Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

चारचाकी गाडीचे दार अकस्मात् उघडून महामार्गावर पडून झालेल्या अपघाताच्या वेळी सुखरूपता अनुभवतांना आणि त्यानंतरही सौ. स्नेहल गांधी यांनी घेतलेली गुरुकृपेची अनुभूती

श्री. संतोष गांधी
     ‘१५.९.२०१६ च्या रात्री मी चारचाकी गाडीतून जात असतांना अचानक गाडीचे उजव्या बाजूचे दार उघडले आणि मी रस्त्यावर (महामार्गावर) पडले. क्षणभर मला काय झाले, ते कळलेच नाही. ‘देवा, मी गाडीतून पडले’, एवढेच माझ्याकडून म्हटले गेले. मी उठण्याचा प्रयत्न केला; परंतु मला सगळीकडेच लागले असल्याने उठता येत नव्हते. त्याही स्थितीत मी ‘महामार्गावर मागून पुढून गाडी येत नाही ना’, हे पाहिले आणि माझ्याकडून देवाप्रती कृतज्ञता व्यक्त झाली. तोपर्यंत गाडीतील साधक उतरून माझ्या साहाय्याला आले होते. साधकांनी मला उठवून गाडीत बसवले आणि रुग्णालयात नेऊन माझ्यावर उपचार चालू झाले. या वेळी देवाने वेळोवेळी केलेले साहाय्य आणि देवाच्या कृपेनेच या प्रसंगातून कशी बाहेर पडले, याविषयी आलेल्या अनुभूती येथे देत आहे. 


सौ. स्नेहल गांधी 
      १. गाडीतून रस्त्यावर पडल्यावर देवानेच 
त्याच्या हाताच्या आेंजळीत अलगदसावरले असल्याचे वाटणे 
     माझ्या हातापायांना खरचटणे आणि डोक्याला थोडा मार लागणे यांव्यतिरिक्त मला काहीही झालेले नाही, हे जेव्हा मला कळले तेव्हा गुरुदेवांप्रती किती कृतज्ञता व्यक्त करू तेच कळत नव्हते. भाव दाटून आला होता. तेथे उपस्थित सर्वांनाच आनंद झाला होता. मी रस्त्यावर पडले, तेव्हा देवाने मला त्याच्या हाताच्या आेंजळीत अलगद सावरले होते. चालत्या गाडीतून पडूनही काही विशेष लागले नाही, यावर क्षणभर माझा विश्‍वासच बसत नव्हता. ‘माझ्या गुरुमाऊलीने मला किती अलगद सावरले’, हे पाहून मला अत्यंत कृतज्ञता वाटत होती. मी काहीच करत नाही, तरी देवाने माझ्यावर १०० टक्के कृपा करून मला या अपघातातून वाचवले, याविषयी त्याच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता ! 
२. वेदना होत असूनही शांत रहाता येणे
     साधकांनी मला साहाय्यही केले आणि धीरही दिला. त्यामुळे मला भीती वाटली नाही. डॉक्टर उपचार करीपर्यंत ‘हाताचा किंवा पायाचा अस्थिभंग तर झाला नाही ना ?’ अशी मनात धाकधूक वाटत होती, तरी आतून मात्र मला स्थिरता जाणवत होती. माझा नामजप चालू होता. देवच मला सहनशक्ती देत होता. त्यामुळे वेदना होत असूनही मला शांत रहाता आले. 
३. अपघाताविषयी मनात नकारात्मक 
विचार न येता ‘देवाने वाचवले’, याविषयी कृतज्ञता वाटणे 
     संपूर्ण रात्रभर मला झोप येत नव्हती; परंतु माझ्या मनात अपघाताविषयी किंवा नकारात्मक विचार नव्हते. त्यापेक्षा ‘भावजागृतीसाठी प्रयत्न, कृतज्ञता व्यक्त करणे, नामजप करणे’, असे सर्व चालू होते. एक - दोनदा ‘मागून गाडी आली असती, अंगावरून गेली असती, तर काय झाले असते ? एखादा पाय गेला असता, तर काय केले असते ?’ असे विचार येऊ लागल्यावर त्वरित गुरुदेवांनी विचार दिला, ‘आता तसे काही झालेले नाही ना ? मग त्या विचारात गुंतून मनाची ऊर्जा कशाला व्यय करायची ? त्यापेक्षा ‘देवाने या अपघातातून सुखरूप कसे वाचवले आहे’, हे आठवून केवळ कृतज्ञता व्यक्त करायची.’ या विचारानंतर मात्र माझे वरील विचार पूर्णपणे थांबले. (तो प्रसंग आठवून मला पुन्हा कधीच त्रास झाला नाही.) 
४. तुळजापूरच्या श्री भवानीदेवीच्या बांगड्या 
हातात घातल्यामुळे हाताचा अस्थिभंग न झाल्याचे 
वाटणे आणि बांगड्या वाढवूनही हाताला काच न लागणे 
     मी हातात तुळजापूरच्या श्री भवानीदेवीची एक एक बांगडी, हिरव्या बांगड्या आणि सोन्याच्या बांगड्या घातल्या होत्या. अपघात झाला, त्या वेळी उजव्या हातातील चारही काचेच्या बांगड्या वाढवल्या. सोन्याच्या बांगड्या पूर्णपणे वाकड्यातिकड्या झाल्या; परंतु माझ्या हाताला बांगड्यांची एकही काच लागली नाही, तसेच श्री भवानीदेवीच्या बांगडीमुळे माझ्या हाताचा अस्थिभंगही झाला नाही. केवळ हाताला भरपूर खरचटले होते. ‘देवीनेच बांगडीच्या माध्यमातून माझे रक्षण केले’, असे मला वाटले आणि पुष्कळ कृतज्ञता वाटली. (उपायांची चित्रेही लावली असल्याने डोक्यालाही विशेष मार लागला नाही.) डोक्याला तीन ठिकाणी लहान लहान जखमा झाल्या होत्या; पण एकही जखम खोल नव्हती. त्यामुळे टाके घालावे लागले नाहीत. 
५. अपघातानंतर विश्रांती घेतांना देवाने व्यष्टी साधना 
आणि भावजागृतीचे प्रयत्न करण्याची संधी दिल्याविषयी कृतज्ञता व्यक्त होणे 
     शरिरावरील व्रण पाहून ‘आता किमान १५ दिवस तरी मी सेवा करू शकणार नाही’, याचा मला अंदाज आला. आतापर्यंत मी केवळ कार्यच करत होते. त्याला साधनेची वा भावाची जोड देण्याचा प्रयत्न केला नव्हता. मी व्यष्टी साधनेचे प्रयत्नही विशेष करत नव्हते. या अपघाताच्या निमित्ताने मला देवाने व्यष्टी साधना आणि भावजागृतीचे प्रयत्न करण्याची संधी दिल्याविषयी देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करून मी ‘प्रयत्न करायचे’, असे ठरवले. 
६. पू. (सौ.) सखदेवआजींचे वास्तव्य असलेल्या खोलीत 
रहाण्याची संधी मिळणे, खोलीत त्यांचे अस्तित्व अनुभवणे 
आणि पूर्वी त्यांची सेवा केल्याचे क्षण आठवून भावजागृती होणे 
     त्यानंतर माझ्याकडून देवाला आत्मनिवेदन करतांना ‘प्रत्यक्ष गुरुदेव समोर आहेत’, असा भाव ठेवून आत्मनिवेदन करण्याचा प्रयत्न केला जायचा. माझे रहाण्याचे नियोजन पू. (सौ.) सखदेवआजी वास्तव्यास होत्या त्या खोलीत केले होते. त्यामुळे माझ्याकडून त्यांचे अस्तित्व अनुभवण्याचा प्रयत्नही व्हायचा. पू. आजींची थोडीफार सेवा करण्याची संधी मला मिळाली होती. ते क्षण आठवूनही माझी भावजागृती होऊ लागली. 
७. ‘श्रीकृष्णच जखमेवर हात ठेवून वेदना 
न्यून करत आहे’, असा भाव ठेवल्याने वेदना न्यून होणे 
     जखमांना मलमपट्टी करत असतांना वेदना व्हायच्या. त्या वेळी मी कृष्णाला आळवून ‘त्या सहन करण्याची शक्ती दे’, अशी प्रार्थना करत असे. जखमेवर माझा हात ठेवून ‘तो प्रत्यक्ष श्रीकृष्णाचा हात आहे. तो मायेने माझ्या जखमांवर हात फिरवून माझ्या वेदना न्यून करत आहे’, हा भाव ठेवून प्रयत्न केल्यावर वेदना कधी न्यून व्हायच्या, ते कळतच नसे. विभूती लावल्यामुळे जखमा लवकर ठीक झाल्या, हे लक्षात येऊन कृतज्ञता वाटत होती. एकूणच अपेक्षित कालावधीच्या आधीच सर्व जखमा बर्‍या झाल्या. 
८. रात्री वेदनांमुळे झोप येत नसल्याने सहज पालट म्हणून
 श्री दुर्गादेवीचा जप करणे आणि दुसर्‍या दिवशी संतांनी तोच जप करण्यास सांगणे 
     अपघाताच्या दुसर्‍या दिवशी दिवसभर श्रीकृष्णाचा आणि पितृपक्ष असल्यामुळे १ घंटा दत्ताचा नामजप केला. मी सतत प्र्रार्थना अन् कृतज्ञताही व्यक्त करत होते. रात्री वेदनांमुळे झोप येत नव्हती आणि कंटाळवाणेही वाटत होते. ‘कधी एकदा ठीक होते’, असे विचार मनात येऊ लागले. सहज पालट म्हणून ‘श्री दुर्गादेवीचा जप करून बघूया’, असा विचार गुरुकृपेने मनात आला आणि मी श्री दुर्गादेवीचा नामजप करू लागले. थोड्या वेळाने वेदना आपोआप न्यून होऊ लागल्या आणि झोपही लागली. दुसर्‍या दिवशी एका संतांनी वेदना न्यून होण्यासाठी आणि झोप लागण्यासाठी करावयाचे मंत्र (जप) श्री. गांधींसमवेत कागदावर लिहून पाठवले. त्यात श्री दुर्गादेवीचा जप होता. तेव्हा लक्षात आले की देवाने माझ्याकडून कालच हा मंत्र म्हणून घेतला होता. 
९. खोलीतील सहसाधिकांमुळे पुष्कळ वर्षांत न मिळालेला 
भावसत्संग ऐकण्याची संधी मिळणे आणि साधनेच्या प्रयत्नांना दिशा मिळणे 
     खोलीत (कु. मयुरी, कु. रूपाली) रुग्ण साधिका रहातात. त्यांना खोलीतच विश्रांती घ्यावी लागते. त्यामुळे त्यांच्यासमवेत मला खोलीतच भावसत्संग ऐकू येत होता. इतक्या वर्षार्ंत मी कधीच भावसत्संगाला बसले नव्हते. ‘तेव्हा देव आपल्याला भरभरून देत आहे’, या विचाराने माझा भाव जागृत झाला. सत्संग घेणार्‍या साधिकांनी वेगवेगळे भावप्रयोग करून घेतल्याने माझे भावजागृतीचे प्रयत्न होऊ लागले. कृतज्ञताही वाढू लागली. सकाळी उठल्यापासून दिवसभर मनात ती जाणीव निर्माण होण्यास साहाय्य झाले. साधनेत आल्यापासून प्रथमच ‘खर्‍या अर्थाने साधनेचे प्रयत्न कसे करायचे’, हे मला कळले. यापूर्वी मला दैनिक सनातन प्रभातमध्ये वाचून किंवा इतरांच्या प्रयत्नांतून अधूनमधून प्रयत्न करावेसे वाटायचे; पण ‘कृतीच्या स्तरावर काय करायचे’, ते लक्षात येत नसे. त्यामुळे एक-दोन दिवसांनी त्या प्रयत्नांत खंड पडत असे. आता माझे थोडेफार प्रयत्न होऊ लागले आहेत. 
 १०. मुलीने स्थिर राहून आनंदाने सेवा करणे 
     कु. मृण्मयीनेही (माझ्या मुलीने) स्थिर राहून माझी सेवा केली. तिला अशी सेवा करायची सवय नाही, तरीही तिने आनंदाने सर्व केले. अपघाताच्या तिसर्‍याच दिवशी तिची सेवा पालटून ती नवीन सेवा शिकायला गेली, तरीही अल्पाहार आणि जेवणाची वेळ झाली की, ती धावत येऊन मला अल्पाहार किंवा जेवण आणून द्यायची. 
११. आश्रमातील संत आणि साधक यांच्या प्रेमामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त होणे 
     आश्रमातील संतांनी माझी वेळोवेळी विचारपूस केली आणि मला धीर दिला. मला मंत्रजप दिला. त्यामुळे मला फार आधार मिळाला. आश्रमातील सर्व साधक माझी प्रेमाने विचारपूस करायचे. या कालावधीत मला साधकांकडून, अगदी नातेवाइकांपेक्षाही अधिक प्रेम मिळाले. दैनिकातील साधिकांनी मला तत्परतेने साहाय्य केले. खोलीत रहाणार्‍या अन्य साधिकाही आजारी आहेत, तसेच त्यांना तीव्र आध्यात्मिक त्रास आहे, तरीही त्या मला वेळोवेळी साहाय्य करत असत. मी आनंदी रहावे; म्हणून प्रयत्नरत असत. आश्रमातील वयोवृद्ध साधकांपासून बालसाधकांपर्यंत सर्वांनीच वेळोवेळी माझ्या प्रकृतीची विचारपूस करून मला प्रेम दिले. मी थोडीशी चालायला लागले, भोजनकक्षात जाऊ शकले आणि दैनिकात सेवेसाठी जाऊ लागले की, साधकांना फार आनंद व्हायचा. त्यांच्याप्रतीही मी कृतज्ञता व्यक्त करते. 
     गुरुदेवांच्या कृपेने ८ दिवसांतच मला माझी वैयक्तिक कामे करता येऊ लागली. १५ दिवसांनी मी थोडी थोडी (१ - २ घंटे) सेवा करू शकले आणि त्यानंतर २० दिवसांनी अर्धवेळ सेवा करू शकले. सेवेचा कालावधी वाढवून आता मी पूर्ण वेळ सेवा करू शकत आहे. गुरुदेवा, तुमच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !’ 
- सौ. स्नेहल संतोष गांधी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१०.२०१६) 
पत्नीला अपघात झाल्याचे कळल्यावर 
देवाच्या कृपेने स्थिरता अनुभवणारे श्री. संतोष गांधी ! 
१. पत्नीच्या अपघाताचे वृत्त कळताच 
सर्व भार देवावर सोडून स्थिर रहाता येणे 
     ‘१५.९.२०१६ या रात्री १० वाजून १० मिनिटांनी सौ. स्नेहलला (माझ्या पत्नीला) अपघात झाल्याचे मला एका साधिकेकडून भ्रमणभाषवरून समजले. त्या वेळी माझी संगणकावर सेवा चालू होती. या वेळी ‘देवाच्या कृपेने काही होणार नाही. देव सांभाळील’, असा माझ्या मनात विचार आला. सेवा आवरत असतांनाच सौ. स्नेहलला रुग्णालयात नेल्याचा भ्रमणभाष आला. तिला शरिरावर सर्व ठिकाणी पुष्कळ लागल्याचे समजले. मी संगणक बंद केला आणि तिला पहायला निघालो. तिला पाहिल्यावर जखमा किती खोलवर आहेत, हे माझ्या लक्षात आले नाही. ‘नंतर डॉक्टर आपल्याला सांगतीलच’, असा मनात विचार येऊन मी शांत आणि स्थिर होऊन बाहेर उभा राहिलो. त्या वेळी ‘जे होईल, ते आपल्याच कृपेने होईल. जे काही होईल, ते सहन करण्याची शक्ती मला द्या’, अशी माझ्याकडून गुरुदेवांना आतूनच प्रार्थना झाली. त्या वेळी ‘काय घडते, ते पहात रहायचे; कारण प.पू. डॉक्टर असतांना आम्हाला काही होणार नाही’, असा विचार पुन्हा एकदा देवाने दिला. 
२. साधकांचा उत्कट प्रेमभाव जाणवणे 
     अन्य साधक पटपट साहाय्य करत होते. त्या वेळी सौ. स्नेहलला लागणारे कपडे आणि अन्य साहित्य साधकांकडून दिले जात होते. तेथे मला काही करण्याचे राहिलेच नाही. अनेक साधकांनी मलाही विचारले, ‘‘ताण नाही ना आला ? तुम्हाला चहा देऊ का ?’’, तेव्हा मला साधकांचा उत्कट प्रेमभाव जाणवला. 
     साधारणे ११ वाजल्यानंतर सौ. स्नेहलला दुसर्‍या खोलीत नेण्यात आले. तिला पडताळणार्‍या डॉक्टरांनी सांगितले, ‘‘गंभीर काही वाटत नाही. जखमाही खोलवर नाहीत. विशेषतः डोक्यातील जखम खोलवर नव्हती. त्यामुळे काळजी करायला नको. उद्या पुन्हा एकदा बघूया’’, असे सांगितले. मी स्नेहलला भेटलो, त्या वेळी तीही स्थिर असल्याचे जाणवले. मी तिला ‘‘आता नामजप, कृतज्ञता आणि भाव वाढवण्याकडे अधिक लक्ष दे’’, असे सांगितले. 
३. अपघाताच्या वेळी सर्व साहाय्य 
वेळेवर मिळाल्याने देवाची कृपा अनुभवता येणे 
     अपघाताच्या रात्री महामार्गावर ज्या ठिकाणी अपघात झाला, ते स्थळ मला एका साधकाने दाखवले. त्या वेळी अपघाताची भीषणता लक्षात आली. ‘महामार्गावर समोर गायी आणि अन्य गुरे आल्याने वाहनाचा वेग अल्प असणे, रात्रीची वेळ असतांना महामार्गावर अन्य वाहने बाजूने वा समोरून न येणे, सौ. स्नेहलला साधकांचे पटकन साहाय्य मिळणे, तिला रुग्णालयात नेण्यासाठी पटकन वाहन मिळणे, या सर्व गोष्टी केवळ गुरुकृपेनेच होऊ शकतात’, याची मला जाणीव झाली. 
     दुसर्‍या दिवशी समोर येणार्‍या प्रत्येक साधकाने सौ. स्नेहलविषयी विचारणा केली. त्यानंतर पुन्हा एकदा डॉक्टरांना भेटलो आणि तिच्या प्रकृतीविषयी विचारले. डॉक्टरांनी ‘विशेष गंभीर असे नाही. काळजी करायला नको’, असे पुन्हा सांगितले. त्यानंतर १५ दिवसांतच सौ. स्नेहलने पुन्हा सेवा चालू केली. या संपूर्ण प्रसंगात गुरुदेवा, आपल्याच कृपेने स्थिर रहाता आले, याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो.’ 
- श्री. संतोष गांधी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१०.२०१६) 
अपघात झाल्याचा कार्यकारणभाव शोधतांना मुलीचे 
‘मातृऋण’ फेडायचे राहिले असल्याचा विचार येणे आणि 
त्याच वेळी मुलीने तिला व्यापक समष्टीत सेवा शिकण्याची संधी मिळाल्याचे सांगणे 
कु. मृण्मयी गांधी
     ‘मला अपघात झाल्याच्या तिसर्‍या दिवशी दुपारी विश्रांती घेत असतांना माझ्या मनात विचार येऊ लागले, ‘एवढ्या आपत्काळात देवाने ‘मी विश्रांती घ्यावी’, असे का केले ? हा प्रसंग माझ्यावर का ओढवला असेल ?’ अचानक माझ्या मनात ‘मातृऋण’ असा शब्द आला. तेव्हा माझ्या मनात आले, ‘कु. मृण्मयीचे (मुलीचे) काही मातृऋण फेडायचे राहिले असेल. ते फिटून जाण्यासाठी आणि तिच्या प्रगतीतील अडथळे दूर होण्यासाठी देवाने हा प्रसंग घडवला असेल.’ थोड्या वेळाने कु. मृण्मयी आली आणि म्हणाली, ‘‘एक नवीन बातमी आहे. मला व्यापक समष्टीत सेवा करायला सांगितले आहे.’’ त्या वेळी माझी भावजागृती झाली आणि वरील विचाराचा भावार्थ लक्षात येऊन गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटली. गुरुदेवा, या अपघातात मला सुखरूप ठेवून तुम्ही मला पुनर्जन्मच दिला आहे. या देहाकडून यापुढे अधिकाधिक सेवा घडू द्या. माझ्या मनात कधीही स्वदेहाचे विचार येऊ देऊ नका. ‘प्रत्येक सेवा ही मला मिळालेली गुरुकृपेची संधी आहे, असा भाव माझ्या मनात निर्माण होऊन तो वृद्धींगत होऊ द्या’, हीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे.’
- सौ. स्नेहल गांधी (१०.१०.२०१६) 
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn