Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

स्वच्छ आणि नितळ अंतरंगाचे अन् गुरुकार्याची तीव्र तळमळ असणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे पिंगुळी, कुडाळ येथील रंजन देसाईकाका !

डॉ. संजय सामंत
रंजन रघुनाथ देसाई
     सनातनचे साधक रंजन रघुनाथ देसाई (वय ६१ वर्षे) यांचे २० नोव्हेंबरच्या रात्री १२.१० वाजता हृदयविकाराच्या झटक्याने बांबोळी, गोवा येथील रुग्णालयात देहावसान झाले. त्यांच्याविषयी साधकांनी केलेले लिखाण येथे देत आहोत.
१. वर्ष १९९५ मध्ये देसाईकाकांशी 
ओळख झाल्यावर पुढे त्यांच्या 
स्वभावाचे विविध पैलू उलगडणे 
    ‘१९९५ या वर्षी गुरुपौर्णिमेनंतर सावंतवाडी येथील साधक श्री. आठलेकरकाका यांच्यासमवेत देसाईकाका आमच्या घरी आले होते. जन्मोजन्मीचे ऋणानुबंध असल्याप्रमाणे त्या पहिल्या भेटीतच देसाईकाकांनी मला आपलेसे केले. पुढे सेवेच्या निमित्ताने झालेल्या प्रत्येक भेटीत देसाईकाकांच्या स्वभावाचे ‘प्रचंड उद्यमशीलता, कोकणच्या लाल मातीवर असणारे अतोनात प्रेम, ‘जे ठरवीन, ते करून दाखवीन’ अशा प्रकारची तीव्र जिद्द’, हे नवीन पैलू उलगडू लागले.
२. कोकणात व्यवसाय करण्यास प्रतिकूलता आणि आस्थापनाच्या स्थानी वाईट शक्तींचा 
त्रास जाणवूनही देसाईकाकांनी अनेक संकटांना तोंड देत आस्थापन नावारूपाला आणणे 
     देसाईकाकांना शिक्षणाची आवड जेमतेम होती. बहुतेक आई-वडिलांच्या आग्रहानेच त्यांनी ‘मेकॅनिकल इंजिनियरिंग’चे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले; पण त्यासंबंधी प्रमाणपत्र (सर्टिफिकेट) आणायला ते कधी हुबळी (कर्नाटक) येथे गेले नाहीत. ‘‘व्यवसाय करायचा, तर तो कागदाचा तुकडा कशाला पाहिजे ?’’, असे ते म्हणायचे. त्या काळात कोकणात ‘वीज, कुशल कामगार, कच्च्या मालाची उपलब्धता, पक्क्या मालाला बाजारपेठ मिळण्यातील अडचणी’ अशी प्रत्येक गोष्टीत प्रतिकूलता होती. त्यामुळे व्यवसाय करायचा, म्हणजे स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारून घेण्याचा प्रकार होता. त्यात भर म्हणजे काकांच्या आस्थापनाच्या ठिकाणी वाईट शक्तींचा प्रचंड त्रास होता. आस्थापनात वेगवेगळ्या घटना घडत होत्या. एकदा तर मोठा अपघात होऊन एक भले मोठे चाक छप्पर फोडून १०० मीटर दूर पडले होते, तरीही त्यांनी ‘जे काही करायचे, ते आपल्या गावीच’ या ध्येयाने अनेक संकटांना तोंड देत आस्थापन नावारूपाला आणले. आरंभीच्या काळात कर्जाचे डोंगर झाले. कामगार संघटना त्रास देत असत. प्रचंड मानसिक ताण येत असे. या सर्व अडचणींना तोंड देतांना त्यांना अगदी तरुण वयात मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे विकार जडले, ते शेवटपर्यंत !
     या सर्व प्रतिकूल परिस्थितीचा त्यांना एक लाभ झाला, तो म्हणजेे त्यांना अध्यात्माची ओढ लागली. खरेतर ‘देसाईकाकांनी साधना करून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटावे’, ही नियतीचीच इच्छा होती. त्यामुळेच त्यांच्या जीवनात एवढे दुर्धर प्रसंग ओढवले असावेत. 
३. व्यवसायातील आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी एका संतांनी साहाय्य करणे; 
पण सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावरच काकांची साधनेच्या अनुषंगाने खरी वाटचाल होणे 
     आरंभीच्या काळात त्यांच्या जीवनात एक संत आले. त्यांनी काकांना पुष्कळ आध्यात्मिक साहाय्य केले. आस्थापनातील वाईट शक्तींचा त्रास न्यून व्हावा; म्हणून त्यांनी आस्थापनाच्या आवारात एक मारुतीचे मंदिर स्थापन केले. काकांच्या बोलण्यातून नेहमी त्या संतांविषयी कृतज्ञता व्यक्त होत असे. १९९५ या वर्षीच्या गुरुपौर्णिमेच्या काही मास (महिने) आधी काका सनातन संस्थेच्या संपर्कात आले. तेव्हाच त्यांची साधनेच्या अनुषंगाने खरी वाटचाल चालू झाली. 
४. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सनातनचे सेवाकेंद्र नसल्याने देसाईकाकांचे कार्यालय हे 
‘सत्संगाचे ठिकाण’ आणि त्यांचे घर हे ‘साधकांच्या निवासाचे ठिकाण’ होणे 
अन् काकांना साधनेच्या तळमळीमुळे नियोजित प्रसारकार्य पूर्ण झाल्याविना चैन न पडणे 
     ‘एकदा एखादी गोष्ट पटली की, त्यासाठी वाटेल ते करणे’ हे काकांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य होते. त्यामुळे पुढे त्यांनी सनातनच्या प्रसारकार्यामध्ये स्वतःला झोकून दिले. त्या वेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सनातनचे कार्य नुकतेच बाळसे धरत होते. जिल्ह्यात सेवाकेंद्रही नव्हते. त्यामुळे देसाईकाकांचे कार्यालय हेच आमच्या ‘सत्संगाचे ठिकाण’ असे आणि त्यांचे घर हे ‘साधकांच्या निवासाचे ठिकाण’ असे. त्यांच्या मनात ‘काहीही करून सनातनचे कार्य जिल्ह्यात वाढवायचेच’, अशी तळमळ निर्माण झाली होती. तेव्हा आम्ही सर्व जण मिळून एखाद्या सेवेचे अथवा प्रसार मोहिमेचे नियोजन करत असू; पण त्याचा पाठपुरावा करून ते कार्य पूर्ण होईपर्यंत देसाईकाकांना चैन पडत नसे. 
५. प.पू. गुरुदेवांचे आशीर्वाद आणि काकांची तळमळ यांमुळे सिंधुदुर्गात 
गावोगावी सनातनचे कार्य पसरणे अन् सेवाकेंद्राची आवश्यकता भासू 
लागल्याने काकांनी आस्थापनातील एक इमारत सेवाकेंद्रासाठी अर्पण करणे 
    त्या वेळी साधनेतील विविध पैलू ठाऊक नसल्याने आमच्याकडून पुष्कळ चुका व्हायच्या; पण देसाईकाकांच्या तळमळीमुळे गुरुदेव आम्हाला क्षमा करत असत. तेव्हा प.पू. गुरुदेवांचे आशीर्वाद आणि काकांची तळमळ यांमुळे सिंधुदुर्गात गावोगावी सनातनचे कार्य पसरले अन् सत्संगही चालू झाले. पुढे सनातनचे कार्य वाढल्याने आणि दैनिक सनातन प्रभात चालू झाल्याने जिल्ह्यात सेवाकेंद्राची आवश्यकता भासू लागली; परंतु कधीही आम्हाला ‘सेवाकेंद्र कुठे असावे ?, जागा कोण देणार ?’, असे प्रश्‍न पडलेच नाहीत. त्या वेळी काकांनी आस्थापनातील एक इमारत सेवाकेंद्रासाठी अर्पण केली. काकांनी प.पू. गुरुदेवांच्या चरणी तन, मन आणि धन अर्पण केले होते. 
६. कार्याची व्याप्ती वाढल्याने काकांनी सत्संगातील युवकांना भेटून त्यांना पूर्णवेळ 
साधना करण्याचे महत्त्व सांगणे अन् पुढे त्यांपैकी काही साधकांची साधनेत उत्तम प्रगतीही होणे 
     नंतर कार्याची व्याप्ती वाढल्याने जिल्ह्यात पूर्णवेळ साधकांची निकड भासू लागली. त्यामुळे काका नुकतेच सत्संगात आलेल्या युवकांना भेटून त्यांना पूर्णवेळ साधना करण्याचे महत्त्व सांगत. त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रसंगी साधकांच्या पालकांना भेटून प्रयत्न करत असत. काकांच्या प्रयत्नांमुळे त्या वेळेपासून पूर्णवेळ साधनारत झालेल्या काही साधकांनी आज ६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी गाठली असून काही साधकांनी संतपदही गाठले आहे. 
७. काकांनी आस्थापनाचा सर्व कारभार त्यांचे मेहुणे श्री. राजन सामंत 
यांच्याकडे सोपवणे आणि काकांनी सनातन आश्रमात पूर्णवेळ सेवा चालू करणे 
     प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळे काकांना गोवा येथील आश्रमात रहायला मिळाले. खरेतर, त्या वेळी त्यांना कर्ज झाले होते. आस्थापनामध्ये अनेक अडचणी येत होत्या; पण त्यांनी मनात कोणताही नकारात्मक विचार न आणता सर्व कारभार त्यांचे मेहुणे श्री. राजन सामंत यांच्याकडे सोपवला. नंतर ते आश्रमात रहायला गेले अन् शेवटपर्यंत आश्रमात पूर्णवेळ साधनारत राहिले. 
      प.पू. गुरुदेवांवर काकांची गाढ निष्ठा होती. ते नेहमी ‘प.पू. गुरुदेवांचा प्रत्येक विचार म्हणजे ब्रह्मवाक्य !’ असे म्हणायचे. एके काळी तोट्यात चालणारे त्यांचे आस्थापन पुढे नफ्यात चालू लागले आणि सर्व कर्ज फिटले. याचे सर्व श्रेय ते अतिशय कृतज्ञताभावाने प.पू. गुरुदेवांना देत असत.
८. सनातनपासून १२ वर्षे दूर गेल्यावरही देसाईकाकांनी 
सातत्याने संपर्क ठेवल्यामुळे स्वतः परत साधनारत होऊ शकणे 
     ‘पाठपुरावा करणे’, या गुणासमवेत त्यांच्यात माणसे जोडण्याचीही कला होती. एकदा आपला माणूस म्हटल्यावर ‘तो जणूकाही कुटुंबातील एक घटक आहे’ अशा रितीने ते त्याच्या सुख-दुःखात सहभागी व्हायचे. संपर्कात आलेल्या प्रत्येकाने साधना करावी; म्हणून ते अतिशय तळमळीने प्रयत्न करत असत. मधल्या काळात मी सनातनपासून आणि पर्यायाने साधनेपासून १२ वर्षे दूर गेलो होतो. तेव्हा देसाईकाकांनी सातत्याने माझ्याशी ठेवलेल्या संपर्कामुळेच मी परत साधनेत येऊ शकलो. आजही साधनेत सक्रीय नसलेल्या अनेक साधकांशी काका पूर्वीच्याच सलोख्याने वागत असत. देवद आश्रमातून एक-दोन मासांनी (महिन्यांनी) ते घरी यायचे; पण येण्यापूर्वी एक-दोन दिवस आधीच दूरभाष करून ते माझ्यासारख्या अनेकांना ‘मी येत आहे, माझ्यासाठी वेळ काढून ठेवा’, असा प्रेमळ आग्रह करायचे. घरी आल्यावर ‘आपण कोणती नवीन सूत्रे शिकलो ?’ याविषयी ते सांगत असत. 
९. काकांनी जीवनात झालेल्या चुकांचे दायित्व 
स्वीकारणे आणि प्रायश्‍चित्त घेऊन लगेच संबंधितांची क्षमा मागणे 
     प्रथमदर्शनी पहाणार्‍याला काकांचा स्वभाव उग्र वाटत असे; पण जसे त्यांच्या जवळ जाऊ, तसे ‘त्यांचे अंतःकरण लोण्याहून मऊ आणि मृदू आहे’, याची जाणीव होत असे. ते ‘आत एक आणि बाहेर एक’ असे कधीच वागले नाहीत. जीवनात स्वतःकडून झालेल्या चुका पूर्णपणे स्वीकारून त्यांचे पूर्ण दायित्व त्यांनी घेतले आणि प्रायश्‍चित्तही घ्यायला ते कधी मागे हटले नाहीत. स्वभावदोषांमुळे काहीतरी चूक झाली, तर लगेच दुसर्‍या क्षणाला ते क्षमा मागून मोकळे व्हायचे. त्यांचे अंतरंग हे स्वच्छ आणि नितळ होते. काकांना ‘कुटुंबियांपैकी त्यांच्या पत्नीने आणि आईने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, तसेच त्यांच्या नाती महर्लोकातून जन्माला आल्या आहेत’, याविषयी फार समाधान वाटत असे. 
१०. कृतज्ञता आणि प्रार्थना 
     मला साधनेमध्ये आणण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी माझ्या साधनेच्या पडत्या काळात प.पू. परुळेकरबाबांप्रमाणे काकांनीही पुष्कळ सहकार्य केले. त्यासाठी मी त्यांच्याप्रती सदैव कृतज्ञ आहे. मी संस्थेपासून दूर असतांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या काही साधकांनी ६१ टक्के स्तर गाठावा, असे मला नेहमी वाटायचे, त्यात देसाईकाका हे एक होते. प.पू. गुरुदेवांनी माझी इच्छा पूर्ण केली. त्यासाठी मी प.पू. गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. तसेच ‘देसाईकाकांची उत्तरोत्तर प्रगती होत जावो’, अशी भगवान श्रीकृष्ण आणि प.पू. गुरुदेव यांच्या चरणी प्रार्थना करतो.’
- डॉ. संजय प्र. सामंत, पिंगुळी, कुडाळ, सिंधुदुर्ग.(२४.११.२०१६)
कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील सनातन सेवाकेंद्रातील साधकांची 
कुटुंबप्रमुखाप्रमाणे नेहमी काळजी घेणारे रंजन देसाईकाका ! 
१. स्मरणशक्ती चांगली असणे 
    ‘एकदा विचारून घेतलेला दूरभाष क्रमांक किंवा भ्रमणभाष क्रमांक नोंदवहीत नोंद न ठेवताही त्यांच्या व्यवस्थित लक्षात रहात असे.
२. आस्थापनातील कर्मचार्‍यांसाठी सत्संग चालू करणे 
     ते त्यांच्या आस्थापनातील (कंपनीतील) कर्मचार्‍यांकडून नामजप करवून घेत असत. त्यांच्यासाठी त्यांनी सत्संगही चालू केला होता. 
३. साधनेत साहाय्य करणे 
अ. त्यांच्या संपर्कात आलेल्या कोणत्याही साधकाला साधनेत अडचणी असल्यास त्यांना त्याची आतून जाणीव होई आणि ते स्वतःहून संबंधित साधकाला त्याविषयी विचारून अडचण सोडवण्यासाठी पुढाकार घेऊन तळमळीने प्रयत्न करायचे.
आ. देवद आश्रमातून काही दिवस घरी रहायला आल्यावर काका जिल्ह्यातील सर्व साधकांची साधनेसंदर्भात चौकशी करत. तसेच एखाद्याच्या घरी जाऊन साधनेसंदर्भात चर्चा करून साधकाला साधनेत पुढे जाण्यासाठी साहाय्य करत. 
इ. एखादा साधक नवीन असेल, तर त्याला साधनेसाठी प्रोत्साहन देत असत.
४. प्रेमभाव 
     कोणताही सण असला आणि देसाईकाका घरी असले की, त्यांना कुडाळ सेवाकेंद्रातील साधकांची सतत आठवण असायची. सेवाकेंद्रातील पू. रेडकरआजींना त्यांनी नियमितपणे घरातून फळे देण्याचे नियोजन चालू केले.’ 
- सर्व साधक, सनातन सेवाकेंद्र, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn