Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

राहुलचे पुरावे !

संपादकीय
    लहान मुलाने, अनुभवी नसणार्‍याने किंवा अभ्यास नसणार्‍याने एखादे संवेदनशील अथवा वादग्रस्त विधान केले, तर त्याला कोणीही गांभीर्याने घेत नाही. तसाच प्रकार काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याविषयी आहे. राहुल गांधी यांचे व्यक्तीमत्त्व वरील तीनही श्रेणीत बसणारे आहे, असे कोणी म्हटल्यास चुकीचे ठरू शकत नाही. घराणेशाहीमुळे काँग्रेसला पर्याय नसल्याने राहुल गांधी यांचे नेतृत्व मिळाले आहे. राहुल गांधी यांचे राजकीय क्षेत्रातील कर्तृत्व शून्य आहे. तसेच व्यावहारिक जगातही त्यांनी कोणतेही कर्तृत्व गाजवलेले नाही. शिक्षणही यथातथाच आहे. त्यामुळे काँग्रेसला विरोध करणार्‍या पक्षांकडून त्यांना महत्त्व दिले जात नाही. काँग्रेसची केंद्रातील सत्ता जाण्याला जसे तिचे घोटाळे उत्तरदायी होते, तसेच राहुल गांधी यांचे नेतृत्वही तितकेच उत्तरदायी होते. अशा राहुल गांधी यांनी आतापर्यंतच्या राजकीय जीवनात केलेल्या विधानांना किंवा विरोधी पक्षांवर केलेल्या टीकेला कोणीही महत्त्व दिलेले नाही. तरीही राहुल गांधी त्यातून काही शिकलेले नाहीत; कारण काँग्रेसची परंपरा शिकण्याची नसून शिकवण्याची राहिलेली आहे तेच राहुल यांच्यातही दिसते. त्यामुळे राहुल गांधी यांनी सध्याच्या नोटाबंदीवरून नुकतेच केलेल्या दोन विधानांना महत्त्व देता येत नाही. 
     पहिले विधान म्हणजे नोटाबंदीविषयी मी संसदेत बोललो, तर भूकंप होईल; मात्र मला बोलायला दिले जात नाही, हे ते विधान होय. गेल्या महिन्याभरापासून नोटाबंदीचा विषय देशात चालू आहे. काँग्रेसने संसदेचे अधिवेशन चालू झाल्यापासून त्याला विरोध करत गदारोळ घातल्याने दोन्ही सभागृहांचे कामकाज ठप्पच आहे. अशा वेळी जर राहुल गांधी असे म्हणत असतील, तर त्याचे दायित्व त्यांचेच आहे. त्यांचाच पक्ष कामकाज ठप्प करणार्‍यांना रोखून कामकाज सुरळीत पार पाडून त्यांना जे मांडायचे आहे, हे ते सहज मांडू शकतात. मुळात राहुल गांधी यांना काही मांडायचेच नसल्यानेच ते अशा प्रकारचे विधान करत आहेत. ही त्यांची दांभिकताच आहे. दुसरे विधान म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे माझ्याकडे आहेत. स्वातंत्र्याच्या ६९ वर्षांतील देशातील राजकारणात अशा प्रकारची विधाने अनेकदा अनेक राजकारणी करत असतात. विरोधाला विरोध करण्यासाठीच अशी विधाने होतात. जर देशातील भ्रष्टाचार खर्‍या अर्थाने दूर करण्याचा राजकारण्यांचा हेतू असेल, तर ते अशी विधाने करणार नाहीत, तर हे पुरावे अन्वेषण यंत्रणांना देऊन, तसेच जनतेसमोर ठेवून तेे त्यांची चौकशी करण्याची मागणी करतील; मात्र असे बहुतेक वेळ होत नाही. काही वेळेस पुरावे नसतात, तर काही वेळेस पुरावे असूनही संबंधिताला ब्लॅकमेल करून स्वतःचे इप्सित साध्य करण्यासाठी अशी धमकी दिली जाते. राहुल गांधी यांचे विधान जनतेला पहिल्या विचाराप्रमाणे वाटत आहे. मोदी भ्रष्टाचार करणार नाहीत, अशी जनतेला निश्‍चिती आहे. त्यामुळे आणि राहुल गांधी यांच्या एकूणच व्यक्तीमत्व पहाता त्यांच्या या विधानावर कोणीही विश्‍वास ठेवणार नाही. जर खरेच राहुल यांच्याकडे पुरावे असतील, तर त्यांनी ते जनतेसमोर उघड करावेत. 
    दुसरी गोष्ट म्हणजे राहुल यांनी खरेच मोदी यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे गोळा केले असतील, तर त्यांना यापूर्वीच काँग्रेसच्या सरकारने केलेले बोफोर्स, कोळसा खाण वाटप, राष्ट्रकुल, २-जी, आदर्श आणि अन्य घोटाळ्यांचे पुरावे शोधणे अवघड गेले नसते; मात्र यापैकी कुठल्याच घोटाळ्याचे पुरावे त्यांनी शोधलेले नाहीत, हे विशेष. मुख्य म्हणजे कोणत्याच राजकीय पक्षाचे नेते स्वतःच्या पक्षातील भ्रष्टाचाराविषयी कधीही बोलत नसतो कि त्याविषयी कोणतेही पुरावे कधी उघड करत नाही. याला कोणताही राजकारणी अपवाद नाही. असा देशभक्त या देशात तरी जन्माला आलेला नाही की, जो स्वतःच्या पक्षाचा भ्रष्टाचार निःस्वार्थ वृत्तीने बाहेर आणील. विश्‍वनाथ प्रतापसिंह यांनी राजीव गांधी सरकारमध्ये मंत्री असतांना बोफोर्स तोफा खरेदीत दलाली दिली गेल्याचे उघड करून मंत्रीपद आणि पक्ष याचा त्याग केला होता; मात्र तेही नंतर भ्रष्टाचार्‍यांना एकत्र घेऊन सत्ता मिळवत पंतप्रधान झाले होते. अशा वेळी राहुल गांधी यांच्या पुराव्यांना कोणी महत्त्व देणार नाही, हे त्यांनी आणि काँग्रेसवाल्यांनी लक्षात घ्यायला हवे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn