज्याने आव्हान न समजता त्याकडे संधी म्हणून पहायला हवे. आंध्रप्रदेश असो किंवा तेलंगण, दोघांचाही तेलगू हा समान धागा आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांचा एकमेकांच्या सहकार्याने विकास झाला पाहिजे." अमरावतीला देशातील लक्षवेधी शहर बनवण्याचा मानस असून हे शहर सर्व अद्ययावत सोयी-सुविधांनी समृद्ध असलेली देशातील सर्वोत्कृष्ट राजधानी बनेल, असा विश्‍वास मुख्यमंत्री चंद्राबाब नायडू यांनी व्यक्त केला.

सनातनवरील संभाव्य बंदीच्या विरोधात मान्यवरांच्या प्रतिक्रिया

श्री. समीर गायकवाड यांचे प्रकरण म्हणजे हिंदु धर्म संपवण्यासाठी पुरोगाम्यांनी उचललेला विडा !
 - श्री. किरण कुलकर्णी, शिवसेना शहरप्रमुख, कागल (जिल्हा कोल्हापूर)
श्री. किरण कुलकर्णी
     सनातन संस्था ही हिंदु धर्मियांसाठी आदर्श धर्मप्रचारक आणि धर्मप्रसारक संघटना म्हणून जगभरात नावारूपाला आलेली आध्यात्मिक संघटना आहे. आपल्या धर्मातील प्रथा, परंपरा आणि इतर सर्व धार्मिक विधी अन् सणांचे मानवाच्या जीवनासाठी किती कल्याणकारी महत्त्व आहे, हे सांगणारी आपली संस्कृती जपणारी सनातन संस्था ! सर्व हिंदूंनी अभिमानाने हिंदु धर्माची सेवा करावी, अशीच मानवताप्रेमी आणि निसर्गप्रेमी शिक्षण देणारी संस्था आहे; मात्र या हिंदु धर्माला आणि त्यातील प्रथा, परंपरा आणि सणांतील खोट काढणार्‍या तथाकथित पुरोगाम्यांना या हिंदुत्ववादी संस्थेचे काय महत्त्व कळणार ? यांनी आणि त्यांचे परकीय पैशांवर जगणारे मित्र, सर्वच प्रसारमाध्यमवाले आणि हिंदुत्वाला विरोध म्हणजे पुरोगामीत्व समजणारे सर्वच तथाकथित पुरोगामी पक्षाचे पुढारी या सर्वांनी मिळून जणू काहीही करून हिंदु धर्म संपवण्यासाठी विडाच उचललेला आहे. त्याचेच श्री. समीर गायकवाड हे एक उदाहरण म्हणावे लागेल. मतांच्या, पैशांच्या अथवा प्रसिद्धीच्या लाचारांनी सनातन संस्थेच्या विरोधात काहीही कारण नसतांना दंगा करू नये. न्यायप्रक्रियेवर विश्‍वास ठेवावा. जर लोकशाही मान्य असेल, तर आणि नसेल, तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत.

सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करणारेच खरे राष्ट्रविघातक कार्यात गुंतले आहेत ! - श्री. विजय आरेकर, श्री शिवप्रतिष्ठान, कार्यवाहक, कागल तालुका (जिल्हा कोल्हापूर)

श्री. विजय आरेकर
     सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करणारेच खरे राष्ट्रविघातक कार्यात गुंतले आहेत. संपूर्ण हिंदु समाज देव, देश आणि धर्म यांच्या तत्त्वावर एकत्र येत असतांना यांना उठणारे पोटशूळ निंदनीय आहे. या सर्वांना प्रथम अटक करून त्यांच्या आर्थिक हिंतसंबंधांची चौकशी केली पाहिजे, तर नक्कीच झालेल्या खुनांचे धागेदोरे सापडण्यास साहाय्य होईल. आघाडी शासन कधीच सत्तेवर येणार नाही, असे स्पष्ट दिसत असल्यामुळे सत्ताधिशांची अपकीर्ती करण्याचा छोटासा प्रयत्न प्रसारमाध्यमांना हाताशी धरून केला जात आहे. हिंदुत्ववादी कायर्कर्त्यांना भगवंतांचे अधिष्ठान, व्यष्टी आणि समष्टी साधना, साधना केलेल्या संतांना आलेले अनुभव, मनुष्यजन्माचा उद्देश या सर्वांची माहिती करून देण्याचे कार्य सनातन संस्था करत असतांना एखादा कार्यकर्ता संशयित म्हणून पकडला गेल्यास संपूर्ण सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करणे हास्यास्पद वाटते.

पुणे येथे दंगल घडवणार्‍या ४ धर्मांधांना दीड वर्ष सक्तमजुरी

  • हा न्याय नव्हे अन्यायच !
  • धर्मांधांनी दंगलीत केलेल्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक हानीची भरपाई कधी तरी भरून निघेल का ? या दंगलीत किती तरी जणांचे आयुष्यही उद्ध्वस्त झालेले असू शकते, ती हानी या शिक्षेतून भरून निघेल काय ?
     पुणे, २२ ऑक्टोबर - देहलीत कुराणाची प्रत जाळल्याची अफवा पसरवून ९ मार्च २००१ या दिवशी येथील मक्का मशीद ते घोरपडे पेठ पोलीस चौकी या परिसरात दंगल झाली होती. दंगल करणार्‍या ४ धर्मांधांना २० ऑक्टोबर या दिवशी न्यायालयाने १ वर्ष ६ मास सक्तमजुरी आणि ४ सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावली. (दंगलीसारख्या गंभीर प्रकरणात कठोर शिक्षा आणि हानीभरपाईसाठी अधिकाधिक आर्थिक दंड वसूल करण्यासारखी शिक्षा होणे अपेक्षित आहे ! - संपादक)

श्रीरामपूर (जिल्हा नगर) येथील पशूवधगृहातून १३ गायी आणि वासरे यांची मुक्तता

६ धर्मांधांना अटक
शासनाने गोवंशहत्या बंदी कायद्याची कठोरात कठोर अंमलबजावणी करावी !
      श्रीरामपूर, २२ ऑक्टोबर - शहरातील प्रभाग क्र. २ मधील पशूवधगृहामध्ये गायींची हत्या करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक राकेश ओला यांच्या पथकाने पशूवधगृहावर कारवाई केली. त्यानंतर १३ गायी आणि वासरे यांची मुक्तता करण्यात आली. या वेळी काही गायींची हत्या केल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी ६ धर्मांधांना अटक केली, तर एक जण पसार झाला आहे. या कारवाईच्या वेळी पोलिसांनी गायी, मांस, हत्यारे आणि टेम्पो वाहन आदी ३ लक्ष २१ सहस्र रुपयांचे साहित्य कह्यात केले आहे.
    इजाज निसार कुरेशी, मुराद इब्राहिम कुरेशी, रौफ जाफर कुरेशी, आसिफ हारून कुरेशी, अबुगर ख्वाजामियाँ कुरेशी, वाहनचालक अब्दुल कादीर चाँद कुरेशी यांना अटक करण्यात आली असून जफर गफूर कुरेशी हा पसार झाला आहे.

रस्ते अपघातात महाराष्ट्र दुसर्‍या क्रमांकावर

महाराष्ट्राची या माध्यमातून होणारी नाचक्की थांबवण्यासाठी
शासनाने कठोर पावले उचलावीत, ही जनतेची अपेक्षा !
     अमरावती - देशातील रस्ते अपघातांच्या संख्येच्या संदर्भात महाराष्ट्र्र द्वितीय स्थानावर आहे. गेल्या वर्षभरात झालेल्या एकूण अपघातांपैकी १३ टक्के अपघात राज्यात झाले आहेत. भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या परिवहन संशोधन शाखेने सिद्ध केलेल्या अहवालातून हे समोर आले आहे.
१. देशातील १३ राज्यांमध्ये एकूण अपघातांपैकी ८७ टक्के अपघात होतात. अशा राज्यांच्या सूचीत २०१४ मध्ये महाराष्ट्र दुसर्‍या स्थानावर आहे.
२. राज्यात वर्षभरात एकूण ६१ सहस्र ६२७ अपघात झाले. त्यात १२ सहस्र ८६३ जणांचा बळी गेला. मृत्यूच्या संख्येत राज्य तिसर्‍या स्थानावर आहे.
     रस्त्यांची दूरवस्था, गतीरोधकांवर पांढरे पट्टे नसणे, धोक्याच्या ठिकाणी दुभाजक असणे, अतिवेगामुळे वाहनावरचे नियंत्रण सुटणे, दारू पिऊन गाडी चालवणे, समोरून गाडी येत असूनही ओव्हरटेक करणे, धोकादायक वळणावर वेगाने गाडी चालवणे, पार्किंग लाईट न लावता महामार्गावर गाडी थांबवणे अशा अनेक कारणांमुळे अपघात होतात. अनेक उपाययोजना राबवूनही राज्यात अपघातांचे प्रमाण अल्प झालेले नाही.

आध्यात्मिक शिक्षणाने भारत विश्‍वगुरु बनेल ! - डॉ. विजय भटकर

डॉ. विजय भटकर
     पुणे, २२ ऑक्टोबर (वार्ता.) - विज्ञान आणि अध्यात्म यांचा संगम साधणे, वेदांमधील तत्त्वज्ञान सिद्ध करणे, हे माझ्या जीवनाचे उद्दिष्ट आहे. संगणकाच्या माध्यमातून देवाचे अस्तित्त्व सिद्ध करणे, हे माझे ध्येय आहे. शालेय शिक्षणात आध्यात्मिक शिक्षणाचा समावेश केल्यास भारतदेश निश्‍चितपणे पुन्हा एकदा विश्‍वगुरुपदी विराजमान होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि परमसंगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांनी केले. माईर्स एम्आयटी संस्थेच्या वतीने ७० व्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्त त्यांच्या जाहीर सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. महाविद्यालयाच्या ज्ञानेश्‍वर सभागृहात २१ ऑक्टोबर या दिवशी हा कार्यक्रम पार पडला.  शाल, पुणेरी पगडी आणि मानपत्र देऊन डॉ. भटकर यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. भटकर यांनी अत्यंत खडतर परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून देशाच्या संशोधन कार्यात भरीव योगदान दिल्याचे मान्यवरांनी मनोगतात सांगितले. डॉ. डी.वाय. पाटील यांनी डॉ. भटकरांसारख्या संत प्रवृत्तीच्या शास्त्रज्ञांची देशाला आवश्यकता असल्याचे सांगितले.

फलक प्रसिद्धीकरता

संपूर्ण देशात गोहत्याबंदीची होणारी मागणी अशाने पूर्ण होईल का ? 
     कर्नाटकातील दक्षिण कन्नड भागातील मूदाबिदरी येथील बजरंग दल कार्यकर्ता प्रशांत पुजारी यांची हत्या पशूवधगृह बंद पाडल्याच्या रागातून करणार्‍या आठ धर्मांधांना पोलिसांनी अटक केली.

रत्नागिरीच्या परिसरात आढळले ४३ रोहिंग्या मुसलमान

एवढे घुसखोर रत्नागिरीत येईपर्यंत गुप्तचर यंत्रणा झोपली होती का ?
     रत्नागिरी - रोहिंग्या मुसलमान म्यानमारमधून थेट आता कोकणात येत आहेत. समुद्रामार्गे येणारे हे मुसलमान जिल्ह्यातील नाटे सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळून आले आहेत. १९ ऑक्टोबर या दिवशी नौकांची तपासणी चालू असतांना म्यानमारमधील ४३ रोहिंग्या मुसलमान आल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आहे. त्यांच्याकडे असणार्‍या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे काम चालू करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून सागरी सुरक्षेसाठी मच्छीमारी नौकांमधील खलाशी आणि अन्य कामगार यांची तपासणी करण्यात येते. नेपाळ, तसेच परराज्यातून आलेल्या व्यक्तींच्या अधिवासाची पडताळणी करण्याचे काम चालू आहे.

पथकर वसुली अध्यादेशात सवलत नाकारल्याने राज्य परिवहन महामंडळाला २० कोटींची हानी

     पुणे, २२ ऑक्टोबर - पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या कंत्राटामध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या बसकडून सवलतीच्या दारात पथकर वसुली करण्याची तरतूद आहे. असे असतांनाही प्रत्यक्ष पथकर वसुली अध्यादेशात ही सवलत नाकारल्याने महामंडळाला गेल्या १० वर्षांत २० कोटींची हानी झाली आहे. (राज्य परिवहन महामंडळ आणि शासनाचे संबंधित विभाग यांना इतक्या वर्षात ही गोष्ट लक्षात का आली नाही ? या प्रकरणाची भाजप शासनाने सखोल चौकशी करून हानीला उत्तरदायी असणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाई करावी ! - संपादक)

मराठवाड्यातील अवैध मंदिरांच्या मोजणीसाठी महसूल विभागाचे कर्मचारी रात्री उशिरापर्यंत कामावर

मशिदीवरील अवैध भोंगे आणि अल्पसंख्यांकांची अवैध प्रार्थनास्थळे मोजण्यासाठी
शासकीय कर्मचार्‍यांनीरात्रीचे असे जागरण केल्याचे कधी ऐकले आहे का ?
     संभाजीनगर, २२ ऑक्टोबर - मराठवाड्यातील ३ सहस्र ५११ मंदिरे अधिकृत असून २५७ मंदिरे काढावी लागणार असल्याची माहिती राज्य शासनाला देण्यात आली. एका न्यायालयीन जनहित याचिकेत राज्य शासनाला तातडीने शपथपत्र प्रविष्ट करावयाचे होते. त्यासाठी राज्यातील अवैध मंदिरांची आकडेवारी मिळवण्यासाठी मंत्रालयातून रात्री ९ वाजता यंत्रणेला आदेश आले. त्यानंतर जिल्हास्तरावर निवासी उपजिल्हाधिकार्‍यांसह वरिष्ठ अधिकारी मंदिरांची अवैधतता रात्रभर शोधून काढत होते. ही माहिती रात्री २ वाजता पूर्ण झाली. वर्ष २००९ पूर्वीची मंदिरे नियमित करता येतात का, याचा सध्या आढावा घेतला जात आहे. त्यानंतरची मंदिरे काढण्यात येणार आहेत. (शासनाने असेच धोरण अल्पसंख्यांकांची अवैध प्रार्थनास्थळे आणि भोंगे यांच्याविषयीही राबवावे. - संपादक)
    मराठवाड्यातील परभणी आणि जालना या दोन जिल्ह्यांत अनुक्रमे ४ आणि १ मंदिर स्थलांतरित करता येतील. संभाजीनगर जिल्ह्यातील ६६ आणि जालना जिल्ह्यातील १९१ अशी २५७ मंदिरे काढण्यात येणार आहेत.

पाकिस्तानप्रेमींनी खुशाल पाकिस्तानात चालते व्हावे ! - पर्यावरणमंत्री रामदास कदम

     मुंबई, २२ ऑक्टोबर - आपल्या देशात पाकिस्तानी राष्ट्रध्वज फडकवणे, पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणे आणि भारतीय सैनिकांची शिरे धडावेगळी करून पाठवली जाणे, हे ज्यांना मान्य आहे, अशा पाकिस्तानप्रेमींनी खुशाल पाकिस्तानात चालते व्हावे, असे घणाघाती वक्तव्य शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री श्री. रामदास कदम यांनी पत्रकारांशी बोलतांना केले.
     पाकिस्तान जोपर्यंत आतंकवादी कारवाया थांबवत नाही, तोपर्यंत शिवसेनेचा पाकिस्तानला विरोध कायम राहील. क्रिकेट, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा अन्य कोणतेही संबंध तोपर्यंत आम्हाला नकोत. शिवसेनेने घेतलेली ही भूमिका राष्ट्रप्रेमातून असून ती व्यक्त केल्याने शिवसेना ही आतंकवादी संघटना होत नाही, असे ते पुढे म्हणाले.

हिंदूंनी अन्याय अजिबात सहन करू नये ! - लखोजी जाधव यांचे १३ वे वंशज श्री. गिरीश जाधव

धर्माभिमानी श्री. गिरीश जाधव उपस्थित धर्माभिमान्यांना मार्गदर्शन करतांना
    बेळगाव, २२ ऑक्टोबर (वार्ता.) - अस्मिता जिवंत असल्याशिवाय आपण लढू शकत नाही. अस्मिता ज्यांच्याजवळ असते, त्यांच्या अंगी १०० हत्तींचे बळ असते. हिंदूंनी अन्याय सहन करायचा नाही. औषधाने चांगले विचार निर्माण होत नाहीत, तर आपली संस्कृतीच आपल्याला चांगले वागण्यास शिकविते, असे प्रतिपादन लखोजी जाधव यांचे १३ वे वंशज श्री. गिरीश जाधव यांनी केले. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित श्री दुर्गामाता दौडीच्या नवव्या दिवशीची सांगता पाटील गल्ली येथील शनिमंदिर येथे झाली. या वेळी उपस्थित धर्माभिमान्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. प्रारंभी ताशिलदार गल्लीतील सोमनाथ मंदिर येथे आरती करण्यात आली. धर्माभिमानी श्री. गिरीश जाधव आणि स्वराज्याचे सरसेनापती हंबिरराव मोहिते यांचे १३ वे वंशज श्री. जयाजी मोहिते यांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला. फुलबाग गल्ली, पाटील गल्ली, शनिमंदिर रोड, मठ गल्ली, कलमठ रोड यांसह २७ ठिकाणी दौडीचे भव्य स्वागत करण्यात आले.

किरकोळ गुन्ह्यासाठी कह्यात असलेल्या आरोपीची चौकशी रात्री १० नंतर करू नये ! - उच्च न्यायालय

हे न्यायालयाने पोलिसांना का सांगावे लागते ?
मुंबई - तीन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा होऊ शकत नाही, अशा किरकोळ गुन्ह्यासाठी कह्यात घेण्यात आलेल्या आरोपींची रात्री १० नंतर चौकशी न करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने २१ ऑक्टोबर या दिवशी पोलिसांना दिला. त्याचप्रमाणे पुढील ६ महिन्यांत कोठडीत एकही मृत्यू होणार नाही, याची काळजी घेण्याचा आदेशही उच्च न्यायालयाने राज्यशासनाला दिला. महाराष्ट्रात पोलीस कोठडीत मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे, तसेच गेल्या वर्षी दोन तरुणांचा कोठडीत मृत्यू झाल्याने त्यांच्या नातेवाइकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.
या याचिकेवरील सुनावणी न्यायमूर्ती व्ही.एम्. कानडे आणि न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपिठापुढे होती.

कर्नाटकमधील बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी आणखी ४ धर्मांधांना अटक

पशूवधगृह बंद पाडल्याचा सूड उगवण्यासाठी हत्या उत्तरप्रदेशात एका धर्मांधाची हत्या
झाल्यावर देशावर राष्ट्रीय संकट कोसळल्याप्रमाणे सर्व धर्मनिरपेक्ष नेते, तथाकथित पुरोगामी,
साहित्यिक आणि राज्यकर्त्यांनीही दु:ख प्रकट केले; मात्र देशात इतरत्र हिंदूंच्या नेत्यांची
हत्या होत असतांना त्यांच्याकडे पहाण्यासाठी कोणाकडेच वेळ नाही !
बेंगळुरू (कर्नाटक) - मंगळुरूहून ४० किलोमीटर लांब असलेल्या दक्षिण कन्नड भागातील मुडबिद्री येथील बजरंग दल कार्यकर्ता प्रशांत पुजारीची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी आणखी ४ धर्मांधांना अटक केली आहे. यापूर्वीही ४ धर्मांधांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींची संख्या ८ इतकी झाली आहे. पुजारी यांनी पशूवधगृह बंद पाडले होते. त्याचा सूड उगवण्यासाठीच या धर्मांधांनी ९ ऑक्टोबरला पुजारी यांची हत्या केली केली होती.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! 
 Karnatakme Bajrang dalke Prashant 
Pujarike hatya mamleme 8 dharmandha giraftar. 
 Es hatyake bareme ab media chup kyo ? 

जागो !
 कर्नाटकमें बजरंग दलके प्रशांत 
पुजारीके हत्या मामलेमें ८ धर्मांध गिरफ्तार ! 
 इस हत्याके बारेमें अब मिडिया चूप क्यो ?

शिक्षिकेने रागावून विद्यार्थ्यांच्या गळ्यात घातला चपलांचा हार

शाळेसारख्या पवित्र ठिकाणी शिक्षकांकडून असे वर्तन घडणे लज्जास्पद !
विद्यार्थ्यांप्रमाणे आता शिक्षकांनाही नैतिक मूल्यांचे शिक्षण देणे आवश्यक आहे !
     धाराशिव, २२ ऑक्टोबर - विद्यार्थ्यांनी वर्गात चप्पल घालून प्रवेश केला; म्हणून रागावलेल्या शिक्षिकेने विद्यार्थ्यांच्या गळ्यात चपलांचा हार घातला. ही घटना येथील अंदोरा जिल्हा परिषदेच्या शाळेत १९ ऑक्टोबर या दिवशी घडली. शिक्षिकेची गटशिक्षण अधिकार्‍यांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्या शिक्षिकेची चौकशी चालू असून अजून तिच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
    अंदोरा जिल्हा परिषदेच्या शाळेत वर्गात शिकतांना चपला बाहेर काढण्याचा नियम आहे. इयत्ता ७ वीमध्ये शिकणारे काही विद्यार्थी नियम विसरल्याने वर्गात चपला घालून गेले. यामुळे रागावलेल्या शिक्षिकेने त्यांना वर्गाबाहेर जाऊन सर्व चपला गोळा करून आणण्यास सांगितल्या आणि चपलांचा हार करून ७ विद्यार्थ्यांच्या गळ्यात घातला. या प्रकाराची कुठेही वाच्यता तुमची छायाचित्रे काढून गावभर लावेन, अशी धमकीही त्या शिक्षिकेने विद्यार्थ्यांना दिली.

लेखक-व्याख्याते शेवडे कुटुंबियांच्या तीन पिढ्यांचा सत्कार आणि व्याख्यानाचे आयोजन

    मुंबई - येथील चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या हीरक महोत्सवानिमित्त एका कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते शेवडे घराण्याच्या तीन पिढ्यांचा सत्कार होणार आहे. तसेच त्यांची व्याख्यानेही होणार आहेत. २७ ऑक्टोबर या दिवशी भारताचार्य प्रा. सु.ग.शेवडे हे शहाजीराजांची चातुर्यनीती, २८ ऑक्टोबर या दिवशी डॉ. सच्चिदानंद शेवड़े हे शिवरायांची युद्धनीती आणि २९ ऑक्टोबर या दिवशी डॉ. परीक्षित शेवडे हे शंभूराजांची राजनीती या विषयांवर व्याख्याने देणार आहेत.

जळगाव येथे हिंदुसंघटक पुरस्कार सोहळा !

    प.पू. १००८ महामंडलेश्‍वर रघुनाथ महाराज (फरशीवालेबाबा) यांना हिंदु महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रामानूज व्रतधर जीयर स्वामीजी (त्रीदंडी महाराज) यांच्या शुभहस्ते हिंदुसंघटक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच शताब्दी वर्ष विशेषांकाचे प्रकाशन प.पू. रत्नदेव सुरीजी महाराज (अद्भूतबाबा) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम जळगाव येथे २४ ऑक्टोबर संध्याकाळी ५ वाजता टेलिफोन कार्यालयामागील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात होणार आहे. 

राज्य शासनाकडून १७९ कोटींची डाळ जप्त - श्री. गिरीष बापट

    मुंबई - राज्यातील डाळी, खाद्यतेले आणि खाद्यतेल बिया यांचा साठा करणार्‍यांवर राज्यशासन कारवाई करत आहे. आतापर्यंत २३ हजार ३४० टन डाळींचा साठा जप्त करण्यात आला आहे. त्यात मुंबईच्या गोदामांतील २२ सहस्र ३३६ टन डाळींचा समावेश आहे. त्याची किंमत १७९ कोटी आहे, अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री श्री. गिरीश बापट यांनी २२ ऑक्टोबर या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.
    डाळींचा बेकायदा साठा आढळल्यास नागरिकांनी अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन बापट यांनी या वेळी केले. शासनाने डाळीच्या साठवणुकीवर ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत निर्बंध घातल्यानंतर नागरी पुरवठा विभागाने केलेल्या कारवाईची माहिती श्री. बापट यांनी दिली.

भारतीय सीमेवर तैनात करण्यात आलेल्या लांब पल्ल्याच्या तोफांचा अन्वयार्थ

श्री. भाऊ तोरसेकर
      गेल्या काही मासांत पाकिस्तान शासन आणि त्यांचे लष्करी प्रवक्ता भारताकडून काश्मिरी नियंत्रणरेषेचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी सातत्याने करू लागले आहेत. आजवर अशा तक्रारी आपल्याकडून व्हायच्या. मग सीमेलगत वास्तव्य करणार्‍या भारतियांच्या घरावर पडलेले तोफगोळे किंवा क्षेपणास्त्रांचे अवशेष वाहिन्यांवर दाखवले जायचे. हल्ली ते अल्प झाले असून, पाकिस्तानकडून अशा तक्रारी ऐकू येत असतात. अर्थात् नियंत्रणरेषा ओलांडण्याचा आगाऊपणा भारतीय सेना करत नाही; पण जिथे घुसखोरी करून जिहादी घुसवण्याचा उद्योग पाक सेना खेळते, तिथे त्यांना रोखण्याचे सर्व उपाय योजले जायचे. त्याविषयी पाकिस्तानची तक्रार नव्हती. मग आता अकस्मात कुरबुरी कशाला चालू झाल्यात ? तर पाक सेनेने गोळीबार वा क्षेपणास्त्रे डागून धमाल करायची आणि त्याच गडबडीचा फायदा घेत भारतीय हद्दीत जिहादी घुसवायचे, या खेळाला पायबंद घातला गेला आहे. गोळीबार वा तोफा डागल्या गेल्यावर ईटका जबाब पत्थरसे मिळू लागल्याचा हा परिणाम आहे.

दूरचित्रवाहिन्यांचे दुष्परिणाम आणि त्यांवरील उपाय

१. दूरचित्रवाहिन्यांचा दुष्परिणाम - दूरदर्शनवरील पुरस्कृत कार्यक्रम आणि विज्ञापने यांच्या
अनिष्ट प्रभावामुळे निर्माण झालेले शैक्षणिक अन् सामाजिक प्रश्‍न चिंतेचा विषय बनणे
     आज देशातील जवळजवळ सर्वच लोक दूरदर्शनचे कार्यक्रम पाहू शकतील, एवढी दूरदर्शनची क्षमता आहे; परंतु दूरदर्शनमुळे अनेक नवे प्रश्‍न निर्माण होऊ लागले आहेत. 
     शासनाला उत्पन्न मिळत असल्यामुळे प्रायोजित कार्यक्रम आणि त्यांतील उथळ स्वरूपाची करमणूक यांवर विशेषतः भर दिला जात आहे. दूरदर्शनवरील पुरस्कृत कार्यक्रम आणि विज्ञापने (जाहिराती) यांचा अनिष्ट प्रभाव पडू लागल्यामुळे त्यातून निर्माण होणारे शैक्षणिक अन् सामाजिक प्रश्‍न हा चिंतेचा विषय झालेला आहे.

या देशाला जे आपली मातृभूमी आणि पितृभूमी मानतात, ते सर्व हिंदू होत, असे सावरकरांनी सांगणे

      या देशाला जे आपली मातृभूमी आणि पितृभूमी मानतात, ते सर्व हिंदू होत, असे स्वा. सावरकरांनी म्हटले आहे. हिंदुस्थानला हिंदु राष्ट्र म्हणणे म्हणजे संकुचितपणा आहे, असे म्हणणार्‍यांना स्वा. सावरकर विचारत की, संपूर्ण मानवतेच्या दृष्टीकोनातून आपण म्हणता ते इंडियन नेशन हीसुद्धा संकुचित कल्पना नाही का ? अधिक व्यापक दृष्टीतून विचार केला, तर सबंध पृथ्वी हीच आपली मातृभूमी आणि जग हे आपले राष्ट्र म्हणता येईल. एवढेच नव्हे तर पृथ्वीच्याही पलीकडे जाऊन संपूर्ण विश्‍व हे आपले राष्ट्र मानता येईल; परंतु राष्ट्राच्या व्यापक विचाराला असणार्‍या व्यवहाराच्या मर्यादेची जाणीवही स्वा. सावरकरांनी करून दिली. जोपर्यंत एक राष्ट्र दुसर्‍या राष्ट्रावर आक्रमण करत आहे, तोपर्यंत मानवतेच्याच हितासाठी सबंध जगाला एक राष्ट्र म्हणता येणार नाही. - केशव आचार्य (स्वातंत्र्यवीर शतकोत्तर रौप्य जन्मोत्सव विशेषांक २००८)

अनागोंदी कारभाराला गतीरोधक आवश्यक !

स्मार्ट बनू पहाणार्‍या पुणे शहराच्या महानगरपालिकेने अनागोंदी कारभाराचा उत्तम नमुना सर्वांपुढे ठेवला आहे. महानगरपालिकेच्या वाहन विभागामध्ये अनियंत्रित कारभाराची गती वाढत असून विभागामध्ये चालणार्‍या सावळ्या गोंधळाला कुठलाच गतीरोधक नसल्याचे चित्र आहे. वाहन विभागाकडून महानगरपालिकेचे वाहन कुठे वापरले गेले ? ते किती किलोमीटर धावले ? किती वेळा दुरुस्त केले ? याच्या नोंदीच ठेवल्या जात नाहीत. अनेक वाहनांचे स्पीडोमीटर बंद आहेत. त्यामुळे वाहन किती धावले, याचा बोध होत नाही. इंधनाची सरासरी काढली जात नाही. वाहनांचे हिस्टरी बूक ठेवले जात नाही. अधिकारी, पदाधिकारी यांना वाहनाच्या वापराविषयी कोणत्याही मर्यादा घालण्यात आलेल्या नाहीत. या सर्व भोंगळ कारभारामुळेच आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशी विभागाची स्थिती असल्याचे ताशेरे राज्यशासनाच्या लेखापरीक्षण अहवालात ओढण्यात आले आहेत.

क्रांतीकारकांच्या कर्तृत्ववान वंशज म्हणजे अभिनव भारतच्या राष्ट्रीय अध्यक्षा हिमानीताई सावरकर !

हिमानीताई सावरकर यांच्या निधनाला १२ दिवस झाल्याच्या निमित्ताने...
श्रीमती हिमानीताई
सावरकर
     अभिनव भारत या संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती हिमानीताई सावरकर यांचे ११ ऑक्टोबरला निधन झाले. वर्ष १९४७ मध्ये जन्मलेल्या हिमानीताई या गोपाळ गोडसे यांच्या कन्या, पं. नथुराम गोडसे यांच्या पुतणी, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चुलत सूनबाई होत्या. माहेर-सासर अशा दोन्ही बाजूंनी त्यांना अग्नीकुळाचा दिव्य वारसा लाभला होता. थोर क्रांतीकारकांचे आम्ही वंशज हे सांगण्यात हयात घालवणार्‍यांपैकी हिमानीताई नव्हत्या. ६८ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी स्वतःचे व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्व यांची छाप निर्माण केली होती. 
     प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार करणार्‍या हिमानीताई हिंदुत्वाचे कार्य करणार्‍या तरुणांना मातृस्वरूप मार्गदर्शन करत असत. एखाद्या रणझुंजार योद्ध्याप्रमाणे त्या हिंदुत्वविरोधी लोकांवर आक्रमण करत.

हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपती शिवरायांना स्वकियांशी द्यावा लागलेला लढा आणि हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाप्रत वाटचाल करणार्‍या सनातनला धर्मद्रोह्यांच्या विरोधात द्यावा लागणारा वैचारिक लढा !

     साधना करतांना सकारात्मक राहून प्रत्येक प्रसंगाकडे पाहिल्यास देव भरभरून देतो, याची प्रचीती नुकतीच पानसरे हत्याप्रकरणी संशयित म्हणून अटक करण्यात आलेल्या श्री. समीर गायकवाड यांच्या प्रसंगातून आम्हा साधकांना अनुभवता आली. देवाने या वेळी संघर्षातून लवकर पुढे जाता येते, याची जाणीवही करून दिली. येणार्‍या काळात देवच पूर्वसिद्धता करून घेत असल्याचे लक्षात आले. देवाने यातून पुष्कळ काही दिले आणि शिकवलेही. श्रीकृष्णाने या प्रसंगात जे लक्षात आणून दिले, ते शब्दबद्ध करून घेण्याची सेवाही त्यानेच करून घेतली.
     हिंदु धर्मातील संस्कृती जपण्याचे कार्य सनातन संस्था करत आहे. तिच्या पाठीशी सर्वांनी उभे रहावे. गोवर्धन पर्वत हिंदूंचा आहे आणि त्या पर्वताला प्रत्येकाने काठी लावण्याची आवश्यकता आहे ! - पू. मोहनबुवा रामदासी, सज्जनगड

भारतियांनो, तुमच्या नैतिक अधःपतनाविषयी अंतर्मुख व्हा आणि जपानकडून नैतिकतेचा र्‍हास रोखण्यास शिका !

     चिरंतन सांस्कृतिक मूल्यांचा विसर पडावा, अशा प्रकारचेच नवे वातावरण आज निर्माण होऊ लागले आहे. हे वातावरण औद्योगिक संस्कृतीचा अविभाज्य भाग असल्याचे मानावे, तर जपानमध्ये औद्योगिक समृद्धी येऊनही त्यांनी जुनी सामाजिक मूल्ये जतन करून ठेवली आहेत आणि म्हणूनच तेथे मोठ्या प्रमाणावर नैतिकतेचा र्‍हास झाला नाही. 
- डॉ. प्र.चिं. शेजवलकर (संदर्भ : मासिक प्रसाद, फेब्रुवारी १९८६)

साधकांनो, अंतरातील भाव-भक्तीचा दीप कृतज्ञतेच्या ज्योतीने प्रज्वलित करून खरी दीपावली साजरी करा !

पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ
१. कृतज्ञताभावाविषयी प.पू. डॉक्टरांनी सांगितलेली मार्गदर्शक सूत्रे !
     काही दिवसांपूर्वी दैनिक सनातन प्रभातमध्ये प.पू. डॉक्टरांची एक चौकट प्रसिद्ध झाली होती. त्यामध्ये त्यांनी साधकांना पुढील संदेश दिला होता, साधनेत प्रगती होण्यासाठी साधकांनी कृतज्ञताभावात रहावे. कुटुंबीय घेत असलेली आपली काळजी, तसेच करत असलेले प्रेम, आपल्याला इतरांकडून मिळणारे साहाय्य, भगवंताने दिलेले जीवन आदी दैनंदिन जीवनातील उदाहरणे पावलोपावली आठवल्यास कृतज्ञताभाव निर्माण होण्यास ५ - ६ आठवड्यांतच आरंभ होतो. पुढे तो वाढत जातो. त्यामुळे साधनेत प्रगती होऊ लागते. 
२. कृतज्ञताभावात राहिल्याने कार्यकर्ते आणि
धर्मप्रेमी यांनी अनुभवलेले स्वतःतील पालट !
     धर्माभिमान्यांच्या सत्संगात उपस्थित असणारे धर्मप्रेमी, तसेच समितीच्या सत्संगात सहभागी होणारे कार्यकर्ते यांना अखंड कृतज्ञताभावात रहाण्याचे महत्त्व सांगण्यात आले होते. त्यानुसार प्रयत्न केल्यावर काही दिवसांतच त्यांना स्वतःमध्ये पुढील पालट जाणवले.

उपजतच सात्त्विकतेची आवड असलेली उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची चि. धारा प्रशांत मेढे (वय ५ वर्षे) !

चि. धारा मेढे
१. जन्मापूर्वी
     चि. धाराच्या आईने गर्भारपणी सनातन संस्थेचे ग्रंथ आणि प्रतिदिन दैनिक सनातन प्रभात वाचले अन् ज्ञानेश्‍वरीचेही पारायण केले.
२. जन्मानंतर
२ अ. २ ते ४ मास : धारा २ - ३ मासांची झाल्यावर रडत असतांना नामजपाचे यंत्र लावल्यावर तो नामजप ऐकत झोपत असे.
२ आ. ६ ते ८ मास : घरातील व्यक्ती देवपूजा करत असतांना ती टाळ्या वाजवत असे आणि बाबा, बाबा म्हणून प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र डोक्याला लावत असे.

रामनाथी आश्रमातील साधकांकडून कु. श्रद्धा लोंढे यांना शिकायला मिळालेली सूत्रे

कु. श्रद्धा लोंढे
     काही दिवसांपूर्वी रामनाथी आश्रमातील काही साधक देवद येथील आश्रमात सेवेसाठी गेले होते. तेव्हा देवद आश्रमातील अनेक साधकांनी रामनाथी आश्रमातील साधकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे लिहून दिली होती. ती वाचून देवाने लक्षात आणून दिले की, आपण प्रत्यक्षात रामनाथी आश्रमात असूनही येथील साधकांकडून शिकायला उणे पडतो. लेख वाचल्यानंतर साधकांचे निरीक्षण होऊन त्यांच्याकडून पुढील सूत्रे शिकायला मिळाली. 
  १. श्री. ज्ञानेश्‍वर गावडे
श्री. ज्ञानेश्‍वर गावडे
१ अ. प्रत्येक सेवा उत्साहाने आणि आनंदाने करणे : रामनाथी आश्रमातील अनेक साधक देवद आश्रमात सेवेसाठी गेले होते. त्यामुळे येथील आश्रमात बांधकाम विभागातील सेवेत केवळ दोन साधक पूूर्ण सेवा पहात होते. त्यातीलच एक साधक म्हणजे श्री. ज्ञानेश्‍वर गावडे. ज्ञानेश्‍वरदादा सतत सेवा करतांना दिसत असे; पण त्याच्या तोंडवळ्यावर कधी ताण दिसला नाही. प्रत्येक सेवा तो उत्साहाने आणि आनंदाने करत होता.
१ आ. समष्टी सेवेबरोबर व्यष्टी साधनेचे प्रयत्न तळमळीने करणे आणि इतर साधकांना तत्परतेने साहाय्य करणे : ज्ञानेश्‍वरदादा सेवेत इतका व्यस्त असायचा की, त्याला प्रसाद आणि महाप्रसाद घेण्याची आठवण करून द्यावी लागत होती. एवढ्या सेवा असतांनाही व्यष्टी साधनेचे प्रयत्न तो तळमळीने करत होता. एके दिवशी ऐनवेळी मी दादांना एक विजेचा दिवा (बल्ब) लावण्यास सांगितले. सेवेत व्यस्त असतांनाही तो तत्परतेने आला आणि त्याने विजेचा दिवा पालटून दिला. या प्रसंगातून त्याचे इतरांचा विचार करणे, तत्परता आणि स्वीकारण्याची वृत्ती हे गुणही माझ्या लक्षात आले.

श्रीकृष्णाप्रती अपार भाव असणारी जळगाव येथील उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची चि. अक्षदा सुनील मेढे (४ वर्षे) !

चि. अक्षदा मेढे
१. जन्मापूर्वी
१ अ. बाळाला देवाची ओढ असावी, अशी प्रार्थना करणे : मला बाळ होणार, असे समजल्यावर माझ्याकडून देवाला प्रार्थना होऊ लागली, जन्माला येणारे बाळ हे गोंडस, आरोग्यवान, हुशार आणि सात्त्विक असावे, तसेच त्याला ईश्‍वरभक्तीची ओढ असावी.
१ आ. गीता, अथर्वशीर्ष आणि संकटनाशन स्तोत्र यांचे वाचन करतांना बाळाने हालचाल करून आतून प्रतिसाद देणे : गर्भारपणात मी प्रतिदिन देवपूजा केल्यानंतर दुपारी १.३० वाजता गीता वाचायला आरंभ करायचे. त्या वेळी बाळ पोटात फार वेगाने हालचाल करायचे आणि मध्येच शांत व्हायचे. जणूकाही मीही गीतेचे श्रवण करत आहे, याची ते मला जाणीव करून देत असे.

निरांजनऐवजी निरंजन असे म्हटल्याने झालेली गंमत !

     गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी आरती करण्यासाठी मला निरांजन हवे होते; म्हणून मी कु. वैदेही (कु. वैदेही पिंगळे) आणि कु. वैभवी (कु. वैभवी भोवर) यांना आरती करण्यासाठी निरंजन हवे आहे. जरा कुठे आहे का बघा., असे सांगितले. तेव्हा त्यांनी बाहेर जाऊन साधक श्री. निरंजन चोडणकर यांना बोलावून आणले. मी त्यांना विचारले, अग निरंजन मिळाले का ? तेव्हा त्या म्हणाल्या, हा काय निरंजनदादा ! - पू. (कु.) स्वाती खाडये

सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी पितरांसाठी प्रार्थना केल्यानंतर त्यांना आनंद झाला असून ते साधकांना आशीर्वाद देत असल्याचे जाणवणे आणि भगवान दत्तात्रेयांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होणे

कु. माया पाटील
     १२.१०.२०१५ या सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी सर्व साधकांच्या पितरांसाठी नैवेद्य ठेवण्यात येणार आहे. साधकांनी पितरांचा त्रास अल्प व्हावा आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी त्यांचे आशीर्वाद मिळावेत, यासाठी प्रार्थना करायची आहे, असे सांगितले होते. ही प्रार्थना करत असतांना मला सूक्ष्मातून पुढील दृश्य दिसले, सर्व पितरांना आनंद झाला आहे. त्यातील काही पितर श्री गुरुदेव दत्त हा नामजप करत आहेत, तसेच साधकांना आशीर्वाद देत आहेत, असे जाणवले. काही पितरांना भुवलोकामध्ये पुष्कळ त्रास होत असून ते त्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे जाणवले. हे दृश्य पाहून भगवान दत्तात्रेयांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.
- कु. माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१४.१०.२०१५)

राजस्थान येथील पू. मोहनदास महाराज आणि पू. शिवबलीजी चौबे महाराज यांचा संगीतमय अन् भावजागृतीची अनुभूती देणारा सत्संग !

पू. आैंकारानंद महाराज
आश्रमातील हिंदु धर्म संस्थापनेचे कार्य स्वतः अनुभवल्यानंतर इतरांना
हिंदु धर्मजागृतीचे कार्य पहाण्यासाठी बोलावणारे पू. औकारानंद महाराज ! 
     रामनाथी आश्रमातील हिंदु धर्म संस्थापनेचे कार्य स्वतः अनुभवल्यानंतर प्रभावित झालेले पू. आैंकारानंद महाराज काही मासांपासून (महिन्यांपासून) येथेच वास्तव्यास आहेत. ते उत्तर भारतातील त्यांच्या परिचित संत-महंतांना रामनाथी आश्रमात चालणारे हिंदु धर्मजागृतीचे कार्य पहाण्यासाठी स्वतः बोलावत असतात. त्यांनी राजस्थान येथील पू. मोहनदास महाराज आणि पू. शिवबलीजी चौबे महाराज यांना आमंत्रित केले होते.

साधकांच्या गुरुकृपायोगानुसार साधना न करणार्‍या नातेवाइकांनी ६० टक्के आध्यात्मिक प्रगती गाठण्यामागील कारणे

पू. अशोक पात्रीकर
     सनातन संस्थेच्या अनेक साधकांचे आई-वडील, आजी-आजोबा, ज्येष्ठ बंधू, वहिनी किंवा भगिनी यांनी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना न करताही अध्यात्मात ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याच्या वार्ता दैनिक सनातन प्रभातमधूून कळतात. तेव्हा बर्‍याच साधकांच्या मनात प्रश्‍न येतो, यांची सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना नसतांनाही प्रगती कशी होते ? याची देवाने सुचवलेली कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
१. ज्येष्ठ व्यक्तींचे प्रारब्धभोग संपलेले आणि तरुणांना ते भोगायचे असणे
     यापूर्वी दैनिक सनातन प्रभातमध्ये चौकट प्रसिद्ध आली होती, ज्येष्ठ व्यक्तींचे प्रारब्धभोग संपत आलेले असतात. त्यामुळे त्यांची प्रगती जलद होते. तरुणांना ते भोग त्यांच्या उर्वरित आयुष्यात भोगायचे असतात.
२. पूर्वजन्मीची साधना असणे
     त्यांची पूर्वजन्मीची साधना या जन्मीच्या प्रगतीला साहाय्य करणारी ठरते.

सेवेला साधनेची जोड देणारे आणि हिंदु जनजागृती समितीचे नाव सर्वत्र पोचावे, यासाठी तळमळीने प्रसार करणारे आग्रा येथील धर्माभिमानी श्री. आनंद जैन !

१. शांत आणि प्रेमळ
      श्री. आनंद जैन यांचा स्वभाव शांत आहे. ते कधीच चिडचिड करत नाहीत. ते मला लहान भावाप्रमाणे प्रेम देतात. त्यांच्यासमवेत धर्मसेवा करत असतांना मला सुरक्षितता जाणवते.
२. सेवेला साधनेची जोड देणे
     त्यांना नामजप आणि साधना यांचे महत्त्व ठाऊक आहे. जर एखादे हिंदुत्ववादी चुकीच्या सूत्रावर वाद घालू लागले, तर ते त्यांना साधनेचा योग्य दृष्टीकोन समजावून सांगतात. सेवा करतांना सोबतच्या धर्माभिमान्यांना ते प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची आठवण करून देतात. त्यांच्या मिळकतीतली ठराविक रक्कम ते नियमितपणे धर्मकार्याला अर्पण करतात.

साधकत्व, धर्मप्रेम अन् सेवेची तळमळ असणारे आग्रा येथील श्री. आनंद जैन !

श्री. आनंद जैन
    उत्तरप्रदेश राज्यातील आग्रा येथील श्री. आनंद जैन मागील ९ मासांपासून हिंदु जनजागृती समितीच्या संपर्कात आहेत. धर्माभिमान्यांच्या सत्संगालाही ते उपस्थित असतात. त्यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे पुढे देत आहे.
१. श्री. जैन यांच्यातील साधकत्वाचे उलगडलेले पैलू
१ अ. विचारण्याची वृत्ती : धर्मकार्य करतांना काही अडचणी आल्यास श्री. आनंद जैन समितीच्या कार्यकर्त्यांना संपर्क करून यात मी अजून काय करायला हवे, या संदर्भात मार्गदर्शन करा, असे सांगतात. कार्यकर्त्यांनी सांगितल्यानुसार प्रत्यक्ष कृती करण्याचाही त्यांचा प्रयत्न असतो.
१ आ. मनमोकळेपणा : सहकार्यकर्त्यांनी मांडलेले एखादे सूत्र पटले नाही, तर त्याविषयी ते त्वरित मोकळेपणाने बोलून घेऊन स्वतःच्या मनातील शंका दूर करण्याचा प्रयत्न करतात.
१ इ. व्यवसायातही सेवारत रहाण्याची धडपड : मागील २० वर्षांपासून श्री. जैन यांचा विजयचिन्ह (ट्रॉफी) बनवण्याचा व्यवसाय आहे. या व्यवसायातूनही माझी सेवा कशी होऊ शकेल, असा त्यांचा विचार असतो आणि त्याप्रमाणे ते प्रयत्न करतात.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
सत्यमेव जयति । म्हणजे सत्याचाच विजय होतो, यावर सनातन संस्थेच्या साधकांची श्रद्धा असल्याने संस्थेवर कितीही आरोप झाले, तरी ते स्थिर असतात. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१७.१०.२०१५)

प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
संतांकडून मिळवायच्या गोष्टी 
देण्यासाठी आमच्याकडे काहीच नाही. 
ज्याला घ्यायचे असेल, तो आमच्याकडून सर्वकाही घेऊ शकतो. 
भावार्थ : 'देण्यासाठी आमच्याकडे काही नाही' मधील 'काही' शब्द व्यावहारिक गोष्टींच्या संदर्भात आहे. 'सर्वकाही घेऊ शकतो' मधील 'सर्वकाही' अध्यात्माच्या संदर्भातील आहे. 
 (संदर्भ : सनातनचे प्रकाशन 'संत भक्तराज महाराज यांची शिकवण.')

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मनाला साधना करण्याचे वळण लावा 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
       ऋतं वच्मि । सत्यं वच्मि ।, म्हणजे मी यथोचित असेच सांगत आहे; सत्य तेच सांगत आहे. 
स्पष्टीकरण : सत्य पालटू शकते, उदा. देवदत्त तरुण आहे, हे वाक्य आता सत्य असले, तरी देवदत्त वृद्ध झाल्यावर हे वाक्य असत्य ठरते; परंतु ऋत कधीही पालटत नाही, उदा. सूर्य पूर्व दिशेला उगवतो. ऋत म्हणजे न पालटणारे नैसर्गिक सत्य. 
     म्हणजे सत्य आणि नित्य जे असेल, त्याची उपासना करण्याचे वळण मनाला लावावे, म्हणजे साधकांची उन्नती वेगाने होते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

अशांत आणि धुमसणारा पंजाब !

संपादकीय
     गेल्या १० दिवसांपासून पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात अशांतता निर्माण झाली आहे. गुरु ग्रंथसाहेब या ग्रंथांची प्रतिदिन वेगवेगळ्या गावांत विटंबना होत आहे. प्रत्येक दिवशी कुठे ना कुठे या ग्रंथाची फाटलेली पृष्ठे आढळून येत आहेत. यामुळे लोकांच्या भावना प्रक्षुब्ध होत आहेत आणि गावोगावी लोक निषेध करण्यासाठी रस्त्यावर येत आहेत. दोन दिवसांपूर्वी अनेक जिल्ह्यांत संतप्त लोकांनी सर्व राज्यमहामार्ग बंद केल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. दुकाने, शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. अनेक जिल्ह्यांमध्ये निमलष्करी दल तैनात करण्यात आले असून लष्कराला पाचारण करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. या प्रकरणावरून काँग्रेस आणि आप या विरोधी पक्षांनी राजकारण करत राज्यशासनाच्या त्यागपत्राची मागणी केली आहे. एकूणच भाजप-अकालीदल यांच्या ९ वर्षांच्या कारकीर्दीमधील हा सर्वांत कठीण काळ आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn