Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

शरणागत भाव आणि वर्तनातील पालट यांविषयी ६७ टक्के आध्यात्मिक स्तर असलेले अधिवक्ता सुधाकर चपळगावकर यांच्या लक्षात आलेली सूत्रे

अधिवक्ता सुधाकर
चपळगावकर
१. संचित, प्रारब्ध, क्रियमाण, पुनर्जन्म, मुक्ती, मोक्ष ही भारतीय
सनातन तत्त्वज्ञानाची 
मूलतत्त्वे असणे अन् आपल्या बुद्धीनुसार धर्माचे
पालन केल्यास मुक्तीसाठी ते पुरेसे असल्याची समजूत असणे
      परमेश्‍वराचे अस्तित्व मानावे कि मानू नये ?, हा प्रत्येकाच्या विचारशक्तीचा प्रश्‍न आहे. मृत्यूनंतर काय ? या विषयावर गेल्या अनेक वर्षांपासून तत्त्ववेत्त्यांनी आपापल्या परीने त्यांचे विचार मांडले आहेत. संचित, प्रारब्ध, क्रियमाण, पुनर्जन्म, मुक्ती, मोक्ष ही भारतीय सनातन तत्त्वज्ञानाची मूलतत्त्वे आहेत, असे मी मानतो. मनुष्यजन्मात या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करणारा स्वतःला मुक्तीमार्गाकडे नेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतो. एखाद्याने कधीही कुणावर अन्याय केला नाही, अन्याय सहन केला नाही, कुणावर अन्याय होऊ दिला नाही, प्रत्येकाचा सन्मान केला, रामायण आणि भगवद्गीता यांमध्ये सांगितलेल्या धर्माचे आपल्या बुद्धीनुसार पालन केले. एवढ्या गोष्टी त्याच्या मुक्तीसाठी पुरेशा आहेत, अशी त्याची समजूत असणे साहजिक आहे.
१ अ. आपल्या चांगल्या वागण्याच्या बदल्यात परमेश्‍वराने आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत; पण त्याच्याही पुढे जाऊन मुक्ती, मोक्ष द्यावा, अशी अपेक्षा करणे चुकीचे ! : भारतातील एक आधुनिक वैद्य आखाती देशात काही काळासाठी व्यवसायानिमित्त जाऊन राहिले होते. एका अती श्रीमंत व्यक्तीच्या घरी त्यांना उपचारासाठी पाचारण करण्यात आले. त्यांचे व्यावसायिक शुल्क त्यांनी मागितले, तितके त्यांना देण्यात आलेच; परंतु भारतामध्ये वैद्यांना मिळणार्‍या मान-सन्मानाची त्यांनी नकळत तुलना केली. तेव्हा त्यांच्या लक्षात आले, आपण जेवढे केले, त्याचे मूल्य आपल्याला मिळाले. त्यापेक्षा अधिक मिळावे, अशी अपेक्षा आपल्याला ठेवता येणार नाही. तद्वत आपल्या पुष्कळ चांगल्या वागण्याच्या बदल्यात परमेश्‍वराने आपल्याला धन-धान्य, समृद्धी, पुत्रसुख या गोष्टी तर दिलेल्या आहेत; पण त्याच्याही पुढे जाऊन मुक्ती, मोक्ष द्यावा, अशी अपेक्षा कशी करता येईल ?
२. द्रौपदीने विचारलेले सर्व बुद्धीप्रामाण्यवादी प्रश्‍न महाभारतात अनुत्तरित असणे,
त्यातून काहीही निष्पन्न होत नसल्याचे लक्षात आल्यावर तिने श्रीकृष्णाचा मनोभावे धावा करणे
अन् शरणागत भावाला प्रतिसाद देऊन श्रीकृष्णाने साहाय्याला धावून येणे
      महाभारतातील सभापर्वामध्ये द्रौपदीने घेतलेले सर्व आक्षेप सर्वश्रुत आहेत. स्वतःला ज्याने अगोदरच पणाला लावलेले आहे, तो स्वतःला हरल्यानंतर पत्नीला पणाला लावू शकतो का ? पत्नी ही पणाला लावण्यासारखी वस्तू आहे का ? पाच भावांची असलेली पत्नी पाचपैकी एकच भाऊ पणाला लावू शकतो का ?, असे द्रौपदीने विचारलेले सर्व बुद्धीप्रामाण्यवादी प्रश्‍न महाभारतात अनुत्तरित ठेवण्यात आलेले आहेत. कुणीही त्या वेळी काहीही बोलले नाही. (दुर्योधनाचा भाऊ विकर्ण याने त्या वेळी धर्माची बाजू घेतली होती.) तेव्हा द्रौपदीने जे धर्म सांगत नाहीत, ते ज्ञानी नाहीत. जे ज्ञानी नाहीत, ते वृद्ध नाहीत आणि ज्या सभेत वृद्ध नाहीत, ती सभा नाही, असे उद्गार काढले. या बुद्धीप्रामाण्यवादी बौद्धिक स्तरावरील चर्चेतून काहीही निष्पन्न झाले नाही. तेव्हा द्रौपदीने मनोभावे श्रीकृष्णाचा धावा केला आणि त्या शरणागत भावाला प्रतिसाद देऊन भगवान श्रीकृष्ण द्रौपदीच्या साहाय्याला धावले, हे आपण सर्व जाणताच.
२ अ. अंतिम साध्य मुक्ती, मोक्ष असल्यामुळे शरणागत भावाविना त्याला तरणोपाय नाही ! : परमेश्‍वराची आळवणी करतांना देवा, तू माझ्यावर टाकलेली सर्व दायित्वे माझ्या शक्तीनुसार पार पाडली आहेत. काही चुका झाल्या, अशी कबुली देतांनाच कवी पुढे आळवणी करतो,
संपता पूजा स्वरांची हात तू देशील का ।
दाटूनी काळोख येता तू घरी नेशील का ।
पूर्णतेसाठीच या मी सर्वकाही साहिले ॥
तर साधकांनो, बुद्धीप्रामाण्याच्या सीमा सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे; परंतु अंतिम साध्य हे मुक्ती, मोक्ष असल्यामुळे शरणागत भावाविना तरणोपाय नाही, अशी माझी नम्र धारणा आहे.
३. व्यक्तीच्या सुंदर वर्तनाचे आकर्षण वाटणे साहजिक असणे आणि
असे वाटणे आपण मनाला कितपत
लावून घेतो, त्यावर वर्तनातील पालट अवलंबून असणे
      एखाद्या व्यक्तीच्या सुंदर वर्तनाचे आपल्याला आकर्षण वाटणे साहजिक आहे. आपलेही वर्तन तसे असावे, असेही मनाला त्या वेळी वाटून जाते. असे वाटणे आपण मनाला कितपत लावून घेतो, यावर आपल्या वर्तनातील पालट अवलंबून असू शकेल.
      पुष्कळ वर्षांपूर्वी परकीय भाषेतील अनुवादित कथा माझ्या वाचनात आली होती. स्वतःच्या वाहनातून दूरच्या प्रवासाला निघालेला लेखक वाटेत एका भटक्याला त्याच्या वाहनात घेतो. वाहन चालवत असतांना त्या भटक्याची भयानक वेशभूषा लक्षात घेऊन हा भटक्या वाटेत आपल्यावर आक्रमण करून आपली चीजवस्तू बळाने नेईल, अशी भीती लेखकाला वाटू लागते. वाहनात बिघाड झाला, असे लेखकाने खोटे सांगितल्याने दोघेही खाली उतरतात. चाक दुरुस्तीसाठी लेखक त्याच्या वाहनातील वजनी दांडा (टॉमी) खाली घेतो आणि दुरुस्तीचा आव आणतो. भटक्याचे लक्ष नाही, असे पाहून लेखक घाईघाईने वाहनात बसून वाहन दामटतो. पुढे काही अंतरावर खर्‍या बिघाडामुळे वाहन बंद पडते. थोड्या वेळाने मागे सोडलेला तो भटक्या हातात तो वजनी दांडा घेऊन चालत येतांना लेखकाला दिसल्यावर लेखकाची भीतीने गाळण उडते. सावकाश चालत तो भटक्या वाहनाजवळ येतो आणि तो वजनी दांडा लेखकाच्या बंद पडलेल्या वाहनाजवळ टाकून शांतपणे चालत-चालत पुढे निघून जातो. वाहनचालकाला कसलाही जाब न विचारता तो भटक्या किती शांतपणे पुढे निघून गेला, याचा परिणाम माझ्या मनावर पुष्कळ खोलवर झाला.
४. ज्येष्ठ व्यक्तीचे चांगले वर्तन पाहून त्याच्यासारखे होण्याचा केलेला प्रामाणिक प्रयत्न
      पुढे अनेक वर्षांनी सनातन संस्थेशी संपर्क आला. वर्ष २०१२ मध्ये मी अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या वेळी गोव्यात आलो होतो. नुकतेच पोटावर एक गंभीर शस्त्रकर्म होऊन गेले होते. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत चालणार्‍या कार्यक्रमात मध्येच थोडेसे आडवे व्हावे लागेल, अशी विनंती मी तेथील आयोजकांना केली. त्यांनी एका तरुण कार्यकर्त्याला बाजूच्या खोलीत माझ्यासमवेत पाठवले. तो कार्यकर्ता तेथे पलंगावर पहुडलेल्या एका ज्येष्ठ व्यक्तीला उद्देशून तुम्ही दुसरीकडे जा, असे म्हटल्यावर ती ज्येष्ठ व्यक्ती शांतपणे स्वतःचे थोडेसे सामान आवरून तेथून निघून गेली. त्या वेळी मला या गोष्टीचे प्रचंड आश्‍चर्य वाटले होते. ही बोलण्याची पद्धत नाही, असेही वाटले आणि एवढ्या शांतपणे ती ज्येष्ठ व्यक्ती तेथून निघून कशी गेली ?, याचेही नवल होते. पुष्कळ विचार केल्यानंतर पुढे लक्षात आले, त्या तरुण कार्यकर्त्याची अभिव्यक्ती फारशी योग्य नसली, तरी ते ज्येष्ठ साधक त्या पलंगाची अधिक आवश्यकता त्यांच्यापेक्षा दुसर्‍या कुणा व्यक्तीला असावी, या विचाराने तेथून गेले असावेत. त्यामुळे मला वाटले, आपण असे कधी होणार ? तेव्हापासून माझ्या आयुष्यात मी असा विचार सतत प्रामाणिकपणे करत येथपर्यंत आलो आहे.
- अधिवक्ता सुधाकर चपळगावकर, संभाजीनगर (१७.११.२०१६)

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn