Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

धान्यसाठवणुकीची सक्षम व्यवस्था हवी !

       भारत हा कृषिप्रधान देश असूनही देशात उपासमारी आणि कुपोषण यांना अनेक लोकांना तोंड द्यावे लागते. यामागे देशाची असलेली अवाढव्य लोकसंख्या हे कारण असले, तरी धान्याची होणारी नासाडी हेही प्रमुख कारण आहे. एका आकडेवारीनुसार बिहार राज्याला वर्षभर पुरेल एवढ्या अन्नाची नासाडी देशात वर्षभरात होते. पुरेशा साठवणूक क्षमतेचा अभाव हे त्यामागचे एक कारण होते. पुरेशी साठवणूक करण्याची व्यवस्था नसल्याने देशातील १६ ते १७ टक्के धान्य वाया जाते. वर्ष २००९-१० मध्ये राज्यात ५.८९ लक्ष मेट्रिक टन क्षमतेची १ सहस्र १७ गोदामे होती. त्यांपैकी ०.५८ लक्ष मेट्रिक टन क्षमतेची १४४ गोदामे वापरासाठी अयोग्य होती. त्यावर उपाय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय गोदाम योजना चालू केली. शेतकर्‍याने पिकवलेल्या अन्नधान्याची योग्य प्रकारे साठवणूक व्हावी आणि त्यातून शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळावा आणि शेतकरी सक्षम व्हावे, हा या योजनेचा उद्देश होता. या योजनेअंतर्गत शासनाच्या वतीने जिल्ह्यांमध्ये भव्य गोदामे, तसेच शीतगृहे उभारली जात आहेत. असे असले तरी जोपर्यंत सक्षम वितरणव्यवस्था निर्माण होणार नाही, तोपर्यंत गोदामांचा विशेष लाभ होणार नाही.
टाक्या बांधण्याच्या जोडीला गळती रोखणे आवश्यक !
      शेतकर्‍यांकडून किमान आधारभूत किमतीत खरेदी केलेले सहस्रो क्विंटल धान्य गोदामांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने वाया जात असल्याच्या घटना अधूनमधून उघडकीस येत असतात. आताही एकट्या नंदुरबार जिल्ह्यात विविध गोदामांमध्ये २० सहस्र क्विंटल ज्वारी पडून असल्याचे उघड झाले. या धान्याविषयी कुठलाही निर्णय न घेतल्याने ज्वारीला जाळ्या लागून त्यात किडे झाले आणि ही ज्वारी वापरण्यायोग्य राहिली नाही. गतवर्षीही सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय गोदामात असलेले २४ सहस्र क्विंटल तांदूळ सडल्याची, तसेच घुशी, उंदीर यांमुळे धान्य खराब झाल्याची घटना घडली होती. गोदामातील धान्याचा निर्णय न घेतल्याने पुढच्या वर्षीचे नवीन धान्य गोदामांमध्ये ठेवण्याचा प्रश्‍न त्या ठिकाणी निर्माण झाला होता. राज्याच्या विविध जिल्ह्यांत असलेल्या गोदामांकडेही दुर्लक्ष झाल्याने धान्य सडत आहे. त्यावर उपाय म्हणून गोदामांच्या उभारणीच्या जोडीला धान्यावर फवारणी करणे, त्याची काळजी घेणे, सक्षम वितरणव्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. धान्याची नासाडी न रोखता केवळ गोदामे उभारणे म्हणजे जलवाहिनीला असलेली गळती न रोखता टाकी भरण्याचे प्रयत्न करण्यासारखे आहे. 
हलगर्जीपणा करणार्‍यांना शेती करायला लावा ! 
      त्यामुळेच सरकारने पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या जोडीला आतापर्यंत हलगर्जीपणा आणि अक्षम्य दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई म्हणून शेतात कष्ट करण्याची शिक्षा द्यावी; जेणेकरून शेतकरी किती कष्टाने धान्य पिकवतात, याची संबंधितांना जाणीव होईल. ‘बडे गोदाम पोकळ धान्य’ ही परिस्थिती पालटण्यासाठी कठोर उपाययोजनाच आवश्यक आहे.
- प्रा. (कु.) शलाका सहस्रबुद्धे, पुणे
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn