Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पूर्णवेळ साधक झाल्यानंतर मनातील संघर्ष जाणून घेऊन साधकाला प्रेम देऊन आश्रमजीवनात रुळण्यास साहाय्य करणारे पू. भाऊकाका (सदाशिव) परब !

पू. भाऊकाका
(सदाशिव) परब
श्री. विलास महाडिक
१. आश्रमात पूर्णवेळ साधनेला आरंभ केल्यानंतर कल्पनेने घरातील अडचणींचे डोंगर उभे करून मायेच्या ओढीने स्वतःला मागे खेचणे
     ‘मी जानेवारी २०१६ मध्ये पूर्णवेळ साधना करण्याच्या निश्‍चयाने देवद आश्रमात सेवेत रुजू झालो. प्रतिदिन ८ ते १० घंटे सेवा होत होती; परंतु मन रमत नव्हते. केवळ कार्य होत होते. मी माझ्या कल्पनेने घरातील अडचणींचे डोंगर उभे करून मायेच्या ओढीने स्वतःला मागे खेचत होतो. आश्रमातील वातावरण एवढे सुंदर असूनही, सर्व सुखसोयी मिळत असूनही आणि सर्व साधकांकडून प्रेम मिळत असूनही ‘येथे मन का रमत नाही ?’, याचे मला आश्‍चर्य वाटायचे आणि दुःखही व्हायचे. कर्मधर्मसंयोगाने किंवा माझ्या पूर्वसुकृतामुळे म्हणा मला पू. भाऊ परब यांच्यासमवेत सेवा मिळाली.
२. पू. भाऊ परब यांनी मनातले ओळखून त्यासंदर्भात बोलून
साधकाला धीर दिल्याने त्याच्या मनातील नकारात्मक विचार न्यून होणे
     पू. भाऊकाका सेवा करतांना अनौपचारिकही बोलायचे. घरच्यांविषयी चौकशी करायचे. त्यांनी माझ्या मनातील विचार ओळखले असावे. ते एकदा म्हणाले, ‘‘माया त्यागून आश्रमात राहायला आलास, हे छान आहे; परंतु लक्षात ठेव, प.पू. गुरुदेवांच्या कृपेने तू येथे आला आहे. काळजी करू नकोस. त्यांच्याच कृपेने आता सेवा आणि साधना होईल. केवळ त्यांना शरण जा. तुझ्या कुटुंबाचीही तेच काळजी घेतील.’’ त्यांच्या या शब्दांनी मला पुष्कळ धीर मिळाला आणि माझ्या मनातील नकारात्मक विचार न्यून झाले.
३. पू. काकांचे नामासहित सेवा करण्याकडे लक्ष असणे
     पू. भाऊकाकांचा सेवेचा उरक पुष्कळ दांडगा आहे. एक सेवा संपायच्या आधीच दुसर्‍या सेवेची ते सिद्धता करायला सांगायचे. मला वाटायचे, ‘थोडा वेळ थांबूया.’ त्यांना माझ्या मनातले कसे कळायचे ठाऊक नाही. ते विचारायचे, ‘‘थकलास काय ?’’ मी ‘‘नाही’’ म्हणायचो. तेव्हा ते सांगायचे, ‘‘देह प्रारब्धावर सोडा, चित्त चैतन्याशी जोडा. मग सेवा कशी होते, ते बघा. तुला थकवा येणार नाही. देवच येऊन सेवा करील.’’ नामासहित सेवा करण्याकडे त्यांचा कटाक्ष असायचा.
४. नामजप थांबल्यावर ते ओळखून त्याची आठवण
करून देणे आणि नामासहित सेवेचे महत्त्व पटवून देणे
    ‘माझा नामजप थांबला आहे’, हे त्यांच्या कसे लक्षात येते, हे मला कळायचे नाही. नेमक्या त्याच क्षणी ते विचारायचे, ‘‘काका, नामजप चालू आहे का ?’’ ते म्हणायचे, ‘‘नामच सर्व करणार आहे. ‘रामनाम’ लिहिलेले दगडही तरले; मग आपण का तरून जाणार नाही ?’’ कधी कधी सेवा करतांना वैखरीतून नामजप करायला सांगत आणि स्वतःही करत. मग थांबून सेवेचा आढावा घ्यायचे आणि दाखवायचे, ‘‘बघ, या वेळेत किती बिनचूक आणि परिपूर्ण सेवा झाली आहे.’’ मला आश्‍चर्याचा धक्का बसायचा, ‘इतर वेळी सेवा करतांना काहीतरी चूक करणारा मी एवढ्या जलद आणि बिनचूक सेवा माझ्याकडून कशी झाली ?’ त्यांच्यामुळे माझा नामजपही आतून होऊ लागला. संतांच्या संकल्पाच्या परिणामाची अनुभूती मला घेता आली.
५. पू. काकांनी भावपूर्ण प्रार्थना केल्याने सहसाधकांच्या उत्साहात वाढ होणे
     पू. काका सेवेला आल्यावर त्यांच्यासमवेत चैतन्य आल्याचे जाणवायचे. सेवेला आरंभ करण्यापूर्वी आम्हा सर्व साधकांना जवळ बोलावून प्रार्थना करत असत. त्यांची प्रार्थना इतकी भावपूर्ण होते की, आम्हाला उत्साह येतो. सेवेसाठी लागणारे सर्व साहित्य सर्व जवळ घेतले का ?, असे ते विचारायचे.
६. पू. काकांच्या प्रत्येक कृतीतून दिसेल ते कर्तव्य शिकायला
मिळणे आणि त्यांचे सेवा करतांना फलनिष्पत्तीकडे लक्ष असणे
    ते सेवेसाठी बाहेरून आलेल्या साधकांची विचारपूस करायचे. त्यांना प्रत्येक सेवा कशी करायची आहे, हे समजावून सांगायचे. स्वतः ती करून घ्यायचे. ग्रंथांची पडताळणी करतांना प्रत्येक गठ्ठा उघडून पहायचे. गृहीत धरणे, चालढकलपणा, आळस इत्यादी काहीतरी चुका आमच्याकडून व्हायच्या; पण त्याकडे ते जातीने लक्ष द्यायचे. सर्व नोंदी त्यांच्या वहीतही ठेवायचे. सेवा थांबली की, स्वतःहून आढावा घ्यायचे आणि आवराआवर करायला साहाय्य करायचे. ‘दिसेल ते कर्तव्य’ म्हणजे काय, हे त्यांच्या प्रत्येक कृतीतून शिकायला मिळते. स्वतः उठून पंखा लावणे, दारे-खिडक्या उघडणे, सायंकाळच्या वेळेला डास येऊ नयेत; म्हणून त्या वेळेत बंद करणे, कुणी खोकी उचलायला नसेल, तर स्वतः उचलून आणणे, असे ते करतात. त्यांचे सेवा करतांना फलनिष्पत्तीकडे लक्ष असते. त्यांना सेवा करतांना वेळेचा अपव्यय अजिबात चालत नसे. ते एक सेवा संपण्यापूर्वीच सेवेसाठी दुसरा खोका आणायला सांगत.
     माझ्यासारख्या अनेक दोष आणि अहं यांनी युक्त असलेल्या जिवाला या पवित्र स्थळी आसरा दिल्यामुळे मी सर्व साधक बंधू-भगिनी, संतमंडळी, प.पू. पांडे महाराज, प.पू. डॉक्टर आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करत आहे.’
- श्री. विलास महाडिक, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (४.६.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn