Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सिंगापूरच्या प्रसारदौर्‍याच्या वेळी सौ. श्‍वेता क्लार्क यांनी अनुभवलेले प.पू. गुरुदेवांच्या संकल्पाचे फलित आणि अनुभवलेला त्यांच्या चैतन्याचा वर्षाव !

सौ. श्‍वेता क्लार्क
     ‘सिंगापूरचा हा माझा चौथा प्रसारदौरा होता. या पूर्वीचा प्रसारदौर्‍याचा कालावधी केवळ दोन आठवड्यांचा असायचा. या वेळी या दौर्‍याचे नियोजन करतांना साधकांनी मला तिथे १ मासासाठी जाण्यास सुचवले. त्यामुळे आम्ही मिळालेल्या अल्प कालावधीत २ आठवड्यांचे प्रसाराचे नियोजन करून उरलेले २ आठवडे प्रवचने आणि प्रसंगानुसार इतर कार्यक्रम करण्यासाठी राखून ठेवले.
१. ‘दोन आठवड्यांत प्रसारकार्य कसे होईल ?’ याची काळजी वाटत असतांना ‘
प.पू. गुरुदेवांचा संकल्प कसा कार्य करतो, याची अनुभूती घ्या’, असे 
सांगून पू. सिरियाकदादा आणि एक संत यांनी आश्‍वस्त करणे 
     ‘शेवटच्या दोन आठवड्यांचे प्रसारकार्य कसे होईल ?’ याविषयी माझ्या मनात थोडी भीती होती. माझ्या मनात पुढील विचार येत होते, ‘इथे मला फारसे कोणी ओळखत नाही. नवीन कार्यक्रम आयोजित करता आले नाही आणि नवीन संपर्क झाले नाही, तर मी काय करू ? देवाला अपेक्षित असे मी पूर्ण करू शकेन का ?’ तेव्हा एक संत आणि पू. सिरियाकदादा यांनी मला पुढीलप्रमाणे सांगून आश्‍वस्त केले, ‘‘प.पू. गुरुदेव सर्व काळजी घेणार आहेत. त्यांचा संकल्प कसा कार्य करतो, ते तुम्ही पहा आणि त्याची अनुभूती घ्या.’’ मी प.पू. गुरुदेवांना संपूर्णपणे शरण जाऊन प्रार्थना केली, ‘आता तुम्हीच सर्व काळजी घ्या.’ प्रत्यक्षात मला या दौर्‍याच्या वेळी पुष्कळ अनुभूती आल्या. ‘प.पू. गुरुदेवांचे चैतन्य कसे कार्यरत होते आणि त्यांचे अस्तित्व पदोपदी माझ्यासमवेत कसे होते ?’, हे अनुभवल्यानंतर मी मंत्रमुग्ध झाले.
२. प्रसारदौर्‍याच्या वेळी जिज्ञासूंनी दिलेला प्रतिसाद 
२ अ. एस्.एस्.आर्.एफ्.च्या ‘लॉग-इन’ सदस्या असलेल्या डॉ. रामपद्मा यांना संपर्क केल्यावर त्यांनी ‘गुरुकृपायोगा’नुसार अष्टांग साधना करण्यास उत्सुक असल्याचे सांगणे : सिंगापूरचा प्रसारदौरा आरंभ होण्यापूर्वी तिथे प्रसार करण्याच्या दृष्टीने नवीन संपर्क करण्यासाठी मी लोकांची सूची पहात होते. त्या वेळी प.पू. गुरुदेवांंनी मला डॉ. रामपद्मा यांना संपर्क करण्याचा विचार दिला. डॉ. रामपद्मा ‘कॅन्सर’ या रोगावरील विशेष तज्ञ असून सिंगापूर येथील के.के. रुग्णालयात चाकरी करतात. आमच्या दुसर्‍या प्रसार दौर्‍याच्या वेळी त्या एका प्रवचनाला उपस्थित होत्या. त्यानंतरच्या दौर्‍यात त्यांनी आम्हाला संपर्क केला नव्हता. त्या वेळी प्रवचनाला आल्यावर त्यांनी भरून दिलेल्या माहितीपत्रकात त्यांनी स्वतःचा संगणकीय पत्ता (इ-मेल आय डी) दिला होता; मात्र तोे चुकीचा होता. मी प.पू. डॉक्टरांना सूक्ष्मातून विचारले, ‘आता मी त्यांना कसा संपर्क करू ?’ त्यावर त्यांनी ‘त्या एस्.एस्.आर्.एफ्.च्या ‘लॉग-इन’च्या सदस्या असल्याने तिथे पहा’, असे सांगितले. मी ‘लॉग-इन’ उघडल्यावर त्यांचा अचूक संगणकीय पत्ता मिळाला. मी त्यांना संगणकीय पत्र पाठवले. ‘त्या याला उत्तर पाठवतील का ?’, असा विचार माझ्या मनात आल्यावर मी पुन्हा प.पू. डॉक्टरांना सूक्ष्मातून प्रार्थना केली, ‘त्यांना संपर्क करण्याचा विचार तुम्ही दिलात. तेव्हा आता तुम्हीच काय ते पहा.’ खरोखर एक घंट्यात त्यांनी मला उत्तर पाठवले. त्यात त्यांनी मला ओळखले असून माझ्या संपर्कामुळे त्यांना पुष्कळ आनंद झाल्याचे कळवले होते, तसेच संपर्क करण्यासाठी स्वतःचा भ्रमणभाष क्रमांक दिला होता. त्यामुळे मी त्यांना ‘व्हॉटस् अ‍ॅप’ वर संपर्क केला. मी सिंगापूरला गेले, तेव्हा त्यांच्याच घरी राहिले. डॉ. रामपद्मा या मागील ५ वर्षांपासून एस्.एस्.आर्.एफ्.च्या ‘लॉग-इन’ सदस्या आहेत. एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळावर असलेले प.पू. गुरुदेवांचे छायाचित्र पाहून ‘यांना मी आयुष्यात एकदा तरी भेटू शकेन का ?’, असा विचार त्यांच्या मनात आल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही त्यांना भेटलो, तेव्हा त्या सतत भावावस्थेत होत्या आणि ‘त्यांच्यासाठीच प.पू. गुरुदेवांनी मला त्यांच्याकडे पाठवले आहे’, असा त्यांचा भाव होता. त्या ‘गुरुकृपायोगा’नुसार अष्टांग साधना करण्यास उत्सुक होत्या. सिंगापूरच्या या दौर्‍यात मला आलेली ही पहिली अनुभूती होती. 
२ आ. एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधकांना अनेक कार्यक्रमांमध्ये प्रवचनासाठी निमंत्रित करणारे सिंगापूरचे श्री. राजेश सिंग : सिंगापूर येथील पहिल्या प्रवचनाला श्री. राजेश सिंग आले होते. श्री. सिंग मूळचे भारतातील लुधियाना येथील असून त्यांनी आता सिंगापूरचे नागरिकत्व स्वीकारले आहे. सिंगापूर येथील सर्व हिंदू संघटनांना एकाच मंचाखाली आणण्यासाठी ते कार्यरत आहेत. त्यांची माझे पती श्री. शॉन यांच्याशी ओळख असून एस्.एस्.आर्.एफ्.विषयीही त्यांना ठाऊक आहेे; मात्र बर्‍याच काळापासून त्यांचा संपर्क नव्हता. त्यांना आमचे प्रवचन पुष्कळ आवडले. त्यानंतर त्यांनी एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधकांना अनेक कार्यक्रमांमध्ये प्रवचनासाठी निमंत्रित करून सहभागी करून घेतले, तसेच त्या कार्यक्रमांमध्ये ते एस्.एस्.आर्.एफ्.चा प्रसार स्वतः करू लागले. सिंधी समाजासाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी आम्हाला ‘नमस्काराचे महत्त्व, नामजप, देवळात दर्शन कसे घ्यावे ?’ या विषयांवर २० मिनिटे मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केले होते.
२ इ. ९१ वर्षे वय असलेले सिंधी समाजाचे अध्यक्ष श्री. हरी यांनी संपर्क वाढवण्यास साहाय्य करणे : येथे आमची भेट ९१ वर्षांचे श्री. हरी यांच्याशी झाली. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. श्री. राजदादांनी (श्री. राजेश सिंग यांनी) सिंगापूर येथील संपर्क वाढवण्याच्या दृष्टीने आम्हाला तिथे निमंत्रित केले होते. 
२ ई. आध्यात्मिक कार्यशाळेचे नियोजन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगणारे जिज्ञासू श्री. आणि सौ. धर्माधिकारी : ‘विवेकानंद सोसायटी’ या संस्थेचे सिंगापूरमध्ये ५०० सदस्य आहेत. भारतीय संस्कृतीचे रक्षण आणि लहान मुलांसाठी नैतिक मूल्यांचे संवर्धन, यासाठी ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेच्या साहाय्याने आयोजित केलेल्या एस्.एस्.आर्.एफ्.च्या प्रवचनाला ८ जिज्ञासू उपस्थित होते. या प्रवचनाला आलेले श्री. आणि सौ. धर्माधिकारी यांच्याशी आमची ओळख झाली. प्रवचन ऐकून त्यांना पुष्कळ आनंद झाला. श्री. धर्माधिकारी यांनी सिंगापूर येथील ‘हिंदू सोसायटी’ नामक संस्थेच्या अध्यक्षांशी बोलून घेणार असल्याचे सांगितले. त्या संस्थेअंतर्गत अनेक मंदिरे आणि हिंदू संघटना आहेत. आमच्या पुढील दौर्‍याच्या वेळी तेथील लोकांसाठी आध्यात्मिक कार्यशाळेचे नियोजन करण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. सौ. धर्माधिकारी यांनी विविध महिलागट आणि शाळा यांसाठी प्रवचने आयोजित करणार असल्याचे सांगितले. 
२ उ. ‘स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया’ आणि ‘तणावमुक्तीसाठी करावयाचे प्रयत्न’ या संकल्पना आवडल्याचे सांगणारे मोटारी विकणार्‍या आस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनीष त्रिपाठी : श्री. मनीष त्रिपाठी येथील एका अलिशान मोटारी विकणार्‍या आस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ते दक्षिणपूर्व आशिया विभागाचे काम पहातात. श्री. मनीष यांच्याशी आमची भेट वैयक्तिक संपर्कातून झाली. ‘स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया’ आणि ‘तणावमुक्तीसाठी करावयाचे प्रयत्न’ या संकल्पना त्यांना पुष्कळ आवडल्या. या भेटीत एस्.एस्.आर्.एफ्.ने सिद्ध केलेले ‘निर्णय घेणे आणि आपण करत असलेल्या कृतींमागील कार्यकारणभाव’ या विषयावरील ‘ट्यूटोरियल्स’ त्यांना दिले. त्यांना कापूर देण्याचा विचार प.पू. गुरुदेवांनी दिल्यामुळे मी त्यांना कापूर दिला. (‘कापराचा सुगंध घेतल्याने मन-बुद्धीवरचे आवरण दूर होऊन चांगले वाटू लागते.’ - संकलक) त्यांनी कापूर हातावर चोळून तोंडवळ्यावर लावल्यावर चांगले वाटत असल्यामुळे त्यांना तोंडावरून हात काढावेसे वाटत नव्हते. ‘‘हे फारच चांगले आहे. तुम्ही या पूर्वी का आला नाहीत ?’’ असे त्यांनी विचारलेे. कापूर हुंगल्याने त्यांना त्वरित बरे वाटल्याने ‘तो छातीशी धरून ठेवावा’, असे त्यांना वाटत असल्याचे सांगून ते म्हणाले, ‘‘मला कामानिमित्ताने अनेकदा प्रवास करावा लागत असल्याने पुष्कळ ताण येतो. या कापरामुळे मला पुष्कळ साहाय्य होईल.’’ नोव्हेंबर मासात (महिन्यात) त्यांच्या आस्थापनातील वरिष्ठ व्यवस्थापकीय अधिकार्‍यांसाठी ‘तणावमुक्ती’ या विषयावर एक प्रवचन आयोजित करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. कामानिमित्त ते अनेक वेळा भारतात येत असल्यामुळे एकदा गोव्यातील आश्रमाला भेट देण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
२ ऊ. साधनेची आवड असलेल्या श्रीमती पोटा : श्रीमती हिरवा पोटा यांच्या कुटुंबियांचे भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. श्रीमती पोटा यांनी आयोजित केलेल्या एस्.एस्.आर्.एफ्.च्या प्रवचनाचा लाभ ४० जिज्ञासूंनी घेतला. त्यानंतर त्यांनी आम्हाला रात्री भोजनाला त्यांच्या घरी बोलवून आमच्याशी साधनेविषयी चर्चा केली. 
३. विविध संपर्कातून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद 
३ अ. मुनीश्‍वरन् मंदिराच्या अध्यक्षांनी प्रवचनासाठी केलेले साहाय्य आणि धनाचा त्याग : आम्ही येथील मुनीश्‍वरन् मंदिरात प्रवचन आयोजित करण्याची अनुमती मागण्यासाठी गेलो होतो. तेव्हा ‘त्या मंदिराचे सध्याचे अध्यक्ष नवीन आहेत’, असे आम्हाला समजले. आम्ही त्यांना भेटून एस्.एस्.आर्.एफ्.च्या कार्याविषयी सांगितले. हे ऐकून ते आनंदित झाले. मंदिरातील प्रवचनासाठीच्या सभागृहाचे भाडेमूल्य १०० सिंगापुरी डॉलर इतके होते. त्यापैकी ५० डॉलर त्यांनी स्वतः अर्पण दिले. त्यांनी मंदिरामध्ये एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्याची इच्छा व्यक्त करून त्या कार्यक्रमाचा प्रसार, फलकप्रसिद्धी इत्यादींचे दायित्व मंदिर व्यवस्थापन सांभाळणार असून एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधकांनी तिथे जाऊन केवळ प्रवचन करायचे असल्याचे सांगितले. प्रवचनाच्या दिवशी ते स्वतः सेवेला आले. त्यांनी आसंद्या (खुर्च्या) मांडणे, ‘प्रोजेक्टर’ जोडून देणे इत्यादी सेवांमध्ये साधकांना साहाय्य केले. या दिवशी त्यांच्या वतीने साधकांना विनामूल्य भोजन देण्यात आले. 
३ आ. एका जिज्ञासूंनी मनातील नकारात्मक विचार ५० टक्क्यांनी घटल्याचे सांगून कार्यशाळेसाठी येण्याची इच्छा दर्शवणे : एका प्रवचनाला एक नवीन जिज्ञासू आले होते. त्यांच्या सासूबाई त्यांच्यावर करणी करून त्यांचा संसार मोडण्याच्या प्रयत्नात असल्याने ते फार त्रस्त होते. प्रवचनानंतर त्यांच्या मनात येणारे विचार ५० टक्क्यांनी घटले असल्याचे त्यांनी सांगितले. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात येणार्‍या कार्यशाळेसाठी त्यांनी त्यांचे नाव नोंदवले आहे. रामनाथी आश्रम, गोवा येथे ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात येणार्‍या अध्यात्म कार्यशाळेसाठी ९ साधकांनी नावे नोंदवली आहेत. प्रत्यक्षातही ते सर्व कार्यशाळेसाठी उपस्थित राहिले.
४. सिंगापूर येथील साधकांमध्ये जाणवलेले सकारात्मक पालट 
     सिंगापूर येथील १४ साधक सँडी यॉन्ग, रिना कट्यारे, मंजुळा, विनय, पुगल, महेश, सौशीला, मामी, गीम, जयराज, रेन, आरती, अभिनय आणि केल्विन या सर्वांनी सक्रीय सेवा केली. ते सर्व भावावस्थेत होते. यांपैकी एकानेही कोणत्याही सेवेला ‘नाही’ म्हटले नाही. या सर्वांनी आपली नोकरी, घरकाम आणि मुले सांभाळून सेवा केल्या. 
५. सिंगापूर येथील साधकांना आलेल्या अनुभूती 
५ अ. श्री. विनयदादा यांना नवीन घरात गेल्यावर आरोग्याच्या आणि अन्य समस्या उद्भवणे अन् साधक घरी रहायला येऊ लागल्यापासून वास्तूतील स्पंदने पालटून घरात हलकेपणा आणि दत्तगुरूंचे अस्तित्व जाणवणे : आम्ही श्री. विनयदादांच्या घरी रहात होतो. त्यांनी त्यांना आलेली अनुभूती आम्हाला सांगितली, ‘‘मी सध्या विकत घेतलेल्या घरात पूर्वी जुगारी आणि गुंड प्रवृत्तीचे लोक रहात होते. घर घेतांना मला याची कल्पना नव्हती; मात्र घरात रहायला लागल्यावर मला आरोग्य आणि इतर समस्या उद्भवू लागल्या. ‘यात कधीच पालट होणार नाही’, असे मला वाटत होते. सिंगापूर येथील प्रसाराला आरंभ झाल्यावर एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक माझ्या घरी राहू लागले. साधकांच्या रूपात प.पू डॉक्टरच घरी रहायला आल्याने आमच्या वास्तूतील स्पंदने पालटली. मला घरात हलकेपणा आणि दत्तगुरूंचे अस्तित्व जाणवू लागले.’’
५ आ. श्री. विनयदादांच्या घरी दैवी कणांचा वर्षाव होणे : या प्रसार दौर्‍यात आम्ही त्यांच्या घरात रहात असतांना त्यांच्या संपूर्ण घरात दैवी कण आढळून आले. अशा प्रकारे ईश्‍वराने त्यांच्या घरातील सर्व नकारात्मक स्पंदने काढून टाकली. ही अनुभूती सांगताना श्री. विनयदादांचा भाव जागृत झाला होता. 
५ इ. साधनेला आरंभ केल्यापासून श्रीमती सँडी यांना आलेल्या अनुभूती आणि परिस्थितीत झालेले पालट : सँडी यांना अनेक अनुभूती आल्या आहेत. त्या साधनेसाठी पुष्कळ प्रयत्न करत आहेत. येथील सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून त्यांनी तळमळीने सेवा केली. प.पू. गुरुदेवांप्रती त्यांचा पुष्कळ भाव आहे. त्यांना जाणवलेल्या अनेक गोष्टी त्यांनी प्रांजळपणे मला सांगितले. प्रारंभी त्यांच्या मनात एस्.एस्.आर्.एफ्.विषयी साशंकता होती; परंतु जसजसा त्यांचा सहभाग वाढला, तसतसा ‘ईश्‍वराने त्यांना योग्य मार्ग दाखवला आहे’, हा विश्‍वास वाढला. मी त्यांच्यासमवेत मुनीश्‍वरन् मंदिरातील प्रवचनाच्या निमित्ताने प्रवास करत असतांना त्या माझ्याशी मनमोकळेपणाने बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ‘‘मुलाची शाळा संपल्यावर त्याने आश्रमात रहायला जावे आणि त्याची इच्छा असल्यास पूर्णवेळ साधक व्हावे’, अशी माझी इच्छा आहे. ईश्‍वराने धनाची काळजी घेतल्याने आता मला एस्.एस्.आर्.एफ्.च्या मार्गदर्शनानुसार अधिक वेळ साधना करता येर्ईल. रामनाथी आश्रमात अधिक काळासाठी येऊन उपाय, सेवा, स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया हे सर्व गांभीर्याने करण्याची माझी इच्छा आहे. माझ्या मुलीलाही साधनेची आवड आहे. माझ्या पतीचा अध्यात्मिक गोष्टीला संपूर्ण विरोध होता. त्यामुळे यापूर्वीच विभक्त होणे, ही दैवी योजनाच असावी. आता माझा मार्ग मोकळा आहे.’’ त्यांची दोन्ही मुले चांगली असून त्यांना अध्यात्माची ओढ आहे. 
५ ई. श्री. रेन यांना आलेल्या अनुभूती : रेन विशीतील तरुण असून त्याने सर्व प्रवचनांना उपस्थित राहून सेवा केली. स्वतःबद्दल सांगतांना तो म्हणाला, ‘‘सेवा करतांना मला पुष्कळ आनंद मिळतो आणि हा आनंद सेवा संपल्यावरही पुष्कळ काळ टिकून रहात असल्याने मला अधिकाअधिक सेवा कराविशी वाटते. सेवेनंतर घरी गेल्यावर मला येणार्‍या प्रतिक्रियांचे प्रमाण उणावले असून चुका स्वीकारण्याचे प्रमाण वाढल्याचे माझ्या लक्षात आले.’’ रेनसमवेत साधिका सँडी यांनी सात्त्विक उत्पादनांच्या प्रदर्शनाची सेवा केली. त्या वेळी ‘रेन सेवा करतांना लहान मुलासारखा आनंदी असून त्या आनंदात तो गाणे गातो’, असे जाणवत असल्याचे सँडी यांनी सांगितले. याविषयी रेन म्हणाला, ‘‘प्रत्यक्षात मी गात नव्हतो. सेवा करतांना माझा नामजप आतून होतो, त्यामुळे मी सेवा आणि नामजप यांमध्ये मग्न असतो.’’
६. श्रीमती आरती आणि श्रीमती सौशीलाताई यांची जाणवलेली वैशिष्ट्ये 
   श्रीमती आरती या सिंगापूरहून भारतात परत येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या घराच्या सामानाची बांधाबांध चालू असूनही त्यांनी सेवा केली. श्रीमती सौशीला ६० वर्षांच्या असून त्यांनी स्वतःचे नवीन घर साधकांना वापरायला दिले.
    एकंदरित सिंगापूर येथील साधकांमध्ये पुष्कळ संघटितपणा आणि कुटुंबभावना असल्याचे जाणवले. प्रवचन वा कार्यक्रम संपल्यानंतर कोणालाही घरी जाण्याची घाई नव्हती. साधकांनी स्वतःच्या चुका प्रांजळपणे सांगितल्या. सर्वांना अनेक अनुभूतीही आल्या. 
७. कृतज्ञता 
     प.पू. डॉक्टरांनी माझ्यावर केलेल्या चैतन्याच्या वर्षावामुळे सिंगापूर दौर्‍यातील एकही दिवस वाया गेला नाही. तिथे पुष्कळ सेवा होत्या आणि त्यातून पुष्कळ आनंदही मिळाला. या दौर्‍याच्या वेळी सर्व साधकांची मरगळ दूर होऊन त्यांचा साधना करण्याचा उत्साह वाढला. प.पू. गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. आम्ही प्रत्येक कृती करण्यापूर्वी प.पू. गुरुदेवांना प्रार्थना आणि कृती झाल्यावर त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत होतो. 
    ‘प.पू. गुरुदेव, आम्हा साधकांचा हात तुम्ही कधीच सोडू नका. तुम्हाला अपेक्षित असे प्रयत्न तुम्हीच आमच्याकडून करून घ्या’, अशी तुमच्या चरणी आर्त प्रार्थना आहे.’
- सौ. श्‍वेता क्लार्क, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.९.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn