Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

हद्दपारी नको, समूळ उच्चाटन हवे !

      नुकतेच चांगल्या उद्देशाने दोन निर्णय घोषित केले गेलेे; पण उद्देशपूर्तीच्या दृष्टीने ते तकलादूच निघाले, असे म्हणावे लागेल. एक निर्णय होता, महाविद्यालयाच्या आवारात जंक फूडवर बंदी घालण्याचा आणि दुसरा होता देशी दारूची दुकाने गावाबाहेर हालवण्याचा ! विद्यापीठ अनुदान आयोगाने एक पत्रक काढून महाविद्यालयांच्या उपाहारगृहामध्ये जंक फूड ठेवण्यास बंदी केली, तर ग्रामसभेने ठराव केल्यास देशी दारूची दुकाने गावाबाहेर १०० मीटरवर हालवण्याचा निर्णय उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषित केला. जंक फूडचे सेवन व्यक्तीला शारीरिकदृष्ट्या कमकुवत बनवते, तर देशी दारू व्यक्तीगत स्वास्थ्यासह कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्यही बिघडवते. त्यामुळे या दोन्हींनाही अटकाव व्हायला हवाच होता; मात्र या दोन्ही वस्तूंवर बंदी घालण्याऐवजी त्या केवळ वेशीबाहेर नेण्याचा प्रकार झाल्याने या निर्णयाच्या फलनिष्पत्तीविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण होते.
     असाच पोकळ शिक्षेचा प्रकार अधिकार्‍यांचे स्थानांतर (बदली) आणि गुंडाची तडीपारी यांसंदर्भातही दिसून येतो. चुकीचे कृत्य केल्यावर अधिकारी किंवा कर्मचारी यांचे स्थानांतर केले जाते; पण अशाने संबंधिताच्या मूळ अयोग्य वृत्तीत पालट होण्याची शाश्‍वती नसते. हाच प्रकार तडीपार केलेल्या गुंडांच्या संदर्भातही घडतो. गुंडांना केवळ तडीपार करणे म्हणजे अन्यत्र गुन्हे करण्यासाठी मोकळीक देण्यासारखे आहे. त्यामुळे अशा प्रकारचे नियम कितपत लाभदायी ठरतात, याविषयी शंका आहे. अशाचा लाभ तर काही होतच नाही; पण आपण उगाचच प्रयत्न करत असल्याच्या भ्रमात रहातो.
     गवताचे मूळ नष्ट केले नाही, तर ते गवत कापल्यानंतरही वारंवार वाढते आणि चांगल्या वनस्पतींना मारक ठरते. त्यामुळे चांगली शेती करायची असेल, तर गवत मूळासकट उपटणे आवश्यक असते. निसर्गाची ही शिकवण सद्य:स्थितीत आपण पूर्णतः विसरून गेल्यानेच जंक फूड आणि देशी दारूची दुकाने गावाबाहेर नेणे यांविषयी वरीलप्रमाणे लाभशून्य निर्णय घेण्यात धन्यता मानली जाते. समाजस्वास्थ्य चांगले रहाण्यासाठी अयोग्य, तसेच अहितकारक वस्तू सीमापार करण्याचा फारसा परिणाम दिसणार नाही. म्हणूनच अशा मानवी आरोग्याच्या दृष्टीने अहितकारक वस्तूंचे समूळ उच्चाटन करणे आवश्यक आहे.
- प्रा.(कु.) शलाका सहस्रबुद्धे, पुणे
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn