Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. शालिनी मराठे यांना स्थुलाकडून सूक्ष्माकडे आणि द्वैताकडून अद्वैताकडे होत असलेल्या प्रवासाविषयी आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...

सौ. शालिनी मराठे
१. परात्पर गुरु डॉ. आठवले ‘माझ्यात अडकू नका, तर कृष्णाकडे जा’
असे सांगत असूनही साधकांना त्यांच्या सगुण भेटीची ओढ वाटणे 
    ‘परात्पर गुरु डॉ. आठवले (प.पू. गुरुदेव) रुग्णाईत असल्यामुळे ते सतत खोलीत असतात. त्यांना फार थकवा असल्यामुळे भिंतीला धरून चालावे लागते. वैद्यांच्या सांगण्याप्रमाणे ते प्रतिदिन ३० ते ३५ वेळा औषध घेत असतात. एवढे असूनही ‘त्यांच्याकडे पाहिल्यावर ते रुग्णाईत आहेत’, असे वाटतच नाही. ते एवढे तेजःपुंज आणि आनंदी दिसतात की, सर्व जीव त्यांच्याकडे आकर्षिले जातात. साधकांना त्यांच्या सान्निध्यात निर्विचार स्थिती, आनंद जाणवणे, तसेच अन्य विविध अनुभूती येतात; मात्र प.पू. गुरुदेव कुणालाच त्यांच्या स्थूल देहात अडकू देत नाहीत. ते सर्वांना ‘माझ्यात अडकू नका, तर कृष्णाकडे जा’ असेच सांगत असतात. असे असले, तरी साधकांना प.पू. गुरुदेवांच्या सगुण भेटीची ओढ असतेच ना ? 
२. प.पू. गुरुदेवांना स्थुलातून भेटण्याची ओढ लागणे आणि कधीतरी ते दिसल्यावर अतिशय आनंद होणे 
   आम्ही पूर्णवेळ साधना करण्यासाठी आश्रमात रहायला आल्यावर मला प.पू. गुरुदेवांना भेटायची पुष्कळ ओढ असायची. सासरहून माहेरी आलेल्या लेकीला ‘आई-बाबा कधी भेटतील’, असे होते ना, अगदी तसेच मला व्हायचे; पण हे मी कुणालाच सांगायची नाही. त्या वेळी एक-दोन साधक त्यांच्या समवेत संगणकासंबंधी सेवा करत असल्यामुळे त्यांना प.पू. गुरुदेव प्रतिदिनच भेटायचे. लहान मुले पटकन प.पू. गुरुदेवांंच्या खोलीत जाऊन त्यांना पाहून येत. मला वाटायचे, ‘प.पू. गुरुदेव सर्वांना सहज भेटतात. माझीच भेट होत नाही. मी श्री. प्रकाश मराठे यांना (यजमानांना) म्हणायची, ‘तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला प.पू. गुरुदेवांना भेटायला मिळते, बोलायला मिळते.’ मलाही वाटायचे, ‘त्यांना भेटायला जावे; पण त्यांना विनाकारण भेटायला जायचे तरी कसे ? तसेच मी त्यांच्याशी बोलणार तरी काय ? आपली साधना नाही; म्हणून आपल्याला देव भेटत नाही.’ त्या वेळी देवालाच दया यायची आणि मग तुळशीला ते पाणी घालतांना किंवा सूर्याला नमस्कार करतांना दिसायचे. तेव्हा मी त्यांना मन भरून पहात असे आणि मला किती आनंद व्हायचा म्हणून सांगू ! 
३. प.पू. गुरुदेवांना छायाचित्राद्वारे भेटल्यावर प्रत्यक्षभेटीचा आनंद मिळणे 
   मग देवाने सोपा उपाय सुचवला. प.पू. गुरुदेवांचे छायाचित्र, तर आपण केव्हाही पाहू शकतो. प्रार्थना करून त्यांच्याकडे पाहिल्यावर मला वाटायचे, ‘ते माझ्याकडे पाहून स्मितहास्य करत आहेत. माझ्याकडे त्यांचे लक्ष आहे. ते माझी चूक लक्षात आणून देत आहेत. ते माझी प्रत्येक कृती पहात आहेत. मी सर्वांना फसवू शकेन; पण त्यांना फसवू शकणार नाही; कारण माझी प्रत्येक गोष्ट चांगली असो कि वाईट, ते सर्व मर्मस्थळे जाणतात.’ तसेच त्यांचे छायाचित्र पाहिल्यावर मला ते प्रत्यक्ष भेटल्यासारखा आनंद मिळायचा. 
४. सूक्ष्मातील प.पू. गुरुदेवांनी ‘अरेच्चाऽ ! तुम्ही सेवा करता, तेथे
मी दिसलो नाही का तुम्हाला ?’ असे विचारल्यावर साधिकेने
‘सेवेमध्येच देव पहायचा’, असे ठरवणे 
    जून २००८ मध्ये एकदा मी ध्यानमंदिरात नामजप करत बसले असतांना मला पुढील दृश्य दिसले, ‘प.पू. गुरुदेवांच्या दर्शनाला भली मोठी न संपणारी रांग (तिरुपति बालाजीच्या दर्शनासाठी असते तशी) लागली आहे. मीही त्या रांगेत आहे. एवढ्यात प.पू. गुरुदेवांनी आपल्या खोलीचे दार उघडले आणि हसत म्हणाले, ‘अरेच्चाऽ ! मला पहायला जमलात का तुम्ही ! तुम्ही सेवा करता, तेथे मी दिसलो नाही का तुम्हाला ?’ त्या वेळेपासून ‘सेवेमध्येेेच देव पहायचा’ आणि ‘स्थुलापेक्षा सूक्ष्मातून भेटायचे’, असे ठरवले.
५. प.पू. गुरुदेवांची आठवण किंवा स्मरण, म्हणजेच
सूक्ष्मातून भेटणे आणि ते नित्य आनंददायी असणे 
   प.पू. गुरुदेवांना भेटलेली प्रत्येक व्यक्ती त्यांची काही ना काहीतरी आठवण सांगायची. तेव्हा मला ‘प्रत्येक जण सांगतो, ते माझ्यासाठीच आहे. ते इतरांना भेटले, तरी ते मलाच भेटले. ते कुणाशीही बोलले, तरी माझ्याशीच बोलले’, असे वाटायला लागले. ‘दैनिक सनातन प्रभात’मधील अनुभूती वाचतांना, गोपींचे बोलणे ऐकतांना, 
‘प.पू डॉक्टर’ हे केवळ नाव निघाले, तरी त्यांना भेटल्याचा आनंद होऊ लागला. अशा प्रकारे प.पू. गुरुदेवांची कृपा झाली. ते मला सतत सूक्ष्मातून भेटून आनंद देऊ लागले !
६. सर्वांमध्ये प.पू. गुरुदेव दिसून ‘ते परमतत्त्व आहेत’, याविषयी अनुभूती येणे 
   पुढे समष्टीत त्यांचेच दर्शन होऊ लागले. ‘सर्वांमध्ये, सर्वस्थळी, सर्वकाळी तेच आहेत’, असे दिसायचे. सर्व नामे-रूपे ही त्यांचीच आहेत. प्रत्येकात त्यांचाच अंश आहे. बाह्यांगाने काही चांगली, काही वाईट, काही पे्रमळ, काही धूर्त अशी माणसे दिसली, तरी ती त्यांच्यातील ‘अहं’मुळे दिसतात; मात्र सर्वांच्या अंतर्यामीचे आत्मतत्त्व तेच आहेत. विश्‍वचालक जगन्नियंता तेच आहेत आणि विश्‍वही तेच आहेत. ‘सूर्याचे सहस्रो किरण असतात, त्याप्रमाणे आत्मज्योतीची अनंत कोटी प्रतिबिंबे आहेत’, असा विचार माझ्या मनात आला. प.पू. गुरुदेवांचे विश्‍वरूप दर्शन झाले आणि ‘मी आनंदाच्या सागरातला आनंदाचा एक थेंब आहे’, असे वाटू लागले. मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. जिकडे पहावे तिकडे प.पू. गुरुदेवच होते. त्या वेळी ‘क्षणभर आलेली ही अनुभूती आपल्याला निरंतर येऊ लागली, तर आपण मोक्षालाच पोचू’, असा विचार मनात आला. 
७. विश्‍वव्यापी चैतन्यमय ब्रह्मकमळ दिसून स्वतः त्यातील एक पाकळी असल्याविषयी अनुभूती येणे 
   वर्ष २०११ मध्ये एकदा ध्यानमंदिरात नामजप करतांना मला जाणीव झाली, ‘माझे काहीच नाही; जे काही आहे, ते प.पू. गुरुदेवांचेच आहे.’ नंतर मला अनंत कोटी पाकळ्या असलेले विश्‍वव्यापी चैतन्यमय ब्रह्मकमळ दिसले आणि ‘मी त्यातील एक पाकळी आहे’, असे मला सूक्ष्मातून जाणवले. 
८. त्या वेळी ‘सारेकाही ते परमतत्त्वच आहे आणि गुरुदेवांमुळेच स्वतःचे अस्तित्व आहे’, असे जाणवल्यावर ‘मीच मला कसे भेटायचे ?’, असा विचार मनात येऊन प.पू. गुरुदेवांना भेटण्याविषयी मनाची रुखरुख शमणे 
    वरील अनुभूती आल्यावर मला जाणवले की, ‘मी’ हा भ्रम किंवा माया आहे. ‘मी’ हा खोटा अहंंभाव नष्ट झाला की, ‘मी - आम्ही, तू - तुम्ही’ असे काहीच नाही. सारेकाही ते परमतत्त्वच आहे. मला देह त्यांनीच दिला आहे, माझा देह तेच चालवतात, तसेच माझ्या देहाकडून होणारी प्रत्येक कृती, मनातील विचार आणि भावना तेच आहेत. आत्मज्योतीरूपाने तर ते सतत माझ्यासमवेत असतात. गुरुदेव आहेत म्हणून मी किंवा माझे अस्तित्व आहे. मग मीच मला कसे भेटायचे ?’ अशा प्रकारे त्या वेळी प.पू. गुरुदेवांना भेटण्याविषयीची माझ्या मनाला लागलेली रुखरुख शमली.
९. देवाच्या कृपेचे वर्णन करणे सर्वथा कठीण असल्याचे लक्षात येणे
आणि क्षणभर ‘सगुण-निर्गुण एक गोविन्दु रे’ याची
अनुभूती दिल्याने त्याच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होणे
   देवा, भेटीचा आनंद देण्यासाठी द्वैत निर्माण करतोस, ओढ लावतोस आणि अद्वैतात नेऊन तृप्त करतोस. आनंदाचा वर्षाव करतोस. तुझी कृपा अगाध आहे. तुझ्या या कृपेचे वर्णन विधाताही करू शकत नाही, तेथे इतरांची काय कथा ! 
श्रीगुरुदेवा, माझ्यातील अहंभाव दूर करून चिरंतन आनंदप्राप्तीसाठी तू मला घडवत आहेस. त्यासाठी क्षणभर ‘सगुण-निर्गुण एक गोविन्दु रे’ याची अनुभूती दिलीस, यासाठी कृतज्ञता ! ‘आता तुझ्या इच्छेप्रमाणे मला घडता येऊ दे आणि निरंतर आनंदप्राप्ती होऊ दे’ अशी तुमच्या चरणी प्रार्थना !’
गुरुचरणी शरणागत,
- सौ. शालिनी मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.१०.२०१६) 
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn