Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

केरळ येथील प्रसिद्ध पुत्तिंगल मंदिरात फटाक्यांमुळे आग लागून १०२ भाविकांचा मृत्यू

  • ३०० भाविक घायाळ
  • पंतप्रधानांची घटनास्थळी भेट
  • नौदल आणि वायूदल यांचे साहाय्य
हे आहेत फटाक्यांचे दुष्परिणाम ! लाखो रुपयांचा चुराडा करण्यासह मनुष्यहानी 
करणार्‍या फटाक्यांवर शासनाने आतातरी देशपातळीवर बंदी आणावी !
     कोल्लम (केरळ) - येथून १४ कि.मी. अंतरावर असलेल्या परावूर येथील प्रसिद्ध पुत्तिंगल मंदिरात रात्री साडेतीन वाजता लागलेल्या भीषण आगीत १०२ भाविकांचा होरपळून मृत्यू झाला, तर ३०० भाविक घायाळ झाले. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. गोदामात ठेवलेल्या फटाक्यांचा स्फोट होऊन ही आग लागल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी मंदिर प्रशासनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुर्घटना घडली तेव्हा मंदिरामध्ये १ सहस्राहून अधिक भाविक उपस्थित होते. वेळीच साहाय्य पोहोचले नसते, तर या सर्वांच्याच जीवाला धोका पोहोचला असता, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. आगीत अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्यासाठी नौदल आणि वायूदल यांच्या सैनिकांनी साहाय्य केले. राज्याचे मुख्यमंत्री ओमान चंडी यांनी घटनास्थळी भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेविषयी तीव्र दु:ख व्यक्त केले असून त्यांनी स्वतः तज्ञ डॉक्टरांचे पथक घेऊन घटनास्थळी भेट दिली.

भूकंपामुळे देहली, हरियाणा आणि जम्मू-काश्मीर राज्ये हादरली !

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्येही भूकंपाचे धक्के
नाडीवाचन क्रमांक ६७मध्ये महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे
      १९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७मध्ये महर्षि म्हणतात, हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे अन् याच कालावधीत उज्जैनमध्ये महाकालेश्‍वराचे स्थान असलेल्या ठिकाणी महाकुंभ होत आहे. (१० एप्रिल या दिवशी देहली, हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या राज्यांसह अफगाणिस्तान आणि पाकिस्तान येथे झालेल्या भूकंपाच्या घटनेवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती सत्य आहे, हे लक्षात येते ! - संपादक)
      नवी देहली - उत्तर भारतात १० एप्रिल या दिवशी भूकंपाचे धक्के बसलेे. या भूकंपामुळे उत्तरेकडील देहली, हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या राज्यांसह अफगाणिस्तान आणि पाकिस्तानही हादरले. या भूकंपाचे धक्के दिल्ली आणि परिसरात ५ मिनिटांपर्यंत जाणवल्याचे सांगण्यात आले. दुपारी ४ वाजून १ मिनिटांनी झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.६ इतकी नोंदवण्यात आली. या भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानमधील हिंदुकुश पर्वतरांगांमध्ये होते.

श्रीनगर पोलिसांनी अभिनेता अनुपम खेर यांना एन्आयटीमध्ये जाण्यापासून रोखले !

देशभक्त विद्यार्थ्यांची घेणार होते भेट
      श्रीनगर - येथील एन्आयटी शिक्षण संस्थेमधील देशभक्त विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी आलेले अभिनेता अनुपम खेर यांना पोलिसांनी विमानतळावरच रोखले आणि त्यांना एन्आयटीमध्ये जाण्यास मनाई केली. अनुपम खेर यांनी श्रीनगरला जाण्यापूर्वी प्रतिक्रिया व्यक्त करतांना, एन्आयटीमधील विद्यार्थ्यांना नैतिक पाठबळ देण्याची आवश्यकता असून एक भारतीय नागरिक या नात्याने मी येथील विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी श्रीनगरला जात आहे, असे सांगितले होते.

भारतमाता की जय न म्हणणार्‍यांना समुद्रात बुडवा ! - साध्वी प्राची

      शिर्डी - भारतमाता की जय म्हणणार नाहीत, अशांना सीमेपलीकडे हाकलून द्यावे अथवा समुद्रात बुडवून टाकावे. भारतात रहायचे आणि भारतमाता की जय म्हणायचे नाही, ही भूमिका निंदनीय आहे, असे प्रतिपादन साध्वी प्राची यांनी केले. ९ एप्रिल या दिवशी साध्वी प्राची यांनी येथील श्री साईबाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
धर्मशास्त्राविषयी अज्ञानी असणार्‍या साध्वी प्राची यांच्याकडून 
शनिदेवाच्या चौथर्‍यावरील महिलांच्या प्रवेशाचे स्वागत
     गुढीपाडव्याच्या दिवशी श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश देण्याच्या निर्णयाचे साध्वी प्राची यांनी स्वागत केले. (साध्वी प्राची यांनी धर्मशास्त्र जाणून घेऊन त्याविषयी बोलावे, अशी शनिभक्तांची अपेक्षा आहे. - संपादक) त्या म्हणाल्या की, महिलांच्या धार्मिक अधिकारांचे हनन करण्यासाठी मोठे षड्यंत्र आखले गेले. तलाकच्या नावाखाली मुसलमान महिलांवर अन्याय होत आहे.

पाककडून शस्त्रसंधीचे पुन्हा उल्लंघन

      जम्मू - येथील पुँछ जिल्ह्यात ९ एप्रिलच्या रात्री पाकिस्तानी सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील भारतीय सैन्याच्या चौक्यांवर गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. (पाकचे अस्त्वित्व असेपर्यंत या घटना थांबवणार नाहीत. त्यामुळे पाकचे अस्तित्व संपवणारे राज्यकर्ते हवेत ! - संपादक) पाककडून पहाटेपर्यंत गोळीबार चालू होता. या वेळी पाक सैन्याने मॉर्टर्सही डागले. भारतीय सैनिकांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले.


श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना जाण्यास विरोध करणार्‍या स्वराज्य महिला संघटनेच्या महिलांचा त्र्यंबकेश्‍वर मंदिरातील गर्भगृहात प्रवेश करण्याचा प्रयत्न !

यावरून स्वराज्य महिला संघटनेचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हे स्पष्ट होते !
      त्र्यंबकेश्‍वर - पुण्यातील स्वराज्य महिला संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा वनिता गुट्टे यांनी ९ एप्रिलला त्यांच्या महिला कार्यकर्त्यांसह श्री त्र्यंबकेश्‍वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला; परंतु मंदिरामध्ये असलेली तुंगार मंडळी आणि सुरक्षारक्षक यांनी त्यांना गर्भगृहाच्या प्रवेशापासून रोखले. वनिता गुट्टे यांनी शनिशिंगणापूरमधील श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांनी जाण्याला विरोध दर्शवला होता; मात्र येथे त्या गर्भगृहात जाण्यासाठी प्रयत्नशील होत्या. या दोन्ही परस्परविरोधी कृती करून त्यांनी त्यांचा दुटप्पीपणा दाखवून दिला.
१. या वेळी गुट्टे आणि इतर महिला यांना इतरांप्रमाणे गर्भगृहाच्या प्रवेशदारापासूनच दर्शन देऊन पोलीस आणि सुरक्षारक्षक यांनी त्यांना मंदिराबाहेर काढले. त्यानंतर त्यांना मंदिराच्या प्रांगणात एका बाकावर बसवण्यात आले.
२. या वेळी देवस्थानचे विश्‍वस्त श्री. सत्यप्रत शुक्ल यांनी गुट्टे यांना सांगितले की, देवस्थानने ३ एप्रिलला ठराव करून पुरुषांनासुद्धा गर्भगृहात प्रवेश बंद केला आहे, तसेच व्यवस्थापनाने पुरुष आणि महिला यांना गाभार्‍यात प्रवेश बंद करण्यात आल्याचे स्पष्ट केले.
३. यावर गुट्टे म्हणाल्या, केवळ महिलांना प्रवेश नको, म्हणून पुरुषांनाही प्रवेश बंद केल्याचे नाटक देवस्थान विश्‍वस्त मंडळाने केले आहे.

हिंदु जनजागृती समितीप्रणीत महिला शाखा रणरागिणीच्या वतीने धर्मपरंपरा रक्षा आंदोलन

विषय : श्री शनिशिंगणापूर मंदिरात घुसून धर्मपरंपरांचे भंजन करणार्‍या महिलांवर शासनाने कठोर कारवाई करावी, यासाठी धर्मपरंपरा रक्षा आंदोलन
दिनांक : ११ एप्रिल २०१६,
वेळ : दुपारी २ ते सायं. ५
स्थळ : आझाद मैदान, मुंबई.
संपर्क क्र. : ९९२०२०८९५८

त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या गाभार्‍यात केवळ सोवळे नेसलेल्या पुरुषांनाच प्रवेश देणार !

विश्‍वस्तांच्या बैठकीत सर्वानुमते निर्णय
     श्री क्षेत्र त्र्यंबकेश्‍वर - श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या गाभार्‍यात केवळ सोवळे नेसलेल्या पुरुषांनाच प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती त्र्यंबकेश्‍वर मंदिराचे विश्‍वस्त अधिवक्ता श्रीकांत गायधनी यांनी दिली.
१. मुंबई उच्च न्यायालयाने १ एप्रिलला राज्यशासनाला धार्मिक स्थळी कोणताही भेदभाव करता येणार नाही, असे निर्देश दिले होते.
२. या पार्श्‍वभूमीवर श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिर प्रशासनाच्या विश्‍वस्तांची ३ एप्रिल या दिवशी बैठक झाली. यात विश्‍वस्तांनी मंदिराच्या गर्भगृहात महिलांसह पुरुषांच्या प्रवेशावरही बंदी आणली होती.
३. या निर्णयाच्या विरोधात त्र्यंबकेश्‍वर येथील ग्रामस्थ आणि पुरोहित महासंघ यांनी ४ एप्रिल या दिवशी मोर्चा काढून तीव्र विरोध दर्शवला होता.
४. हा निर्णय विश्‍वस्तांनी १० एप्रिल या दिवशी झालेल्या त्यांच्या बैठकीत पालटला. या बैठकीत गर्भगृहात पूर्वीप्रमाणेच केवळ सोवळे नेसलेल्या पुरुषांना प्रवेश दिला जाणार असून महिलांना गर्भगृहात प्रवेश देण्यात येणार नाही, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.
५. मंदिराच्या गाभार्‍यामध्ये प्रवेश देण्याविषयीची मार्गदर्शक सूचना मागवण्याविषयी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात येणार असल्याचेही गायधनी यांनी स्पष्ट केले.


बीड येथील श्री शनिदेवाचे अर्धपीठ असलेल्या मंदिरातील चौथर्‍यावर प्रवेश करून महिलांनी धर्मपरंपरा खंडित केली

धर्मशिक्षणाच्या अभावी जन्महिंदूंकडून केली जाणारी अयोग्य कृती !
      बीड - श्री शनिशिंगणापूरमध्ये महिलांनी श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर ९ एप्रिल या दिवशी श्री शनिदेवाच्या साडेतीन पिठांपैकी अर्धपीठ असलेल्या शहरातील प्राचीन श्री शनिमंदिरातील चौथर्‍यावर सकाळी महिलांनी प्रवेश करून श्री शनिदेवाला तैलाभिषेक केला आणि धर्मपरंपरा मोडली. याही मंदिरातील चौथर्‍यात महिला प्रवेश करत नव्हत्या. महिलांच्या या कृतीचे स्वागत करून महिलांनी आता विश्‍वस्त मंडळात यावे, असे आवाहन मंदिर प्रशासक रामनाथ खोड यांनी केले. (धर्मपरंपरा रक्षण करणारे मंदिर प्रशासक हवेत. मंदिर प्रशासकांनी ही धर्मपरंपरा मोडणार्‍यांचे स्वागत करून एक प्रकारे धर्मद्रोहच केला आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. - संपादक) राजा विक्रमादित्याच्या काळापासून हे मंदिर अस्तित्वात असल्याचे इतिहास संशोधकांचे मत आहे. सदर शनिमंदिरात प्रत्येक शनिवारी मोठ्या संख्येने महिला-पुरुष दर्शनासाठी येत असतात; परंतु महिला मात्र लांबूनच दर्शन घेत असत. श्री शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश देण्याविषयी उच्च न्यायालयाने मंदिरासाठी लिंगभेद असता कामा नये, असे सांगितले होते. या निर्णयामुळे या शनिदेवाच्या मंदिरातील चौथर्‍यावर महिलांनी जाण्यास प्रारंभ केला आहे.

अफझलखानाचे थडगे प्रशस्त; मात्र जन्मभूमीवरच प्रभु श्रीराम तंबूत बंदिस्त ! - मिलिंद धर्माधिकारी

पुणे येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन 
श्रीरामनवमीला रामजन्मभूमीवर पूजा करण्यास
हिंदूंना विशेष अनुमती देण्याची रामभक्तांची मागणी
        पुणे, १० एप्रिल (वार्ता.) - परकीय आक्रमकांनी जाणीवपूर्वक भारतातील हिंदूंची श्रद्धास्थाने उद्ध्वस्त केली. अनेक ठिकाणे मंदिरे जमीनदोस्त करून त्या ठिकाणी मशिदींची उभारणी केली. अयोध्येतही श्रीराम मंदिराच्या ठिकाणी बाबरीचा ढाचा बांधण्यात आला. पुढे शेकडो करसेवकांनी स्वतःचे रक्त सांडून तो ढाचा पाडला. या संदर्भात उच्च न्यायालयानेही निकाल देतांना ती भूमी रामलल्लाची आहे, असे स्पष्ट केले. असे असूनही अद्याप तेथील मुख्य स्थानावर श्रीरामनवमीला पूजा, तसेच उत्सव साजरा करण्यास हिंदूंना कोणतीही अनुमती नाही. एकीकडे प्रतापगडाच्या पायथ्याशी असणार्‍या अफझलखानाच्या कबरीचे उदात्तीकरण केले जाते, तर दुसरीकडे कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेले प्रभु श्रीराम त्यांच्याच जन्मभूमीत तंबूत बंदिस्त आहेत. त्यामुळे येत्या १५ एप्रिलला म्हणजेच श्रीराम नवमीच्या दिवशी अयोध्येमध्ये समस्त हिंदु बांधवांना श्रीरामाचे पूजन करण्याची विशेष अनुमती देण्यात यावी. आक्रमकांचे उदात्तीकरण आणि देवतेची अवहेलना हिंदू सहन करणार नाहीत, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. मिलिंद धर्माधिकारी यांनी दिली. हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने १० एप्रिल या दिवशी कोथरूड येथील छत्रपती शिवाजी पुतळा चौकात आंदोलन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी सनातन संस्थेचे श्री. चंद्रशेखर तांदळे यांनीही उपस्थितांना संबोधित केले.

देशात प्रत्येक घंट्याला एक महिला हुंड्यासंबंधित कारणांची बळी ठरते !

महिलांवरील वाढते अत्याचार शासन कधी रोखणार ? 
     नवी देहली - देशात प्रत्येक घंट्याला एक महिला हुंड्यासंबंधित कारणांची बळी ठरते, अशी धक्कादायक माहिती नॅशनल क्राईम रेकॉडर्स ब्युरोच्या (राष्ट्रीय गुन्हे अहवालाच्या) माध्यमातून पुढे आली आहे. या आकड्यांनुसार वर्ष २०१४ मध्ये देशातील विविध राज्यांत हुंडाबळीच्या ८ सहस्र ४५५ घटना समोर आल्या आहेत. (देशाने गेल्या ६८ वर्षांत हाच विकास साध्य केला का ? - संपादक)
    जुलै २०१५ मध्ये घोषित करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या ३ वर्षांत भारतात एकूण २७ सहस्र ७७१ महिलांचा मृत्यू हुंड्याच्या संदर्भातील कारणांमुळे झाला होता. यातील अनुमाने ७ सहस्र घटना केवळ उत्तरप्रदेश राज्यातील आहेत. त्यानंतर बिहारचा क्रमांक लागत असून तेथे ३ सहस्र ८३० घटना घडल्या आहेत, तर तिसर्‍या क्रमांकावर मध्यप्रदेश असून तेथे हुंड्यासंबंधित २ सहस्र २५२ घटना घडल्या आहेत.
     कायद्यानुसार हुंडा मागितल्यास व्यक्तीला किंवा तिच्या कुटुंबियांना ३ वर्षे कारावासाची शिक्षा होऊ शकते, तर हुंडाबळीसाठी उत्तरदायी व्यक्तींना जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे.

मध्यप्रदेशात वर्षभरात १६ वाघांचा मृत्यू !

     भोपाळ - मध्यप्रदेशमध्ये गेल्या एक वर्षाच्या काळामध्ये शिकार आणि अन्य कारणांमुळे १६ वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यांपैकी बहुसंख्य वाघांचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाल्याचे येथील वनविभागाच्या अधिकार्‍यांनी म्हटले आहे. तथापि शासनाच्या अपयशामुळेच या वाघांचा मृत्यू ओढवल्याचा आरोप या क्षेत्रामध्ये काम करणार्‍या प्रयत्न या स्वयंसेवी संस्थेने केला आहे. 
     या स्वयंसेवी संस्थेचे संचालक अजय दुबे यांनी म्हटले आहे की, मध्यप्रदेशमध्ये ८ वर्षांनंतरही वाघांच्या संरक्षणाच्या उद्देशार्थ विशेष पथकाची स्थापना करण्यात आलेली नाही. राज्यात वाघांची शिकार करणार्‍या तस्करांना शिक्षा होण्याचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षाही अल्प आहे. तस्करीसंदर्भात माहिती गोळा करण्याचे प्रमाण जवळपास शून्य आहे. अलीकडच्या काळात तस्करांना अटक झाल्याचेही आढळून आलेले नाही.
     वाघांच्या सुरक्षेसाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जात असल्याचा दावा वनविभागाचे उच्चाधिकारी शाहबाझ अहमद यांनी केला आहे.

तोकड्या कपड्यांवरून प्राध्यापकाने विद्यार्थिनीचा अवमान केल्याचा आरोप : विद्यार्थी बंडाच्या पवित्र्यात

     बेंगळुरू - येथील नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटीमध्ये एका विद्यार्थिनीला तोकड्या कपड्यांविषयी प्राध्यापकांनी भर वर्गात रागावल्याने विद्यार्थ्यांनी सदर प्राध्यापकाच्या विरोधात बंडाचा पवित्रा घेतला आहे. प्राध्यापकाच्या विधानाचा निषेध म्हणून दुसर्‍या दिवशी विद्यार्थी तोकडे कपडे घालून सदर प्राध्यापकाच्या वर्गाला उपस्थित राहिले. (अशा नीतीमत्ताहीन पिढीमुळेच देश रसातळाला जात आहे. ही परिस्थिती पालटण्यासाठी तरुणांना धर्मशिक्षण देणे अनिवार्य आहे. - संपादक)

इटली शासनाकडून भारताशी निगडित भ्रष्टाचारातील दोषींना शिक्षा !

विजय मल्ल्यासारख्यांवर कारवाई न करणारे केंद्रशासन 
यातून काही बोध घेईल, याची शक्यता नाही !
       नवी देहली - इटलीमधील संरक्षण आणि वायूदल क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या सर्वांत मोठ्या फिनमेकानिका ग्रुपचे माजी प्रमुख जुसेप्पे ओरसी यांना साडेचार वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच ऑगस्टा वेस्टलॅन्डचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रुनो स्पॅग्नोलिनी यांनाही न्यायालयाने ४ वर्षांचा कारावास ठोठावला आहे. यामुळे इटलीच्या या आस्थापनांना मोठा धक्का बसला आहे.
१. भारताला विक्री करण्यात आलेल्या ३ सहस्र ६०० कोटी रुपयांच्या १२ व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर्समध्ये चुकीचा हिशेब करणे, कंत्राट करण्यासाठी ५६ कोटी युरो (४ सहस्र २५० कोटी रुपये) लाच देणे आणि भ्रष्टाचारप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
२. सदर भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आल्यानंतर भारताने १ जानेवारी २०१४ पासून ऑगस्टा वेस्टलॅन्डसमवेत असलेले कंत्राट रहित केले होते.
३. वायूदलाचे माजी प्रमुख एस्.पी. त्यागी आणि त्यांचे चुलतभाऊ यामध्ये लाभार्थी असल्याच्या आरोपावरून केंद्रीय अन्वेषण विभाग आणि अंमलबजावणी संचालनालय यांच्याकडून चौकशी चालू आहे.
४. संचालनालयाने त्यागी, त्यांचे कुटुंबीय, युरोपमधील कार्लो जेरोसा, ख्रिश्‍चन मायकेल आणि गाइडो हस्चके हे नागरिक, फिनमेकानिका, ऑगस्टा वेस्टलॅन्ड अन् चंदीगडमधील आयडीएस् इन्फोटेक आणि एअरोमॅट्रिक्स ही आस्थापने; तसेच मॉरिशस आणि ट्युनिशिया या देशांतील दोन आस्थापने यांची नावे केंद्रीय अन्वेषण विभागाच्या तक्रारींमध्ये नमूद केली आहेत.

महाराष्ट्रात हिंदु धर्माभिमान्यांच्या संघटितपणामुळे नववर्षाचे स्वागत उत्साहात !

मुंबई
विविध संघटनांच्या वतीने काढली बोरिवली ते विलेपार्ले वाहन फेरी !
वाहनफेरीच्या सांगतेवेळी उपस्थित धर्माभिमानी
कोपरखैरणे

मुंबईत २ सहस्र ७०२ भ्रमणभाष मनोरे अनधिकृत !

पालिकेची साडेसहा कोटी रुपयांची हानी, लोकलेखा समितीचा ठपका !
       मुंबई - मुंबईतील विविध आस्थापनांनी २ सहस्र ७०२ अनधिकृत भ्रमणभाष मनोरे उभारले आहेत. ते उभारतांना आस्थापनांनी पालिकेचीही अनुमती घेतली नसल्याचा ठपका लोकलेखा समितीने ठेवला आहे. या मनोर्‍यांमुळे नागरिकांच्या आरोग्याला असलेला धोका लक्षात घेऊन शासनाने कडक अंमलबजावणी करावी, अशी शिफारसही समितीने केली आहे. यामुळे मुंबई महापालिकेला साडेसहा कोटी रुपयांची हानी झाल्याचा ठपका समितीने ठेवला आहे. याविषयीचे दायित्व मुंबई महापालिका आणि नगरविकास यांच्यावर निश्‍चित करण्यात यावे, असेही या अहवालात म्हटले आहे.

मुंबईत २ सहस्र ७०२ भ्रमणभाष मनोरे अनधिकृत !

पालिकेची साडेसहा कोटी रुपयांची हानी, लोकलेखा समितीचा ठपका !
       मुंबई - मुंबईतील विविध आस्थापनांनी २ सहस्र ७०२ अनधिकृत भ्रमणभाष मनोरे उभारले आहेत. ते उभारतांना आस्थापनांनी पालिकेचीही अनुमती घेतली नसल्याचा ठपका लोकलेखा समितीने ठेवला आहे. या मनोर्‍यांमुळे नागरिकांच्या आरोग्याला असलेला धोका लक्षात घेऊन शासनाने कडक अंमलबजावणी करावी, अशी शिफारसही समितीने केली आहे. यामुळे मुंबई महापालिकेला साडेसहा कोटी रुपयांची हानी झाल्याचा ठपका समितीने ठेवला आहे. याविषयीचे दायित्व मुंबई महापालिका आणि नगरविकास यांच्यावर निश्‍चित करण्यात यावे, असेही या अहवालात म्हटले आहे.

कोल्हापूरच्या संस्कृतीला आणि शांततेला कोणी तडा देण्याचा प्रयत्न केल्यास तो हाणून पाडू ! - राजर्षी शाहू कोल्हापूर अंबाबाई शांतता समिती

      कोल्हापूर - अंबाबाई मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्याचा हट्ट धरणार्‍या मुंबई, पुण्याच्या तथाकथित संघटनांना सक्त विरोध केला जाईल. ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा असणार्‍या कोल्हापूरच्या संस्कृतीला आणि शांततेला कोणी तडा देण्याचा प्रयत्न केल्यास तो हाणून पाडण्यात येईल, असे निवेदन राजर्षी शाहू कोल्हापूर अंबाबाई शांतता समितीने प्रसिद्धीस दिले आहे. सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे, रामभाऊ चव्हाण यांच्यासह शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या यावर स्वाक्षर्‍या आहेत. (तथाकथित स्त्री मुक्तीवादी संघटनांना विरोध करणार्‍या राजर्षी शाहू कोल्हापूर अंबाबाई शांतता समितीचे अभिनंदन ! हीच भूमिका कोल्हापुरातील जवळपास प्रत्येक भाविकाची आहे. त्यामुळे लक्षावधी भाविकांच्या श्रद्धांचा शासन विचार करणार कि नाही ? - संपादक)
     या पत्रकात म्हटले आहे की, देवाच्या नावावर सामाजिक स्वास्थ्य बिघडवणे आणि त्यायोगाने कायदा-सुव्यवस्था बिघडवून समाजात दुफळी निर्माण करण्याचे सुनियोजित कारस्थान चालू आहे. कोल्हापूरच्या मंदिरात गाभार्‍याचे दोन भाग आहेत. पहिल्या उंबर्‍यापासून आत प्रवेश करणे याचाच अर्थ गाभार्‍यात प्रवेश करणे असा अर्थ होतो. त्या पुढच्या उंबर्‍यापासून मूर्ती पाच फुटांवर आहे. आतील मूर्तीचे ठिकाण गर्भगृह म्हणून ओळखले जाते. तिचा आकार लहान असल्याने भक्तांनी आत जाणे अशक्य आहे.

भारतमाता की जय म्हणणे ही भारतीय असल्याची पावती ! - अनुपम खेर

       पुणे - काही लोकांनी देशाचे नाव खराब करण्याचे दायित्वच घेतले आहे. ते अगदी थोडे आहेत; मात्र माझा विश्‍वास १२० कोटी भारतवासियांवर आहे. जोपर्यंत नि:स्वार्थ भावनेने काम करणारे लोक आहेत, तोपर्यंत देशाची मान गर्वाने वर राहील. दूरचित्रवाहिन्यांच्या चर्चांमध्ये जे दाखवले जाते, ते भारताचे वास्तविक चित्र नाही. भारतमाता की जय म्हणणे, ही भारतियांसाठी गर्वाची गोष्ट आहे आणि तीच भारतीय असल्याची पावती आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी नुकतेच केले.

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात श्रीमती मथुराबाई राठी आणि सौ. जयमाला पडवळ यांनी गाठली ६१ प्रतिशत आध्यात्मिक पातळी !

श्रीमती राठी यांचा सत्कार करतांना सौ. अश्‍विनी पवार (डावीकडे)
सौ. पडवळ यांचा सत्कार करतांना सौ. अश्‍विनी पवार (डावीकडे)
       पनवेल - पिंपळगाव बसवंत (जिल्हा नाशिक) येथील श्रीमती मथुराबाई राठी (वय ८४ वर्षे) आणि देवद आश्रमातील स्वयंपाक विभागात सेवा करणार्‍या साधिका सौ. जयमाला पडवळ (वय ६१ वर्षे) यांनी ६१ प्रतिशत आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. देवद आश्रमात एका अनौपचारिक कार्यक्रमात सनातनच्या ६८ प्रतिशत आध्यात्मिक पातळी असणार्‍या साधिका सौ. अश्‍विनी पवार यांनी ही आनंदवार्ता घोषित केल्यावर उपस्थितांची भावजागृती झाली. या वेळी सौ. अश्‍विनी यांनी श्रीमती राठी यांचा श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन आणि सौ. पडवळ यांचा भेटवस्तू देऊन सत्कार केला.

सातारा येथे श्रीराम महायज्ञाला मोठ्या उत्साहात प्रारंभ

      सातारा - श्री श्री जगद्गुरु शंकराचार्य महासंस्थानम दक्षिणाम्नाय श्री शरदापीठम श्रृंगेरी आणि श्रीकृष्ण यजुर्वेद पाठशाळा याच्या संयुक्त विद्यमाने चिमणपुरा येथील वेदपाठशाळेमध्ये श्रीराम महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या यज्ञाला ९ एप्रिलपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी ८ एप्रिल ते १५ एप्रिल या कालावधीत हा यज्ञ होणार असून शांतीसूक्त पठण, आवाहित देवतांचे पूजन अग्निध्यान विविध सूक्त आणि स्वाहाकार होणार आहेत. महायज्ञ कालावधीत प्रतिदिन रात्री ८ वाजता यज्ञस्थळी महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच प्रतिदिन ५.३० ते ७.३० कीर्तनाचा कार्यक्रमही होणार आहे. शेवटच्या दिवशी म्हणजे १५ एप्रिल या दिवशी भव्य श्रीराम शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी समस्त श्रीराम भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घेऊन शोभायात्रेमध्ये सहस्रोंच्या संख्येने सहभागी होऊन रामभक्तीचा आनंद घ्यावा, असे आवाहन श्रीराम महायज्ञ संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

सनातन संस्था, सातारा न्यासाच्या वतीने डोंबिवली येथे नैतिक मूल्याचे संवर्धन या विषयावर मार्गदर्शन

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सौ. सीमा सामंत
     ठाणे - सध्या विद्यार्थ्यांकडून गुरुजनांचीच टिंगलटवाळी केली जाते. यातून त्यांचा अनादर होतो; पण ज्ञान देणार्‍या गुरूंचा आपण करायला हवा. ते कधीही, कुठेही भेटल्यास त्यांना नमस्कार करावा, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सौ. सीमा सामंत यांनी केले. त्या डोंबिवली (पश्‍चिम) येथील गावदेवी शाळेत ८ वी आणि ९ वीच्या विद्यार्थ्यांना सनातन संस्था, सातारा न्यासाच्या वतीने नैतिक मूल्याचे संवर्धन या विषयावर मार्गदर्शन करतांना बोलत होत्या. या वेळी त्यांनी मुलांना योग्य पद्धतीने अभ्यास कसा करावा, तसेच परीक्षेच्या वेळी येणारा ताण कसा दूर करावा, याविषयीही मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचा लाभ १५० विद्यार्थ्यांनी घेतला.हिंदुविरोधी षड्यंत्रांविरुद्ध हिंदूंनी एकमुखाने आवाज उठवण्याची हीच वेळ ! - कु. प्रतिभा तावरे, हिंदु जनजागृती समिती

  • हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने आयोजित वाहनफेरीत हिंदु धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त सहभाग !
  • १४० हून अधिक वाहनांचा सहभाग 
       तासगाव, १० एप्रिल (वार्ता.) - हिंदूविरोधी कायदे, गोहत्या, धर्मांतर, आतंकवाद, बलात्कार, नक्षलवाद, काश्मीरमध्ये इसिसचे झेंडे फडकावणार्‍यांची वाढती संख्या, लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद यांसारख्या समस्या वाढत आहेत. याचप्रकारे विविध प्रकारच्या हिंदूविरोधी षड्यंत्रांविरुद्ध हिंदूंनी जात, संप्रदाय, संघटना आदींचे बंध तोडून एकमुखाने आवाज उठवण्याची हीच वेळ आहे. त्यासाठी हिंदूंनी बुधवार, १३ एप्रिल या दिवशी चंपाबेन वाडीलालच्या ज्ञानमंदिराच्या मैदानावर होत असलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतिभा तावरे यांनी केले. हिंदु धर्मजागृती प्रचारासाठी सांगली नाका ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अशी वाहनफेरी काढण्यात आली, त्या वेळी त्या बोलत होत्या. या फेरीत १२५ हून अधिक दुचाकी आणि १५ हून अधिक चारचाकी वाहने सहभागी झाली होती.

इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या (बी.ई) शेवटच्या वर्षाच्या प्रथम सत्र परीक्षेत ८१.०९ प्रतिशत गुण !

कु. जया थोरात
कु. जया थोरात हिचे सुयश !
      वाशी (नवी मुंबई) - येथील सनातनची साधिका कु. जया अशोक थोरात (वय २२ वर्षे) हिला इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या अभियांत्रिकी शाखेच्या शेवटच्या वर्षाच्या (बी.ई) प्रथम सत्र परीक्षेत ८१.०९ प्रतिशत गुण मिळाले असून तिचा महाविद्यालयात तृतीय क्रमांक आला आहे. (मिळालेल्या यशासाठी कु. जया थोरात हिचे अभिनंदन ! - संपादक) या यशाचे श्रेय तिने श्रीकृष्ण, प.पू. डॉक्टर, प.पू. पांडे महाराज यांना अर्पण केले.
     परीक्षेच्या वेळी कु. जया प्रत्येक पेपरला सुट्टी असतांना सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात सेवेसाठी जायची. सेवा, अभ्यास आणि परीक्षा या संदर्भात सांगतांना ती म्हणाली, आश्रमात सेवा करतांना मनात केवळ सेवेचेच विचार असायचे. त्यानंतर घरी गेल्यावर अल्प वेळेत अधिक अभ्यास होऊन तो लक्षातही रहायचा. प्रश्‍नपत्रिकेत उलट-सुलट प्रश्‍न पाहून भीती वाटायची. श्रीकृष्णाला प्रार्थना केल्यावर आपोआप उत्तरे सुचायची. सेवेतून मिळालेल्या चैतन्यामुळेच मला उत्तरे सुचत होती, असेही वाटायचे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींचा वक्फ बोर्डाचा घोटाळा उघड होण्याची चिन्हे !

      मुंबई - सिंचन आणि महाराष्ट्र सदन घोटाळ्यांनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी शासनाच्या काळात केलेल्या वक्फ बोर्डाच्या घोटाळ्याप्रकरणी कारवाई होण्याची चिन्हे आहेत. या घोटाळ्यातील दोषींची पोलिसांच्या द्वारे चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे प्रविष्ट करण्याची ग्वाही ६ एप्रिल या दिवशी अल्पसंख्यांकमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत दिली. राष्ट्रवादीचे नेते माजी केंद्रीय मंत्री तारीक अन्वर, माजी आरोग्यमंत्री राजेंद्र शिंगणे, आसिफ पटेल आदी नेते वक्फ घोटाळ्याच्या चौकशीत दोषी आढळल्याचेही खडसे म्हणाले.
     अल्पसंख्यांक विभागाच्या अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांवर झालेल्या चर्चेला उत्तर देतांना एकनाथ खडसे यांनी वक्फ बोर्डाच्या भूमी घोटाळ्याच्या प्रकरणी कारवाई करण्याची शासनाची भूमिका असल्याचे स्पष्ट केले. वक्फ बोर्ड घोटाळ्याच्या प्रकरणी नेमण्यात आलेल्या शेख समितीने नेते आणि अधिकारी यांवर ठपका ठेवला आहे.

तुळजापूर तालुक्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विविध ठिकाणी सामूहिक गुढीपूजन आणि स्वागत फेरी !

       तुळजापूर (जिल्हा धाराशिव), १० एप्रिल (वार्ता.) - तुळजापूर तालुक्यातील विविध गावांत हिंदूंनी स्वयंस्फूर्तीने एकत्र येऊन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सामूहिक गुढीपूजन केले. सिंदफळ येथे श्री. आंबादास बेंबळकर, नांदूरी येथे श्री. भास्कर पाटील, सारोळा येथे महादेवाचे पुजारी श्री. वसंत गिरी, काटी येथे श्री. ढगेगुरुजी, काक्रंबा येथे श्री. धोडिंबा माळी, अपसिंगा येथे श्री. बालाजी पांचाळ आणि तुळजापूर येथे श्री. भारत धर्माधिकारी यांनी गुढीचे पूजन केले, तर अन्य ठिकाणी धर्माभिमान्यांच्या हस्ते गुढीचे पूजन करण्यात आले.

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंच्या धर्मपरंपरा मोडणारे हिंदूच हिंदु धर्माचे खरे वैरी !
     श्री शनिशिंगणापूरमध्ये महिलांनी श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर जाऊन शेकडो वर्षांची परंपरा खंडित केल्यानंतर आता श्री शनिदेवाच्या साडेतीन पिठांपैकी अर्धपीठ असलेल्या बीड येथील प्राचीन श्री शनिमंदिराच्या चौथर्‍यावर जाऊन महिलांनी तैलाभिषेक केला आणि धर्मपरंपरा मोडली.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Maharashtrake Beedme Shri Shanibhagvan ke chabutarepar jakar mahilaone darshan liye !
Dharmaparamparaon ko todnewale Hinduhi Hindu dharmake bairi hai !
जागो ! : महाराष्ट्र के बीड में श्री शनि भगवान के चबुतरेपर जाकर धर्मद्रोही महिलाओं ने दर्शन लिए.
धर्मपरंपराआें को तोडनेवाले हिन्दु ही हिन्दू धर्म के बैरी है !

मिरज, कुंडल, पलूस येथे सामूहिक गुढीपूजन उत्साहात !

पलूस येथे सामूहिक गुढीपूजन चालू असतांना उपस्थित हिंदु धर्माभिमानी
      सांगली, १० एप्रिल (वार्ता.) - मिरज शहरात मरीमाता मंदिर, भारतनगर, शंभरफुटी रस्ता येथे हिंदु जनजागृती समिती, गोंधळी समाज, श्रीराम सेना यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक गुढीपूजन करण्यात आले. पूजेसाठी माजी पोलीस निरीक्षक श्री. बाबासाहेब जाधव आणि त्यांच्या धर्मपत्नी हे उपस्थित होते, तर पूजा श्री. जोशीकाका यांनी सांगितली. श्री. मनोज गवळी यांनी सामूहिक प्रार्थना सांगून उपस्थितांकडून प्रतिज्ञा म्हणवून घेतली. या वेळी शिवसेनेचे श्री. शशिकांत वाघमोडे, श्रीराम सेनेचे श्री. शुभम भोरावत, गोंधळी समाजाचे सर्वश्री बसवंत भोरावत, नितीन भोरावत, रेल्वे प्रवासी सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. किशोर भोरावत, माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री. राजू सरवदे, सामाजिक कार्यकर्ते श्री. अनिल आयरेकर, कमळाबाई वासुदेव, प्रज्ञाताई गोंधळी, शोभाताई भोसले यांसह ५५ हून अधिक हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते.

अवैध वाळू आणि गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी नवीन धोरण ! - एकनाथ खडसे, महसूलमंत्री, महाराष्ट्र

     मुंबई - राज्यभरात होत असलेले अवैध वाळू आणि गौण खनिजाचे उत्खनन रोखण्यासाठी नवीन धोरण ठरवण्यात येत असून नियमांमध्ये दुरुस्तीही करण्यात येत आहे. वाळू आणि खनिजाचे अवैध उत्खनन रोखण्यासाठी हरित न्यायालयाने काही सूचना आणि निर्देश दिले आहेत. या निर्देशाचे पालन करून महसूल विभागाच्या माध्यमातून नवीन धोरण आखण्यात येत आहे, अशी माहिती महसूलमंत्री श्री. एकनाथ खडसे यांनी विधानसभेत दिली. 
    अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यामध्ये गौण खनिजाचे उत्खनन होत असल्याविषयीचा प्रश्‍न आमदार प्रा. वीरेंद्र जगताप, भीमराव धोंडे आणि राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विचारला होता.

लातूरला १५ दिवसांत रेल्वेने पाणी देणार ! महसूलमंत्री खडसे

विशेष प्रतिनिधी श्री. संतोष पाटणे
     मुंबई - गेल्या ७० वर्षांत साधी पाईपलाईन करू शकला नाही. लोकांनी टँकर, बॅरेलने पाणी भरले. आम्ही तर थेट रेल्वेनेच पाणी लातूर येथे पोहोचवणार आहोत. गेल्या ७० वर्षांत आघाडी शासनाने जे पाप केले आहे ते आम्ही फेडत आहोत, असा घणाघाती आरोप महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी नुकताच विधानसभेत केला. 
     लातूर जिल्ह्यातील दुष्काळ आणि पाणीटंचाई यांमुळे गावकरी स्थलांतरीत होत असल्याविषयी लातूरचे आमदार श्री. अमित देशमुख यांनी विधानसभेत तारांकित प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देतांना खडसे यांनी वरील आरोप केला. खडसे पुढे म्हणाले, केंद्रशासनाने २ रेल्वे ट्रॅक देण्याचे मान्य केले आहे. पाणी वाटपात सवलतही देण्यात येणार आहे. आमची इच्छाशक्ती आहे म्हणून आम्ही रेल्वेने पाणी देण्याची उपाययोजना करत आहोत. हे नियमात बसत नसेल, तरी नियमात दुरुस्ती करून लातूरला पाणी देणारच आहोत. लातूरला पाणी दिल्यानंतर विरोधकांकडे विषयच रहाणार नाही. त्यामुळे विरोधकांची अडचण झाली आहे. याविषयी एका सदस्याने मागणी केली की, संभाजीनगर (औरंगाबाद) येथे बियर, दारू बनवणार्‍या कारखान्यासाठी ५६ एम्एल्डी पैकी ३५ एम्एल्डी पाणी वापरले जात आहे. पाण्याचे दुर्भिक्ष पाहता पुढील ३ मास त्यांना पाणी वापरास बंदी घालण्यात यावी. यावर सभापती हरीभाऊ बागडे यांनी ही मागणी योग्य असून त्यावर शासनाने कारवाई करावी, असा आदेश दिला.

बांधा-वापरा-हस्तांतर करा, प्रकल्पाऐवजी वसंतदादा बँकेतील ठेव प्रथम वसूल करा ! - युवराज बावडेकर

      सांगली, १० एप्रिल (वार्ता.) - महापालिकेच्या हिताच्या नावे बांधा-वापरा-हस्तांतरीत करा याचा घाट घालण्यात आला आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे महापौर हारुण शिकलगार यांनी धैर्य असेल, तर महापालिकेचे वसंतदादा सहकारी बँकेत अडकलेले ६८ कोटी रुपये वसूल करावेत, असे आव्हान भाजपचे नगरसेवक श्री. युवराज बावडेकर यांनी दिले आहे.
      बांधा-वापरा-हस्तांतरित करा यातून पुन्हा भूखंड माफियांचे कोटकल्याण करण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यामुळे मोक्याच्या जागा संगनमताने बांधकाम व्यावसायिकांच्या कह्यात देण्याचा प्रयत्न जर बहुमताच्या जोरावर केला, तर भाजप रस्त्यावर उतरून विरोध करेल, असेही श्री. बावडेकर यांनी पत्रकारांना सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने केंद्रीयमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी चढवली अजमेर दर्ग्यावर चादर !

       नवी देहली - अजमेर येथे ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या साजरा करण्यात येत असलेल्या ८०४ व्या उरूसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने केंद्रीयमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी नुकतीच अजमेर शरीफ दर्ग्यावर चादर चढवली. या वेळी नक्वी यांनी पंतप्रधान मोदी यांचा संदेश वाचून दाखवला. ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती आमच्या देशातील महान सूफी परंपरेचे एक वेगळे आदर्श आहेत, असे त्यात लिहिले होते. या उरूसामध्ये मुसलमानांसह हिंदूंही मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

तंजीम अहमद हत्या ही पहिलीच घटना असावी !

श्री. विक्रम भावे
     तंजीम अहमद या एन्.आय.ए. (राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा)मध्ये काम करणार्‍या पोलीस अधिकार्‍याला गोळ्या घालून ठार मारल्याची घटना उत्तरप्रदेशमधील बिजनोर येथे घडली. गुंड किंवा आतंकवादी यांच्याशी झालेल्या चकमकीत पोलीस मारले गेल्याच्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. देशवासियांना (आणि पोलिसांनाही) त्याची सवय झाली आहे; पण अशा पद्धतीने एका पोलीस अधिकार्‍याला भर रस्त्यात गोळ्या घालून ठार मारण्याची ही देशातील पहिलीच वेळ असावी. तंजीम अहमद हे वर्ष २००९ पर्यंत सीमासुरक्षा दलात कार्यरत होते. त्यानंतर त्यांची नियुक्ती राष्ट्रीय अन्वेेषण यंत्रणेमध्ये केली गेली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी पाकिस्तानातून येणार्‍या बनावट चलनी नोटा भारतात पसरवणार्‍यांचे मोठे जाळे मोडून काढले होते, तसेच इसिससाठी भारतात काम करणार्‍यांनाही त्यांनी जेरबंद केले होते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पठाणकोट येथील सैन्याच्या तळावर पाकिस्तानी आतंकवाद्यांनी जे आक्रमण केले होते, त्याचे अन्वेषण करणार्‍या संयुक्त दलातही तंजीम अहमद होते.

सोलापुरात तरुणीचा विनयभंग करणार्‍या धर्मांधास अटक

       सोलापूर, १० एप्रिल - हैद्राबाद रोडवरील शेतकी फार्म येथे फुले आणण्यासाठी गेलेल्या तरुणीचा शकुंबर तांबोळी (रा. सोलापूर) या धर्मांधाने विनयभंग केला. या धर्मांधाच्या विरुद्ध पीडित तरुणीने जोडभावी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पनामा - शासकीय अपयश ?

     सध्या पनामा या देशामध्ये लपवलेल्या काळ्या पैशांची चर्चा चालू आहे. इंटरनॅशनल कंझोर्शियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्ट्स (आयसीआयजे) आणि ऑर्गनाइज्ड क्राइम अ‍ॅण्ड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (ओसीसीआरपी) या २ संस्थांनी उघड केलेल्या पनामा पेपर्सनी आधुनिक जगातील अतीश्रीमंतांची खरी ओळख उघड केली आहे. पनामा हा देश वर्ष १९८० पासून काळे पैसे गुंतवणार्‍यांसाठी कुप्रसिद्ध आहे. त्या देशातील कायदा क्षेत्रातील मोसेक फोंसेका आस्थापनातील १ कोटी १५ लक्षांहून अधिक कागदपत्रे उघड झाली आहेत. त्यात ५० पेक्षाही अधिक देशांतील १४० राजकीय नेते, शेकडो उद्योजक, खेळाडू आणि चित्रपट अभिनेते यांनी केलेली आर्थिक बनवाबनवी उघड केली आहे. पनामामध्ये २१ महापद्म ते ३२ महापद्म डॉलर्स इतका काळा पैसा आहे, असे ब्रिटनच्या टॅक्स जस्टीस नेटवर्कने म्हटले आहे. इतके गुप्त असलेले हे कागद उघड करण्यासाठी किती आणि कसे प्रयत्न केले गेले, हे जगाला लवकर कळेलच !

पुरोगाम्यांनो, तळ्यातील बेडकाप्रमाणे विचार करणे सोडा आणि महान वैदिक हिंदु धर्माचे महत्त्व लक्षात घ्या !

१. धर्मप्रेमी हिंदूंना धर्माचरण वा धर्मप्रसार करण्यास हिंदूंचाच मोठा 
विरोध सहन करावा लागतो, ही आजची शोकांतिका !
श्री. संदीप जगताप
     अन्य धर्मीय त्यांच्या धर्मपरंपरांचे समर्थपणे रक्षण करू शकतात आणि त्यांचा धर्मप्रसार होण्यासाठी प्रयत्न करू शकतात; कारण ते संघटित आहेत. त्यांना ज्ञात आहे की, धर्म ही अस्मिता आहे, धर्म ही जननी आहे, ती नरजन्माचे सार्थक करून देणारी संजीवनी आहे; परंतु हिंदु धर्मामध्ये विरुद्ध स्थिती पहावयास मिळते. धर्मप्रेमी हिंदूंना स्वधर्मानुसार आचरण करण्यास वा हिंदु धर्माचा प्रसार करण्यास हिंदूंकडूनच मोठा विरोध सहन करावा लागतो, ही आजची शोकांतिका आहे. धर्मशास्त्राला प्रमाण न मानल्याने श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांनी चढायचे कि नाही यांसारख्या विविध सूत्रांवरून हिंदूंमध्ये वाद निर्माण होतो आणि जी हिंदूंची शक्ती धर्माचे तेज जगाच्या कानाकोपर्‍यांत पोचवण्यासाठी वापरायला हवी, ती आपापसांत वाद-विवाद करण्यामध्ये व्यर्थ दवडली जात आहे; पण ही गोष्ट स्वत:ला पुरोगामी म्हणवणारे समजून घेतील, तो सुदिन !

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)
    आपण हिंदु एकत्र येतो; पण एक होत नाही. आतातरी एक होेऊया ! - श्री. आनंद मयेकर, अध्यक्ष, ब्रह्मानंद तरुणाई

नाशिक येथील कुंभमेळ्यातील सेवेच्या कालावधीत साधकांना आलेल्या अनुभूती, त्यांच्यात झालेले पालट आणि शिकायला मिळालेली सूत्रे

१. सौ. सुचेता सुरेश नाईक, पंढरपूर
१ अ. कुंभमेळ्यातील सेवेच्या कालावधीत अ‍ॅलर्जी आणि कंबरदुखीचा त्रास न होणे आणि सेेवेतून आनंद मिळणे : मला धुळीची पुष्कळ अ‍ॅलर्जी आहे. गर्दीतून जातांना किंवा अन्य वेळी नाकात धूळ गेली, तर मला लगेच सर्दी होते आणि जागरण झाले की, पित्ताचा त्रास होतो. नाशिक येथील कुंभमेळ्यातील सेवा करतांना गर्दी आणि धूळ दोन्हीही होती अन् जागरणही होत होते; परंतु मला कोणताही त्रास झाला नाही. मणक्याचा आणि कंबरदुखीचा त्रास असल्याने ४ घंटे एकाच ठिकाणी बसून किंवा उभे राहून यापूर्वी मी कधीही सेवा केली नाही; पण या वेळी ८ ते १० घंटे तशी सेवा होत होती, तरी त्रास झाला नाही. सकाळी वेळेत आवरले जायचे. कोणतीही सेवा करतांना देव आनंदच देत होता.

साधकांनी कारागृहात राहून केलेली साधना

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
साधकांनी कारागृहात असतांना साधना, राष्ट्र, आणि धर्म 
(तात्त्विक विषय) यांच्या संदर्भात केलेले लिखाण
   वर्ष २००९ मध्ये मडगावला एका दुचाकीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे नाचणार्‍या पोलिसांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास, तसेच त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. या अशा कठीण प्रसंगांना साधकांनी केवळ साधनेच्या बळावर धीरोदत्तपणे तोंड दिले. यातून वाचकांच्या मनावर साधनेचे महत्त्व ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना करणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिकेच्या अंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही साधना, राष्ट्र आणि धर्म यांविषयी केलेले तात्त्विक चिंतन पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

प्रतिदिन वाचा नवे सदर...!

रामनाथी आश्रमाचे माहात्म्य
       सात्त्विकता आणि चैतन्य यांची अनुभूती देणारा अन् विश्‍वदीप असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, साधक, हितचिंतक आणि जिज्ञासू भेट देत असतात. हिंदु राष्ट्राची छोटी प्रतिकृतीच असलेल्या या आश्रमाला भेट देऊन हिंदुत्वनिष्ठांना हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रेरणा मिळते, तर साधकांना साधनेसाठी आध्यात्मिक ऊर्जा लाभते. अशा या एकमेवाद्वितीय रामनाथी आश्रमाच्या भेटीच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती या सदरातून नियमित प्रसिद्ध करत आहोत.

भावजागृतीचे प्रयत्न केल्यावर मिळणार्‍या आनंदामुळे ६१ टक्के पातळीच्या सौ. रोहिणी रमेश ताम्हणकर यांनी प.पू. गुरुदेवांच्या चरणी व्यक्त केलेली पत्ररूपी कृतज्ञता !

सौ. रोहिणी ताम्हनकर
हे गुरुदेवा,
        मी आज आहे, ती तुमच्यामुळेच ! मला तुम्हीच घडवलेत, योग्य दिशा दिलीत. खरे अध्यात्म शिकवलेत आणि दैनंदिन जीवनात कृतीच्या स्तरावर ते करवून घेतलेत. आज मी पुष्कळ आनंदी आहे, ती केवळ तुमच्यामुळेच; म्हणून परम पूज्य तुम्ही जिंकलात आणि आम्ही हरलो, (अशा प्रसंगी साधक आणि मी दोघेही जिंकलेले असतो; कारण साधक जिंकले की, मलाही जिंकल्याचा आनंद होतो ! - (प.पू.) डॉ. आठवले) नाहीतर आज या मायाजाळात अडकून पडलो असतो. मायेत राहून अलिप्त कसे रहायचे ?, हे तुम्हीच शिकवलेत ना ? मला आज कुठल्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते. हे केवळ आणि केवळ तुमच्यामुळेच ! आज श्रीकृष्णाच्या रूपात तुम्हीच भेटलात. तुमची आणि पू. बिंदाताईची पुष्कळ आठवण येते. तुमच्यामुळेच भावाच्या स्तरावर कृती करायला शिकले. त्यातून आत्मिक आनंद मिळायला लागला. तोच आनंद लिहून देत आहे. काही चुकले असल्यास मला क्षमा करा.

पू. अप्पाकाकांनी संत होण्यापूर्वी एकनाथी भागवतावर केलेल्या मार्गदर्शनाच्या ध्वनीचकतीचे टंकलेखन करतांना साधकाला झालेले आध्यात्मिक त्रास

      
श्री. राम होनप
माझ्याकडे सात्त्विक बालकांच्या मुलाखती, संत अथवा उन्नत यांचे मार्गदर्शन इत्यादी विषयांच्या ध्वनीचकतींचे टंकलेखन करण्याची सेवा आहे. एकदा मी टंकलेखन करण्यासाठी पू. अप्पाकाकांनी (देहत्याग केलेले सनातनचे संत पू. वसंत बाळाजी आठवले) एकनाथी भागवतावर केलेल्या मार्गदर्शनाची ध्वनीचकती ऐकत होतो. ही सेवा करतांना माझ्या मनात किती जलद गतीने बोलत आहेत. ही ध्वनीचकती कधी एकदाची संपते ? काय ही कटकट आहे ? विषयाची सूत्रबद्ध मांडणी नाही. त्यामुळे टंकलेखनाला किती अडचणी येत आहेत, असे नकारात्मक विचार येत होते. या वेळी माझी चिडचिडही होत होती. माझ्या मनातील हे विचार प.पू. डॉक्टरांना सांगितल्यावर ते म्हणाले, हे मार्गदर्शन पू. अप्पाकाकांनी संत होण्यापूर्वी केले असूनही त्यात किती चैतन्य आहे !, हे लक्षात येते. ही ध्वनीचकती ऐकून खरे तर माझ्या मनात चांगले शिकायला मिळाले, असा विचार यायला हवा होता; परंतु आसुरी शक्ती मनात नकारात्मक विचार आणतात, हे लक्षात आले. (पूर्वी मला आसुरी शक्तींचा तीव्र त्रास होता.) 
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.१०.२०१५)

लाघवी स्वभावाचा, देवतेचे विडंबन होऊ नये, यासाठी सतर्क असलेला आणि महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ५५ टक्के आध्यात्मिक स्तर असलेला कोची (केरळ) येथील कु. राघव श्रीराम लुकतुके (वय ८ वर्षे) !

कु. राघव लुकतुके
      कोची, केरळ येथील कु. राघव श्रीराम लुकतुके याचा आज चैत्र शुक्ल पक्ष पंचमी (११.४.२०१६) ला व्रतबंध सोहळा आहे. या निमित्ताने कु. राघवचे आई-बाबा यांना त्याच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे पाहूया.
कु. राघव यास मौजीबंधनानिमित्त 
सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !
१. साधकांच्या सहवासात रहायला आवडणे
         राघवला साधकांच्या सहवासात रहायला आवडते. चेन्नई सेवाकेंद्रात बाहेरून कुणीही साधक आले की, तो त्यांना रहायला सांगत असे. पू. (सौ.) गाडगीळकाकू तमिळनाडू दौर्‍यावर असतांना पुष्कळ वेळा त्यांना रात्री सेवाकेंद्रात येण्यास उशीर होत असे. तेव्हा राघव पू. काकूंची वाट बघत जागा रहात असे. आम्ही सेवेसाठी बाहेर गेलो, तरी पूर्ण दिवस तो साधकांसमवेत रहातो.

अभ्यासू वृत्ती, वाक्पटूता आणि गुरूंवरील दृढ श्रद्धा या गुणांचा समुच्चय असणार्‍या कु. सुप्रिया नवरंगे !

कु. सुप्रिया नवरंगे
१. गुरूंवरील श्रद्धेमुळे नेहमी 
चिंतामुक्त आणि आनंदी असणे
      सुप्रियाताईला पुष्कळ त्रास होत असतो, तरीही ती नेहमी आनंदी असते. ती कधीच निराश किंवा नकारात्मक वाटत नाही. ताई प्रत्येक परिस्थिती स्वीकारून आनंदी रहाते. ती कशाची चिंता करत नाही. असे वाटते की, गुरूंवरील श्रद्धेमुळे तिला चिंतामुक्त रहायला जमते.
२. चांगली सेवा करणार्‍या 
साधकांचे पुष्कळ कौतुक वाटणे
      एकदा श्री. चेतन राजहंस यांनी सनातनचे प्रवक्ता म्हणून एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात जाऊन चांगला विषय मांडला. तेव्हा सुप्रियाताईला पुष्कळ आनंद झाला. यावरून सुप्रियाताईला चांगली सेवा करणार्‍यांचे पुष्कळ कौतुक वाटते आणि ती इतरांच्या विजयात धर्मविजय मानून आनंदी होते, असे मला जाणवले.

प.पू. पांडे महाराज यांचे मार्गदर्शन

चैतन्यमय वातावरणात आणि आनंदाच्या 
डोहात डुंबून आस्वाद घेत रहाणे, हीच खरी साधना असणे 
प.पू. पांडे महाराज
        आपल्याला दृश्य स्वरूपात जे दिसते, ते सर्व मायेचे आवरण आहे. त्याच्या अंतःस्थ सर्व चैतन्य भरलेले आहे. यासाठी अंत:चक्षूंनी त्यांतील चैतन्य ओळखून ते चालतांना पदस्पर्शाने, पहातांना डोळ्यांनी, कानाद्वारे ऐकतांना, प्रसाद म्हणून अन्न ग्रहण करतांना मी चैतन्यच ग्रहण करत आहे, असे समजल्यास या चैतन्याच्या प्रवाहाने माझे सर्व विकार नष्ट होतात. हे चैतन्य आणि माझ्यातील चैतन्य एकरूप होऊन चैतन्य द्विगुणीत होते. केवळ चैतन्यच राहिल्याने मी आनंदविभोर होतो, अशा प्रकारे दृष्टीमध्ये पालट केला की, मी सतत आनंदी रहातो; कारण संत तुकाराम महाराज म्हणतात, आनंदाचे डोही आनंद तरंग । आनंदही अंग आनंदाचे ॥ सर्वत्र चैतन्यमय वातावरण आहे आणि हेच सत्य आहे. चैतन्य असल्याने ते आनंददायक आहे. अशा या डोहामध्ये जे दृश्य स्वरूपात तरंग उमटतात, ते आनंदाचेच असतात. एवढेच नव्हे, तर आपले शरीरही, प्रत्येक आवरणही त्याच आनंदाचे एक अंग आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदाशिवाय काहीच नाही. अशा आनंदाच्या डोहात डुंबून आस्वाद घेत रहाणे, हेच जीवन आहे.
- प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

पू. (सौ.) भावनाताई यांच्या चरणाचे दर्शन झाल्यावर चरणकमल या शब्दाचा खरा अर्थ उमगतांना झालेली भावजागृती !

१. पू. (सौ.) भावनाताई यांच्या पायाच्या तळव्याकडे दृष्टी पडताक्षणी डोळ्यांतून भावाश्रू वहाणे : आज सकाळी मी नामजपाच्या खोलीत बसून नामजप करत होतो. त्या वेळी एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) भावना शिंदे-हर्ली तेथे आल्या आणि माझ्या शेजारी बसून नामजप करू लागल्या. आम्ही दोघेही मांडी घालून बसल्याने त्यांच्या डाव्या पायाच्या तळव्याकडे माझी दृष्टी गेली. त्यांच्या चरणावर दृष्टी पडताक्षणी माझा भाव जागृत होऊन डोेळ्यांतून थंड अश्रू वाहू लागले.

पू. (सौ.) भावना शिंदे-हर्ली यांना तुर्यावस्था आणि आनंदावस्था यांच्या आलेल्या अनुभूती अन् त्यांमागील अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

पू. (सौ.) भावना शिंदे-हर्ली
१. तुर्यावस्थेत दैवी ज्ञान मिळणे : काही वेळा मी रात्री झोपायला जाते. तेव्हा मी झोपेतही नाही, जागृतावस्थेत नाही किंवा स्वप्नावस्थेतही नाही, अशी स्थिती मला अनुभवायला येते. या अवस्थेत असतांना मला दैवी ज्ञान मिळते, उदा. सतीसावित्री या शब्दाचा भावार्थ; म्हणजे आध्यात्मिकरित्या त्याचा अर्थ साधना आहे, जी मृत्यूनंतरही आपल्या समवेत येते.
२. तुर्यावस्थेत काही मिनिटांच्या अंतराने आत्मबोध होणे आणि त्या वेळी आनंदही जाणवणे : काही आठवड्यांपूर्वी एका रात्री ४ घंट्यांपर्यंत (तासांपर्यंत) मी कुठल्यातरी वेगळ्याच लोकात होते. हे चार घंटे पृथ्वीवरील अर्धा घंट्याच्या समान होते. या अवस्थेत असतांना काही मिनिटांच्या अंतराने मला आत्मबोध होत होता आणि त्या वेळी आनंदही जाणवत होता; मात्र नंतर ते मला आठवत नव्हते.

साधकांची साधना व्हावी, हेच असे ध्येय पू. अनुताईंचे !

पू. (कु.) अनुराधा वाडेकर
काय आणि किती सांगू ।
पू. अनुराधाताई आहेत किती छान ॥ १ ॥
कधी देत असती, मायेने पाठीवर थाप ।
तर कधी फिरत असे त्यांचा, गालावरून प्रीतीचा हात ॥ २ ॥
त्यांच्या स्पर्शात आहे मायेची (आई), आपुलकीची ऊब ।
पू. अनुताई आहेत प्रेमळ खूप ॥ ३ ॥
आवाजातच त्यांच्या गोडवा खूप ।
पू. अनुताई आहेत मधुर खूप ॥ ४ ॥

हिंदु धर्मशास्त्रातील अन्नदानाचे अनन्यसाधारण महत्त्व जाणून राष्ट्र-धर्म कार्यासाठी निष्काम आणि समर्पित वृत्तीने सेवा करणार्‍या सनातन आश्रमांतील शेकडो साधकांच्या अन्नदानाकरता धनरूपात साहाय्य करा !

वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
       राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कटीबद्ध असणारी अन् त्यासाठी प्रभावीपणे कार्य करणारी सनातन संस्था ही एकमेव संस्था आहे. भारतात विविध ठिकाणी संस्थेचे आश्रम आहेत. तेथे अध्यात्म आणि धर्मशिक्षण यांविषयी ज्ञान देणारे ग्रंथ, नियतकालिके, ध्वनीचित्र-चकती आदींच्या निर्मितीची सेवा अविरतपणे चालू असते. अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी हिंदु राष्ट्र स्थापनेचे उद्दिष्ट समोर ठेवून निष्काम आणि समर्पित वृत्तीने अखंड सेवारत असलेले शेकडो साधक या आश्रमांत वास्तव्याला असतात. त्यांच्यासाठी अन्नदानाकरता धनरूपात साहाय्य करून आध्यात्मिक लाभ मिळवण्याची सुवर्णसंधी सर्व धर्मप्रेमी आणि हितचिंतक यांना उपलब्ध आहे.
१. हिंदु धर्मशास्त्रानुसार अन्नदानाचे महत्त्व
      हिंदु धर्मशास्त्रानुसार जो गृहस्थ अर्थार्जन करतो आणि ज्याच्या घरी अन्न शिजते, त्याने अन्नदान करणे, हे त्याचे कर्तव्यच आहे. अन्नदानामुळे भोक्ता तृप्त होऊन आशीर्वाद देतो; म्हणून अन्नदान करणे हे श्रेष्ठ कर्म मानले जाते. अन्नदान केल्यास कोणत्या ना कोणत्या रूपाने अन्नदानाच्या दुप्पट फळ अन्नदात्याला मिळते; परंतु अहंपोटी अन्नदान केल्यास फळ निम्मे होते.

धर्मशिक्षणवर्ग घेण्याची सेवा प्रभावीपणे होण्यासाठी सनातनचे ग्रंथ, तसेच नियतकालिक सनातन प्रभात यांचे अभ्यासपूर्वक वाचन करा !

साधक, कार्यकर्ते आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी महत्त्वाची सूचना
     समाजमनात राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे बीज पेरण्यासाठी धर्मशिक्षणवर्ग आयोजित केले जात आहेत. राष्ट्र-धर्म कार्यात सहभागी होऊ इच्छिणार्‍यांपर्यंत लवकरात लवकर पोचता यावे, यासाठी ठिकठिकाणी धर्मशिक्षणवर्ग घेण्याची नितांत आवश्यकता आहे. जे साधक, कार्यकर्ते आणि धर्मप्रेमी धर्मशिक्षणवर्ग घेण्याची सेवा करतात, त्यांनी पुढील ग्रंथांचा अभ्यास केल्यास त्यांना वर्ग प्रभावीपणे घेता येईल.
अ. अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन
आ. अध्यात्म
इ. सण, धार्मिक उत्सव आणि व्रते
ई. कौटुंबिक, धार्मिक आणि सामाजिक कृतींमागील शास्त्र - भाग ३
उ. धर्मशिक्षण फलक
ऊ. हिंदु राष्ट्र स्थापनेची दिशा
     राष्ट्र आणि धर्म यांवर प्रतिदिन होणार्‍या आघातांविषयीची माहिती, हिंदूसंघटनासाठी आवश्यक प्रयत्न, तसेच धर्महानी रोखण्यासाठी योग्य आणि प्रभावी उपाय यांविषयी धर्मशिक्षण वर्गात दिशादर्शन करण्यात येते.

लग्नपत्रिकेतील वैशिष्ट्यपूर्ण कविता आणि निमंत्रण

पाऊस क्षणाचा, गारवा कायमचा ।
भेट क्षणांची, पण गाठ दोन जिवांची ॥
मुहूर्त क्षणाचा, पण नाती आयुष्याची ।
आपला सहभाग क्षणाचा, पण आशीर्वाद कायमचा ॥
या मनस्वी इच्छेने वधू-वरांस 
आशीर्वाद द्यावेत म्हणून आग्रहाचे निमंत्रण !

भाजी रिटायर होणे !

        श्रीगणेशचतुर्थीच्या कालावधीत ३०.९.२०१४ या दिवशी मी स्वयंपाकघरात सेवा करत होते. त्या वेळी माझ्या सासूबाई भाजी चिरतांना मला म्हणाल्या, भाजी पीड्डयार झाली ! त्या वेळी मला ऐकू आले, भाजी रिटायर झाली. मी विचार करू लागले, भाजी रिटायर कशी होईल ? काही वेळानंतर त्यांना काय म्हणायचे होते, हे माझ्या लक्षात आले. (कोकणी भाषेत पीड्डयार म्हणजे खराब) - एक साधिका, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

गोपींनो, एखादा प्रश्‍न विचारला, तर कृष्ण, असे उत्तर देऊ नका, तर बुद्धीला कळेल असे उत्तर द्या !

       एका साधिकेला विचारले, तुला नाश्ता करायला कोणी शिकवले ? त्यावर ती म्हणाली, कृष्णाने. कृष्ण सर्वत्र असल्याने हे उत्तर तात्त्विकदृष्ट्या बरोबर असले, तरी त्यामुळे व्यवहारात अडचण येते. नाश्ता चांगला झाल्यामुळे त्यासंदर्भात कौतुक करायचे असले किंवा त्यात पालट करणे आवश्यक असले, तर ते कोणाला सांगायचे, हे या उत्तरावरून कळत नाही; म्हणून व्यवहारात व्यावहारिक नाव घेऊनच बोलावे.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
संतांचे विश्‍लेषण करू नये
संतांचा शोध घेऊन काही सापडत नाही; कारण तेथे केवळ शून्य असते.
     भावार्थ : प्रकृतीतील गोष्टी पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्याद्वारे शोध घेऊन सापडणे शक्य आहे; पण पुरुष, शिव किंवा ब्रह्मतत्त्व यांचा शोध घेता येत नाही; कारण ते पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडचे आहे. संत ब्रह्माशी एकरूप झालेले असल्याने त्यांचा शोध घेऊन काही सापडत नाही.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार


परात्पर गुरु डॉ. आठवले
घरीही लोकशाही नसते, तर राष्ट्रात कशी यशस्वी ठरेल ?
     घरी लोकशाही नसते, म्हणजे लहान मुलांचे मत विचारांत घेऊन आई-वडील निर्णय घेत नाहीत. असे असतांना राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात एकही विचार न करणार्‍या जनतेने लोकप्रतिनिधी निवडणे हास्यास्पद नाही का ? - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

संयमाची आवश्यकता !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
    संस्कृती हा केवळ विद्वत्तापूर्ण चर्चा करण्याचा विषय नसून नित्य आपल्या मनावर नियंत्रण ठेवणे आणि इतरांच्या दुःखाची जाणीव ठेवणे, हीच खरी संस्कृती ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)


बंगालची जनता संभ्रमात !

संपादकीय
     वर्ष निवडणुकांचे आहे. सध्या पश्‍चिम बंगाल राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. विधानसभेच्या निवडणुकीतील दुसर्‍या टप्प्यातील मतदान आज, ११ एप्रिल या दिवशी होत आहे. या विधानसभेसाठी एकूण ६ टप्प्यांत मतदान होणार आहे. प्रचारात अनेक पक्ष सहभागी झाले असले आणि मोठमोठ्या नेत्यांच्या प्रचारसभांना गर्दी जमली असली, तरी अनेक राजकीय विश्‍लेषकांनी तृणमूल काँग्रेसच पुन्हा सत्तेत येणार असल्याचे भाकीत वर्तवले आहे. सत्तापालट झाला, तरी बंगालमध्ये भाजप विशेष जागा मिळवू शकेल, अशी शक्यता नाही. तृणमूल काँग्रेस नाही, तर डाव्यांना मते मिळतील; म्हणजे बंगालमधील जनतेची स्थिती आगीतून उठून फुफाट्यात अशीच होईल. एकूणच बंगालला चांगले दिवस पहायला मिळतील, याची शक्यता अत्यंत धूसर आहे. त्यामुळेच निवडणुकीतून काही सकारात्मक घडेल, अशी आशा करणे दिवास्वप्न ठरेल. वास्तविक बंगालची झालेली दुःस्थिती दूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न होणे आवश्यक आहे. गेली अनेक वर्षे राजकीय संघर्षातून रसातळाला गेलेले हे राज्य हिंदूंसाठी अत्यंत असुरक्षित, तर राष्ट्रद्रोह्यांसाठी मोकळे रान झाले आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn