Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कुटुंबियांची पित्याप्रमाणे काळजी घेणारे आणि ‘ते आनंदी रहावेत’, यासाठी प्रयत्न करणारे श्री. अमोल बधाले !

श्री. अमोल बधाले
     रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे श्री. अमोल बधाले यांच्याविषयी त्यांच्या आई श्रीमती संध्या बधाले यांनी लिहिलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. गुणवैशिष्ट्ये
१ अ. समाधानी वृत्ती : ‘मी घरी असतांना त्याला ‘त्याच्या वाढदिवसासाठी काय आणू’, असे विचारल्यावर तो म्हणाला, ‘‘आता मला पुष्कळ सेवा आहे. आठवले की, मी सांगेन.’’ त्याने शेवटपर्यंत ‘काय पाहिजे’, हे सांगितले नाही. त्याचा ‘देवाने इथे सर्व दिले आहे’, असा विचार असून तो नेहमी समाधानी असतो. 
१ आ. सकारात्मक दृष्टीकोन देणे : आमच्या घराच्या कट्ट्यावर तुळशीची आणि कोरफडीची कुंडी होती. एकदा त्या अचानक कट्ट्यावरून खाली पडल्या. तुळशीची कुंडी फुटल्याने माझ्या मनात ‘हा त्रासाचा भाग असावा’, असा विचार आला. नंतर घरावर माकड येऊन बसले. मी हे दोन्ही प्रसंग अमोलला सांगितले. तेव्हा तो म्हणाला, ‘‘आपण कुठेही असलो, तरी देव आपले रक्षण करतो.’’
१ इ. सेवा आणि साधना यांचे गांभीर्य असणे : अमोलला सेवेची पुष्कळ तळमळ आहे. तो सांगतो, ‘‘आई, सेवा आणि व्यष्टी साधना केली, तर त्रास न्यून होतो. मी आश्रमात असले आणि मला त्रास झाला, तर लगेच स्वतःहून जवळ येऊन ‘मी आध्यात्मिक उपाय पूर्ण केले का ?’ याची चौकशी करतो आणि मला ते पूर्ण करण्याचे महत्त्व पटवून देतो. आम्ही घरून आश्रमात आलो, तरी तो आम्हाला भेटायला आला नाही. मी त्याच्याकडे गेले, तेव्हा तो सेवा करत होता. तो सेवा करतच माझ्याशी बोलत होता. त्याला सेवा करण्याची तळमळ आणि ती पूर्ण होण्यासाठी धडपड असते, हे मला समजले. त्याची पूर्वीपेक्षा सेवेची तळमळही वाढली आहे
१ ई. शारीरिक त्रास असूनही आनंदी असणे : अमोलला तीव्र पाठदुखीचा त्रास आहे; पण तो पुष्कळ आनंदी असतो. तो कधी मला त्रास होतो, हे सांगत नाही.
१ उ. परात्पर गुरु डॉक्टरांवर श्रद्धा असणे : त्याची परात्पर गुरु डॉक्टरांवर पुष्कळ श्रद्धा आहे. तो म्हणतो, ‘‘देवाने आपल्या सर्वांना कठीण प्रसंगातून बाहेर काढून त्यांच्या चरणी ठेवले आहे. ही मोठी गुरुकृपा आहे.’’ 
२. जाणवलेले पालट 
     दिवाळीला घरी जाण्यापूर्वी आम्ही एका संतांना भेटलो. त्या वेळी त्यांनी आम्हाला सांगितले, ‘‘घरी गेल्यावर प्रतिदिन अमोलला साधनेचा आढावा द्या.’’
२ अ. अमोलने दिलेल्या दृष्टीकोनामुळे घराविषयीचे विचार न्यून होऊन ‘मी आश्रमात आहे’, असा सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे शक्य होणे : मी आणि सोनाली आश्रमातून घरी आलो, तेव्हा घरी पाण्याची पुष्कळ टंचाई होती आणि घरही पुष्कळ अस्वच्छ झाले होते. आम्ही दोघीही आजारी होतो. घरची स्थिती पाहून मनात पुष्कळ नकारात्मक विचार येऊन निराशा आली. त्यामुळे मला ‘मी कशाला घरी आले ?’, असे वाटले. अमोलने मला भ्रमणभाष केला. तेव्हा मी थकलेली होते. त्याने माझा आवाज ओळखला आणि म्हणाला, ‘‘देवाने जिथे ठेवले आहे, तो ‘आश्रमच आहे’, असा भाव ठेवून सेवा कर आणि तुम्ही दोघींना आवश्यक तेवढे पाणी देवाने दिले आहे. त्यानंतर त्याने माझा ‘अपेक्षा करणे’ हा दोष सांगून सकारात्मक दृष्टीकोन दिला. तेव्हापासून माझ्या मनात घराविषयी कसलाच विचार आला नाही. सतत ‘मी आश्रमात आहे’, हा विचार यायचा. अमोलच्या बोलण्यामुळे माझे विचार पालटले.
२ आ. ‘आई आजारी आहे’, हे ज्ञात नसतांनाही तिला भावजागृतीचे प्रयत्न करण्यास आणि आनंदी रहाण्यास तळमळीने सांगत रहाणे, त्यामुळे शारीरिक त्रासाकडे दुर्लक्ष करणे शक्य होणे : मी दिवाळीला घरी गेल्यावर मला शारीरिक त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी सांगितले की, मला विषमज्वर (टायफॉईड) हा आजार झाला आहे. ऐन दिवाळीच्या दिवशी मी रुग्णालयात होते. त्या वेळी मी अमोलला भ्रमणभाष केला. तेव्हा त्याने सांगितले, ‘‘आई, या वर्षी दिवाळी स्थुलातून नाही, सूक्ष्मातून साजरी कर. भावसत्संगात दिवाळीच्या कालावधीत भावजागृतीसाठी जे प्रयत्न करायला सांगितले आहेत, ते कर.’’ त्या वेळी अमोलला मी आजारी आहे, हे ज्ञात नव्हते, तरी त्याने ‘मी आजारी असतांना कसे प्रयत्न करायला हवेत’, ते सांगितले. त्याने मला भ्रमणभाषवरून ‘स्वयंसूचना, भावाचे प्रयत्न कसे करायचे आणि आनंदी कसे रहायचे’, तेही सांगितले. आरंभी मी त्याचे बोलणे ऐकत नसे; पण मी हसेपर्यंत तो माझ्याशी बोलत रहायचा. माझ्याकडून भावजागृतीचे प्रयत्न व्हावेत आणि मी आनंदी रहावे; म्हणून तो तळमळीने सांगत रहायचा. त्या वेळी मला ‘त्याच्या मुखातून गुरुमाऊलीच बोलत आहे’, असे वाटून माझे शारीरिक त्रासाकडे दुर्लक्ष व्हायचे. 
२ इ. आजारपणात अमोलशी बोलल्यावर आनंदी रहाता येणे : नंतर त्याला ‘मी आजारी आहे’, हे समजले. तेव्हा तो मला सांगायचा, ‘‘आई, खरी दिवाळी हिंदु राष्ट्रात आहे. तुला देवाने हा आजार दिला, तो तुझ्या प्रारब्धानुसार आहे.’’ मला दवाखान्यात त्रास व्हायचा; पण मी प्रतिदिन अमोलशी बोलले की, मन आनंदी होत असे आणि माझे उपाय होत असे.
२ ई. मुलीविषयी अपेक्षा वाढल्यावर ‘देवाने आजारपणात मुलीच्या रूपात सहसाधिका दिली आहे’; म्हणून तिच्याप्रती कृतज्ञ रहाण्यास सांगणे : मला सोनालीविषयी पुष्कळ अपेक्षा असायच्या आणि मी त्याला त्याविषयी सांगायचे. तेव्हा त्याने मला भावनिक स्तरावर कधी हाताळले नाही. तो म्हणायचा, ‘‘आई, सत्संगात सांगितले, ‘सहसाधक नसते, तर काय झाले असते. देवाने तुला आजारपणात मुलीच्या रूपात सहसाधिका दिली आहे. तिच्याप्रती कृतज्ञ रहा.’
२ उ. भावाविषयी असणारा पूर्वग्रह आणि अपेक्षा न्यून होऊन त्याच्यातील पालटाचे कौतुक करणे : पूर्वी अमोलचे अतुलशी पटत नसे; पण आता तो त्याला आवश्यक लागणार्‍या गोष्टी देतो. त्याच्या मनात अतुलविषयी असणारा पूर्वग्रह आणि अपेक्षा अल्प झाल्या. आता तो मला म्हणतो, ‘‘आई, अतुलमध्ये किती पालट झाला आहे.’’ मला त्रास होऊ नये; म्हणून तो अतुलला होत असलेले त्रास मला सांगत नसे. 
२ ऊ. बहीण आनंदी रहावी, यासाठी आईला समजावून सांगणे : सोनालीला नवीन भ्रमणभाष घ्यायचा होता; पण मी त्यास नकार देत होते. तेव्हा त्याने मला पुष्कळ समजावून सांगितले आणि स्वतः तिच्यासाठी भ्रमणभाष मागवून तो घरी पाठवून दिला. त्या वेळी अमोलच्या मनात ‘ताईच्या अडचणी समजून घेतल्या, तर ती आनंदी राहील’, असा विचार होता. तो आम्ही सर्वांनी आनंदी राहून साधना कशी चांगली होईल असा त्याचा विचार असतो. 
२ ए. ‘अमोलने घरी यावे’, अशी अपेक्षा असतांना त्याने तुम्हीच लवकर आश्रमात परत येण्यास सांगणे : पूर्वीच्या तुलनेत अमोल सतत आनंदी असतो. त्याला घरी जाण्याची इच्छा होत नाही. तो दिवाळीतही घरी आला नाही. मी आजारी होते; म्हणून ‘अमोल आणि अतुलने घरी यावे’, असे मला वाटत होते; पण तो म्हणाला, ‘‘आई, देव तुझी किती काळजी घेत आहे. तुम्हीच लवकर आश्रमात परत या.’’ 
३. अमोलचे शांतपणे समजावून सांगणे ऐकल्यावर संतांनी 
त्याला आढावा देण्यास सांगण्यामागील कारण लक्षात येणे 
     एक मासाच्या (महिन्याच्या) कालावधीत अमोलने मी उपाय, व्यष्टी साधनेकडे लक्ष देऊन करून आजाराकडे दुर्लक्ष करावे, यासाठी तो माझ्याशी बोलत असे. माझी चिडचीड झाली, तरी तो शांत राहून मला समजावून सांगायचा. तेव्हा मला समजले की, घरी गेल्यावर संतांनी मला प्रतिदिन साधनेचा आढावा देण्यास का सांगितले. मी चांगली साधना करावी म्हणून तो स्वतः आजारी असला, तरी माझी प्रेमाने चौकशी करत होता. 
     परमपूज्य, अमोलच्या माध्यमातून तुम्हीच माझी काळजी घेत आहात. तुम्ही सर्व कुटुंबाची काळजी घेणारा, तत्त्वनिष्ठ रहाणारा आणि गुरुसेवा तळमळीने करणारा अमोलसारखा मुलगा दिलात, यासाठी मी तुमच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहे.’ 
- श्रीमती संध्या तबाजी बधाले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.१२.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn