Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

देशभक्ती आणि विकल्प !

संपादकीय
     नोटाबंदीच्या निणर्र्यात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. ‘देशाच्या आर्थिक धोरणाचा तो भाग आहे’, असे न्यायालयाने निकालात म्हटले आहे. नोटाबंदीचा सरकारचा उद्देश नीट लक्षात न घेता प्रविष्ट केलेली ही याचिका असावी. शासनाचा उद्देश सर्वसामान्य जनतेला भावल्याने ती शासनाच्या बाजूने उभी राहिली. संसदेत विरोधी पक्ष नोटाबंदीच्या विरोधात गोंधळ घालत होते, त्याच वेळी त्यांना निवडून देणारी जनता, ‘आम्ही शासनाबरोबर आहोत, आम्हाला थोडा त्रास सहन करावा लागला, तरी शासनाचा हा निर्णय योग्यच आहे’, असे म्हणत होती. देशातील वातावरण लक्षात न घेता न्यायालयाकडे धाव घेऊन याचिका प्रविष्ट करणार्‍याची कीव करावी तेवढी थोडीच ! सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिलाच, शिवाय देशातील विविध राज्यांतील उच्च न्यायालयांना नोटाबंदीच्या संदर्भातील याचिका सुनावणीसाठी न घेण्याचा आदेश देऊन नोटाबंदीच्या संदर्भातील निर्णय केवळ सर्वोच्च न्यायालयातच घेतले जातील, असे कळवले. उच्च न्यायालयाने घालून दिलेली नियमावली उत्तमच आहे. एकाच विषयावर निरनिराळ्या न्यायालयांत याचिका दाखल झाल्यावर त्यावरील निकालांतही भेद दिसून येतो आणि देशभर गोंधळाचे वातावरण निर्माण होते. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली रूपरेषा लक्षात घेता, एका महत्त्वाच्या सूत्रावरून निर्माण होऊ शकणारा संभ्रम टाळण्यासाठी न्यायालयाने योग्य भूमिका बजावली, असे म्हणता येते. मोठ्या मूल्याच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय देशाच्या हिताचा होता. पंतप्रधानांनी ‘आरंभी थोडा त्रास सहन करावा लागला, तरी भविष्य सुखदायी आहे’, असे सांगून जनतेमध्ये विश्‍वास निर्माण केला. चांगल्या भविष्यासाठी कष्ट आणि त्रास सहन करणे, ही नैसर्गिक गोष्ट आहे. किंबहुना तो निसर्गाचा नियमच आहे. जनतेला हा नियम ठाऊक असल्याने तिने पंतप्रधानांनी म्हटल्याप्रमाणे ५० दिवस सहन करण्याची सिद्धता दाखवली. तरीही जनतेला आर्थिक गोष्टींत त्रास होत आहे, असे म्हणत याचिका प्रविष्ट करण्यात आली. देशासाठी त्रास भोगण्याची इच्छा नसणारी जनता ‘उत्तम नागरिक’ म्हणता येत नाही. नोटाबंदीचा काळ जर कुणाला हालाखीचा वाटत असेल, तर ती एकांगी विचारसरणी झाली. त्यातून मार्ग काढण्यासाठी एकमेकांना साहाय्य करण्याची मानसिकता निर्माण व्हायला हवी. आपली संस्कृती आणि संतांचे विचार काय सांगतात ? ‘एकमेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ।’ यातूनच देशवासियांचे उत्तम संघटन अस्तित्वात येईल आणि देशाला सुख-शांतीचे दिवस दिसतील. अर्थहीन याचिका प्रविष्ट करून न्यायालयांचा वेळ वाया घालवण्याऐवजी अशा पद्धतीने देशाची सेवा करण्याचे विचार मनात का येत नाहीत ?
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn