Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

दोन वेळा सभागृह स्थगितीनंतर विधान परिषदेत नोटाबंदीवर चर्चा चालू !

विधान परिषद
     नागपूर, ७ डिसेंबर (वार्ता.) - विधान परिषदेचे कामकाज चालू झाल्यावर नोटाबंदीच्या परिणामांची चर्चा चालू होण्यासाठी विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतल्याने सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी प्रथम २५ मिनिटांसाठी आणि नंतर ४५ मिनिटांसाठी आणि सायंकाळी परत १० मिनिटांसाठी सभेचे कामकाज स्थगित केले. (सभा स्थगित करणे म्हणजे, कोट्यवधी रुपयांचा चुराडा करणेच होय. - संपादक) दोन वेळा सभागृह स्थगितीनंतर सभापतींनी नियम १७ अन्वये नोटाबंदीच्या परिणामांवर चर्चा करण्यास अनुमती दिली आणि त्यावर चर्चा चालू झाली. 
१. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नोटबंदीवरील चर्चेसाठी आग्रही भूमिका मांडली. सभागृहाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, प्रश्‍नोत्तराचा तास महत्त्वाचा असून त्यावर चर्चा होणे आवश्यक आहे. त्यातून जनतेच्या प्रश्‍नांना न्याय मिळेल. त्यावर सभापती नाईक-निंबाळकर यांनी चर्चा करायची कि नाही, याविषयी निर्णय घेण्यासाठी सभा स्थगित करण्याचा निर्णय घेतला असता विरोधी पक्षातील सदस्यांनी सभापतींच्या समोरील मोकळ्या जागेत जाऊन घोषणाबाजी केली.
२. एकूण १ घंटा १० मिनिटांच्या स्थगितीनंतर अखेर सभापतींनी नोटाबंदीच्या परिणामांवर चर्चा करण्यास सदस्यांना अनुमती दिली.
म्हणे, नोटाबंदी हे देशावरील ‘सुलतानी’ संकट ! - राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे 
     नोटाबंदीमुळे शेतकरी आणि छोटे व्यापारी यांची २० सहस्र कोटी रुपयांची हानी झाली आहे. अनेक लघुउद्योग गेले १ मास बंद आहेत. अशी हानी झालेल्यांना भरपाई म्हणून अनुदान द्यावे. नोटा पालटण्यामध्ये देशातील ७८ लोकांचे मृत्यू झाले आहेत. सरकारचा हा निर्णय देशाची ‘आर्थिक स्वातंत्र्य चळवळ’ असे म्हटले जात असेल, तर त्या मृत्यू झालेल्या व्यक्तींना सरकारने ‘हुतात्मा’ जाहीर करावे, अन्यथा त्या प्रकरणी सरकारने ३०२ चे गुन्हे प्रविष्ट करावेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नोटाबंदीमुळे किती काळा पैसा जमा झाला, ते जाहीर करावे, तसेच जनतेला कोणताही त्रास होणार नाही, यासाठी काळजीपर निर्णय जाहीर करावेत.
जनतेला होणार्‍या त्रासाविषयी परिषदेने ठराव मांडून 
केंद्र सरकारला उपाययोजना करण्यास सांगावे ! - काँग्रेसचे नारायण राणे
      केंद्र सरकारने गरीबी, महागाई आणि ‘अच्छे दिन’ यांवरील लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी नोटा पालटण्याचा निर्णय घेतला आहे. जनतेला असा त्रास देण्यापेक्षा सरकार काळा पैसा असणार्‍यांना अटक का करत नाही ? सरकार संवेदनाशून्य असून नोटाबंदीमुळे आतंकवादी आणि नक्षलवादी आक्रमणे न्यून झालेली नाहीत. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन जनतेच्या अडचणी मांडण्यासाठी पंतप्रधानांची भेट घेण्यास पुढाकार घेतला पाहिजे. तसेच जनतेला होणार्‍या त्रासाविषयी या परिषदेने ठराव मांडून केंद्र सरकारला उपाययोजना करण्यास सांगावे.
नोटाबंदीमुळे देशात क्रांती होणार असून जनतेचा 
या निर्णयाला पाठिंबा आहे. नोटा पालटण्याचा हा निर्णय 
पहिल्यांदा झाला नसून त्यातून देश गतिमान होणार आहे. - भाजपचे भाई गिरकर

केंद्र सरकारने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना 
नोटा पालटण्यास अनुमती द्यावी ! - शेकापचे जयंत पाटील 
      नोटाबंदीमुळे केंद्र सरकारचा ‘कॅशलेस’ व्यवहार करण्याचा प्रयत्न असून जगात कोणत्याही देशात संपूर्णपणे ‘कॅशलेस’ व्यवस्था नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये नोटा पालटण्यास जी बंदी घातली आहे, ती अत्यंत चुकीची आहे. त्यातून सर्वसामान्य शेतकरी भरडला जात आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था बिघडली जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने त्या अधिकोषांना नोटा पालटण्यास अनुमती दिली पाहिजे.
अर्थकारणावर मोठा परिणाम होणार आहे ! - शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गोर्‍हे
नोटाबंदीचा निर्णयाचा हेतू चांगला असला, तरी तो सर्वसामान्य जनतेला त्रासदायक आहे. नोटाबंदीचा परिणाम हा राज्यातील असंघटित कर्मचार्‍यांवर होणार असून त्याचा अर्थकारणावर मोठा परिणाम होणार आहे. 
क्षणचित्रे
  • देशात नोटा पालटण्यासाठी रांगेमध्ये मृत्यू झालेल्या लोकांना परिषदेमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली.
  • वरील चर्चा चालू झाल्यावर आणि विरोधी पक्षनेते बोलत असतांना काँग्रेसचे आमदार अनंत गाडगीळ म्हणाले, ‘‘ज्यांनी संसार केला नाही, त्यांना महिलांच्या दागिन्यांचे महत्त्व काय कळणार ?’’ या विधानावर सत्ताधारी पक्षाचे नेते आक्रमक झाले आणि सभागृह १५ मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले. हे वाक्य रेकॉर्डवरून काढत आहे, असे सभापतींनी सांगितले. सभागृह परत चालू झाल्यावर गाडगीळ यांनी ‘‘कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेतो’’, असे सांगितले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn