Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

राष्ट्रवादी काँग्रेसवर बंदी का नको ?

      मुंबईतील चेंबूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या कार्यक्रमात त्यांच्याच पक्षाचे माजी खासदार आणि माजी मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय दीना पाटील यांनी त्यांच्या ८ हून अधिक कार्यकर्त्यांसमवेत जाऊन गोळीबार केला. तसेच या वेळी काही जणांना शस्त्राद्वारे मारहाणही केली. त्यामध्ये काही जण घायाळ झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात प्रविष्ट करण्यात आले होते. या संदर्भात मलिक यांनी म्हटले की, या प्रकरणी आपण पोलीस तक्रार प्रविष्ट करणार असून पाटील यांनीच माझ्यावर जीवघेणे आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. पाटील यांनी म्हटले की, आपण काही केले नसून उलट मला आणि माझ्या कार्यकर्त्यांनाच मारहाण करण्यात आली आहे. आपण आपल्या स्वरक्षणार्थ बंदूक चालवली. त्यामुळे आपणही मलिक यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट करणार. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी ४ जणांना अटक केली असून आणखी ५ जण फरार आहेत. हे प्रकरण झाल्यानंतर मलिक आणि पाटील यांच्यामध्ये अंतर्गत वाद असल्याची चर्चा चालू होती.
      मागील वर्षी राष्ट्रवादीचेच आमदार जयंत पाटील यांच्या सांगली येथील कार्यक्रमातही अशाच प्रकारे गोंधळ झाला होता. एवढेच नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध जिल्ह्यांत होणार्‍या पक्ष मेळाव्यांमध्ये दोन नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी होणे, भांडणे होणे, शस्त्रास्त्रे घेऊन एकमेकांवर आक्रमणे होणे, अशा घटना होणे, हे नित्याचेच होत आहे. अशा घटना होत असतांना एकमात्र नक्की लक्षात येते की, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये कायदा सुव्यवस्था मानणारे किती जण आहेत, गुंड आणि गुन्हेगारी वृत्तीचे किती कार्यकर्ते-नेते आहेत, हे स्पष्ट होते. तसेच दुसर्‍या बाजूने विचार केला, तर यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था इतकी रसातळाला गेली आहे की, बिनधास्तपणे आणि उघडपणे अशा गोळीबाराच्या घटना घडत आहेत. 
     राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपापसांत एवढे वाद आहेत आणि ते एवढ्या विकोपाला जात असतील, तर त्या पक्षाची बांधणी अन् विचारसरणी किती घातक असेल, याचा विचारच न केलेला बरा. असे पक्ष कार्यकर्ते वा पदाधिकारी यांच्यावर पक्षाने कारवाई केल्याचेही कधी ऐकिवात नाही. याचाच अर्थ पक्षाला वरील घटना आणि पक्षातील वाढती गुंडगिरी मान्य आहे, असेच म्हणावे लागेल. नवाब मलिक यांच्यावर समाजातील अन्य कोणाकडून अशा प्रकारचे आक्रमण झाले असते, तर पोलिसांनी त्या गुन्हेगाराला आतापर्यंत अटक करून त्याची बिकट अवस्था केली असती आणि राष्ट्रवादीने मोठ्या प्रमाणात कांगावा केला असता. तसे या प्रकरणात घडले नाही. मुंबईतील प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी पक्षातील या वाढत्या गुन्हेगारीविषयी साधा ब्रही काढला नाही वा त्या पदाधिकार्‍याला पक्षातून काढले, असे केल्याची घटना क्वचितच आढळेल. याचा अर्थ शरद पवार यांना पक्षातील ही गुंडगिरी आणि गुन्हेगारी मान्य आहे, असा निष्कर्ष कोणी काढल्यास चुकीचे काय ? एकूणच काय तर पक्षामध्ये राष्ट्रवादी भूमिका असलेले कार्यकर्ते अल्प आणि गुन्हेगारच जास्त, असे समीकरण झाल्याचेच दिसत आहे. त्यामुळे अशा पक्षावरच आता शासनाने बंदी का घालू नये, असे कुणाला वाटल्यास काय नवल ? 
- श्री. भूषण कुलकर्णी, पुणे
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn