Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

चुका सुधारण्यासाठी गुरुकृपायोगानुसार साधनेचे प्रयत्न कसे करावेत, याविषयी देवाने सुचवलेली सूत्रे

श्री. विक्रम डोंगरे
१. सहसाधकांनी चुका सांगितल्यावर मनाचा संघर्ष होणे 
      ‘२८.८.२०१६ या दिवशी सहसाधकांनी मला माझ्याकडून सेवेत होणार्‍या चुकांची जाणीव करून दिली. आरंभी माझ्या मनाचा संघर्ष झाला. माझ्या मनात नकारात्मक विचार येऊन ‘परिस्थितीला दोष देणे, ‘स्वतः प्रयत्न करत आहेच’, असा विचार येणे आणि सहसाधकांमधील दोष पहाणे’, असा भाग झाला. त्याच वेळी दुसर्‍या बाजूला ‘आपल्याला अंतर्मुख व्हायचे आहे आणि त्यासाठी सकारात्मक रहायला हवे’, असे विचारही मनात येत होते. तेव्हा मी माझ्या आध्यात्मिक मित्राशी बोललो. त्यांनी काही आध्यात्मिक दृष्टीकोन देऊन प्रोत्साहन दिले.
     नंतर चुकांचे चिंतन करतांना माझ्यातील कोणते दोष आणि अहं यांच्या पैलूंमुळे माझ्याकडून चुका होतात, याचा अभ्यास झाला. त्या दृष्टीने आपण प्रयत्न करायला हवेत, हे लक्षात आले; परंतु तरीही मनाला पूर्ण शांतता अथवा आनंद मिळत नव्हता. काहीतरी अपूर्ण आहे, असे मला जाणवत होते.
२. शरणागतीचा अभाव असल्याचे देवाने लक्षात आणून देणे 
     नंतर शारीरिक अस्वास्थ्यामुळे विश्रांती घेत असतांना पुन्हा मनाचा संघर्ष होऊ लागला. तेव्हाही ‘आपल्याला सकारात्मक रहायचे आहे आणि अंतर्मुख व्हायचे आहे’, हे विचार मनात येत-जात होते; परंतु मार्ग मिळत नव्हता. चुकांचे चिंतन करता-करता ‘मी नेमका कुठे न्यून पडलो’, असा विचार होत असतांना देवाने अकस्मात् लक्षात आणून दिले की, सेवा करतांना माझा शरणागत भाव नसतो. मला याची जाणीव करून देण्यासाठीच देवाने श्रीकृष्णरूपी साधकांद्वारे मला चुकांची जाणीव करून दिली. ‘मी शरण गेलो, तरच मला कोणत्या वेळी कोणती कृती किंवा सेवा करायची आहे, हेे देवच सुचवेल आणि त्याला अपेक्षित अशी गुरुसेवा माझ्याकडून घडेल’, असे माझ्या लक्षात आले.
३. बहिर्मुखता आणि स्पष्टीकरण, हे कृतघ्नतारूपी पापच आहे, याची जाणीव होणे ! 
     तेव्हा मला तीव्र खंत वाटून मी साधकांची मानस क्षमा मागितली. त्या वेळी देवाने पुढील विचार दिले. ‘श्रीगुरूंच्या अलौकिक, अद्वितीय कार्यामध्ये त्यांनी माझी काहीच पात्रता नसतांना मला सहभागी करवून घेतले आहे. सेवा देऊन माझ्यावर अपार कृपाच केली आहे.’ हे लक्षात आल्यावर खंत आणि कृतज्ञता, असे दोन्ही वाटत होते. 
     ‘माझ्यात असंख्य दोष आणि अहंचे पैलू असतांना गुरु मला चुका सांगून परिपूर्ण करण्यासाठी झटत आहेत. त्यासाठी मी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. त्यामुळे बहिर्मुखता आणि स्पष्टीकरण, हे कृतघ्नतारूपी पापच आहे’, हेही देवाने लक्षात आणून दिले.
४. गुरुकृपायोगानुसार साधना केल्यानेच परिपूर्णत्व येऊ शकते, हे देवाने सांगणे 
     याविषयी दुसर्‍या दिवशी पुन्हा चिंतन करतांना देवाने पुढील विचार दिले - ‘आपल्याला नुसता भाव वृद्धींगत करून चालणार नाही. त्यासमवेत स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन होणे, हेही समष्टी सेवेच्या दृष्टीने आवश्यक आहे. माझ्यातील दोष आणि अहं यांचा अभ्यास होणे हा ‘ज्ञानयोग’ झाला. शरणागत भाव वाढवण्याचे प्रयत्न करणे, हा ‘भक्तियोग’ झाला; परंतु केवळ दोष-अहंचा अभ्यास अथवा भाव ठेवल्याने चुकीतून परिपूर्णत्वाने शिकणे होणार नाही. त्यासाठी हा अभ्यास आणि भाव कृतीत उतरवणे आवश्यक आहे, म्हणजे ‘कर्मयोग’ आचरणे आवश्यक आहे. असे केले तरच देवाला अपेक्षित असे खर्‍या अर्थाने शिकणे होईल. थोडक्यात, कोणत्याही चुकीला सुधारण्यासाठी ज्ञान, भक्ती आणि कर्म यांची साथ मिळाली, तरच देवाला अपेक्षित असे आपण घडू शकतो, म्हणजेच गुरुकृपायोगानुसार साधना पूर्ण होऊ शकते.’ 
     त्या वेळी ईश्‍वराच्या व्यष्टी आणि समष्टी अशा दोन्ही रूपांशी एकरूप होण्यासाठी गुरुकृपायोगानुसार साधना करणे किती महत्त्वाचे आहे, हे लक्षात आले. त्यातून साक्षात् श्रीमत् नारायण असलेल्या प.पू. डॉक्टरांचे अद्वितीयत्व पुनः एकदा अधोरेखित झाले. गुरुदेवा, तुला अपेक्षित असे घडण्यासाठी माझ्याकडून शरणागत भावाने कृतीच्या स्तरावर अभ्यासपूर्ण प्रयत्न होवोत, अशी प्रार्थना करतो.’
अनंत अपराधी 
- श्री. विक्रम डोंगरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.९.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn