Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

धर्मसूर्य तळपू दे !

   २८ ते ३१ डिसेंबर या कालावधीत पुणे शहरानजीकच्या केसनंद या गावात होणार्‍या ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला हिंदु जनजागृती समितीसह हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि स्थानिक शिवसेना यांनी अत्यंत प्रखर विरोध चालू केला असून आता हे आंदोलन एक टप्प्यावर येऊन ठेपले आहे. येथील ग्रामस्थांच्या या विरोधातील भावनाही तीव्र होत आहेत. अमली पदार्थांचा यथेच्छ अंमल चालणार्‍या, तसेच हिंदु देवता, धर्म, संस्कृती, गानपरंपरा या सर्वांवर आघात करणार्‍या या पाश्‍चात्त्य संगीत महोत्सवास महाराष्ट्रातील अन्य हिंदुत्वनिष्ठांकडूनही आता विरोध होत आहे.
विरोध का ?
   गेली ८ वर्षे हा महोत्सव परदेशी पर्यटकांसाठी प्रसिद्ध असणार्‍या गोव्यात होत होता. गोव्यात या कार्यक्रमात महिलांवर अत्याचार करण्यास उत्तेजन देऊ शकणार्‍या ‘केटामेन’ या (‘रेप ड्रग’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या) ड्रग्जच्या ४५० बाटल्या मिळाल्या होत्या. एवढ्या एका उदाहारणावरून या ‘महोत्सव’ म्हणवल्या जाणार्‍या कार्यक्रमाच्या दुष्परिणामांचे गांभीर्य लक्षात घेतले पाहिजे. वर्ष २०१३ मध्ये गोव्यात ‘अमली पदार्थविरोधी पथका’ला या कार्यक्रमात शेकडोजण सार्वजनिकरित्या हुक्का आणि चिलीम पित असतांना आणि अनेकजण तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यात आलेल्या प्रसाधनगृहात अमली पदार्थांचे सेवन करत असतांना पहायला मिळाले. नेहा बहुगुणा हिचा मृत्यू या कार्यक्रमातील अमली पदार्थांच्या अतिसेवनाने झाला. अमली पदार्थांचा दलाल सौरभ अगरवाल याला चरससहित अटक करण्यात आली होती. गोवा शासनाचा ३ कोटी रुपयांचा महसूल या कार्यक्रमाच्या आयोजकांनी बुडवला. या पार्श्‍वभूमीकडे पुण्यात या कार्यक्रमाला अनुमती देतांना अधिकार्‍यांनी सोयिस्करपणे दुर्लक्ष केले आहे. वरील अनेक कारणामुळे गोव्यातून त्या कार्यक्रमाला अनुमती नाकारल्याने पुण्यातील बहुभाषिक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील युवकांची बहुसंख्या लक्षात घेऊन आयोजकांनी पुणे निवडले, हे वेगळे सांगायला नकोच. संकेतस्थळावरील ध्वनी-चित्रीफितींतून या कार्यक्रमात दिसणार्‍या युवक-युवतींच्या अर्धनग्न वेशभूषेवरून कार्यक्रमातील अश्‍लीलतेच्या परमावधीची कल्पना येते. नववर्ष स्वागताच्या नावाखाली हिंदूंच्या युवा पिढीला अधोगतीच्या खाईत ढकलायला निघालेल्या या कार्यक्रमाचे आर्थिक, नैसर्गिक, सामाजिक, राष्ट्रीय, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक दुष्परिणाम मोठे आहेत. गतवर्षी गोव्यातील या कार्यक्रमात नटराजाच्या मूर्तीसमोर अर्धनग्न कपड्यांमध्ये कर्णकर्कश संगीताचा हा अश्‍लाघ्य धिंगाणा चालू होता. भारतीय संस्कृतीत ईश्‍वरप्राप्तीसाठी संगीत आणि नृत्य या कला उदयाला आल्या आहेत. या दोहोंची देवता असणार्‍या साक्षात् शिवाच्या समोरच या कलांची अशी घोर विटंबना करण्यात आली. धर्म विसरलेल्या सध्याच्या लोकप्रतिनिधींना हे लक्षातही येणार नाही; पण संस्कृतीरक्षणासाठी कार्यकरत असलेले हिंदुत्वनिष्ठ देवता आणि संस्कृती यांची अशी विटंबना उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाहीत. केसनंद हे स्थळ पुण्यातील संरक्षण खात्याच्या विमानतळाच्या जवळ आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही या कार्यक्रमाला होणारी सहस्रो परदेशी पर्यटक आणि हातात पैसा खेळणारे भारतीय युवक यांची गर्दी धोकादायक आहे. हे कार्यक्रमस्थळ छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळ असणार्‍या वढु या गावापासून ८ कि.मी. अंतरावर, ज्ञानेश्‍वरांच्या समाधीच्या २५ कि.मी.वर, थेऊरच्या अष्टविनायक गणपतीपासून ७ कि.मी.वर, अष्टविनायकांपैकी एक असलेल्या रांजणगावापासून ३० कि.मी.वर, श्री बोलाई देवीच्या स्थानापासून ३ कि.मी.वर आणि ग्रामदेवता श्री जोगेश्‍वरीदेवी मंदिरापासून अवघ्या १०० फूट अंतरावर आहे. पुण्यपावन भूमीत असा विकृत आणि अश्‍लाघ्य कार्यक्रम होणे, हे भाविक आणि धर्मप्रेमी यांच्या जिव्हारी लागले आहे. या कार्यक्रमासाठी सध्या वृक्षतोड करून रस्ते बांधले आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या कार्यक्रमासाठी वनखाते, तहसील कार्यालय यांची अनुमती घेतली नसल्याचे प्राथमिक पाहणीत समोर येत आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी या कार्यक्रमाच्या विरोधात शिवाजीनगर न्यायालयात दिवाणी आणि फौजदारी दावे प्रविष्ट केले आहेत. ‘सनबर्न’मुळे युवा पिढी भिकेला लागेल’, असे या प्रकरणी न्यायालयीन लढा लढणार्‍या अधिवक्ता वाजिद खान यांनी म्हटले आहे. या कार्यक्रमाचे सर्वांत महागडे तिकीट ८८ सहस्र ४८८ रुपयांचे, तर सर्वांत स्वस्त तिकीट ७ सहस्र ७५० रुपयांचे आहे. यावरून कार्यक्रमाचा किती महसूल मिळेल आणि यात किती परदेशींना काम मिळेल, याचा अंदाज येईल. यासाठी याची अनुमती रहित करण्याकडे दुर्लक्ष होत आहे, असे सर्वांना वाटते. अन्यथा अशा कार्यक्रमांचे आयोजन भारताला कुठल्याच अंगाने विकासाकडे घेऊन जाणार नाही, हे कुणीही सांगेल.
    हिंदुत्वनिष्ठांनी या कार्यक्रमाला करत असलेल्या तीव्र विरोधामुळे पुरोगामी कदाचित् नेहमीप्रमाणे त्यांंना ‘‘तुम्ही संस्कृतीरक्षणाचा ठेका घेतला आहे का ?’’ असा प्रश्‍न खवचटपणे विचारतील. अशांना प्रत्येक हिंदुत्वनिष्ठाने ठणकावून सांगितले पाहिजे, ‘‘हो, हिंदुसंस्कृती रक्षणामुळेच तुमचेही रक्षण होणार आहे आणि आम्ही हिंदु धर्मरक्षणाचे महत्त्व जाणत असल्याने आम्ही तो ठेका घेतला आहे.’’ मांगल्याचे उत्सव साजरे करणार्‍या भारतीय संस्कृतीला गालबोट लावणारा हा महोत्सव रहित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांपासून मंत्री, आमदार, खासदार आदींना विनंती करण्यात आली आहे आणि त्यांपैकी प्रत्येकानेच याची चौकशी करण्याचे आश्‍वासन दिले आहे. हिंदुत्वनिष्ठ शिवसेनेच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी या महोत्सवाच्या विरोधात धडाडीची भूमिका घेऊन हिंदुत्वनिष्ठांना हवे ते साहाय्य करण्याचा निर्णय घेतला आहे. युवा जागरण आणि संस्कृती जागरण अभियान राबवणार्‍या हिंदु जनजागृती समितीने धर्मरक्षणाच्या ज्या मोहिमा आतापर्यंत हातात घेतल्या, त्यात यश प्राप्त केले आहे. हेही धर्म आणि राष्ट्र कार्य ती कर्तव्यभावनेने पार पाडेल !
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn