Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

‘सनबर्न फेस्टिव्हल’ - भारतीय संस्कृतीवर विकृत परिणाम घडवणारे आक्रमण !

   
गेली ९ वर्षे गोव्यासह देशातील विविध शहरांमध्ये आयोजित करण्यात येणारा ‘सनबर्न’ हा पाश्‍चात्त्य संगीताचा फेस्टिव्हल यंदा पुणे शहराजवळ केसनंद येथे २८ ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या संगीत महोत्सवामध्ये ‘डीजे’ वाद्याच्या कर्णकर्कश आवाजात गायन-नृत्यासह, मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन यामधून युवक आणि युवती उन्मत्त होतात. यामधून अश्‍लील चाळे, ‘नार्कोटिक ड्रग्ज’चा मुक्तहस्ते वापर आदी अपप्रकारांना चालना मिळून कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येते. या संगीत महोत्सवामध्ये हिंदु संस्कृतीपासून दुरावरलेले समाजातील उच्चभ्रू लोक (Uprooted Hindus) सहभागी होत असले, तरी या कार्यक्रमाच्या आजूबाजूचे नागरी जीवन आणि ‘सोशल मिडिया’मधून देशाची सबंध युवा पिढी या भोगवादाला बळी पडल्याचे निर्दशनास येते. या कार्यक्रमातून संस्कृतीवर होणार्‍या आक्रमणातून समाजमनावर अनेक दूरगामी परिणाम होऊन भोगवादी मूल्यांना चालना मिळते. महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाने पर्यटनवाढीच्या नावाखाली हा फेेस्टिव्हल पुण्यात आणण्यास हिरवा कंदील दाखवला असला, तरी पुण्याचे सांस्कृतिक वातावरण लक्षात घेता ‘सनबर्न’सारखे फेेस्टिव्हल पुण्याच्या सुसंस्कृतपणाला गालबोट लावणारे ठरणार आहे.
सनबर्नमध्ये देवतेचे विडंबन

सनबर्नमध्ये राष्ट्रध्वजाची विटंबना 

१. पैशाचिक हिप्पी विकृतीचे सनबर्न हे व्यावसायिक स्वरूप !
   वर्ष १९७५ ते १९९० या कालावधीत पाश्‍चात्त्य देशांतील विकृत, मनोरुग्ण, नशाधीन विदेशी हिप्पी लोक गोव्यामधील काही निर्जन समुद्रकिनारी वस्तीला होते. हे हिप्पी रात्रीच्या वेळी विकृत संगीतावर रात्रभर अमली पदार्थांचे सेवन करून नाचायचे. अशा संगीताला ट्रान्झ, गोवा ट्रान्झ, टेक्नो अशी नावे देण्यात आली आहेत. या वेळी हे हिप्पी हिंदूंच्या देवतांच्या चित्रांच्या प्रतिकृती उभारायचे, तसेच झाडांना रंगवायचे. अशाच हिप्पींच्या संगीताला मोठ्या ध्वनीवर्धक यंत्रणेद्वारे प्रक्षेपित करून त्याला व्यावसायिक रूप देण्यात आले. अशा कार्यक्रमांना ‘इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक (इडीएम्) फेस्टिव्हल’ असे गोंडस नाव देण्यात आले आहे. सनबर्न हे असेच एक ‘इडीएम्’ आहे. आता सनबर्न या संगीत फेेस्टिव्हलमध्ये अशा विकृत संगीताच्या जोडीला अन्य मनोरंजन, खरेदी, खाद्यपदार्थ यांसह जीवनशैलीचे प्रदर्शन यांची रेलचेल असते. ‘सनबर्न महोत्सवामध्ये अमली पदार्थ नसतात’, असा दावा आयोजक करत आहेत; मात्र अमली पदार्थांचे सेवन केले जाते म्हणूनच दिवसभर आणि रात्रभर विकृत पाश्‍चात्त्य संगीतावर नाचले जाते, हे लक्षात येईल. या फेस्टिव्हलमध्ये येणारे सर्वजणच अमली पदार्थांचे सेवन करणारे नसतील; मात्र अमली पदार्थांचे सेवन करणार्‍यांचे प्रमाण लक्षणीय असेल हे निश्‍चित. या फेस्टिव्हलमध्ये प्रवेश घेण्यासाठी संकेतस्थळाच्या माध्यमातून प्रवेशिका मिळवता येते. या प्रवेशिकेसाठी प्रत्येकी किमान ७ सहस्र ७५० रुपयांचा दर आकारला जातो. 
२. सनबर्न ‘संगीत महोत्सव’ नव्हे, तर युवा पिढीला लक्ष्य करण्याचा नियोजनबद्ध कार्यक्रम !
   देशातील आयआयटी, एन्आयटी, एआयआयएम्, बिट्स पिलानी आदी महत्त्वाची अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालये यांमधील विद्यार्थी, तसेच संगणकीय आस्थापने यांतील युवा कर्मचारी आदी या महोत्सवाच्या प्रचारतंत्राला भुलून या महोत्सवात सहभागी होतात. ‘सनबर्न’ने अनेक महाविद्यालयांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये छोट्या संगीतरजन्यांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना भुरळ पाडली आहे. पुण्यात येऊ घातलेल्या ‘सनबर्न’ महोत्सवाचा विचार केल्यास विद्येचे माहेरघर म्हणून लौकिक असलेल्या पुण्यात लक्षावधी युवक-युवती विद्यार्जन करतात. त्यामुळे ‘सनबर्न’ या धर्मद्रोही कार्यक्रमाला ते बळी पडण्याची दाट शक्यता आहे. 
३. राजकारण्यांच्या भ्रष्टाचाराचा मोठा स्रोत !
   गोव्यात सनबर्नला अनुमती मिळण्यापूर्वीच बहुतेक वेळा संगीतरजनी आयोजकांकडून तिकीटविक्री पूर्ण करण्यात आली होती. यावरून आयोजकांना ‘अनुमती मिळणार’, याची निश्‍चिती असते, हेच दिसून येते. सनबर्नवाल्यांनी गोवा शासनाच्या कराची बरीच थकबाकी केली होती. संगीतरजन्यांच्या आयोजकांकडून करवसुली व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ट्रोजन डिमेलो यांनी वर्ष २०१५ मध्ये अधिवक्ता रोहित ब्रास डिसा यांच्याकरवी जनहित याचिका प्रविष्ट केली होती. कोट्यवधी रुपयांची थकबाकी वसूल केल्याशिवाय गोव्यात इलेक्ट्रॉनिक संगीतरजन्यांना अनुमती देऊ नये, असा स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने डिसेंबर २०१५ मध्ये दिला होता. यानंतर काही प्रमाणात कर भरण्यात आला आणि या संगीतरजनीला अनुमती मिळाली. आता पुणे येथे स्थलांतरित झाल्यानंतर सनबर्नच्या आयोजकांनी गोव्यातील तीन कोटी रुपयांचा कर भरलेला नाही, असे लक्षात आले आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. खरे तर असे भोगवादी कार्यक्रम शासनकर्ते, राजकारणी आणि प्रशासन यांच्या साहाय्याशिवाय आयोजित होऊ शकत नाहीत. हे समाजधुरीण कायद्यातील पळवाटा शोधत स्वार्थापोटी अंध होऊन समाज, राष्ट्र आणि पर्यायाने धर्म यांची हानी करत आहेत. केसनंद (जिल्हा पुणे) येथे होणार्‍या संगीत फेस्टिव्हललाही आजअखेर ग्रामपंचायतीचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र मिळालेले नाही; मात्र या कार्यक्रमस्थळाच्या भूमीचे मालक हे मोठे बांधकाम व्यावसायिक असून एका मोठ्या राजकीय नेत्याचे मानसपुत्र मानले जातात. 
४. गोव्यात सनबर्न आयोजकांकडून राष्ट्रध्वज आणि देवता यांचा विडंबनात्मक वापर !
   ख्रिस्ती नववर्ष साजरे करतांना गोव्यात संगीतरजनी आयोजित करणार्‍यांपैकी सनबर्न या प्रमुख ‘ब्रॅण्ड’च्या देशातील संगीतरजन्यांमध्ये राष्ट्रध्वजाचा विडंबनात्मक वापर करून देशाचा आणि राष्ट्रध्वजाचा अवमान करण्यात आल्याने सनबर्नच्या आयोजकांवर कारवाई करावी, अशी तक्रार फोंडा (गोवा) येथील राष्ट्रप्र्रेमी नागरिक श्री. श्रीरामप्रसाद कुष्टे यांनी २५ जानेवारी २०१५ या दिवशी फोंडा पोलीस ठाण्यात केली होती; मात्र या तक्रारीच्या संदर्भात पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. वर्ष २०१४ मध्ये सनबर्न संगीतरजनीच्या विज्ञापनात, तसेच ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या फलकांवर नटराजाच्या प्रतिमेचा वापर करून शिवाचा अवमान करण्यात आला होता. याविषयी हिंदु जनजागृती समितीने सनबर्नच्या आयोजकांचा निषेध केला होता. 
५. अमली पदार्थ सेवनाचे एकप्रकारे समर्थन करणारे सनबर्नचे माजी आयोजक शैलेंद्र सिंह !
   ‘अमली पदार्थाची प्रकरणे होतच रहातील. वाहनचालक वाहन चालवतांना भ्रमणभाषवर बोलतात आणि अपघात होतच असतात. कर्करोग कोणाला टाळता आला आहे का ? गोव्यापेक्षा पंजाबमध्ये अमली पदार्थांचा फैलाव अधिक आहे; मात्र गोवा अमली पदार्थाचे केंद्र असल्याचा आभास निर्माण केला जातो’, असे वादग्रस्त विधान सनबर्न महोत्सवाचे माजी आयोजक आणि ‘पर्सेप्ट इंडिया’या आस्थापनाचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक शैलेंद्र सिंह यांनी नोव्हेंबर २०१५ मध्ये केले होते. (देशाची आधारस्तंभ असलेली युवा पिढी अमली पदार्थांच्या आहारी गेली तरी हरकत नाही, असे शैलेंद्र सिंह यांना म्हणायचे आहे का ? सिंह यांच्यासारख्या राष्ट्रद्रोही विचारांच्या विकृत नागरिकांवर वेळीच कारवाई न झाल्यास ते देश रसातळाला नेतील. विकासाचा ध्यास घेतलेले शासन याची नोंद घेईल का ? - संपादक)
६. पुणे येथील सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजकांची मनमानी आणि गैरकारभार
   हा फेस्टिव्हल केसनंद गावातील गट क्रमांक ६० आणि त्यास लागून असलेल्या क्षेत्रात होत आहे. या भागात या फेस्टिव्हलच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात अनधिकृतरित्या गौण खनिजाचे उत्खनन आणि वृक्षतोड केली जात आहे, अशी तक्रार स्थानिक शेतकर्‍यांनी तहसीलदार आणि मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे केली आहे. या प्रकरणी तलाठ्यांनी केलेल्या पंचनाम्यात अंदाजे ६६५ ब्रास मुरुम अवैधरित्या उत्खनन केल्याचे म्हटले आहे. या अवैध उत्खननामुळे शासनाचा कोट्यवधींचा निधी बुडत आहे. तसेच पर्यावरणाचीही हानी होत आहे. सर्वांत गंभीर म्हणजे या भागात ज्या शेतकर्‍यांच्या भूमी आहेत, त्यांना समाजकंटकांकडून धमक्या दिला जात आहेत. तशा तक्रारी शेतकर्‍यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात केल्याने अज्ञातांविरुद्ध गुन्हा प्रविष्ट झाला. या भूमीचे एक वाटेकरी श्री. दत्तात्रय पालसकर यांनी अवैध उत्खनन होत असल्याविषयी आणि जमीन मालकांची अनुमती न घेता जागेचा वापर होत असल्याविषयीची तक्रार तलाठी, सर्कल अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. त्यामुळे कार्यक्रमाची अनुमती नाकारावी, असे तक्रारीत म्हटले आहे. या संदर्भात माहितीच्या अधिकारात माहिती मागवली असता तहसीलदारांनी अतुल चोरडिया यांना ‘तुम्ही अवैध उत्खनन केल्याचे कामगार तलाठी यांच्या पंचनाम्यानुसार सिद्ध होते, तरी तुमच्यावर जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७) नुसार कारवाई का करण्यात येऊ नये’, अशी नोटीस १६ नोव्हेंबरला पाठवल्याची कागदपत्रे मिळाली आहेत.
७. संस्कृतीभिमानी पुण्यातील नागरिकांनी गोव्याचा आदर्श घ्यावा !
पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या युवा शक्तीचा उल्लेख करून भारताच्या विकासाची स्वप्ने पहातात, ती युवा शक्ती अमली पदार्थांच्या सहज उपलब्धतेमुळे आणि पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे नाश पावणे योग्य नव्हे. युवा पिढी अमली पदार्थांच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढत आहे. पुण्यातील ‘रेव्ह पार्टी’, ‘हुक्का पार्टी’ आदींमधील युवकांचा सहभाग याची गंभीरता दर्शवतो. पर्यटनखात्याला पर्यटनवाढ करायचीच असेल, तर विदेशी पर्यटक भारतीय संस्कृतीशी जोडले जातील, अशा अनेक कलाकृती राज्यात आणि देशात आहेत, त्यांना उर्जितावस्था प्राप्त करून देऊन पर्यटनवाढ करावी; मात्र पाश्‍चात्त्य विकृतीला प्रोत्साहन देणारे आणि युवा पिढीला अमली पदार्थांच्या गर्तेत ढकलून नासवणारे सनबर्न फेस्टिव्हल गोव्याप्रमाणे हद्दपार करून सांस्कृतिक अस्मिता जपावी.
- श्री. पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती
‘सनबर्न’ या महोत्सवाचा गोव्यातील समाजविघातक इतिहास
‘सनबर्न’सारख्या महोत्सवांत अमली पदार्थांचा सर्रास वापर होत असल्याने झालेले गंभीर दुष्परिणाम
वर्ष २०१० : ३० डिसेंबर २०१० या दिवशी ‘सनबर्न’ महोत्सवात बेंगळुरू येथील नेहा बहुगुणा (वय २३ वर्षे) नावाच्या एका युवतीचा अमली पदार्थाच्या अतीसेवनाने मृत्यू 
वर्ष २०१४ : कांदोळी (गोवा) येथे झालेल्या ‘सुपरसोनिक’ इलेक्ट्रॉनिक नृत्य महोत्सवात मुंबईस्थित डिझायनर इशा मंत्री (वय २७ वर्षे) यांचा अमली पदार्थाच्या अतीसेवनाने मृत्यू 
‘सनबर्न’सारख्या संगीतरजन्यांच्या आयोजनामुळे पोलीस यंत्रणेवर बराच ताण पडत असणे 
   गोव्याच्या वागातोर भागात ‘सनबर्न’सारख्या संगीतरजन्या आयोजित केल्या जातात. या संगीतरजन्यांना लक्षावधी नागरिकांची उपस्थिती असते. त्यामुळे पोलीस यंत्रणेवर बराच ताण पडत असतो. या भागात रस्ते एकदम अरुंद असतात. यामुळे वाहतुकीची कोंडी होते. अशा परिस्थितीत नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती आल्यास रुग्णवाहिनी, अग्नीशमन आदी आपत्कालीन सुविधा पुरवणे अडचणीचे ठरू शकते.’ - गोव्याचे पोलीस उपमहानिरीक्षक ए.व्ही. गुप्ता (ऑगस्ट २०१६)
हिंदवी स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवणार्‍या पुण्यनगरीत सनबर्न होणे हे लांच्छनास्पद ! 
   ‘जो समाज आपला इतिहास-परंपरा विसरतो, त्या समाजाचे भवितव्य धोक्यात असते’ अशी एक म्हण आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी पाच पातशाह्यांचा पाडाव करून हिंदवी स्वराज्याची मुहुर्तमेढ छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्यनगरीत रोवली, तर छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी त्यांच्या प्राणांचे बलीदान केसनंदपासून अवघ्या ८ किलोमीटर अंतरावर असणार्‍या वढू-तुळापूर येथे केले. धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी धर्मवीर संभाजी महाराजांनी औरंग्याच्या क्रूर यातनांना क्षात्रतेजाने सामोरे जाऊन मृत्यूला आलिंगन दिले; मात्र कुठलीही तडजोड केली नाही. या पार्श्‍वभूमीवर देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना झालेल्या पुण्यनगरीत भोगवादी संस्कृतीचे बीभत्स रूप असलेल्या सनबर्नचे आयोजन हे लांच्छनास्पद आहे. भारत महासत्ता होण्याकडे वाटचाल करत आहे; मात्र ‘सनबर्न’चे आयोजन करून युवा पिढीला नशेच्या आहारी घालणारा भारत कशाच्या आधारावर महासत्ता होणार आहे, हा प्रश्‍न देशप्रेमी नागरिकांच्या मनात सलत आहे. 
श्री. पराग गोखले
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn