Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

निधर्मी लोकशाहीतील नीतीहीन लोकप्रतिनिधी !

      लोकांनी, लोकांसाठी आणि लोकांचे असलेले ‘भारत’ हे स्वतंत्र लोकशाही राष्ट्र ! वरपांगी अतिशय आदर्श वाटणारी ही लोकशाही आज स्वातंत्र्याच्या ६९ वर्षांनंतरही लोकांच्या समस्या सोडवू शकलेली नाही, हे प्रतिदिन वर्तमानपत्रांमध्ये येणार्‍या घडामोडींवरून लक्षात येतच आहे. सध्याच्या लोकशाहीत सर्वसाधारणपणे प्रसिद्धी मिळवून मतपेढी वाढवण्याकडेच लोकप्रतिनिधींचा कल असतो. लोकप्रतिनिधींनी लोकप्रिय असले पाहिजे; परंतु त्यासाठी त्यांनी किमान काही नीतीमूल्यांचा अवलंब करायला हवा.
      भारतातील कोट्यवधी जनतेमध्ये अनेक प्रकारच्या चांगल्या-वाईट मनोवृत्ती आढळून येतात. त्यातील चांगल्या मनोवृत्तींना चालना मिळावी आणि समाजाच्या नाशाला कारणीभूत ठरणार्‍या मनोवृत्तींना अटकाव करायला हवा. उदाहरणच घ्यायचे झाले तर, सिगारेट, मद्य, मटका यांच्या सेवनाने जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या समस्या उघड्या डोळ्यांना दिसत असतांनाही काही लोकप्रतिनिधी मात्र याच वाईट गोष्टींना कायद्याची मान्यता असावी, अशी मागणी करतात. काही दिवसांपूर्वी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी ‘ऑनलाईन’ मटका आणि हातभट्ट्या ‘महालॉटरी’च्या नावाने चालू ठेवल्या जाव्यात’, असे म्हटले. ‘हे धंदे कायदेशीर केले, तर सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळेल’, असेही त्यांनी सांगितले. या प्रातिनिधिक उदाहरणातून एका विशिष्ट वर्गाला खुश करून त्यांची मते मिळवण्यासाठी धडपडणारे देशाला प्रगती पथावर नेऊ शकतील का, असा प्रश्‍न पडतो. असे राज्यकर्ते भारतात बहुसंख्येने निवडून येणे, हा ‘मेकॉले’प्रणीत शिक्षण पद्धतीचा दृश्य परिणाम आहे. ‘समाजासाठी वाईट असणार्‍या आणि समाजाच्या सर्वनाशास कारणीभूत असलेल्या गोेष्टी वैध करणे, त्यासाठी खुलेआम तशी मागणी करून प्रसिद्धी मिळवणे, एवढाच काय तो हेतू ! अशा गोष्टी समाजासाठी घातक आहेत, ते सुज्ञ नागरिकांना कळते; पण ते लोकप्रतिनिधींना कळत नाही, अशी परिस्थिती आहे.
      निवडणूक कोणतीही असो, लोकप्रतिनिधी महिला अथवा पुरुष असो, मद्याच्या मेजवान्यांशिवाय मतदारांना खुश ठेवण्याचा दुसरा कुठलाही पर्याय सध्याच्या काळात उपलब्ध नाही. समाजातील काही मंडळींना हे सर्व उमजूनही ते याकडे दुर्लक्ष करतात. कारण विरोधात बोलले, तर शासनाकडून मिळणारे लाभ पदरी कसे पडणार ? समाजाची ही स्थिती बघून महाभारतातील भीष्म, द्रोणाचार्य आणि कर्ण यांची आठवण होते. ‘राष्ट्र आणि धर्म यांना हानी पोचत असेल, तर धर्मरक्षणाकरता वैयक्तिक निष्ठा किंवा प्रतिज्ञा यांना मुळीच महत्त्व देऊ नका’, असे भगवान श्रीकृष्णाने पांडवांना उद्देशून सांगितले होते. त्यामुळेच पांडव शेवटपर्यंत धर्माच्या बाजूने राहू शकले आणि त्यांनी युद्ध जिंकले, तर भीष्म, द्रोणाचार्य अन् कर्ण हे युद्ध हरले.
      तशाच प्रकारे देशातील प्रत्येक घटकाने त्याची निष्ठा, पद, पक्ष आणि राज्य यांच्या पुरते सीमित न रहाता राष्ट्र आणि धर्म यांप्रती दक्ष असणे अधिक महत्त्वाचे आहे. म्हणूनच भारतियांनी स्वप्रतिष्ठेच्या सीमा लांघून देशसेवेसाठी तत्पर रहाण्याचा संकल्प करायला हवा. 
- सौ. कीर्ती निपाणीकर, पुणे
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn