Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

फारुख अब्दुल्लांचे देशद्रोही फुत्कार !

       जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा फुटीरतावाद्यांची तळी उचलत स्वतंत्र काश्मीरच्या मागणीचे समर्थन केले आहे. त्यांनी नुकतेच ‘पाकव्याप्त काश्मीर ही भारताच्या बापाची जागा नाही’, असे देशद्रोही विधान केले. याही आधी त्यांनी वेळोवेळी देशद्रोही वक्तव्ये केली आहेत. तरीही त्यांच्यावर केंद्रातील आजपर्यंतच्या एकाही सरकारकडून कारवाई झालेली नाही. त्याविषयी ऊहापोह करणारा हा लेख.
१. अब्दुल्लांच्या वादग्रस्त
आणि देशद्रोही वक्तव्यांची मालिका !
      ‘कुठले ना कुठले वक्तव्य करून प्रसिद्धीच्या झोतात रहाण्याची जी शैली दिग्विजय सिंह, मणिशंकर अय्यर आदींनी अवगत करून घेतली आहे, त्या मालिकेतील आणखी एक नाव म्हणजे फारुख अब्दुल्ला ! जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला यांचे पुत्र आणि अब्दुल्ला घराण्याचा वारसा, हीच त्यांची राजकारणात येण्याची पात्रता ! पण भारतीय राजकारणात जशी नेहरू, गांधींची घराणेशाही चालून गेली, तसेच अब्दुल्ला घराणेही घराणेशाहीच्या राजकारणात तरून गेले. सतत वादग्रस्त वक्तव्ये करण्यात फारुख अब्दुल्ला यांचा हात धरणारे बोटावर मोजता येण्याएवढे नेते भारतीय राजकारणात सापडू शकतील. ३७० कलमान्वये जम्मू आणि काश्मीर राज्याला मिळालेल्या विशेष दर्जामुळेही त्यांचे समाधान झालेले नाही. ते स्वतः आणि त्यांचा मुलगा उमर अब्दुल्ला हे राज्याचे मुख्यमंत्री असतांना त्यांनी कायम जम्मू आणि काश्मीर राज्याला अधिकाधिक स्वायत्तता मिळावी, यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी चिथावणीखोर वक्तव्ये केली, केंद्र सरकारविरुद्ध संघर्षाची भूमिका घेतली आणि धमक्या देऊन अधिकाधिक लाभ लाटून घेतले. प्रसंगी राजकीय पदेही लाटली. अधिक स्वायत्ततेची मागणी करणार्‍या काश्मीर खोर्‍यातील हिंसक गटांच्या पाठीशी उभे रहाण्याची राष्ट्रद्रोही भूमिकाही त्यांच्या पक्षाने घेतली. ‘भारताच्या कह्यातील जम्मू आणि काश्मीरमध्ये सार्वमत घ्यावे’, अशी जी मागणी काश्मीर खोर्‍यात मधूनमधून उठते, त्या मागणीचे समर्थनही त्यांनी केले आहे. अशातच फारुख अब्दुल्ला यांनी त्यांचे वडील तथा जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला यांच्या १११ व्या जयंतीनिमित्त हजरतबल येथे आयोजित एका कार्यक्रमात ‘मी हुरियत कॉन्फरन्सच्या विरोधात नाही. काश्मिरी जनतेच्या अधिकारासाठी मी स्वातंत्र्याचे समर्थन करतो. आम्ही तुमच्या आंदोलनाचा भाग आहोत. आम्हाला विरोधी समजू नका. आम्ही जिहादची लढाई लढली आहे. संघटित रहा आणि हे आंदोलन पुढे घेऊन चला’, असे विखारी विधान केले. काही दिवसांपूर्वी त्यांनी ‘पाकव्याप्त काश्मीर ही भारताच्या बापाची जागा नाही’, असे देशद्रोही विधान केले. त्यांनी असे वक्तव्य करायची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी ती वेळोवेळी केली आहे. ‘पाकव्याप्त काश्मीर भारताचे नाहीच’, ‘काश्मीरचा हा भाग भारत पाकिस्तानपासून हिरावू शकत नाही’, अशी एकामागोमाग एक वादग्रस्त वक्तव्ये करून त्यांनी राष्ट्रवादी विचारसरणीच्या नेत्यांची अप्रसन्नता ओढावून घेतली आहे. त्यांच्या वक्तव्यांविषयी निषेधाचे सूर उमटले नसते तरच नवल. असे वक्तव्य करून त्यांनी राष्ट्रद्रोही भूमिकाच घेतली आहे. आपण खोर्‍यातील सैनिकांचे नैतिक खच्चीकरण करत आहोत, असेही त्यांना वाटले नाही. त्यांची जीभ जराही कचरली नाही. यातून प्राणांची बाजी लावणार्‍या सैनिकांची अवहेलनाच त्यांनी केलेली आहे. 
२. म्हणे ‘भारतीय फौजा काश्मीरमधील आतंकवाद रोखू शकत नाहीत !’
      स्वातंत्र्यानंतरही भारताच्या कह्यातील जम्मू आणि काश्मीर शाबूत आहे, ते केवळ सीमेवर लढणार्‍या भारतीय फौजांमुळेच ! पाकिस्तानची अडचण या फौजांमुळेच होत आहे, हे साधे गणित अब्दुल्ला यांना समजू नये, याचे आश्‍चर्य वाटते. याच सैनिकांमुळे आपण घुसखोरीवर नियंत्रण मिळवू शकलो आहोत. खोर्‍यातील आतंकवाद आटोक्यात येऊन तेथील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यात सैन्याची भूमिका कोण नाकारू शकेल ? फौजा आहेत; म्हणून हिंसाचारही आटोक्यात आहे. फौजा आहेत; म्हणून आया-बहिणींची अब्रू वाचलेली आहे, फौजा आहेत; म्हणून समृद्धी आहे आणि फौजा आहेत; म्हणून प्रशासनाचे कार्यही सुरळीत पद्धतीने चालू आहे. फौजांच्या उपस्थितीमुळेच २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टला खोर्‍यात राष्ट्रध्वज तिरंगा डौलाने फडकवला जाऊ शकतो आणि फौजा आहेत; म्हणूनच काश्मीर खोर्‍यातील उरलेसुरले राष्ट्रवादी देहलीच्या सुरात सूर मिसळून गाऊ शकतात. एका अर्थाने, सैन्यामुळेच आज जम्मू आणि काश्मीरच्या सुरक्षेची ग्वाही दिली जाऊ शकते. या पार्श्‍वभूमीवर देशद्रोही वक्तव्य करून फारुख अब्दुल्ला यांनी पाकचे हात बळकट करण्याचे, तसेच भारतीय फौजांचे मनोधैर्य खच्ची करण्याचे काम केले आहे. फारुख अब्दुल्लांची विधाने एकतर खुर्ची टिकवण्यासाठी असतात किंवा ती पुन्हा मिळवण्याच्या उद्देशाने तरी केलेली असतात. सध्या राज्यात भाजप आणि पीडीपीचे सरकार असल्याने, नॅशनल कॉन्फरन्सची कोंडी झालेली आहे. सत्तेविना या पक्षाचे कार्यकर्ते आणि नेतेही अस्वस्थ आहेत. कुठलातरी वाद उकरून काढायचा आणि सरकारविरुद्ध रोष निर्माण होईल असे करायचे, एवढेेच काम सध्या त्यांना करता येण्यासारखे आहे. तेच काम ते इमानेइतबारे करत आहेत. जम्मू आणि काश्मीर हे भारताचे अभिन्न अंग असून पाकव्याप्त काश्मीरवरसुद्धा भारताचाच हक्क असल्याचे आपण मानतो. जम्मू आणि काश्मीर विघटनवाद्यांच्या तावडीतून मुक्त करणे आणि पाकने गिळंकृत केलेला भाग परत मिळवणे, यासाठी भारताचे सातत्याने प्रयत्न चालू आहेत. अनेक गोष्टी राजकीय पातळीवर चालू आहेत. छोटी-मोठी सूत्रे पाकिस्तानी नेत्यांना पटवून सांगितली जात आहेत. आज भलेही पाकिस्तान आपल्या मागण्यांना आणि पुराव्यांना केराची टोपली दाखवत असला, तरी भारताच्या प्रयत्नांना हळूहळू यश येऊ लागले आहे. आता गिलगिट, बाल्टिस्तान, मिरपूर आणि बलुचिस्त येथील लोक ‘चलो भारत’च्या घोषणा देऊ लागले आहेत. फारुख अब्दुल्ला यांनी केलेले वक्तव्य हे व्यक्तीगत आहे कि त्यांच्या पक्षाची ही मते आहेत, हे भारतीय जनतेने जाणून घ्यायला हवे.
३. फारुख अब्दुल्ला यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करा !
      सशस्त्र दलांच्या म्हणजेच देशाच्या क्षमतेविषयी उघडपणे वाद उपस्थित करून त्यांनी संरक्षणविषयक सूत्राचे राजकीयीकरण केले आहे. त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचाच गुन्हा प्रविष्ट व्हायला हवा ! श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी काश्मीरच्या अखंडतेसाठी प्राणांची बाजी लावली आणि हा नेता (फारुख अब्दुल्ला) देशाच्या अखंडतेला तडे देणारी भूमिका घेत आहे. कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे नॅशनल कॉन्फरन्सची तट्टाणी ? विघटनवाद्यांच्या भूमिकेला समर्थन देतांना, खोर्‍यातील काश्मिरी हिंदूंच्या दुरवस्थेविषयी चकार शब्द काढायला अब्दुल्ला महाशय सिद्ध नाहीत. लडाख खोर्‍यातील मागास बौद्ध समुदायाच्या समस्यांविषयी ते अवाक्षरही बोलणार नाहीत. स्वातंत्र्यानंतर पंजाबमधून येऊन खोर्‍यात स्थायिक झालेल्या समाजबांधवांना स्वातंत्र्यानंतरही आजतागायत निवडणुका आणि मतदान यांपासून वंचित ठेवले जात आहे. त्यांच्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाविषयीही अब्दुल्ला काही बोलणार नाहीत; पण पाकव्याप्त काश्मीरचे आणि भारताच्या कह्यातील जम्मू-काश्मीरचे विलीनीकरण कदापि शक्य नाही, याचा धोशा मात्र हा दायित्वशून्य नेता वारंवार करत रहाणार ! प्रश्‍न असा उपस्थित होतो की, अब्दुल्ला घराणे मीठ कुणाचे खात आहे ? ते जर भारताचे मीठ खात असतील, तर अशी देशद्रोही भूमिका घेण्याचा त्यांना अधिकारच नाही आणि जर ते पाकिस्तानचे मीठ खात असतील, तर त्यांना भारतात रहाण्याचा, तसेच येथील घटनेनुसार मूलभूत हक्क मिळवण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. भारतीय फौजांच्या असमर्थतेविषयी त्यांना एवढा विश्‍वास कुठून आला ? पाकिस्तानी नेतृत्वाशी त्यांची घसट तर नाही कि विघटनवाद्यांच्या ताकदीविषयी ते आश्‍वस्त आहेत ? असे असेल, तर त्यांचे देशद्रोह्यांशी असलेले संबंध जगजाहीर होतात. हे सिद्ध होत असेल, तर त्यांची जागा सामान्य माणसांप्रमाणे कारागृहातच असायला हवी ! अशांना आवर घालून त्यांना दंडित करणे आवश्यक आहे.’
- ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn