Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

मद्यपींचा राजमार्ग रोखा !

संपादकीय
       देशातील रस्त्यांवरील अपघातात १ लाख ४२ सहस्र नागरिक प्रतिवर्षी मृत्यू पावतात, अशी आकडेवारी केंद्र सरकारने दिली आहे. या अपघातांमागे विविध कारणे असतात. त्यातीलच एक कारण म्हणजे दारू पिऊन गाडी चालवणे, हे एक आहे. देशाच्या राज्यघटनेनुसार दारू पिणे अयोग्य नाही. व्यक्तीस्वातंत्र्याच्या अंतर्गत व्यक्ती दारू पिऊ शकते; मात्र विविध नियमांद्वारे सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास, तसेच दारू पिऊन कृती करण्यास बंदी आहे. त्यात दारू पिऊन गाडी चालवण्यास बंदी घालण्यात आली आहे. देशात किंवा कुठेही नियमभंग करण्याच्या कृती होत असतात. त्यात या नियमाचाही भंग केला जातो. त्यामुळे दारू पिऊन गाडी चालवली जाते आणि मद्याच्या अमलामध्ये चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात होतात अन् त्यात लोकांचा आणि स्वतः गाडीच्या चालकासह गाडीतील लोकांचा नाहक मृत्यू होतो किंवा ते जायबंदी होतात. या घटना पहाता सरकारने जनतेच्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी दारू पिऊन वाहन चालवणार्‍यांवर कारवाई करण्यासह त्यांना सहजरित्या दारू मिळणार नाही, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते; मात्र स्वातंत्र्याच्या ६९ वर्षांत तसा प्रयत्न झालेला नाही. शेवटी या देशात सरकार आणि प्रशासन यांच्या निष्क्रीयतेमुळे न्यायालयांनाच देश चालवावा लागत आहे. शेकडो प्रकरणांत नागरिकांना जनहित याचिकांद्वारे सरकारला न्यायालयाच्या माध्यमातून आदेश देऊन काम करण्यास भाग पाडले जात आहे. तसाच प्रकार या संदर्भातही झाला आहे. काही जागरूक नागरिकांनी महामार्गांवरील दारूची दुकाने बंद करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याला न्यायालयाने दारू विक्रेते आणि सरकार यांना न्यायालयाने परखड शब्दांत फटकारले आहे. राज्यघटनेच्या कलम २१ नुसार प्रत्येक नागरिकाला जीवन जगण्याचा अधिकार आहे. हा अधिकार अबाधित ठेवण्याचे कर्तव्य सरकारचे आहे. त्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. मद्य पिऊन गाडी चालवल्याने अपघात होऊन नागरिकांचे जीव जात असतील, तर सरकारने महामार्गांवरील दारूची दुकाने बंद केली पाहिजेत. अबकारी नियमातच अशा ठिकाणी दुकाने उघडण्यास बंदी घातली पाहिजे, अशा शब्दांत न्यायालयाने फटकारले. मुळात ही गोष्ट सर्वसामान्य नागरिकांच्याही लक्षात येते. तसेच दारू पिणे मुळातच शरिरासाठी, समाजासाठी आणि व्यक्तीच्या कुटुंबासाठी अपायकारक आहे. दारूच्या व्यसनामुळे होणारी हानीची माहिती प्रत्येक व्यक्तीला असते. त्यामुळे दारूवर प्रतिबंध लावणेच अधिक योग्य आहे; मात्र त्यातून मिळणार्‍या महसुलामुळे सरकार दारूवर बंदी आणण्याऐवजी त्याला प्रोत्साहनच कसे मिळेल, याचाच प्रयत्न करत असते. त्यातूनच वाईन निर्मिती, तसेच धान्यापासून मद्यनिर्मिती अशा सारख्या योजना आखल्या जातात. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांमधूनही मद्यासाठी कच्चा माल मिळतो. अनेक राज्यांत दारू बंदी आहे; मात्र त्यावर कठोर कार्यवाही होत नसल्याने ही बंदी केवळ कागदावरच दिसून येते. तसेच अशा बंदीमुळे दारूची तस्करी होते आणि त्यातून अनेक अवैध कृत्ये केली जातात. नुकतेच बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या सरकारने दारू बंदी केली आहे. ते याची कार्यवाही कठोरपणे होईल, याकडे जातीने लक्ष देत आहे. यासाठी त्यांचे कौतुकच केले पाहिजे. असा प्रयत्न अन्यत्रच्या सरकारांनी करणे आवश्यक आहे; मात्र कोणीही तो करण्याचा विचारही बोलून दाखवत नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने जरी महामार्गावर दारूची दुकाने नसावीत, असे म्हटले असले, तरी उद्या तसा नियमही आला, तरी त्याची कार्यवाही होईल का, हाच प्रश्‍न आहे. त्यातून पुन्हा तस्करी आणि अवैध विक्री होऊ शकते. त्यातून सरकारी यंत्रणांना भ्रष्टाचाराचे आणखी एक कुरण उघड होईल. हे चक्र असेच चालू रहाणार आहे. गोहत्या बंदीच्या कायद्याचीही कार्यवाही कठोरपणे होत नसल्याचे दिसून आले आहे. तोच प्रकार याही गोष्टीत होईल. 
साधनेला पर्याय नाही !
      दारूच्या व्यसनामागे मानसिक कारणांच्या जोडीला आध्यात्मिक कारणांचाही विचार करणे आवश्यक आहे. दारूचे व्यसन असणार्‍या आणि पुढची गती न मिळाल्याने भुव लोकात अडकलेला अतृप्त लिंगदेह व्यक्तीच्या मनावर नियंत्रण मिळवून दारूची चटक पूर्ण करून घेत असतो. त्यामुळे आधुनिक औषधोपचाराने व्यसन दूर होत नाही. त्यासाठी आध्यात्मिक उपाय करणे आवश्यक ठरते. तसेच मनुष्याच्या मनाला दारू पिण्याचा विचारही शिवू नये; म्हणून त्याने साधना करणेच आवश्यक ठरते. एकदा का ईशचिंतनाचा आनंद मिळू लागला, तर अन्य रज-तम गोष्टींतून सुख मिळवण्याचा विचार मन स्वीकारत नाही. यासाठी प्रत्येकाला धर्मशिक्षण देऊन त्याच्याकडून धर्माचरण आणि साधना करून घेणे आवश्यक आहे. अनेक संप्रदायांमध्ये व्यसनमुक्ती चळवळ राबवली जाते. यातून सहस्रावधी लोक व्यसनाला सोडून साधनेला लागतात. जर सरकारी स्तरावरच सर्व यंत्रणांचा वापर करून लहानपणापासूनच मुलांवर साधनेचे संस्कार केले, तर दारूचे व्यसन लागणारच नाही. तसेच सरकारनेही दारूवर पूर्ण बंदी घातली, तर ते सहजपणे मिळणारही नाही. सध्याच्या भ्रष्ट राजकारण्यांच्या निधर्मी लोकशाहीत अशी स्थिती येणे अत्यंत कठीण आहे. त्यासाठी प्रथम हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) स्थापना करणे आवश्यक आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn