Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सेवेची फलनिष्पती वाढण्यासाठी साधकांनी लक्षात घ्यायची सूत्रे !

सौ. कमलिनी कुंडले
     देवद आश्रमाची आध्यात्मिक स्थिती सुधारण्यासाठी आम्हा स्वतःला सुधारण्याचे आध्यात्मिक स्तरावरचे प्रयत्न होत नाहीत; परंतु निदान कार्य तरी परिपूर्ण, सहज, सोपे आणि अनुशासनबद्ध होण्यासाठी बुद्धीच्या स्तरावर प्रयत्न व्हावेत, यासाठी काही सूत्रे सुचली. आपल्याला सेवेची फलनिष्पत्ती वाढवायची असेल, तर आपल्या वेळेचे परिपूर्ण नियोजन केले पाहिजे. त्यासाठी प्रत्येक साधकाला काही महत्त्वाच्या सवयी अंगी बाणवाव्या लागतील. त्यातील काही महत्त्वपूर्ण सवयींचा येथे विचार केला आहे.
१. कार्यालये आणि आस्थापने यांची कामकाजाची पद्धत
१ अ. कर्मचारी अन् अधिकारी यांच्या कार्यालयात उपस्थित रहाण्याच्या ठराविक वेळा 
      व्यवहारात अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात त्यांच्या ठरलेल्या वेळेतच पोेचतात. अनेक कार्यालयांचे काम सकाळी ९.३० किंवा १० वाजता चालू होते. कार्यालयातील अधिकारीवर्ग किंवा मालक अनुमाने ११ ते १२ वाजेपर्यंत पोचतात. अधिकारी किंवा मालक यांच्या भेटीगाठी, बैठका ते कार्यालयात किंवा दुकानांत आल्यावर लगेचच चालू होतात. त्यामुळे त्यांच्या कामाची पूर्वसिद्धता करण्यासाठी अन्य कर्मचार्‍यांनी घंटाभर तरी आधी कार्यालयात उपस्थित असले पाहिजे, असा दंडक असतो.
१ आ. कार्यालये आणि आस्थापने यांच्यातील कर्मचार्‍यांचा ठरलेला कामांचा क्रम
      बहुतेक कार्यालयांत सकाळी सर्वप्रथम मालक किंवा प्रमुखांसमवेत मुख्य अधिकार्‍यांची बैठक असते. त्यात आदल्या दिवशी झालेली कामे, आलेल्या अडचणी आणि त्यांवर केलेले उपाय हा सर्वात महत्त्वाचा विषय असतो. साहजिकच याची सविस्तर माहिती घेऊनच अधिकार्‍यांनी बैठकीला येणे अपेक्षित असते. आपापल्या विभागाची सविस्तर माहिती सिद्ध करून ठेवण्याचे उत्तरदायित्व अन्य कर्मचार्‍यांकडे असते. या बैठकीत प्रथम मागील दिवसांचा आढावा नंतर त्या दिवसाच्या कामांचे नियोजन आणि त्यानंतर पुढील आठवड्यातील कामांविषयी चर्चा अन् त्याचे नियोजन केले जाते. अशा वेळी एखादा अधिकारी वेळेत आला नाही, पुरेशी माहिती न घेताच किंवा काही चुकीची माहिती घेऊन बैठकीला आला, तर सर्वांच्याच कामाचा खोळंबा होऊ शकतो. प्रसंगी आस्थापनाची हानी होऊ शकते. त्यामुळे त्याला कडक शिक्षाही भोगावी लागते; म्हणून प्रत्येक जण वेळेत पोचण्याचा आणि त्याचे काम परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. केवळ मासिक वेतन किंवा पदोन्नती मिळावी; म्हणून काम करणारे इतका प्रयत्न करतात.
२. मनुष्यजन्माचे सर्वोच्च ध्येय ईश्‍वरप्राप्ती
हे साध्य करण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करणे आवश्यक
      आपण मनुष्यजन्माचे सर्वोच्च ध्येय ईश्‍वरप्राप्ती हे साध्य करण्यासाठी आलो आहोत. आपल्याकडे ना कुणी अधिकारी, ना मालक ! त्यामुळे आपण प्रत्येक जण प्रत्येक सेवेसाठी १०० टक्के उत्तरदायी असतो. त्यामुळे आपण सर्वांनीच आपले ध्येय गाठण्यासाठी, स्वभावदोष अन् अहं-निर्मूलनासाठी आणि सेवा परिपूर्ण होण्यासाठी जीव तोडून प्रयत्न का करत नाही ?, असा प्रश्‍न स्वतःला विचारावा.
३. साधकांची साधना आणि सेवा यांची फलनिष्पत्ती वाढण्यासाठी अवलंबायच्या काही गोष्टी
३ अ. सेवेत अनुशासन राखणे
३ अ १. समयमर्यादेत सेवा करण्याचे महत्त्व मनावर बिंबवणे : कोणत्याही सेवा या एकमेकांशी निगडित असतात. प्रत्येक साधकाला मिळालेली सेवा त्याने योग्य रितीने आणि समयमर्यादेत पूर्ण केली नाही, तर त्याचा गंभीर परिणाम मुख्यसेवेवर होतो. त्यासाठी प्रत्येकाने त्याची सेवा चोख आणि वेळेत पूर्ण करणे अपरिहार्य आहे, याची जाणीव साधकांनी मधूनमधून सर्वांना करून देणे आवश्यक आहे.
३ अ २. क्षमतेनुसार सेवा देणे : सेवेतील हे अनुशासन राखत असतांनाच साधकाला क्षमतेनुसार सेवा दिली आहे ना ? दिलेल्या वेळेत तो ती सेवा पूर्ण करू शकतो ना ? त्याला काही अडचणी नाहीत ना ?, याचाही विचार होणे आवश्यक आहे.
३ अ ३. साधकाला नवीन सेवा शिकवण्याचे नियोजन : एखाद्या अकुशल साधकाला सेवा दिली असेल, तर ती सेवा योग्य पद्धतीने आणि परिपूर्ण होण्यासाठी प्रत्येक टप्प्याला कुशल साधकाने ती शिकवण्याचे नियोजन करावे. ती सेवा शिकवतांना प्रेमाने, न कंटाळता आणि त्या साधकामध्ये आत्मविश्‍वास निर्माण होईल, अशा प्रकारे शिकवली पाहिजे. तो साधक जोपर्यंत ती सेवा आत्मविश्‍वासपूर्वक करत नाही, तोपर्यंत त्याला साहाय्य करावे. संबंधित साधकांनी त्या साधकाची क्षमता आणि कार्यकुशलता यांचा अभ्यास करावा. त्यासाठी अन्य साधकांचे साहाय्य घेऊन त्याला शिकवण्याची समयमर्यादा निश्‍चित केली पाहिजे. त्या साधकाची क्षमता आणि कार्यकौशल्य यांचा योग्य अभ्यास नसेल, तर त्यातून बर्‍याच वेळा सेवेवर विपरित परिणाम होतो. एक साधिका काही वर्षे एकाच ठिकाणी सेवा करत होत्या; परंतु त्या शेवटपर्यंत सक्षम झाल्या नाहीत, असे एका शुद्धीकरण सत्संगातून एका संतांनी लक्षात आणून दिले. साधक पुढच्या टप्प्याचे शिकतो आहे की नाही, याकडेही लक्ष ठेवावे. आवश्यक असेल, तर सेवा करण्याच्या पद्धतीत पालट करावा किंवा दुसरा साधक नेमावा आणि त्या साधकाला दुसरी सेवा द्यावी. सेवेचे अनुशासन बिघडू न देणे आवश्यक असते.
३ आ. साहित्याची हाताळणी
      प्रत्येक ठिकाणी प्रतिदिन अनेक प्रकारच्या वस्तू हाताळल्या जातात. त्या वस्तूंचा सुयोग्य आणि काटेकोर वापर होत आहे ना ?, इकडेही लक्ष द्यावे. त्यांची योग्य पद्धतीने हाताळणी झाली नाही, तर कोणतीही वस्तू वेळेवर सापडत नाही. त्यामुळे सर्वांच्याच वेळेचा अपव्यय होतो आणि चिडचीड होते ती वेगळीच. सेवा गतीने आणि व्यवस्थित होण्यासाठी भ्रमणभाष, फॅक्स, संगणक, इंटरनेट, प्रिंटर, झेरॉक्स मशिन अशी अनेक वेगवेगळी उपकरणे आपण वापरत असतो. त्यांची देखभाल व्यवस्थित आणि वेळेवर झाली नाही, तर सेवेत अडचणी येतात. संगणक बंद पडला किंवा त्याची गती मंदावली, प्रिंटर किंवा झेरॉक्स यांच्यासाठीचा कागद संपला, अशा कोणत्याही अडचणी कुणालाही येऊ नयेत, अशी चोख व्यवस्था ठेवण्याचे दायित्व प्रत्येकाचेच आहे, ही जाणीव सतत जागृत ठेवली पाहिजे.
३ इ. स्थितीचे नेमके आकलन
      कोणतीही सेवा टप्याटप्याने होत असते. प्रत्येक सेवेत काही ना काही अडचणीही येत असतात; पण बहुतेक वेळा साधक सेवेची नेमकी स्थिती न सांगता त्यांना असलेल्या अडचणी सांगतात. प्रत्येक साधकाला सेवा नेमक्या कुठल्या टप्यावर आहे, हे सांगता आले पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने स्वतःला तशी सवयही लावून घेतली पाहिजे आणि अडचणींचा विचार करून त्यावर पर्यायी उपाययोजनाही केली पाहिजे. प.पू. डॉक्टर म्हणतात, अडचणींच्या मुळाशी जाणारा साधकच अडचण दूर करू शकतो. हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे.
३ ई. पर्याय सिद्ध ठेवणे
      प्रत्येक सेवेत काही अडचणी येऊ शकतात. त्यासाठी कोणत्या सेवेत कोणत्या अडचणी येऊ शकतात, याचा ढोबळमानाने प्रत्येकाचा अभ्यास असला पाहिजे. बहुतेक साधक न्यूनतम ४ - ५ वर्षांपासून ते ८ - १० वर्षे एकाच ठिकाणी आणि त्याच प्रकारच्या सेवा करत आहेत. प्रत्येक साधकाला केव्हातरी अडचणींना सामोरे जावे लागले असल्याने त्यांचा विचार करून सेवा वेळेत पूर्ण होण्यासाठी पर्यायी उपाययोजना शोधली पाहिजे. अशा पर्यायांचा विचार केला नाही, तर ती सेवा किती काळ प्रलंबित रहाणार याचा आडाखा बांधणेही अवघड जाते. एका साधकाकडे एक सेवा अनेक वर्षे प्रलंबित होती. त्यामुळे अनेक अडचणी येत होत्या; परंतु कुणीच पुढाकार घेऊन ती सेवा पूर्ण करण्यासाठी त्यांना साहाय्य केले नाही. शेवटी त्यांना व्यष्टी साधना करण्यास सांगून प्रलंबित राहिलेली सेवा पूर्ण करून घ्यावी लागली.
३ उ. वर्गीकरण
      सर्व वस्तूंचे, साहित्याचे आणि कागदपत्रांचे आवश्यकतेनुसार वर्गीकरण करावे. उपयुक्त असेल तेवढेच साहित्य ठेवून शेष साहित्य त्वरित काढून टाकले पाहिजे. यातील वर्गीकरण जेवढे महत्त्वाचे तेवढेच उर्वरित साहित्याचे काय करायचे ?, याचे काय करायचे, हेही महत्त्वाचे आहे. संगणकात कालबाह्य झालेल्या धारिका कधीतरी लागतील; म्हणून ठेवलेल्या असतात. त्यामुळे संगणकाची गती मंदावते आणि संगणक हँग होण्याचे प्रमाणही वाढते. यावर उपाय म्हणजे अशा कधीतरी लागणार्‍या धारिका वेगळ्या काढून संगणकाची क्षमता वाढवली पाहिजे. दुसरे उदाहरण म्हणजे नियतकालिके, पुस्तके, धार्मिक आणि आध्यात्मिक ग्रंथ यांचे वर्गीकरण करून नियमित लागणारे, कधीतरी लागणारे आणि विषयवार असे वर्गीकरण करावेे. अशाच प्रकारे त्या त्या ठिकाणाच्या साहित्याविषयी करावे. केवळ वेळेवर निर्णय न घेतल्याने आश्रमातील काही साहित्याची बरीच मोठी हानी होऊ शकते, याची जाणीव आपल्याला पदोपदी असली पाहिजे.
३ ऊ. क्रमबद्ध मांडणी
      ही पद्धत म्हणजे भारतीय गृहिणीचे वैशिष्ट्य म्हणता येईल. स्वयंपाकासाठी लागणार्‍या सर्व वस्तू पटापट मिळाव्यात, अशा कौशल्याने गृहिणी स्वयंपाकगृहाची मांडणी करते. वस्तूचे ठरलेले स्थान हे सूत्र कार्यालयीन सेवेसाठीसुद्धा तेवढेच उपयुक्त आहे. आपल्याला लागणारी प्रत्येक महत्त्वाची वस्तू आपल्या बसण्याच्या ठराविक ठिकाणी आणि वारंवार उठावे लागू नये, अशा प्रकारे ठेवलेली असावी. आपल्या पटलावर अन् त्याच्या खणात कोणत्या वस्तू असाव्यात, तसेच त्या उपयुक्ततेेनुसार कुठे असाव्यात, हे ठरलेले असले, तर शोधाशोध करण्यात वेळ जात नाही. कपाट, पटल, खण किंवा मांडणीत ज्या वस्तू ठेवल्या असतील, त्यांची ठळक अक्षरातील एक सूची बनवून ती त्या कपाट आणि तत्सम वस्तूंना चिकटवावी. काही वेळा काही अडचणींमुळे काही वस्तू उदा. पुस्तके, मासिके इत्यादी किंवा कात्रणांच्या धारिका खोक्यात भरून ठेवाव्या लागतात. अशा वेळी त्या खोक्यावर त्यातील वस्तूंच्या नावाची विषयासह सूची लावली असेल, तर पाहिजे ती वस्तू लगेच मिळू शकते. त्यामुळे त्या साधकाच्या अनुपस्थितही वस्तू मिळण्यात अडचण येणार नाही. येणार्‍या आपत्काळाचा विचार करून आतापासूनच आपली सिद्धता असायला पाहिजे. अगदी मध्यरात्रीच्या अंधारातही हवी असलेली नेमकी वस्तू हातात आली पाहिजे. यासाठी प्रत्येक साधकाने घेतलेली वस्तू आळस किंवा कंटाळा न करता पुन्हा त्याच ठिकाणी ठेवण्याची सवय लावली पाहिजे.
३ ए. नीटनेटकेपणा आणि स्वच्छता
      सेवेचे ठिकाण जेवढे नीटनेटके आणि स्वच्छ, तेवढे मन प्रसन्न रहाते. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण ।, असे एक सुवचन आहे. मन प्रसन्न असेल, तर सेवा करायला उत्साह येईल. आपले पटल, आसंदी, संगणक, भ्रमणभाष, दूरभाष आदी निर्जीव वस्तूही आपले सहकारी साधक आणि गुरुसेवक वाटले पाहिजेत. तो भाव निर्माण होण्यासाठी आपण सेवेला आल्यावर कापड घेऊन पुन्हा एकदा त्यांवरून स्वतःचा हात फिरवावा. म्हणजे अन्य स्वच्छता करणार्‍या साधकाकडून आपल्याला अपेक्षा रहात नाही आणि स्वतःच्या दायित्वाचीही जाणीव वाढते.
३ ऐ. प्रमाणीकरण
      या सूत्रातील वर दिलेली सूत्रे, म्हणजे सेवेचा ९८ टक्के तात्त्विक भाग आहे आणि हे सूत्र म्हणजे २ टक्यांचा प्रायोगिक भाग आहे. यावरून याचे महत्त्व लक्षात येईल. यामध्ये सर्व सेवा परिपूर्ण होण्यासाठी संबंधित साधकांनी अन्य साधकांच्या सूचना विचारात घेऊन आणि सर्वांच्या सहमतीने घालावयाची कार्यपद्धत अंतर्भूत आहे. या कार्यपद्धतीचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करणे, तसेच त्यात आलेल्या अडचणी मांडणे, त्यात सुधारणा होण्याच्या दृष्टीने याचा सातत्याने अभ्यास करत रहाणे, म्हणजे २ टक्क्याचा प्रत्यक्ष प्रयोग. साधकांना त्यांच्या अडचणी आणि समस्या मोकळेपणाने मांडता याव्यात, असे खुले विश्‍वासार्ह वातावरण साधकांनी निर्माण करणे, तसेच त्यांच्या अडचणींचे शक्य तितक्या तातडीने निराकरण करणे, त्यात साधकांना काही अडचण असल्यास तशी सुस्पष्ट कल्पना अन्य साधकांना देणे, अडचण सोडवण्यासाठी लागणारी समयमर्यादा स्पष्टपणे सांगणे आणि मधल्या कालावधीत स्वतःहून त्याचा पाठपुरावा साधकांना देणे, इतर साधकांना सेवा घेण्यास प्रोत्साहित करणे, इत्यादी गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. चांगल्या साधकाचे अनुकरण इतर सर्व साधकही करतात, त्यामुळे त्यांनी सतर्क रहाणे आवश्यक आहे.
३ ओ. स्वयंअनुशासन
      स्वयंअनुशासन म्हणजे सर्वजण मिळून होणारा आम्ही, म्हणजेच मी, असा व्यापक अर्थ येथे आहे. केवळ इतरांसाठी अनुशासन आहे, माझ्यासाठी नाही, असा कोणाचाही भ्रम होऊ नये; म्हणून प्रत्येकाने स्वतःसह इतरही सगळे अनुशासन पाळत आहेत ना ? हे पहाणे, हा या सूत्राचा उद्देश आहे. केवळ संबंधित साधकांनी कार्यपद्धत किंवा नियम घालून त्याचा फारसा उपयोग होत नाही. त्यासाठी सर्वांनीच सर्वांच्या हितासाठी स्वयंअनुशासन पाळणे, हेच अंतिमतः सर्वांच्या कल्याणाचे आहे. आपण कधी प्रवासाला गेला असाल, तर एस.टी. स्थानकावरचे एक वाक्य वाचण्यात आले असेल, ओळीचा लाभ सर्वांना तसेच येथेही आहे. स्वयंअनुशासनाचा लाभ सर्वांना होतो.
४. होणारे लाभ
      या पद्धतीमुळे कोणत्याही गोष्टीची शोधाशोध करण्यासाठी लागणारा वेळ आणि श्रम वाचतात. चिडचीड, प्रतिक्रिया येणे, राग येणे आणि अपेक्षा असणे, या दोषांची तीव्रता न्यून होऊ शकते. सेवा करतांना आपले मानसिक, बौद्धिक संतुलन आणि ऊर्जा व्यवस्थित टिकून रहाते. मनाची सकारात्मकता वाढते. परिणामस्वरूप सेवा लक्षपूर्वक आणि परिपूर्ण होते, तसेच आपल्या कार्यक्षमतेत वाढ होऊन फलनिष्पत्तीही वाढते. सेवेची गुणवत्ता सुधारते आणि सेवेतून आनंद मिळतो. मुख्य म्हणजे आपल्या साधनेवर लक्ष केंद्रित करण्यास साहाय्य होते. आपला आत्मविश्‍वास वाढतो. त्यामुळे आपली स्वभावदोष आणि अहं निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्यासाठी वेळ आणि ऊर्जा मिळते. स्वभावदोष आणि अहंमध्ये घट होऊन गुणवृद्धी होते. सर्वांप्रती प्रेमभाव निर्माण होतो. संघटितपणा वाढतो. त्यामुळे आपण ईश्‍वरप्राप्तीच्या मार्गावर गतीने मार्गक्रमण करतो. मग तो सुवर्णदिन लवकरच उगवेल, त्या दिवशी आपण सर्व जण श्रीकृष्णाशी एकरूप होऊ.
मला स्वतःला आध्यात्मिक स्तरावर काय आणि कसे असते किंवा कसे करावे, ते ठाऊक नाही; पण सर्वसामान्यपणे जे सहज, सुलभ असे आपल्या बौद्धिक क्षमतेनुसार (ईश्‍वरी सेवेसाठी बुद्धी अर्पण करणे) करत गेलो, तर एक दिवस आध्यात्मिक स्तरावरचेही देव शिकवील, असे वाटते. काही वेळा आम्ही बुद्धी अर्पण न करता बुद्धीचा अयोग्य वापर करून बुद्धीशी वैर मांडलेले असते. त्यामुळे आमच्याकडून चुका होतात आणि परिणामी स्वतःसह इतरांच्या हानीला कारणीभूत ठरल्याने आमचे पाप मात्र वाढते.
      हे भगवंता, एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ हे सुवचन कृतीत आणण्यासाठी आम्हा सर्वांनाच तुझ्या कृपेचे बळ दे. आम्हाला सेवेच्या माध्यमातून तुझ्या चरणी बुद्धी अर्पण करायला शिकव, अशी तुझ्या चरणी प्रार्थना !
- सौ. कमलिनी कुंडले, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२.६.२०१५)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn