Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

बँकांमधील विश्‍वासघातकी कोण ?

संपादकीय
     नोटाबंदीचा मोदी सरकारचा धाडसी, राष्ट्रहितकारी निर्णय यशस्वी करण्याचे सर्वांत मोठे दायित्व आहे ते बँकांचे आणि प्राप्तीकर खात्याचे. नोटा बंदीनंतर जी गोंधळाची परिस्थिती उद्भवणार होती, त्याला नियंत्रणात ठेवण्याचे यश बँकांचे सुयोग्य आणि कौशल्यपूर्ण नियोजन यांवर ठरणार होते. काही ठिकाणी पोलिसांनी एटीएम्समोरील गर्दी हटवण्यासाठी केलेला लाठीमार, मोठ्या रांगामध्ये नागरिकांचे झालेले मृत्यू अशा घटना घडल्या असल्या, तरी बँक कर्मचार्‍यांनी रात्रंदिवस सेवा पुरवून नागरिकांना दिलासा दिला होता. बँक कर्मचार्‍यांच्या या सेवावृत्तीचे पंतप्रधान मोदी यांनीही कौतुक केले आणि त्यांचे आभार मानले. हे सर्व आतापर्यंत ठीक होते. गेल्या काही दिवसांत मात्र वेगळ्याच बातम्या ऐकायला मिळत आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरातील बँकांमध्ये गेल्या महिन्याभरात तब्बल २०० कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे वृत्त आहे. अनेक बँकांमधील व्यवस्थापक आणि कर्मचारी यांनी कोट्यवधींच्या नोटा गैरमार्गाने पालटून दिल्या. या सगळ्यांचे ‘स्टिंग ऑपरेशन’ करण्यात आले असून बँकांमध्ये काही मोजक्या लोकांची मोठी रक्कम पोलीस, दलाल आणि बँक कर्मचारी कशा प्रकारे पालटून देतात, याची सर्व माहिती असलेल्या ४०० सीडी अर्थ मंत्रालयाकडे सोपवण्यात आल्या आहेत, असेही समजते.
बँक कर्मचार्‍यांनी गमावली विश्‍वासार्हता !
     वरील आकडेवारी ही केवळ उघड झालेली आकडेवारी आहे. उघड न झालेली अशा प्रकारची प्रकरणे आणि रक्कम किती असेल, याचा अंदाज आपण यावरून बांधू शकतो. एकूण बँक कर्मचार्‍यांपैकी काहींनीच असे केले असणार; पण त्या बँकांतील किंवा बँकांच्या शाखांतील काही कर्मचारीच यात सहभागी आहेत, असे समजून चालणार नाही. बँक व्यवस्थापक किंवा ज्येष्ठ अधिकारी यांच्या संगनमताशिवाय नोटा पालटणे शक्यच नाही; कारण संबंधित बँकेला पुरवल्या गेलेल्या नवा नोटा आणि त्या बँकेने वितरित केलेल्या नव्या नोटा यांचा हिशोब व्यवस्थापक कसा घालणार आहेत ? हा प्रश्‍न सामान्यांच्या मनात येतोच. अपहार करणार्‍या या बँक कर्मचार्‍यांचे हे कृत्य अनीतीमान, काळा पैसावाल्यांना पाठीशी घालणारे आहेच; परंतु त्याहीपेक्षा राष्ट्रप्रेमी जनता राष्ट्रासाठी सोसत असलेल्या जखमांवर मीठ चोळण्याचे आणि त्यांच्या त्यागावर पाणी फेरण्याचे घृणास्पद कृत्य आहे. नोटाबंदीनंतर काळा पैसा सरकारदरबारी जमा होणार, काळा पैसावाल्यांचे कंबरडे मोडणार, या आशेने देशहितासाठी काही दिवस रांगेत राहून, पैशांची चणचण सोसून त्याग करण्याची सिद्धता नागरिकांनी ठेवली होती; परंतु बँक कर्मचार्‍यांनी आलेल्या नोटा रांगेतील जनतेला वितरित न करता धनदांडग्यांना पालटून देऊन गैरसोयीत भर घातली. त्यामुळे साहजिकच रांगा वाढत जाणे, नवीन नोटा संपणे या गैरसोयींना जनतेला सामोरे जावे लागले. सर्व त्रास सोसत नागरिकांनी मोदी यांच्या निर्णयाला उघड पाठिंबा दर्शवला होता. यातून जनतेतील राष्ट्रप्रेम दिसून आले; परंतु बँक कर्मचार्‍यांनी विश्‍वासघात केला. 
..., तर जिल्हा बँकांत काय झाले असते ?
     जिल्हा बँकांना नोटा पालटण्याचे अधिकार दिले नाहीत; म्हणून काही राजकारण्यांनी थयथयाट केला. जिल्हा बँका किंवा पतसंस्था यांवर स्थानिक राजकारणी, उद्योजक, आदींचे नियंत्रण असते किंवा त्यांचाच दबदबा असतो असे म्हणतात. त्यामुळे ठेवीदारांचीसुद्धा या बँका किंवा पतसंस्था यांच्यावरची विश्‍वासार्हता एरव्हीही अल्पच असते. तेथील पैसे बुडण्याची ठेवीदारांना अधिक भीती असते. राष्ट्रीयीकृत बँकांतील बँक कर्मचार्‍यांचे परस्पर नोटा पालटून देण्याचे वाढते प्रकार उघड होत असतांना जिल्हा बँका किंवा पतसंस्था यांना नोटा पालटण्याचे अधिकार दिले असते, तर काय झाले असते, याची कल्पना आपण करू शकतो. 
पंतप्रधान मोदींसमोर मोठे आव्हान !
     आपला देश सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांपैकी एक देश आहे. त्याचे क्षेत्रफळही मोठे आहे. त्यामुळे अपहार, गैरप्रकार, गुन्हे, घोटाळे यांचे प्रमाणही अधिक आहे. देशातील सर्व बँकांच्या सर्व शाखांमध्ये असे प्रकार घडू नयेत किंवा घडत असल्यास ते कॅमेर्‍यात बंद होऊन त्यांच्यावर नंतर कारवाई करता येईल, यासाठी सरकारने कितपत सिद्धता केली होती ? ते येणारा काळच सांगेल. सरकारने काळा पैसावाल्यांना पकडण्यासाठी केलेली सिद्धता आणि त्यानंतर या अपहारांत पकडले गेलेल्यांवर होणारी झटपट कारवाई यांवर मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे यश अवलंबून आहे. प्राप्तीकर खात्याचे अधिकारीही ठिकठिकाणी धाडी घालून कोट्यवधींच्या नोटा जप्त करत आहे. नियमित घालण्यात येणार्‍या धाडी पहाता देशात भ्रष्टाचार, अनैतिकता आणि काळा पैसा तळागाळात पसरला आहे, ते लक्षात येते. त्यामुळे एकूण प्रकरणांपैकी किती प्रकरणांत प्राप्तीकर खाते, पोलीस आणि इतर मिळून कारवाई करू शकणार आहेत ? हा प्रश्‍न आहे. तसेच धाडी घालणार्‍यांच्यातही अनैतिक आणि भ्रष्टाचारी नसतील कशावरून ? नोटाजप्तीचे आकडे कोट्यवधींचे दिसले, तरी ते हिमनगाचे केवळ टोक न ठरो, ही सदिच्छा ! नोटाबंदीच्या निर्णयानंतरच्या या घडामोडी पहाता रांगेत रहाणारे सामान्य नोकरदार, कष्टकरी यांच्यात नव्हे, तर व्यापारी, उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, बँक कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी, पोलीस, राजकारणी, वकील, आदींच्यात राष्ट्रप्रेम निर्माण होणे आवश्यक आहे, असे दिसून येते. यासाठी लौकिक शिक्षणासोबतच नैतिकता निर्माण करणारे धर्मशिक्षण देण्याला पर्याय नाही !
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn