Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

काळे पैसेवाल्यांकडून देशांतर्गत लुटमार !

     पैसा बड्या असामींचा, मी केवळ प्यादा, असे केंद्र सरकारच्या उत्पन्न प्रकटीकरण योजनेच्या अंतर्गत १३ सहस्र ८६० कोटी रुपयांची रक्कम घोषित करणारे बांधकाम व्यावसायिक महेश शहा यांचे म्हणणे आहे. मोजक्याच आयकर अधिकार्‍यांच्या चमूसमोर नावे सांगण्याची त्याने तयारी दर्शवली आहे. दुसर्‍या प्रकरणात मुंबईतील एका कुटुंबाने घोषित केलेल्या दोन लाख कोटी रुपयांच्या बेहिशोबी उत्पन्नाचे विवरणपत्र संशयास्पद ठरवून प्राप्तीकर विभागाने ते फेटाळल्याने काळ्या पैशाचे हे बेनामी घबाड आहे तरी कोणाचे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. नोटाबंदीमुळे देशाच्या चलनातून १६-१७ लाख कोटी रुपये बाद झाले आणि या ठिकाणी तर देशाच्या आर्थिक राजधानीतून एक कुटुंब २ लाख कोटींची संपत्ती जाहीर करते. अशा लुटारूंनीच देशाला रसातळाला नेले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेवरच यांनी किती मोठा डल्ला मारला आहे, हे लक्षात येते. स्वतंत्र अर्थव्यवस्था चालवली जाऊ शकते इतकी संपत्ती असणार्‍या त्या कुटुंबाची कसून चौकशी होत त्यांना कडक शासन करायलाच पाहिजे. शासनाने सदर योजना काढली नसती, तर ती संपत्ती लुटारूंकडेच राहिली असती. काळ्या पैशास अटकाव करण्याची आवश्यकता सतावत असल्याने त्याचे उच्चाटन कसे करायचे, हा प्रामुख्याने शासनाचा विषय आहे. त्यांनीच यावर उपाय शोधणे अपरिहार्य होते. त्यामुळेच काळा पैसा पांढरा करण्यासाठी कर, दंड आकारून लुटारूंनाही संधी देण्यात आली आहे. त्यांच्याकडील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी त्यांना योजनेच्या माध्यमातून प्रवृत्त करण्यात आले आहे.
    शासकीय तिजोरीत फक्त नियमित करदात्यांचाच कर जमा होत असतो आणि करचुकवे त्यास बगल देत असल्याने तिजोरीत खडखडाट झाला आहे. देशामध्ये ४ प्रतिशत जनताच कर भरते. त्यामुळे हा आकडा वाढण्यासाठी काय करता येईल, यासाठी शासनाला कंबर कसावीच लागणार आहे. करदात्यांत वाढ झाल्यावर महागाईस लगाम बसेल शिवाय वर्षानुवर्षे निधीअभावी रखडलेली विकासकामे मार्गी लागून जनतेची तारेवरची कसरत कमी होईल. 
     प्रदूषणामुळे माणसाची, तर काळ्या पैशाच्या धुराने देशाच्या अर्थव्यवस्थेची घुसमट होत आहे आणि त्याचा नाहक फटका नोटाबंदीच्या माध्यामातून सामान्य जनता आजमितीस सोसत आहे. त्या बड्या असामींची नावे प्राप्तीकर विभाग, शासन यांच्याकडून जाहीर होण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे ती बडी धेंडे सुरक्षित रहातील. परिणामी त्यांच्या अब्रूचे धिंडवडे उडण्यापासून रक्षणच होईल. ती नावे जाहीर करावी, अशी जनतेची इच्छा आहे; कारण आपल्यासमोर खोटे मुखवटे लावून कोण फिरत आहे, हे तात्काळ सर्वांना समजले पाहिजे. पैशांची लुट करतांना लाज वाटली नाही, तर आता अमूक यांनी ती लुट केली, असे जाहीर केल्यावर सामोरे जाव्या लागणार्‍या परिणामांची चिंता का वाटावी ? चलन तुटवड्यामुळे जनता संतप्त आहे, जनतेचा तो राग त्या धेंडांवर ज्वालामुखी होऊन बरसण्याच्या विचारानेच त्यांच्या पोटात गोळा येत असेल. गुप्तता कशा संदर्भात पाळायला पाहिजे, याचा केंद्राने विचार करायला पाहिजे. काळे धंदे करून माया जमवणार्‍यांचे पितळ उघडे पाडायला हवे.
- श्री. जयेश राणे, भांडुप, मुंबई.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn