Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

काळ्याचे पांढरे !

संपादकीय
     नोटाबंदी घोषित करून एक मास उलटून गेला आहे. पंतप्रधान मोदी यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगतांना देशवासियांकडे ५० दिवसांचा कालावधी मागितला आहे. या कालावधीची ते परत परत जनतेला जाणीव करून देत आहेत; कारण जनता नोटाबंदीनंतरच्या चलन तुटवड्याचा अजूनही सामना करत आहेत. त्यात तिला मनस्ताप होत आहे. या कालावधीत काही जणांचा मृत्यूही झाला, तर काहींनी आत्महत्याही केल्या आहेत. अशा वेळी जनतेला आणखी काही काळ कळ सोसण्यासाठी मोदी आवाहन करत आहेत. ५० दिवसांनंतर जनतेला आता भोगाव्या लागणारे त्रास समाप्त होतील, असे आश्‍वासन ते देत आहेत. हा त्रास देशहिताचा आहे, हे पंतप्रधानांचे आवाहन जनतेला पटल्याने तीही आतापर्यंत प्रतिक्रिया व्यक्त न करता आणि विरोधी पक्षांच्या विरोधाला साथ न देता पंतप्रधानांच्या पाठीशी उभी आहे; मात्र याविषयी आता गंभीर होण्याची आवश्यकता आहे अन्यथा जनतेचा उद्रेक होणे नाकारता येणार नाही. दुसरीकडे सरकार जनतेला ‘कॅशलेस’ व्यवहार (चलनविरहित व्यवहार) करण्याच्या दृष्टीने प्रयत्नरत आहे. त्यासाठी जनतेला आवाहन केले जात आहे. दुसरीकडे काही अर्थतज्ञांच्या मते सरकारने ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या १४ लाख ६० सहस्र कोटी रुपये रहित केले; मात्र त्या बदल्यात आतापर्यंत केवळ ५ लाख कोटीच नव्या नोटा बाजारात आणल्या आहेत. पुढील काही दिवसांत त्यात १० लाख कोटी रुपयांची वाढ होणार नाही. कारण बाजारात तेवढा पैसा ठेवण्याचा सरकारचा विचार नाही. पैसा नसल्याने अनायसे जनतेला कॅशलेस व्यवहार करावे लागतील आणि त्यामुळे काळा पैसा निर्माण होण्याचे प्रमाण अल्प होईल. सरकारचा विचार चांगला असला, तरी यात अनेक समस्या आहेत. या समस्या दूर करण्यापर्यंत जनतेला पैसा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. कॅशलेससाठी वीज, इंटरनेट, त्याविषयीचे ज्ञान, बँकिंग सुविधा या गोष्टींची आवश्यकता आहे. शहरीभाग सोडला, तर ग्रामीण भागात वरील गोष्टी पुरेशा प्रमाणात नाहीत आणि देशात शहरांपेक्षा ग्रामीण भाग अधिक आहे. त्यामुळे येथेही उद्रेकाची शक्यता नाकारता येत नाही. 
बँकांवर कारवाई कधी ?
     शहरांमध्ये बँकांच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करण्याचे प्रकार समोर आल्याने जनतेच्या मनात आता संतापाची भावना निर्माण होऊ लागली आहे. त्याचे पडसाद मुरादाबाद येथे दिसून आले. येथे एका बँकेत पैसेच नसल्याने जनतेने या बँकेची तोडफोड केली. एकीकडे जनतेला बँकेतून पैसा मिळत नसतांना दुसरीकडे आयकर विभागाकडून गेल्या काही दिवसांत देशभरात विविध ठिकाणी घातलेल्या अनेक छाप्यांतून कोट्यवधी रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आणि त्यात नव्या नोटांचे प्रमाण सर्वाधिक आहे. सर्वसामान्य जनतेला आठवड्यात केवळ २४ सहस्र रुपये काढण्याचे बंधन असतांना कोट्यवधी रुपयांच्या नव्या नोटा या लोकांना मिळाल्याच कशा, असा प्रश्‍न आता समोर येऊ लागला आहे. त्यातच केंद्र सरकारने ५०० बँकांचे ‘स्टींग ऑपरेशन’ करून त्यामधील काळ्या पैशाचे पांढरे करून देण्याचे गैरप्रकार चित्रीत करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे पंतप्रधान जनतेला ५० दिवस म्हणजे ३० डिसेंबरपर्यंत त्रास सहन करण्याचे आवाहन सातत्याने करत आहेत, त्यावर या समोर येणार्‍या घटनांमुळे पाणी फेरले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सरकारने अशा प्रकारे बँकांतून काळ्याचे पांढरे करून देणार्‍यांवर तात्काळ कारवाई चालू करणे अपेक्षित आहे. या कारवाईमुळे जनतेपर्यंत पैसे पोचू शकतील आणि जनतेचा त्रास अल्प होईल.
‘सर्जिकल स्ट्राईक’ अपयशी ? 
     पाकविरोधात करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे आतंकवादी घटना कमी झाल्यात अशी स्थिती नाही, तसेच नोटाबंदीमुळे काळा पैसा नष्ट झाला, असे आतापर्यंत तरी ठामपणे म्हणता येत नाही. त्यामुळे जसे सर्जिकल र्स्ट्राइकपेक्षा पाकला कायमचे संपवण्यातच खरे हित आहे, तसेच काळा पैसे संपवण्यासाठी राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, उद्योगपती, पोलीस आदींमधील भ्रष्ट लोकांवर प्रथम कारवाई होणे आवश्यक आहे. त्यातून जनतेला एक संदेश मिळेल आणि ती सरकारला देत असलेली आतापर्यंतचे सहकार्य कायम ठेवील; मात्र गेल्या ३४ दिवसांत अशा एकाही काळ्या पैसेवाल्यावर सरकारने थेट कारवाई केल्याचे दिसून आलेले नाही. सर्वसामान्य जनता बँकांसमोर अजूनही रांग लावत आहे; मात्र राजकारणी, अधिकारी, पोलीस आदी लोकांपैकी कोणीही अशा रांगा लावतांना दिसत नाही. यासाठीच मोदी यांनी त्यांच्यावर कारवाई चालू केली पाहिजे. स्वतः काही ठिकाणी भाजपच्या नेत्यांकडून बेहिशोबी पैसे जप्त करण्यात आले. मोदी यांनी भाजपच्या सर्व आमदार, खासदार यांना त्यांच्या बँक खात्यांचे विवरण मागितले आहे; मात्र मोदी यांनाही माहिती आहे की, हे लोकप्रतिनिधी कधीही स्वतः काळ्या पैशाचे अशा प्रकारे व्यवहार करत नाहीत. तिच गोष्ट अन्य राजकीय पक्षांचीही. या देशातील राजकीय पक्षांकडे अधिकाधिक काळा पैसा पक्षनिधी म्हणून जमा होतो आणि मोदी गेले ४० वर्षे राजकारणात आहेत, त्यामुळे हे त्यांना माहिती आहे. मोदी यांच्या पक्षाने अद्याप त्यांच्या पक्षाला मिळालेल्या निधीतील काळा पैसा घोषित केलेला नाही. अन्य पक्षांकडून तशी अपेक्षाही करता येत नाही. काँग्रेसने गेल्या ६९ वर्षांत किती पैसा जमा केला असणार याची कल्पनाही करता येत नाही आणि त्यांच्या नेत्यांकडे किती असेल, हेही सांगता येणार नाही. अशांचा पैसा कुठे गेला, असा प्रश्‍न आता जनतेसमोर येत आहे. त्यांनी तो नष्ट केला असेल, तर त्याची माहिती गुप्तचरांनी घेतली पाहिजे, असेच जनतेला वाटते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn