Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

राहुल गांधी यांचे भूकंपविषयक नवे संशोधन !

श्री. भाऊ तोरसेकर
      राहुल गांधी यांनी आता देशातील विरोधी पक्षांचे नेतृत्व हाती घेतले असून, त्यासाठीच विरोधी पक्षांना शुभेच्छा देण्याची वेळ आलेली आहे, कारण राहुल यांनी गेल्या चार वर्षांत काँग्रेससारख्या शतायुषी पक्षाची लिलया धूळधाण उडवून दाखवली आहे. साहजिकच त्यांच्याच हाती आपल्या तमाम विरोधकांचे नेतृत्व जावे, अशीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अपेक्षा असली, तर नवल नाही. नोटाबंदीनंतर त्या दिशेने राजकारण वळते आहे. गेल्या तीन आठवड्यांत संसदेचे कामकाज ठप्प करून दाखवण्यात राहुल यशस्वी झाले असून, राष्ट्रपती प्रणव मुखर्जीही त्यामुळे विचलीत झाले आहेत.
म्हणून तर आपले घटनात्मक पद संभाळतांनाही त्यांना आपल्या राजकीय वारशाची चिंता ग्रासत असावी. अन्यथा त्यांनी संधी मिळताच अशा आक्रस्ताळेपणाचा कान पकडण्याचे औचित्य दाखवले नसते. उघडपणे राष्ट्रपती राजकीय पक्षाचे नाव घेऊन भाष्य करू शकत नाहीत; पण त्यांनी सूचकरित्या काँग्रेस आत्मघाताकडे वाटचाल करत असल्याचे मतप्रदर्शन केलेले आहे. धरणे आणि घोषणा देण्यासाठी अन्य जागा आहेत. संसद हे चर्चा, प्रतिवाद आणि निर्णय घेण्याचे स्थान आहे, अशा कानपिचक्या त्यांनी विरोधकांना दिलेल्या आहेत. संसदेचे कामकाज ठप्प करण्याने त्या संस्थेला निकामी केले जाते, असे प्रणवदांना म्हणायचे आहे; पण आज काँग्रेस आणि तिच्या मागे फरफटत जाणार्‍या कुणाला प्रणवदांचे ऐकायचे आहे कुठे ? राहुल कधी भूकंप करतात, त्याची आशाळभूतपणे विरोधक प्रतिक्षा करत आहेत. अडीच वर्षांनी पुन्हा राहुलना भूकंप करण्याची उबळ आली आहे. अडीच वर्षांपूर्वी त्यांनी शतायुषी काँग्रेसला एकाच भूकंपाने उद्ध्वस्त करून टाकले. आता उरल्यासुरल्या विरोधी पक्षालाही धाराशायी केल्यावर त्यांचे समाधान होऊ शकेल. अन्यथा आपण लोकसभेत बोललो तर भूकंप होऊन जाईल, अशी भाषा राहुल कशाला बोलले असते ?
१. राहुल गांधी यांच्या भाषणातून काँग्रेस नावाची भूमी आणि तिचे 
विविध बालेकिल्ले मात्र पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडलेले आहेत !
     पाच महिन्यांपूर्वी अशीच काहीशी भाषा महाराष्ट्रातले ज्येष्ठ माजी मंत्री नाथाभाऊ खडसे बोलले होते. ‘मी बोलत नाही आणि बोललो तर देशात मोठे भूकंप होतील’, अशी चेतावणी त्यांनी दिली होती; पण नाथाभाऊंनी शब्द पाळला आणि बोलले नाहीत. अन्यथा नोटाबंदी करायला पंतप्रधानांना उसंतच मिळाली नसती किंवा राहुल गांधी यांना भूकंपाच्या भाषणाच्या सिद्धतेला वेळ मिळाला नसता. खरे तर राहुल गांधी यांनी आता देशाचे कल्याण करायचे विचार डोक्यातून काढून टाकावेत आणि आपले उर्वरीत आयुष्य ‘इस्रो’ किंवा ‘नासा’ या संस्थांना दान करून टाकावे. गेल्या कित्येक वर्षांपासून अशा संस्था आणि त्यातले सहस्रो शास्त्रज्ञ भूकंप कशामुळे होतात आणि त्याचे आधीच भाकित करता येईल काय ? याच्या संशोधनात मग्न आहेत. अवघे आयुष्य भूगर्भशास्त्र आणि भूचुंबकीय शास्त्राचे रहस्य उलगडण्यात खर्ची घालूनही, त्यांपैकी कोणाला अजून कधी कुठे आणि कशामुळे भूकंप होऊ शकेल, याचा वेध घेता आलेला नाही. अशा पार्श्‍वभूमीवर राहुल गांधी यांनी केलेला गौप्यस्फोट अतिशय मोलाचा आहे. या संस्थांनी राहुल गांधी यांच्या जुन्या नव्या तमाम भाषणांचे बारकाईने संशोधन करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आकस्मिक भूकंपाचे रहस्य उलगडू शकेल. लक्षावधींच्या संख्येने होणारी जीवितहानीही टाळली जाऊ शकेल. किंबहुना राहुल संसदेत बोलल्यावर किती रिश्टर स्केल मापनाचा भूकंप होतो आणि अन्यत्र बोलले, तर किती मापनाचा भूकंप होऊ शकतो; याचाही वेगवेगळा अभ्यास व्हायला हवा, कारण तसे राहुल संसदेत फारसे बोलत नाहीत. अन्यत्रच ते सतत बोलत असतात. त्यांच्या प्रत्येक बोलण्यातून आणि भाषणातून काँग्रेस नावाची भूमी आणि तिचे विविध बालेकिल्ले पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडलेले आहेत. तेव्हा राहुल यांच्या शब्दांवर विसंबून इतके संशोधन व्हायला काहीच हरकत नसावी. जयपूरच्या पक्ष चिंतन शिबिरात राहुल गांधी यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतली आणि त्यातून ते अधिवेशन इतके हादरले की, त्यात बोलतांना गृहमंत्री सुशीलकुमार यांचीही जीभ घसरली होती. ती राहुल यांच्या भाषणाने निर्माण होणार्‍या भूकंपाची पहिली साक्ष होती. पुढला पुरावा लोकसभा निकालांनी समोर आणला होता.
२. ज्याच्या बोलण्याने काँग्रेस जमीनदोस्त झाली, 
त्याच्याच भाषणाने संसदही कोसळून पडण्याची प्रत्येक काँग्रेसनिष्ठाला खात्री !
     राहुल गांधी आज काय सांगत आहेत ? त्यांना लोकसभेत बोलायची संधी मिळाली, तर त्यांचे भाषण होईल आणि त्यातून भूकंप होतील. तसे झाले तर त्यात आपोआपच नरेंद्र मोदी सरकार कोसळून पडायला वेळ लागणार नाही; पण राहुल यांना तशी संधीच मिळत नाही. त्यांच्या भाषणाला मोदी वा सत्ताधारी पक्षाने कुठलीही आडकाठी केलेली नाही. सरकार चर्चेला सिद्ध आहे. त्यामुळेच हवे तेव्हा राहुल लोकसभेत बोलू शकतात; पण राहुल यांच्या शब्दावर विश्‍वास असलेल्या काँग्रेसजनांनीच देशहित लक्षात घेऊन राहुलना बोलण्याची संधी नाकारलेली आहे. ज्याच्या बोलण्याने काँग्रेस जमीनदोस्त झाली, त्याच्याच भाषणाने देश हादरून जाईल आणि संसदही कोसळून पडण्याची प्रत्येक काँग्रेसनिष्ठाला खात्री आहे. साहजिकच देश आणि संसद भवन वाचवायचे असेल, तर त्यांच्यासमोर एकच पर्याय आहे. तो म्हणजे राहुलना लोकसभेत भाषण करण्याची संधी नाकारणे. त्यासाठी लोकसभाच चालू द्यायची नाही आणि कामकाज ठप्प करायचे. आपोआपच राहुलचे भाषण होत नाही आणि संसद भवनासह देश सुरक्षित रहातो. याच कारणास्तव काँग्रेससह विरोधी पक्षांनी संसदेचे कामकाज रोखलेले आहे. खुद्द माता सोनियाजी यांनी पक्षाचा लोकसभेतील नेता म्हणून राहुलना कशासाठी संधी दिली नाही, त्याचेही उत्तर यातच दडलेले असावे. आपले सुपुत्र जितका वेळ बोलतील, तितके भूकंप होऊन उरलासुरला देश जमीनदोस्त होऊन गेला तर ? याच भीतीपोटी राहुल यांच्याऐवजी मल्लिकार्जुन खरगे यांना नेतापदी नेमण्यात आले. 
- श्री. भाऊ तोरसेकर, ज्येष्ठ पत्रकार, मुंबई
(संदर्भ : http://jagatapahara.blogspot.in/)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn