Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

याचसाठी केला होता अट्टाहास । शेवटचा दिस गोड व्हावा ॥ या संतवचनाप्रमाणे जीवनाचे सार्थक करणारे देवद आश्रमातील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. नारायण (नंदू) मुळ्येकाका !

१. सौ. संगीता 
लोटलीकर, रायगड जिल्हासेवक
१ अ. दैनिक वितरणाची सेवा अविरतपणे करणे
१. मुळ्येकाका आश्रमात पूर्ण वेळ असले, तरी त्यांचा प्रसारसेवेत मोठा वाटा होता. दैनिक सनातन प्रभात चालू झाल्यापासून; म्हणजे वर्ष २००० पासून २२.१२.२०१६ पर्यंत त्यांनी दैनिक वितरणाची सेवा अविरतपणे केली.
२. उन्हाळा असो किंवा पावसाळा, नियमित वेळेत दैनिक वितरण करून त्यांनी प.पू. गुरुदेवांना अपेक्षित अशी सेवा केली. देवद आश्रमातील सेवा पूर्ण करून ते रात्री १२ ते १२.३० वाजेपर्यंत घरी जात; परंतु त्यांनी दैनिक वितरण करण्यासाठी कधीच तक्रार केली नाही.
१ आ. सर्वांना हवेहवेसे वाटणारे व्यक्तीमत्त्व : काकांचेे व्यक्तीमत्त्व सर्वांना हवेहवेसे वाटणारे होते. ते कधीच अनावश्यक बोलत नसत. आवश्यक आणि समर्पक बोलण्याने ते सर्वांना आपलेसे करून घेत. अखंड सेवारत असून ते प्रत्येक सेवा मनापासून करत. प्रत्येक प्रसंग शांतपणे हाताळण्याची त्यांची हातोटी होती. त्यांच्या तोंडवळ्यावर कधीच ताण दिसत नसे. त्यांची प.पू. गुरुदेवांवर अपार श्रद्धा असल्याने शेवटच्या श्‍वासापर्यंत ते अखंड सेवारत राहिले आणि श्रीगुरूंची कृपा संपादन करून त्यांनी जीवनाचे सार्थक केले.
२. कु. स्मिता जाधव, कु. रत्नमाला 
दळवी, सौ. तनुजा गाडगीळ आणि 
श्री. महेंद्र सहस्रबुद्धे, सनातन आश्रम, देवद.
२ अ. व्यवस्थितपणा : काकांमधील व्यवस्थितपणा त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येत असे. डब्याचे झाकण योग्य पद्धतीनेच लावले जावे, यासाठी त्यांनी डब्याच्या झाकणाची दिशा समजावी, यासाठी त्यावर लेखणीने खूण केली होती. झाकण उलट लागले, तर ते त्याविषयी जाणीव करून देत.
२ आ. सातत्य : रात्री १२ ते १२.३० नंतर दैनिकाचे पूर्ण वाचन केल्याशिवाय ते झोपत नसत. त्याशिवाय त्यांना झोप लागत नसे. काका दैनिक न वाचता झोपले आहेत, असे आतापर्यंत कधीच झाले नाही.
२ इ. शारीरिक सेवेस सदैव सिद्ध : काका कोणतीही शारीरिक सेवा करण्यास सदैव सिद्ध असत. ते तरुणांना लाजवेल, अशा पद्धतीने सेवा करत.
२ ई. सतत इतरांचा विचार करणे : मुळ्येकाकांच्या प्रत्येक कृतीतून ते सतत इतरांचा विचार करत आहेत, याचे प्रत्यंतर येत असे. आश्रमातील केर काढून झाल्यावर झाडू ठेवणे असो किंवा केराची सुपली ठेवणे असो, आपल्यानंतर सेवा करणार्‍या साधकाला त्यापासून कधी अडचण येऊ नये, असाच त्यांचा विचार असे.
२ उ. सांगितलेले पूर्णपणे ऐकून घेणे : कुणी काहीही सेवा सांगितली, कोणतेही सूत्र सांगितले, तरी काका ऐकण्याच्या स्थितीत राहून पूर्णपणे ऐकून घेत. त्यासंदर्भात त्यांना जे वाटेल, ते नंतर सांगत.
२ ऊ. शिकण्याची वृत्ती : काका सेवेतील सर्व प्रकारचे बारकावे लिहून ठेवून त्याप्रमाणे कृती करत.
२ ए. स्वतःला पालटण्याची तळमळ वाढणे : मागील काही मासांपासून त्यांची स्वतःला पालटण्याची तळमळ वाढली होती. त्यांच्यातील व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांची चिकाटी वाढली होती. काका प्रत्येक प्रसंगात सकारात्मक विचार करत. एखादी चूक झाल्यास भगवंत कसा शिकवत आहे, याचा विचार करण्यास सांगत. व्यष्टी आढाव्यात ते स्वतःच्या मनाच्या स्तरावरील चुका प्रांजळपणे मांडत.
२ ऐे. प्रेमळ : काका प्रेमळ होते. साधकांनी दैनिकात लिहिलेल्या लिखाणाचे ते नेहमी कौतुक करत. कुणाचा वाढदिवस असल्यास त्या साधकाला आठवणीने खाऊ आणून देत. साधकांच्या गुणांचे कौतुक करत ते वाढदिवस असलेल्या साधकाला संपर्क करून शुभेच्छा देत. कुणी रुग्णाईत असल्यास त्यांच्या जिभेला रुची यावी, यासाठी ते घरातून सूप बनवून आणत, तसेच चॉकलेट इत्यादी पदार्थ देत. अन्य वेळेस आम्हा साधकांना काही खाऊ लागला, तर आम्ही त्यांच्याकडे हक्काने मागत असू. त्यांच्याकडे आमच्यासाठी खाऊ जणू तयारच असे.
२ ओ. प्रांजळपणा : दैनिकात येणार्‍या सूचनांचे ते तंतोतंत पालन करत. त्यांच्याकडून एखाद्या सूचनेचे पालन न झाल्यास ते ती चूक प्रांजळपणे सांगत. ते काही विसरले, तरीही त्याविषयी प्रांजळपणे सांगत.
२ औ. सर्व साधकांचा आधार : सर्व साधकांना सदैव साहाय्य करण्यास तत्पर असल्याने ते सर्व साधकांचा आधार होते. कुणी काकांना घरून येतांना पेठेतून काही आणायला सांगितले, कुणी काही वैयक्तिक बँकेची (अधिकोषाची) कामे सांगितली, वैयक्तिक अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने साहाय्य मागितले, तर ते सर्वांना सदैव तत्परतेने साहाय्य करत. आम्हा मुलींना काकांचा वडिलांसारखा आधार वाटे आणि वयस्कर साधकांना काका जवळचे वाटत.
२ अं. भाव
१. त्यांच्या दुचाकीवर गुरुसेवक असे लिहिले आहे. ते त्यांच्या गुरुसेवकत्वाचे प्रतीक होते, असे वाटते.
२. सद्गुरु (श्री.) राजेंद्र शिंदेदादा घेत असलेल्या व्यष्टी आढाव्याविषयी त्यांना पुष्कळ कृतज्ञता वाटे. ते म्हणत, आमच्या सारख्यांसाठी देव किती करतो !
३. सौ. आनंदी रामचंद्र 
पांगुळ, सनातन आश्रम, देवद.
३ अ. परिस्थिती स्वीकारणे : काकांच्या पटलावर अंतर्गत दूरभाष संच नव्हता. त्यामुळे आमच्या पटलावर त्यांच्यासाठी दूरभाष येत असत. दिवसातून न्यूनतम २५ ते ३० वेळातरी त्यांना आसंदीतून उठून दूरभाष घ्यावा लागे. त्यासाठी त्यांनी कधी तक्रार केली नाही.
३ आ. मराठी भाषेवर प्रभुत्व : काकांचे मराठी भाषेवर प्रभुत्व होते. मराठी व्याकरण, भाषाशैली यासाठी मी त्यांच्याकडे पुष्कळ वेळा साहाय्य घेत असे.
३ इ. आदर्श गुरुसेवक : छायाचित्रण असो, संस्थेवरील एखादा प्रसंग असो किंवा भांडी घासण्याची सेवा असो, काकांमधील सेवकभाव पहाता, गुरुसेवक कसा असावा, याची प्रचीती येत असे.
४. प्रार्थना
         काकांचे आम्हा सर्वांत नसणे, हे अजूनही अविश्‍वसनीय वाटते. हे भगवंता, त्यांना हिंदु राष्ट्रातील दायित्व सांभाळण्यासाठी पुन्हा शीघ्रतेने आमच्यात पाठव, हीच जगत्नियंत्या नारायणा, तुझ्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना !
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn