Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सतत आनंदी आणि शारीरिक त्रासांवर मात करून भावपूर्णरित्या संतसेवा करणार्‍या सनातनच्या ज्योतिष फलित विशारद सौ. प्राजक्ता जोशी !

सौ. प्राजक्ता जोशी
     ‘सनातनचे संत पू. सौरभ जोशी यांच्या मातोश्री सौ. प्राजक्ता जोशी यांचा मार्गशीर्ष कृष्ण पक्ष अष्टमी, म्हणजेच २१.१२.२०१६ या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने रामनाथी आश्रमातील साधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.
सौ. प्राजक्ता जोशी यांना सनातन
परिवाराच्या वतीने वाढदिवसानिमित्त नमस्कार !
१. कु. स्नेहल स्वामी
      ‘नोव्हेंबर २०१६ मध्ये मी सौ. प्राजक्ता जोशीकाकू यांच्याकडे गेले होते. त्या वेळी त्यांची पुढील वैशिष्ट्ये लक्षात आली.
१ अ. काकू सतत सकारात्मक आणि हसतमुख असतात.
१ आ. प्रेमळ : त्या साधकांशी मनमोकळेपणाने बोलतात. त्या प्रत्येक साधकाला आपलेसे करून घेतात. त्या मला पुष्कळ प्रेमाने आणि स्वतःच्या मुलीप्रमाणे समजून घेतात. १ इ. रुग्णाईत असतांनाही सेवा करण्याची तळमळ : काकूंच्या संपूर्ण अंगाला सूज येते. त्यांना थकवाही असतो. त्या रुग्णाईत असतांनाही सेवा करतात. सेवा झाली नाही, तर त्यांना पुष्कळ दुःख होते.
१ ई. भाव : ‘प्रत्येक सेवा देवासाठी करत आहे’, असा त्यांचा भाव असतो. साधकांशी बोलतांना ‘त्यांच्यातील देवाशी बोलत आहे’, असा भाव ठेवतात. काकूंची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती पुष्कळ श्रद्धा आणि भाव आहे.’
२. सौ. अवंतिका दिघे
२ अ. सतत सेवेत व्यस्त असणे : ‘सौ. प्राजक्ताताई सतत सेवेत व्यस्त असतात. कधीही पू. सौरभदादांच्या दर्शनाला गेल्यावर ताई पू. दादांची सेवा करत असतात किंवा ज्योतिषशास्त्राशी संबंधित अभ्यास करून त्याचे टंकलेखन करत असतात.
२ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अपेक्षित असे करण्यासाठी झटणे : अनेकदा आश्रमात घडत असलेल्या घटनांबद्दल पू. सौरभदादांचे बोलणे, त्यांनी केलेले हावभाव इत्यादी जसेच्या तसे आणि त्या त्या वेळी लिहून संकलनासाठी पाठवतात. त्या पू. दादांचे बोल एखाद्या शिष्याप्रमाणे पाळतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अपेक्षित असे करण्यासाठी त्या झटत असतात.’
३. सौ. अरुणा तावडे, श्री. अजित तावडे आणि श्री. रूपेश रेडकर
३ अ. शारीरिक त्रासांवर मात करून आनंदी रहाणे : ‘काकूंना कितीही शारीरिक त्रास होत असला, तर तो त्या सहन करतात आणि आनंदी रहातात. त्यांची सहनशक्ती पाहून मलाही माझ्या त्रासांवर मात करायला उभारी मिळते.’ - सौ. अरुणा तावडे
३ आ. स्वतःहून इतरांना साहाय्य करणे : ‘जेव्हा काकूंना ‘कोणालातरी साहाय्य हवे आहे’, हे लक्षात येते, तेव्हा त्या स्वतःची सोय-गैरसोय न पहाता स्वतःहून साहाय्य करतात. त्यामुळे त्यांचा आधार वाटतो.’ - सौ. अरुणा तावडे, सौ. अवंतिका दिघे आणि श्री. रूपेश रेडकर
३ इ. प्रत्येक प्रसंगात देवावर दृढ श्रद्धा ठेवणे : ‘मला एका प्रसंगात दृष्टीकोन देतांना त्यांनी सांगितले होते, ‘‘आलेला प्रत्येक कठीण प्रसंग देवानेच निर्माण केला आहे आणि तो सोडवायलाही तोच सामर्थ्य देतो. असे असतांना आपण प्रसंगांना कशाला घाबरायचे ? कर्ता-करविता भगवंत आहे आणि तोच सर्व प्रसंगांतून तारणारा आहे. त्याच्यावर श्रद्धा ठेवून आपण सर्व करायचे.’’ - सौ. अरुणा तावडे
३ ई. पू. सौरभदादांची सेवा स्वतःचा पुत्र म्हणून नाही, तर संतसेवेचा भाव ठेवून करणे : ‘सौ. प्राजक्ताताई म्हणजे खरंच एक फूल आहेत. त्या अविरतपणे आणि आनंदाने पू. सौरभदादांची सेवा करतात. ‘पू. सौरभदादांची सेवा स्वतःचा पुत्र म्हणून नाही, तर संतसेवेचा भाव ठेवून करणे’, हे त्यांच्या प्रत्येक कृतीतून लक्षात येते.’ - सौ. अरुणा तावडे आणि श्री. अजित तावडे
३ उ. सदा बहरलेला असे हा ‘प्राजक्त’ ।
सतत हसतमुख राहूनी । चित्ती आनंद ठेवूनी ॥
अविरत करिती पुत्रसेवा । संतसेवेचा भाव ठेवूनी ॥ १ ॥
‘भविष्य’ (टीप) असो वा असो ‘प्रारब्ध’ ।
सदा बहरलेला असे हा ‘प्राजक्त’ ॥
त्रास कितीही होवोत स्वत:स । न्यून होईना चेहर्‍यावरील हास्य ॥ २ ॥
प्रेरणादायी असे आम्हास । यांचा ‘साधनामय संसार’ ॥
नित्य राहो तुमच्या जीवनी । गुरुकृपेचा हा वर्षाव ॥ ३ ॥
टीप - सौ. प्राजक्ता जोशी स्वतः ज्योतिष फलित विशारद असल्याने भविष्य पाहू शकतात.
- श्री. अजित तावडे
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn