Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना वेळोवेळी केलेले मार्गदर्शन

१. साधकांनी विचारलेले प्रश्‍न आणि त्यांनी दिलेली उत्तरे 
१ अ. त्रास असलेल्या व्यक्तीने स्वतः आध्यात्मिक उपाय करणे अधिक योग्य, ते शक्य नसल्यास घरच्यांनी तिच्यासाठी सांगितलेले उपाय करावेत !
प्रश्‍न : मुलीला त्रास आहे. त्यामुळे तिला आश्रमात राहू नये, असे वाटते. तिला ‘नोकरी करावी’, असे वाटते. ती आध्यात्मिक उपायही करत नाही.
उत्तर : मुलीला ३० प्रतिशत आध्यात्मिक त्रास असल्यामुळे तिच्या मनात असे विचार येतात. त्रास असणारी व्यक्ती स्वतः नामजप किंवा उपाय करू शकत नसेल, तर घरच्यांनी सतत उदबत्ती लावणे, भ्रमणभाष संचावर भजने किंवा नामजप लावणे हे उपाय करावेत. अन्य आध्यात्मिक उपायही करावेत. असे अप्रत्यक्ष उपाय केल्यामुळेही तिचा त्रास न्यून होण्यास साहाय्य होईल. त्रास होत असलेल्या व्यक्तीने प्रत्यक्ष उपाय केल्यास तिला अधिक लाभ होतो.
१ आ. कर्तव्यातून मुक्त होण्याचा विचार करण्यापेक्षा देवच सर्वांची काळजी घेत असल्याने ईश्‍वरप्राप्तीसाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे असणे 
प्रश्‍न : आता ‘संसारातून, कर्तव्यातून मुक्त होऊया’, असा विचार येतो; पण ‘इतर काय म्हणतील ?’ या विचारामुळे संघर्ष होतो. 
उत्तर : ‘कर्तव्यातून मुक्त होऊया’, असा विचार नको. मनाला वैराग्य आले की, पुढे संसारात आणि मायेत रहावे, असे वाटतच नाही. घरी आई एकटी असतांना शंकराचार्य वयाच्या ८ व्या वर्षी साधनेसाठी निघून गेले. समर्थ रामदासांचेही तसेच होते. त्यांना आईची काळजी नव्हती, असे नाही. ‘देवच सर्वांची काळजी घेतो, आपण नाही’, हे ज्या क्षणी त्यांना समजले, त्या क्षणी ते गेले. त्यामुळे प्रार्थना करतांनाही साधना होण्यासाठी, ईश्‍वरप्राप्तीसाठी करावी, म्हणजे हळूहळू मनाची सिद्धता होईल. 
२. अन्य सूत्रे 
२ अ. सनातन म्हणजे देवाकडे जाण्याचे चिकित्सालय ! : आजारी पडल्यावर सर्वजण आधुनिक वैद्यांकडे जाऊन उपचार करून घेतात; पण सनातन म्हणजे देवाकडे जाण्याचे, मायेत अडकण्यापासून बरे होण्याचे चिकित्सालय आहे.
२ आ. आपल्या जवळच्यांनी साधना करावी, असे वाटते; पण जे साधना करतात, ते आपल्याला ‘आपले’ वाटायला हवेत.
२ इ. घरी राहूनही साधनेत प्रगती करता येते ! : काही जणांना ‘घरी राहून साधना होत नाही’, असे वाटते; पण तुरुंगासारख्या नरकयातना देणार्‍या ठिकाणी राहून साधना केल्यावर साधकांची प्रगती होते, ते संतपदाला जाऊ शकतात, तर घरी राहून साधना, प्रगती का होऊ शकणार नाही ? सनातनचे अनेक साधक घरी राहून साधना करून संतपदाला पोचले आहेत. 
२ ई. हिंदु धर्मात सांगितलेले नारायण-नागबळीसारखे धार्मिक विधी करण्याचे महत्त्व : त्रिपिंडी श्राद्ध, नारायण-नागबळी यांसारखे धार्मिक विधी केल्याने विशिष्ट त्रास दूर होण्यात आपली साधना खर्च होत नाही. त्रास निवारण्यासाठी साधना खर्च न झाल्याने प्रगती होण्यास साहाय्य होते. जे साधना करत नाहीत, त्यांनी मात्र आवर्जून सर्व विधी करायला हवेत. 
२ उ. ईश्‍वरप्राप्तीची तळमळ असेल, तर कितीही मोठ्या संकटातून आपण बाहेर पडू शकतो.
२ ऊ. साधना हा कर्मयोग असल्याने फळाची अपेक्षा न ठेवणे महत्त्वाचे ! : बर्‍याच वेळा आपल्या मनात ‘मी सांगेन, तसे व्हायला हवे. इतरांनी माझे ऐकायला हवे. कुटुंबियांनी साधना आणि सेवा करायला हवी’, असे अपेक्षेचे विचार असतात; पण साधना हा कर्मयोग आहे. त्यामुळे फळाची अपेक्षा न ठेवता ती करत रहावी, म्हणजे त्यांना साधना करण्यासंदर्भात एका मर्यादेपर्यंत सांगावे; पण ‘मी सांगतो, मला वाटते, तसे व्हावे’, ही अपेक्षा करू नये.
२ ए. देवाकडे सकामातले आणि ‘साधनेत प्रगती होऊ दे’, असे मागणे अयोग्य : देवाकडे सकामातले काही मागू नये, तसेच ‘साधनेत प्रगती होऊ दे’, असेही मागू नये. मागण्यात चूक काही नाही; पण आपण लायक, पात्र झाल्यावरच देव कोणतीही गोष्ट देत असतो. त्यामुळे आपल्या मागण्याला काही अर्थ रहात नाही. तसेच ‘मागणे’ हे व्यावहारिक स्तरावरचे झाले. आपल्या प्रारब्धात जे असेल, ते देव भोगायला लावतोच; पण भोगण्यासाठी शक्तीही देत असतो.
२ ऐ. हिंदु राष्ट्रासाठी प्रार्थना करणे : हिंदु राष्ट्रासाठी प्रार्थना करणे, हीसुद्धा स्वेच्छाच झाली, तरीही ज्यांना दुसर्‍यांसाठी काही मागण्याची सवय नाही, त्यांनी समष्टीसाठी, हिंदु राष्ट्रासाठी अवश्य प्रार्थना करावी.’
- परात्पर गुरु डॉ. आठवले
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn