Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. संगीता घोंगाणे यांनी दिवाळीच्या कालावधीत स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांसाठी गुणरूपी १० देवदूतांना घेऊन करावयाच्या प्रयत्नांविषयी केलेले मार्गदर्शन

सौ. संगीता घोंघाणे
     ‘२२.१०.२०१६ या दिवशी ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांचा जिल्हा स्तरावरचा सत्संग दादर येथील सेवाकेंद्रात होता. त्या वेळी दिवाळीमध्ये साधनेसाठी करावयाच्या प्रयत्नांच्या संदर्भात ‘पुढील आठवड्याचे सर्वांचे नियोजन काय आहे ?’, असे सौ. घोंगाणेकाकूंनी (सौ. संगीता घोंगाणे यांनी) विचारल्यावर सर्व साधिकांच्या तोंडवळ्यावर ताण दिसला. त्या वेळी ‘दिवाळीची सिद्धता करायची आहे. फराळ आणि घराची स्वच्छता करायची आहे. सेवाही पुष्कळ आहेत; पण घरातील कामांना प्राधान्य द्यावे लागेल. पाहुण्यांचे आदरातिथ्य करावे लागेल. या सर्वांमधून व्यष्टी आणि समष्टी साधना यांचा मेळ कसा राखायचा ? पुढील ८ ते १० दिवसांमध्ये घरातील कृती करण्यात वेळ जाईल. मग आवरण वाढेल. ते घालवण्यासाठी परत काही दिवस वेळ जाईल. चुका होतील. त्यांचा ताण येईल’, असे सर्व विचार मनात येत होते. त्या वेळी सौ. घोंघाणेकाकूंच्या माध्यमातून गुरुदेवांनीच ‘खरी दिवाळी कशी साजरी करायची आणि दिवाळीचा खरा आनंद कसा घ्यायचा ?’, ते शिकवले. त्यांनी सांगितलेली सूत्रे पुढे देत आहे.’
- सौ. वेदिका पालन, डोंबिवली.
१. मनाची स्वच्छता करणे 
     ‘या वर्षीच्या दिवाळीत आपण आपले मन अर्पण करूया. घराची स्वच्छता आपण प्रत्येक वर्षीच करतो. या वर्षी मनाची स्वच्छता करूया. 
२. घरातील कर्तव्ये करतांना ती भावपूर्ण आणि साधना म्हणून करावीत.
३. झोपेच्या वेळेच्या व्यतिरिक्त उर्वरित वेळेत व्यष्टी साधनेसाठी प्रयत्न करणे 
     ‘ठराविक वेळेत व्यष्टी साधना करायची आहे’, या विचारापेक्षा ‘झोपेचे ६ घंटे सोडले, तर उरलेले १८ घंटे व्यष्टी साधना करायची आहे’, असा विचार करावा, म्हणजे स्वभावदोेष आणि अहं निर्मूलन यांसाठी सतत प्रयत्न करावेत. भावजागृतीचे प्रयत्न करावेत.
४. परेच्छेने वागणे 
४ अ. साधनेत अडथळा येणार नाही अशा गोष्टींत परेच्छेने वागणे : सर्वांचा स्वतःच्या मनाप्रमाणे करण्याचा भाग पुष्कळ आहे. त्यामुळे सर्वांनी या दिवाळीत परेच्छेने वागायचे आहे; मात्र परेच्छेने वागतांना तारतम्य बाळगावे. ज्या गोष्टीचा साधनेत अडथळा येणार नाही, त्या गोष्टी परेच्छेने कराव्यात, उदा. भाजी, फराळ असे पदार्थ विचारून केल्याने साधनेत अडथळा येणार नाही; पण सेवेला जाण्याच्या संदर्भात विचारून करण्याने जर अडथळा येत असेल, तर तेथे तारतम्याने घ्यावे.
४ आ. परेच्छेत स्वतःची इच्छा येऊ न देणे : परेच्छेने वागतांना स्वतःची इच्छा सांभाळत परेच्छेने वागायचे नाही, म्हणजे आपल्याला जे करावेसे वाटते, ते इतरांना पटवून सांगून त्यांनी ‘हो’ म्हटले की, मग त्याप्रमाणे, म्हणजे शेवटी आपल्याच मनाप्रमाणे करायचे. असे न करता खरोखर इतरांच्या मनाप्रमाणे, प्रामाणिकपणे परेच्छेने वागण्याचा प्रयत्न करावा. 
४ इ. परेच्छेने वागल्याने होणारे लाभ
१. मनाने करण्याचा भाग न्यून होतो.
२. ‘स्व’चे विचार न्यून होतात.
३. स्वतःच्या विचारांवर ठाम रहाण्याचा भाग न्यून होतो.
४. ‘मी’पणा न्यून होतो.
५. अपेक्षा न्यून होतात.
६. स्वत:चे म्हणणे खरे करण्याचा भाग न्यून होतो.
७. विचारण्याची आणि ऐकण्याची वृत्ती वाढते.
८. इतरांचा विचार करण्याचा भाग वाढतो.
९. त्याग आणि नम्रता वाढते. 
१०. आसक्ती न्यून होतेे.
११. निरपेक्षता वाढते.
५. आपल्या वाटणार्‍या सर्व गोष्टींवरील अधिकार सोडणे 
     घरात पाहुण्यासारखे रहावेे. ‘घर, पैसा, घरातील कोणतीही गोष्ट, वस्तू आणि व्यक्ती यांवर आपला काहीच अधिकार नाही’, असा विचार करावा. एकदम अंतीम टप्प्याचा विचार करायचा झाला, तर ‘आता अकस्मात् जर माझा मृत्यू झाला, तर घरातील काही अडणार आहे का ? ते चालूच रहाणार ना ?’, असा विचार करावा.
६. प्रतिदिन समष्टी सेवा होण्यासाठी प्रयत्न करणे 
     घरातील सेवाही करायच्या आहेत आणि समष्टी सेवाही करायची आहे, तर दोघांचेही परिपूर्ण नियोजन करावे. नियोजन करतांना प्रतिदिन समष्टी सेवा होईल, हे पहाणे आवश्यक आहे; कारण त्या सेवेच्या माध्यमातूनच गुरुकृपेचा ओघ सतत राहील आणि आवरण वाढणार नाही. 
७. वरीलप्रमाणे प्रयत्न करण्यासाठी गुरुदेवांनी दिलेल्या गुणरूपी १० देवदूतांचे साहाय्य घेणे 
     वरीलप्रमाणे प्रयत्न करतांना आपले स्वभावदोष आणि अहं यांमुळे आपल्याला कठीण वाटेल. आपला संघर्ष होईल. थोडे प्रयत्न केल्यावर थांबवावेसे वाटतील; परंतु गुरुदेवांनीच हे प्रयत्न करायला सुचवले आहे आणि त्यासाठी लागणारी शक्तीही त्यांनीच दिली आहे, असा भाव ठेवायचा. वरीलप्रमाणे प्रयत्न करतांना आपल्याला आनंद मिळावा, त्यांतील सातत्य टिकून रहावे, प्रयत्नांची परिणामकारकता वाढावी, यांसाठी गुरुदेवांनी त्यांचे १० देवदूत आपल्यासमवेत दिले आहेत. त्यांना समवेत घेऊन आता आपल्याला आपले स्वभावदोष आणि अहं यांवर आक्रमण करायचे आहे. ते देवदूत आपल्या आजूबाजूलाच असतील आणि तेच आपल्याकडून प्रयत्न करवून घेतील. प्रत्येक देवदूत साहाय्य करतांना सांगितलेल्या क्रमानेच आपल्याला साहाय्य करेल. कुठेही सेवेला जातांना, घरात असतांना त्या देवदूतांना समवेत घेऊनच जायचे. मग तेच कार्य करतील.
७ अ. दहा देवदूत 
७ अ १. ध्येय : हा देवदूत आपले प्रत्येक कृतीतील ध्येय निश्‍चित करून घेईल. गुरुदेवांना ध्येय ठेवून केलेली कृती आवडते. प.पू. डॉक्टरांचे तत्त्व ध्येयामध्ये आहे. त्यामुळे तेच ध्येयाप्रमाणे कृती करवून घेतील. ध्येय म्हणजेच प.पू. डॉक्टर ! त्यामुळे ‘ध्येयाच्या माध्यमातून आपण गुरुदेवांना भेटणार आहोत’, असा भाव ठेवावा. सकाळी उठल्यावर अंथरुणात असतांनाच सर्वांनी गुरुदेवांचे चरण आठवून त्यांच्या चरणांवर डोके ठेवून दिवसभरातील कृतींचे ध्येय ठरवावे, उदा. संपर्क करतांना अमुक दोषांवर मी प्रयत्न करणार, दिवसभरात किती प्रार्थना करणार ? किती वेळा क्षमायाचना करणार ? इत्यादी.
७ अ २. नियोजन : हा देवदूत ‘ठरवलेल्या ध्येयाला प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी काय काय करायला पाहिजे ?’, याचे विस्तृत नियोजन करवून घेईल. अयोग्य कृती म्हणजेच स्वभावदोष आणि अहं यांवर आक्रमण करून योग्य कृती करवून घेणारा हा देवदूत आहे. नियोजन करतांना ‘ते बारकाव्यांसहित, वस्तुनिष्ठतेने कसे होईल ?’, याकडे तो लक्ष देईल. एकेक कृती झाल्यावर तो आपल्याला सातत्याने पुढील नियोजनाची आठवण करून देईल. त्यामुळे आपल्या मनात इतर विचार यायला वेळच मिळणार नाही आणि आपण दिवसभर चैतन्यात राहू शकू. 
७ अ ३. भाव : हा देवदूत आपल्याला प्रत्येक कृती भावपूर्ण करायला शिकवील. सर्व देवदूत देवाने पाठवले आहेत. त्यामुळे ‘देवाने सांगितलेले करायचेच आहे’, असा भाव सातत्याने जागृत ठेवण्यासाठी हा देवदूत साहाय्य करील. ‘भाव तेथे देव’ या उक्तीप्रमाणे प्रत्येक कृती करतांना देवाच्या अस्तित्वाची अनुभूती घेता येईल. भाव असेल, तरच ध्येय साध्य होईल. 
७ अ ४. पालटण्याची तळमळ : वरील तीन देवदूत आले की, हा देवदूत आपोआपच येईल. अध्यात्मात तळमळीला ८० टक्के महत्त्व आहे. ‘मला स्वत:ला पालटायचे आहे’, हा विचार सातत्याने आपल्या मनात जागृत ठेवेल आणि त्यानुसार कृती करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करवून घेईल. 
७ अ ५. प्रार्थना : हा देवदूत आपल्या बाजूलाच असेल. आपण त्याला बोलावले की, तो लगेच येईल. वरील सर्व देवदूतांचे कार्य तळमळीने आणि निर्विघ्नपणे करता यावे, यासाठी तो आपल्याकडून आर्ततेने अन् तळमळीने प्रार्थना करवून घेईल. ‘देवा, तूच करवून घे. तूच मात करायला शिकव’, अशा प्रार्थना तो करवून घेईल. वरील सर्व कृती करतांना ‘आपण बुद्धीने त्या कृती करू शकणार नाही. त्या आपल्या क्षमतेच्या पलीकडच्या आहेत’, ही जाणीव निर्माण करून ‘प्रार्थनेच्या बळावरच आपण सर्व करू शकतो’, हे तो सातत्याने आपल्या मनावर बिंबवील.
७ अ ६. सतर्कता : हा देवदूत पहारेकर्‍याप्रमाणे सतत आपल्या मनावर पहारा देईल. ‘कोणते स्वभावदोष आणि अहं उफाळून येत आहेत ?’, याकडे सातत्याने लक्ष ठेवील. वरीलप्रमाणे प्रयत्न करतांना आपण कुठे अल्प पडत आहोत किंवा आपल्यातील जाणीव, गांभीर्य अल्प झाले आहे, याची हा देवदूत सातत्याने आठवण करवून देईल. ठरवलेल्या नियोजनाप्रमाणे काही होत नसेल, मन पुन्हा त्याच्या पद्धतीने करायला प्रारंभ करत असेल, तर हा देवदूत लगेच आपल्याला जागृत करील आणि त्यावर मात करायला सांगील. भाव अल्प पडला, पालटण्याची तळमळ अल्प झाली की, तो लगेच आपल्याला आठवण करवून देईल. त्यामुळे त्याचे कार्य आपल्या आजूबाजूला सतत चालू असेल.
७ अ ७. अनुसंधान : वरील सर्व प्रयत्न करतांना हा देवदूत आपल्याला सातत्याने देवाच्या अनुसंधानात ठेवील. वरीलप्रमाणे प्रयत्न करायला लागल्यावर ‘या देवदूताच्या माध्यमातून देव आपल्याला योग्य आणि अयोग्य काय आहे ?’, ते सांगील. 
७ अ ८. अपराधीभाव : वरील सर्व प्रयत्न करायला प्रारंभ केल्यावर ‘आपण न्यून पडतो, देवाच्या सेवेत अल्प आहोत’, असा विचार येऊन अपराधीभाव निर्माण होतो. 
७ अ ९. कृतज्ञता : ‘आपण अल्प पडत असूनही देव आपल्याला किती संधी देतो, देव आपल्यासाठी काय काय करतो ?’, याचे विचार देऊन हा देवदूत आपल्या मनात कृतज्ञताभाव निर्माण करेल.
७ अ १०. शरणागती : आपण तोंडाने ‘देवा, मी तुला शरण आलो आहे’, असे कितीही म्हटले, तरी खरी शरणागती ही वरीलप्रमाणे प्रयत्न केल्यावरच निर्माण होते’, असे हा देवदूत आपल्याला जाणीव करवून देईल. 
    प्रसाराला गेल्यावर, घरात असतांना, प्रत्येक कृती करतांना वरील सर्व देवदूतांना समवेत घेऊन गेलो, तर आपण लवकरच देवाच्या चरणांपर्यंत पोचू.
८. प्रार्थना 
     हे श्रीकृष्णा, या देवदूतांच्या माध्यमातून तूच आम्हाला तुझ्या चरणांजवळ येण्याचा सुलभ मार्ग सांगितला आहेस. त्याबद्दल आम्ही सर्व साधक तुझ्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहोत. तूच आमच्याकडून त्याप्रमाणे प्रयत्न करवून घे. या प्रयत्नांमधील आनंद आम्हाला अनुभवता येऊ दे.’ 
- सौ. संगीता घोंगाणे, दादर, मुंबई. (नोव्हेंबर २०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn