Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

संसद ठप्प होण्यातले दोषी !

१. संसदेचे कामकाज ठप्प झाल्यामुळे त्या दिवसांचे वेतन न घेणारे ओडीशाचे
आदर्श खासदार जयपांडा आणि त्याविषयी टीका करणारे काही स्वार्थी विरोधक !
भाऊ तोरसेकर
     जयपांडा नावाचे ओडीशाचे एक खासदार आहेत. गेल्या तीन-चार निवडणुका त्यांनी केंद्रापारा या मतरादसंघातून जिंकल्या आहेत. अतिशय शांत स्वभावाचे हे खासदार अनेकदा तुम्ही विविध वाहिन्यांवरील चर्चेत सहभागी होतांना बघितलेले असेल. आपल्या संयमी स्वभावासाठी ते प्रसिद्ध आहेत आणि नेमक्या विषयावर मोजक्या शब्दांत मतप्रदर्शन करणारे, अशी त्यांची ओळख आहे. जयपांडा कधी लोकसभा अधिवेशनात गोंधळ घालतांना वा आवेशपूर्ण भाषण करतांना दिसणार नाहीत. त्यांनी आता नवे वादळ निर्माण केले आहे. आपल्या सोशल मीडियाच्या खात्यावर त्यांनी आपल्यापुरती एक घोषणा करून टाकली आहे.     हिवाळी अधिवेशनात संसदेचे कामकाज ठप्प झाले आणि जवळपास अधिवेशन धुवून निघाले; त्या दिवसाचे मिळालेले वेतन नाकारण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. आपण जे कामच केले नसेल, त्याचे वेतन मोबदला कशाला घ्यायचा ? असा त्यांचा प्रश्‍न आहे. अर्थात अन्य संसद सदस्यांनी असे करावे, असा त्यांचा आग्रह नाही कि आवाहनही नाही. आपल्यापुरता असा निर्णय घेतल्याचे त्यांनी घोषित केले आहे; पण त्यामुळेच इतरांना मिरच्या झोंबल्या आहेत. मग जयपांडा यांच्यावरही टिकेची झोड उठायची थांबलेली नाही. ते सुखवस्तू आहेत आणि वेतन सोडले म्हणून त्यांचा उदरनिर्वाह थांबणार नाही, अशी मल्लीनाथीही अनेकांनी केलेली आहे. तसे बघितले तर किती खासदार केवळ मोबदला आणि वेतन यांवर गुजराण करतात, हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे संसदीय अधिवेशनाच्या काळातील वेतन सोडल्याने कोणावर उपासमारीची वेळ येण्याची अजिबात शक्यता नाही. त्यामुळेच वेतन सोडण्याइतके सुखवस्तू असण्याचे काही कारण नाही. मग जयपांडा यांच्या उपरोक्त कृतीविषयी नाराजी कशाला ? तर त्यांनी नेमक्या दुखण्यावर बोट ठेवलेले आहे.
२. संसद चालवणे हे सत्ताधारी पक्षाचे दायित्व असले, तरी
विरोधक गोंधळच घालणार असतील, तर कामकाज व्हायचे कसे ?
     ‘संसदेचे कामकाज कुणामुळे होऊ शकले नाही ? कशामुळे त्यात व्यत्यय आला आणि त्याला उत्तरदायी कोण ?’, असे प्रश्‍न विचारून खूप गदारोळ माजवला गेला. नंतर आपापले दायित्व झटकण्यासाठी दोन्ही बाजूंनी विविध युक्तीवाद केले गेले आहेत. संसद चालवणे हे सत्ताधारी पक्षाचे दायित्व आहे, असे विरोधकांनी छातीठोकपणे सांगितलेले आहे; पण त्याखेरीज विरोधकांचे दायित्व कुठले, त्याचे स्पष्टीकरण दिलेले नाही. हा अर्धवट वा अपुरा युक्तीवाद लक्षात घ्यायचा, तर कामकाजात व्यत्यय आणणे हे विरोधकांचे दायित्व असते का ? तसे असेल तर जयपांडा सत्ताधारी पक्षात नसतांनाही शांत बसले आणि त्यांनी कामकाजात कुठलाही व्यत्यय आणला नाही. ही दायित्वशून्यताच म्हणावी लागेल. पण तसा आरोप तरी अजून कुणी केलेला नाही. म्हणजेच कामकाजात व्यत्यय आणणे, हे विरोधकांचे कर्तव्य किंवा दायित्व नाही, हे विरोधकांना मान्य असायला हरकत नसावी; परंतु ती गोष्ट तिथेच संपत नाही. संसदेत सरकारने आपल्या कारभाराचा जाबजबाब द्यायचा असल्याने, कामकाज व्यवस्थित चालवण्याचे दायित्व सत्ताधारी पक्षावरच असते; पण दुसरी बाजू गोंधळच घालणार असेल, तर कामकाज व्हायचे कसे ? त्याचेही उत्तर देण्याची आवश्यकता आहे. ते उत्तर कुणी देत नाही. किंबहुना त्यामुळेच सरकारला जाब विचारण्याचा आपला अधिकार जयपांडा यांना वापरता आलेला नाही. त्यांच्या अधिकारावर गोंधळामुळे गदा आणली गेली आहे. मग त्यांनी कोणाच्या डोक्यावर खापर फोडायचे ? सरकार कि विरोधक ? जयपांडा यांनी दुसर्‍या कुणाच्या डोक्यावर खापर फोडण्यापेक्षा आपण असाहाय्य होऊन काही करू शकलो नाही, म्हणून स्वत:लाच शिक्षा देण्याचा मार्ग चोखाळला आहे. आपल्यापुरते प्रायश्‍चित्त म्हणून संसद काळातील वेतन नाकारण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे; पण अन्य कुणाला दोष देण्याचे टाळले आहे.
३. खासदार जयपांडा यांनी संसद सदस्यांचा
मानभावीपणा आणि शहाजोगपणा उघड केला !
     कुठल्याही सामूहिक घटनाक्रमामध्ये सहभागी होणार्‍या प्रत्येकाचे काही दायित्व असते आणि त्यात गडबड होत असेल, तर सुसूत्रता आणण्याची कामगिरी प्रत्येकाने पार पाडण्यासाठी पुढे येण्याचेही कर्तव्य असते. आपण गोंधळ घालू आणि इतरांनी सुसूत्रता आणावी, असा आग्रह फसवा असतो. आज सत्ताधारी असोत कि विरोधक असोत, परस्परांच्या माथी कामकाज राहिल्याचे खापर फोडत आहेत; पण त्यातला कोणीही आपलीही काही चूक झाल्याचे मान्य करायला सिद्ध नाही. दोन्ही बाजूंचे दावे ऐकले, तर बोलणारा जणू अतिशय शिस्तीचा आणि सभ्य वर्तनाचा पुतळा असल्यासारखाच युक्तीवाद करतो आहे. दुसर्‍याच्या चुका वा बेशिस्तीचे दाखले अगत्याने देतो आहे; मात्र आपल्या चुकांविषयी बोलण्याची इच्छा दिसत नाही कि चुका मान्य करण्याचा प्रामाणिकपणा आढळून येत नाही. या दोन्हीत कुठेही नसलेले बिजू जनता दलाचे जयपांडा मात्र प्रायश्‍चित्त घेत आहेत. त्यातली कल्पना मुळातच गांधीजींची आहे. आपल्या चळवळ आंदोलनात कोणाही व्यक्तीने वा कुठल्याही कारणाने हिंसाचार झाला, तर दायित्व घेऊन महात्माजी प्रायश्‍चित्त घेत असत. त्यासाठी ब्रिटीश सरकारच्या पोलिसांवर आरोपाचा भडीमार करत नव्हते. व्यक्तीगत प्रायश्‍चित्त हा त्यांचा मार्ग होता आणि त्याचेच अनुकरण जयपांडा यांनी केलेले आहे. त्यामुळेच अन्य पक्षांच्या लोकांना अस्वस्थ होण्याची पाळी आलेली आहे. कारण जयपांडा हे सभ्यपणा आणि प्रामाणिकपणाचे उदाहरण समोर मांडत आहेत. आपण स्वत:शी प्रामाणिक असल्याचे कृतीतून दाखवून देत आहेत. त्यामुळेच इतरांचा खोटेपणा उघड होतो आहे. सगळी गडबड तिथे आहे. या प्रायश्‍चित्तातून या एका सदस्याने उर्वरीत संसद सदस्यांचा मानभावीपणा आणि शहाजोगपणा उघड करून टाकला आहे. मग अशा लोकांनी जयपांडा यांच्यावर व्यक्तीगत चिखलफेक करणे स्वाभाविक नाही काय ?
४. खासदार जयपांडा यांनी कृतीतून उभे केलेले आवाहन आणि
आव्हान पेलण्याची हिंमत नसलेले विरोधी आणि सत्ताधारी खासदार !
     एका उर्दू शायराचा एक दृष्टांतकारी शेर या माणसाने साक्षात जगून दाखवला आहे. प्रतिष्ठित समाजात आपले धुतलेपण सादर करतांना नावाजलेली माणसेही कशी लबाडी करतात, त्याचे वर्णन करतांना हा शायर म्हणतो, ‘उमर भर यूं ही गलती करतें रहें, धूल चेहरे पर थी और हम आईना साफ करते रहें !’ मराठीत ‘आयुष्यभर आरसा स्वच्छ करत बसण्याची चूक केली; पण धूळ तर चेहर्‍यावरच साचलेली होती.’ जयपांडा तोच आरसा संसद सदस्यांच्या समोर आणून ठेवत आहेत. राष्ट्रपतींना भेटून संसदेचे कामकाज होऊ शकले नाही; म्हणून निवेदन देणार्‍या काँग्रेस आणि अन्य पक्षांनी दुसरे काय चालवले होते ? कुठलेही निमित्त काढून कामकाज ठप्प करण्यापलीकडे नेमके काय झाले ? मग तीन आठवड्यांनी सत्ताधारी पक्षानेही तोच खाक्या पुढे रेटला आणि आता दोन्ही बाजू एकमेकांना संसदेतील गोंधळासाठी उत्तरदायी धरत आहेत. प्रत्येक जण आरश्याच्या समोर उभा राहून आरसा साफ करण्याची केविलवाणी धडपड करतो आहे; पण त्यातली लबाडी यापैकी प्रत्येकाला पक्की ठाऊक आहे. धूळ आरशावर नाही, तर आपला चेहराच धुळीने माखलेला आहे, हे प्रत्येक जण जाणून आहे. म्हणूनच कामकाज केले नाही, तर प्रायश्‍चित्त घेण्याची कोणाची सिद्धता नाही. तशी अपेक्षा व्यक्त होण्याच्या भितीने त्यांना जयपांडा यांची कृती खटकली आहे. कारण कृतीतून जयपांडा यांनी आवाहन आणि आव्हानही उभे केले आहे. कामकाज न झाल्याने खरेच दु:खी असाल, तर आपापले वेतन नाकारून त्याची साक्ष द्या, असे ते आव्हान आहे; पण ते पेलण्याची हिंमत नसल्यानेच मग त्या उर्दू शायराचे शब्द खरे करण्यात धन्यता मानली जात आहे.
- भाऊ तोरसेकर, ज्येष्ठ पत्रकार, मुंबई
(संदर्भ : http://jagatapahara.blogspot.in/)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn