Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

मधुरा भक्तीद्वारे अखंड ईश्‍वराच्या अनुसंधान राहून सगुणातून निर्गुणाकडे वाटचाल करणार्‍या कु. दीपाली पवार !

कु. दीपाली पवार
       साधना करणे म्हणजे सतत ईश्‍वराच्या अनुसंधानात रहाणे. नवविधा भक्तीद्वारे भक्त त्याच्या प्रकृतीप्रमाणे ईश्‍वराच्या अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न करतो. कु. दीपाली पवार यांचा ‘परात्पर गुरु म्हणजे श्रीकृष्ण’, असा भाव आहे. त्यांच्या जीवनातील सर्व घडामोडी पत्राद्वारे परात्पर गुरु डॉक्टरांना सांगणे, ‘तेच श्रीकृष्ण कसे आहेत’, हे त्यांना विविध उदाहरणांतून पटवून देणे, त्यांच्याशी सूक्ष्मातून झालेल्या संवादाची चित्रे रेखाटून त्यांना देणे आणि त्यांना सखा मानून प्रत्येक वैशिष्ट्यपूर्ण प्रसंगात शुभेच्छापत्रे देणे, अशा प्रकारे त्या ईश्‍वराच्या अनुसंधान राहिल्या. पुढे त्यांना काही विषयांवर ईश्‍वराकडून ज्ञानही मिळाले. हे सर्व करतांना त्यांच्यामध्ये निरपेक्षता होती. त्यामुळे त्यातूनही त्यांची साधना होत गेली. ‘द्रष्टा दृश्यवशात् बद्ध: ।’ म्हणजे ‘द्रष्टा दृश्य पाहिल्याने त्यात बद्ध होऊन जातो’, या न्यायाने त्या सतत कृष्णाच्या (परात्पर गुरु डॉक्टरांच्या) अनुसंधानात राहिल्याने सगुणातून निर्गुणाकडे, स्थुलातून सूक्ष्मात आणि स्वेच्छेतून ईश्‍वरेच्छेकडे हे साधनेचे टप्पे गाठून त्यांची आध्यात्मिक प्रगती होत गेली. गोपींनीही मधुरा भक्तीद्वारे श्रीकृष्णावर प्रीती (निरपेक्ष प्रेम) केली. कु. दीपाली पवार यांची ही साधनेतील वाटचाल मधुरा भक्तीची आठवण करून देते. आजपासून त्यांच्या साधनेचा प्रवास उलगडणारी साप्ताहिक लेखमाला चालू करत आहोत. त्यातून वाचकांची ईश्‍वराच्या अनुसंधानात रहाण्याची ओढ निर्माण होवो, हीच श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !
१. कु. दीपालीची सगुणाकडून निर्गुणाकडे वाटचाल होणे 
     ‘नमस्कार कृष्णा, ‘कसा आहेस ?’ मी आश्रमात येऊन ४ दिवस झाले. यापूर्वी मी तुला नेहमी म्हणायचे, ‘मला तुझी पुष्कळ आठवण येते.’ सप्टेंबर २०१६ पासून तुझी आठवण येणे हळूहळू अल्प होत जाऊन आता बर्‍यापैकी बंदच होत चालली आहे. पूर्वी तुझे रूप दिसायचे. तुझे बोलणे आठवायचे. तुझी मार्गदर्शक सूत्रे आठवायची आणि तुझ्या सामर्थ्याविषयी पुष्कळ कौतुक वाटून प्रेम जागृत व्हायचे; पण सध्या असे काहीच होत नाही. पूर्वी ‘तू कृष्णच कसा आहेस’, याविषयीची उत्तरे मनात यायची; पण सध्या असे काहीच होत नाही. मनातील शब्द पुष्कळ अल्प होऊ लागले आहे. त्यामुळे आत्मनिवेदन करतांनाही मला शब्द सुचत नाहीत. (हे प्रगतीचे लक्षण आहे. सगुणाकडून निर्गुणाकडे वाटचाल आहे. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले) 
२. मनातील विचार न्यून होऊन निर्विचार स्थिती अनुभवणे 
     मनातील विचार अतिशय अल्प झाले आहेत. १० ते २० टक्केच विचार मनात येतात. ते मायेचे विचार नसतात, तसेच अध्यात्माविषयीही नसतात. पूर्वी विविध विषयावर चिंतन आणि मनन व्हायचे. आता कसलेच चिंतन आणि मनन होत नाही. मन एकदम स्थिर आणि शांत होत चालल्यासारखे वाटत आहे. माझ्याकडून शब्दातून नामजप, प्रार्थना आणि कृतज्ञताही होत नाही. प्रयत्नपूर्वक करायला गेले, तरी होत नाही. केवळ ‘स्थिर आणि शांत रहावे’, असे वाटत आहे. ‘ओढून ताणून शब्दांच्या मागे धावायला नको’, असे वाटत आहे. मागील सहा मासांत (महिन्यांत) माझ्या मनात अध्यात्मातील विविध विषयांवरचे प्रश्‍न येऊन त्या संदर्भातील उत्तरे आपोआप मिळायची. प्रत्येक महिन्याला ती मी तुझ्याकडे लिहून पाठवली आहेत; पण नोव्हेंबर मासांपासून माझ्या मनात प्रश्‍नही येत नाहीत आणि उत्तरेही मिळत नाही. त्यामुळे लिखाणाची सेवा बंद झाली आहे. माझ्याकडून आता काहीच लिखाण होत नाही, याचे मला वाईटही वाटत नाही. 
     मला घरी असतांना असे वाटले होते की, मी घरी असल्यामुळे माझ्यावरील त्रासदायक शक्तीचे आवरण वाढल्यामुळे माझी अशी स्थिती झाली असावी. आश्रमात गेल्यानंतर खरे कारण कळेल की, मला असे सर्व का होत आहे ते; म्हणून मी आतापर्यंत माझ्या आंतरिक अवस्थेकडे दुर्लक्ष करत गेले; पण आश्रमात आल्यानंतरही माझी स्थिती तशीच आहे. (याला ‘निर्विचार स्थिती’ म्हणतात. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले)
३. कशाचेच काही वाटत नाही, असे वाटणे 
     मला चांगल्याचेही काही वाटत नाही आणि वाईटाचेही काही वाटेनासे झाले आहे. (याला साक्षीभाव म्हणतात. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले) कोणाविषयी चांगलेही वाटत नाही आणि वाईटही वाटत नाही. मनात मायेचे विचार नसतात. केवळ प्रसंग आणि परिस्थिती यांनुसार विचार मनात येतात. 
४. सद्गुरु बिंदाताईंनी साधना चांगली चालू असल्याचे 
सांगणे आणि पू. गाडगीळकाकांनी त्रास नसल्याचे सांगणे 
      कृष्णा, आश्रमात आल्यानंतर पहिल्याच दिवशी सद्गुरु बिंदाताई भेटल्या. त्या म्हणाल्या, ‘‘तोंडवळ्यात पालट झाला आहे. तुझी साधना चांगली चालू आहे.’’ (अभिनंदन ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले) यावरून असे वाटले की, माझ्यात जो पालट मला जाणवत आहे, तो त्रासामुळे नसून आध्यात्मिक कारणांमुळेच होत असावा. मला वाटले, ‘७ मास (महिने) घरी राहिल्यावर माझा त्रास वाढला असेल. त्यामुळे माझे उपायही वाढतील; पण पू. गाडगीळकाकांना उपायांच्या संदर्भात विचारायला गेल्यावर पू. काकांनी त्यांच्या सप्तचक्रावरून मुद्रा करून पाहिल्या आणि मला म्हणाले, ‘‘तुम्हाला काहीच त्रास नाही. आश्रमात आल्यानंतर तुमच्या मनात जे नकारात्मक विचार येत आहेत, ते आश्रमातील चैतन्यामुळे आहेत. आश्रमात सतत वातावरणातील ईष्ट आणि अनिष्ट शक्तींचे सूक्ष्मातील युद्ध चालू असते. त्यामुळे विचारांच्या माध्यमातून प्रकटीकरण होत आहे. त्यामुळे केवळ दोन घंटे नामजप करा.’’
५. स्वतःमध्ये झालेल्या आमूलाग्र पालटामुळे मन स्वतःविषयी साशंक होणे
       कृष्णा, या प्रसंगावरून मला एक गोष्ट लक्षात आली की, माझी जी आंतरिक अवस्था पालटत आहे, ती त्रासामुळे नसून आध्यात्मिक उन्नतीतील कोणत्या तरी टप्प्यामुळे, असे होत आहे; पण मला त्याविषयी माहित नाही. कृष्णा, मला एवढेच कळत आहे की, माझ्या आंतरिक अवस्थेत पुष्कळ पालट होत चालला आहे. पूर्वीची मी आणि आताची मी यात पुष्कळ अंतर जाणवत आहे; पण कृष्णा, मला हा पालट झेपतच नाही. इतकी वर्षे मनाला लागलेली विचार करण्याची सवय, सुख-दुःखाची सवय, चांगले-वाईट अनुभवण्याची सवय, एकदम अचानक बंद होऊ लागल्यामुळे पुष्कळ चुकल्या चुकल्यासारखे आणि घाबरल्यासारखे वाटत आहे. ‘मी सर्वसाधारण (नॉर्मल) आहे ना ?’, असे वाटते. (सर्वसाधारणच्या पुढे गेली आहे. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले)
     ‘मी काहीतरी हरवत चालले आहे’, असे वाटते; कारण कृष्णा, आध्यात्मिक उन्नतीच्या टप्प्यांचे ज्ञान नसल्यामुळे आपल्यात होणारा पालट पटकन स्वीकारणे कठीण जाते. आध्यात्मिक उन्नती होत असतांना शरीर, मन आणि बुद्धी यांच्या अवस्थेत पालट होत असतो. त्यामागची कारणे काय ? याविषयीचे ज्ञान मला नसल्यामुळे माझी अवस्था चांगली आहे कि वाईट (त्रासदायक) आहे, हे कळत नाही.
६. देवाविषयी प्रेम आणि त्याचे रूप दिसेनासे झाल्यावर उलट प्रवास होत आहे, असे वाटणे
      मला वाटत होते की, माझी जसजशी आध्यात्मिक उन्नती होत जाईल, तसतसे मला देवाचे रूप पुष्कळ स्पष्ट दिसू लागेल. मला सतत देवाचे दर्शन होईल. दिवसेंदिवस देवाची आठवण पुष्कळ वाढत जाईल. देवाविषयीचे प्रेम पुष्कळ म्हणजे पुष्कळ वाढत जाईल, असे वाटले होते; पण सर्व उलटेच होत चालले आहे. (भावाच्या पुढे आनंद आणि आनंदाच्या पुढे शांतीची अनुभूती येते. शांतीच्या अनुभूतीमुळे अशा अनुभूती येत आहेत. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले)
७. ईश्‍वरप्राप्तीच्या प्रयत्नात देवाला विसरत चालल्याने काळजी वाटणे 
      कृष्णा, मला तुझे रूप दिसत नाही. तुझी आठवण येत नाही. तुझ्याविषयी प्रेम जागृत होत नाही. आता तुला ‘परात्पर गुरु डॉक्टर’ही म्हणू नये कि ‘कृष्ण’ही म्हणू नये’, असे वाटते. तुला शब्दांतून काहीच संबोधू नये, असे वाटते. केवळ ‘तू देव आहेस’, ही जाणीव सूक्ष्म स्तरावर जागृत असते. कृष्णा, ‘तुला मी विसरत चालले आहे’, ही भीती मनातून जातच नाही. ‘देवाला प्राप्त करण्यासाठी मी देवालाच कशी काय विसरत चालले आहे’, अशी काळजी मनात निर्माण झाली आहे. (देवाशी एकरूप व्हायची अनुभूती आहे. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले)
८. समष्टी साधना करून अखंड अनुसंधान साधण्याची ओढ वाटणे 
     कृष्णा, आता असेही वाटते की, एकांतात राहून तुझ्याशी अखंड अनुसंधान कसे साध्य करायचे, हे शिकले. आता समष्टीत राहून तुझ्याशी अखंड अनुसंधान साध्य करण्यासाठी प्रयत्न करावे, असे वाटू लागले आहे; कारण ‘तुझ्याशी अखंड अनुसंधान साधणे’, हेच जीवनाचे ध्येय असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत तुझ्याशी अनुसंधान टिकवून ठेवण्याचे ध्येय समोर ठेवावे आणि ‘त्यासाठीच प्रयत्न करावे’, असे वाटू लागले आहे. (व्यष्टी साधनेतून समष्टी साधनेत जाणे, ही पुढची प्रगती आहे. - डॉ. आठवले) अखंड अनुसंधानातूनच मी तुझ्याशी लवकर एकरूप होईन, असे वाटत आहे. 
     कृष्णा, माझ्या या अवस्थेवरून मला तुला विचारावेसे वाटते की, देवा, माझ्या या अवस्थेमागचे कोणते आध्यात्मिक कारण आहे ? हा अध्यात्मातील कोणता टप्पा आहे ? कृष्णा, तू मला यामागील आध्यात्मिक कारण सांगितलेस, तर पुष्कळ छान होईल. त्यामुळे मला ‘आध्यात्मिक उन्नती म्हणजे नेमके काय असते ?’, हे कळेल. ‘देवाशी एकरूप होणे’ म्हणजे काय असते ? आध्यात्मिक उन्नतीचे टप्पे कशा प्रकारचे असतात. तुझ्याकडून मला मार्गदर्शन मिळाल्यामुळे मला पुढे जाण्यासाठी योग्य दिशा मिळेल आणि पुढे इतरांनाही मला ‘आध्यात्मिक उन्नती म्हणजे काय असते’, हे सोपे करून सांगता येईल. तेव्हा कृष्णा, कृपा करून मला मार्गदर्शन कर, हीच तुझ्या चरणी प्रार्थना.
- कृष्णाची, (क्रमश: पुढील सोमवारी)
कु. दीपाली पवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.१२.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn