Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा !

आजपासून वाचा नियमित सदर
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसंदर्भातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन !
परात्पर गुरु डॉ. आठवले
     हिंदु धर्म आणि भारतवर्ष यांचे वैशिष्ट्य असे की, येथे भविष्यात घडणार्‍या अद्वितीय घटनांचा उच्चार त्या घडण्यापूर्वी होतो. वाल्मिकी ऋषींनी अलौकिक प्रतिभादृष्टीतून प्रथम रामायण रचले. तद्नंतर प्रभु श्रीरामाचा अवतार झाला आणि ऐतिहासिक ‘रामराज्य’ पृथ्वीतलावर अवतरले. भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या पूर्वीही दैवी आकाशवाणी झाली. आकाशवाणीनुसार जन्मलेल्या भगवान श्रीकृष्णाने धर्मसंस्थापना केली आणि पुनश्‍च पृथ्वीवर ‘धर्मराज्य’ अवतरले. अध्यात्मातील अधिकारी व्यक्ती असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सर्वप्रथम १९९८ या वर्षी ‘भारतात वर्ष २०२३ मध्ये ‘ईश्‍वरी राज्य’ म्हणजे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापित होईल’, असा विचार द्रष्टेपणाने मांडला होता. तेव्हापासूनच ते ‘हिंदु राष्ट्र’ या विषयावर सातत्याने वैचारिक आणि आध्यात्मिक स्तरांवरील लिखाण करत आहेत. या विचारांत आगामी काळात होणार्‍या आदर्श राष्ट्ररचनेचे, म्हणजेच धर्मसंस्थापनेचे बीज रोवलेले आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी कोणत्याही आशादायी घटना स्थुलातून घडत नसतांना ‘हिंदु राष्ट्रा’विषयी सांगणे, ही काहींना अतिशयोक्ती वाटेल; पण काळाची पावले ओळखणार्‍या संतांना त्या उज्ज्वल भविष्याची चाहूल लागली आहे. आपण त्या दिशेने प्रयत्न करणे, ही आपली साधना आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वेळोवेळी ‘हिंदु राष्ट्र’ या विषयासंबंधी लिहिलेल्या एकूण विचारांपैकी केवळ हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा देणार्‍या विचारांचाच या ग्रंथात समावेश केलेला आहे. हा ग्रंथ म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा विचारसंग्रह असून त्यात त्यांचे स्फूटलेख आणि लेख या दोन्हींचा अंतर्भाव आहे. ‘हिंदु राष्ट्र’ या शब्दाची व्याख्या अनेक विचारवेत्त्यांनी भूगोल, इतिहास, संस्कृती आणि तत्त्वज्ञान यांच्या आधारे केली आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘हिंदु राष्ट्र’ या विषयाची आध्यात्मिक दृष्टीकोनातून मांडणी केली आहे. विश्‍वकल्याणाची व्यापक आध्यात्मिक शिकवण देणार्‍या भारतातच नव्हे, तर पृथ्वीवर सर्वत्र ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करणे, ही एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे, हे या ग्रंथातून सहज लक्षात येईल.
      स्वातंत्र्यवीर सावरकर, आद्यसरसंघचालक डॉ. हेडगेवार, पू. गोळवलकरगुरुजी आदी थोर पुरुषांनीही हिंदु राष्ट्राचा विचार प्रखरपणे मांडला. दुर्दैवाने स्वयंभू हिंदु राष्ट्र असलेले भारतवर्ष हे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनले आणि ‘हिंदु राष्ट्र’ ही तेजस्वी संकल्पना झाकोळून गेली. जेथे ‘रामराज्य’ प्रत्यक्षात अवतरले, ते राज्य आज एक दंतकथा ठरवली जात आहे. छत्रपती शिवरायांनी स्थापिलेले ‘हिंदवी स्वराज्य’ म्हणजेच ‘हिंदु राष्ट्र’ विस्मृतीत नेऊन त्याला ‘धर्मनिरपेक्ष राज्या’च्या नावाखाली ‘हिरवा रंग’ फासण्याचा खटाटोप केला जात आहे. त्याहीपुढे जाऊन ‘हिंदु राष्ट्र म्हणजे धर्मांधता’, असा अपप्रचार हेतूपूर्वक केला जात आहे. या धर्मनिरपेक्षतेमुळे देशासमोर असंख्य समस्या निर्माण झालेल्या असूनही धर्मनिरपेक्षतेविषयी अंधश्रद्धा बाळगणार्‍यांना आजही भारत हे ‘धर्मनिरपेक्ष राज्य’ म्हणूनच हवे आहे. ‘हिंदु राष्ट्र’ हा विषय त्यांच्या खिजगणतीतही नाही. त्यांना हे ज्ञात नाही की, ‘धर्मनिरपेक्ष राज्य’ कि ‘हिंदु राज्य’ हा खरा प्रश्‍न नसून ‘इस्लामी राज्य कि ‘हिंदु राज्य ?’, असा प्रश्‍न येत्या २ - ३ वर्षांत उत्पन्न होणार आहे. अशा परिस्थितीत केवळ हिंदूसंघटन करणारी विचारधाराच या देशाचे रक्षण अन् हिंदु राष्ट्राचे निर्माण करू शकते. हिंदु राष्ट्राच्या आकांक्षा सफल होण्यासाठी हिंदु समाजाचा हिंदु राष्ट्राविषयीचा विचार, उच्चार आणि आचार सर्वत्र एकसमान दिसला पाहिजे. म्हणूनच ‘हिंदु समाजातील विविध घटक, उदा. हिंदु संघटना, संप्रदाय, संत, अधिवक्ते, विचारवंत आदींनी ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेसाठी काय प्रयत्न केले पाहिजेत’, याचे दिशादर्शन या सदरातून केले आहे. 
      परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रेरणादायी विचारांतून स्फूर्ती घेऊन आगामी काळात हिंदु समाजाला भारतभूमीत रामराज्याची अनुभूती देणारे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्यासाठी खारीचा नव्हे, तर हनुमानाचा वाटा उचलण्याची प्रेरणा व्हावी आणि त्याने या कार्यासाठी शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक स्तरांवर अथक परिश्रम घ्यावेत, ही प्रभु श्रीरामाच्या चरणी प्रार्थना ! 
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’)
हा ग्रंथ ऑनलाइन खरेदीसाठीही उपलब्ध !
     यासाठी ‘सनातन शॉप’ च्या संकेतस्थळावरील पुढील लिंकला भेट द्या : goo.gl/TxlFr0 
(टीप : या लिंकमधील काही अक्षरे ‘कॅपिटल’ असल्याची नोंद घ्यावी.)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn