Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या संदर्भातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विचारधन !

हिंदु राष्ट्र स्थापनेतील धर्माचरणी हिंदूंचे महत्त्व
     वर्ष २०२३ पासून हिंदु राष्ट्र येईल, हे आजवर अनेक संतांनी वेळोवेळी सांगितले आहे. या पार्श्‍वभूमीवर हिंदु राष्ट्र स्थापनेविषयी अनेकांंच्या मनात उत्सुकता असते. यासाठीच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा या विषयावरील वैशिष्ट्यपूर्ण सदर !
१. हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी सध्याचे 
बहुतांश धर्मनिरपेक्ष राजकारणी अपात्र का आहेत ?
अ. धर्मनिरपेक्ष राजकारणी हे स्वतः धर्मच मानत नसल्याने ते हिंदु राष्ट्र ही संकल्पनाच मान्य करणार नाहीत. त्यांच्या दृष्टीने अल्पसंख्य आधारित राजकारण प्रथम असून धर्म नंतर आहे, तर हिंदु राष्ट्र हे सनातन धर्मातील आदर्श संकल्पनेवर आधारित असल्याने ते अपात्र ठरतात.
आ. हिंदु राष्ट्राची स्थापना, म्हणजेच राष्ट्ररचना ही एक शास्त्रीय प्रक्रिया आहे आणि तिच्यात केवळ सत्याला स्थान आहे. आधुनिक बहुतांश राजकारणी असत्याचे रूप आहेत. भ्रष्टाचार, स्वार्थ, अनैतिकता, स्वैराचार अशा प्रकारचे दुर्गुण राजकारण्यांमध्ये आहेत. त्यामुळे अशा राजकारण्यांकडून राष्ट्ररचना होणे सर्वथा अशक्य आहे. 
इ. राज्यकर्त्यांना अमर्याद सत्ता हवी असते. वय उलटून गेले, तरी त्यांची पदाची आणि प्रसिद्धीची हाव सुटत नाही. याउलट राष्ट्ररचनेसाठी निःस्वार्थीपणा, प्रसिद्धीचा हव्यास नसणे, त्याग अशा गुणांची आवश्यकता असते. हे गुण ईश्‍वराची भक्ती आणि निःस्वार्थीपणे राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करणार्‍या धर्माचरणी हिंदूंकडेच असतात. 
ई. सत्याच्या बाजूने असलेल्या धर्माचरणी राजकारण्यांचाही हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत सहभाग असेल. (२३.४.२०१२) 
२. धर्माचरणी हिंदूच हिंदु राष्ट्र स्थापन करू शकतात !
     राष्ट्ररचना करू इच्छिणारे नेते आणि त्यांचे अनुयायी यांमध्ये नैतिक (आध्यात्मिक) प्रेरणा असणे आवश्यक आहे. धर्माचरणी हिंदूंमध्येच खरीखुरी नैतिक प्रेरणा जागृत होत असल्याने ते हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे प्रत्यक्ष कार्य करू शकतात. (२४.५.२०१२) 
२ अ. हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांची सद्यस्थिती : धर्मरक्षणासाठी संघटित झालेल्या व्यक्ती हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीच्या असल्या, तरी प्रत्येकाची प्रवृत्ती, विचारसरणी वेगवेगळी असते. हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांपैकी काही जण वाममार्गी, व्यसनी असतात. थोडक्यात कार्यकर्ते अनेक राजकीय पक्षांत ज्याप्रमाणे कार्य करतात, त्याचप्रमाणे हिंदुत्वनिष्ठ संघटनांतही कार्य करतांना आढळतात. हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या सद्यस्थितीचा अभ्यास केला, तर हे सहज लक्षात येईल.
२ अ १. धर्माचा अभ्यास नसणे : सर्व जण हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्र यांसाठी कार्यरत असले, तरी सनातन धर्माचा अभ्यास नसल्यामुळे अनेकांना हिंदु धर्मात ज्ञानाचे केवढे अपार भांडार आहे अन् इतर धर्मांत (पंथांत) त्याच्या एक लक्षांशही ज्ञान नाही, याची जाणीव नाही.
२ अ २. साधना न करणे : अनेक जण साधना न करणारे असल्यामुळे हिंदु धर्म किती सर्वोच्च पातळीच्या अनुभूती देतो आणि शेवटी अद्वैतापर्यंत नेतो, हे त्यांना ज्ञात नसते.
२ अ ३. हिंदु धर्माविषयी कृतज्ञता नसणे : व्यवहारात एखाद्याने साहाय्य केले, तर आपल्याला त्याच्याविषयी कृतज्ञता वाटते. हिंदु धर्म जन्म-मृत्यूच्या चक्रांतून कायमची मुक्ती देणारा असूनही ते ज्ञात नसल्याने अनेकांना हिंदु धर्मात जन्माला आल्याविषयी कृतज्ञता वाटत नाही.
२ अ ४. खरा धर्माभिमान नसल्याने धर्मद्रोही कृत्ये घडणे : काही जण केवळ मानसिक पातळीवर धर्माभिमान जोपासत असल्यामुळे काही वेळा त्यांच्याकडून धर्मद्रोही कृत्येही घडतात, उदा. श्रीलंकेत तमिळी हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांविषयी केंद्रातील तत्कालीन काँग्रेस शासनाने घेतलेल्या तटस्थ भूमिकेचे बंगालमधील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी समर्थन केले. तेव्हा त्यांचा निषेध करण्यासाठी तमिळी हिंदूंनी मूलतः बंगाली असलेल्या महर्षि अरविंद यांच्या पुडूचेरी येथील आश्रमावर आक्रमण केले होते. संत हे जात, प्रांत, भाषा आणि अस्मिता यांच्या पलीकडे गेलेले असतात. महर्षि अरविंदांनी हिंदु धर्माचा देश-विदेशांत प्रसार केला. त्यांच्याविषयी अखिल हिंंदु समाजाने कृतज्ञ असायला हवे. तमिळी वंशाच्या हिंंदूंच्या रक्षणासाठी प्रयत्न हे धर्मरक्षणाचे कार्य असले, तरी संतांच्या आश्रमावर आक्रमण करणे, हे धर्मद्रोही कृत्य होते. साधना केल्यानेच संतांचे महत्त्व कळू शकते.
२ अ ५. मोठेपणा मिळावा, यासाठी धर्मरक्षणाचे कार्य करणे : काही जण स्वतःला मोठेपणा मिळावा किंवा राजकीय महत्त्व प्राप्त व्हावे, या हेतूनेही धर्मरक्षणाचे कार्य करत असतात. खरे सांगायचे, तर धर्माला, म्हणजेच ईश्‍वराला धर्मरक्षणासाठी कोणाचीही आवश्यकता नसते. धर्मग्लानी आल्यानंतर भगवंत स्वतःच अवतार घेतो किंवा कोणाच्या तरी माध्यमातून ते कार्य करतो. या कार्यात आपली साधना म्हणून आपण सहभागी व्हायचे असते. (क्रमश:) 
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा) 
हा ग्रंथ ऑनलाइन खरेदीसाठीही उपलब्ध !
यासाठी सनातन शॉप च्या संकेतस्थळावरील पुढील लिंकला भेट द्या : goo.gl/TxlFr0 
(टीप : या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल असल्याची नोंद घ्यावी.)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn