Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अध्यात्मप्रसाराच्या कार्याला बळ देण्यासाठी महर्षि अनेक उपाय योजत असणे

१. दिनांक १४.६.२०१६ - नादाच्या रूपात प्रत्यक्ष दृष्टांत देऊन देवीने प.पू. डॉक्टरांच्या अमृत महोत्सवाच्या वेळी त्यांच्या डोक्यावर धरण्यासाठी मी तुला हे माझे छत्र दिले आहे, असे सांगणे आणि प.पू. डॉक्टरांच्या डोक्यावर प्रत्यक्ष देवतांनाही छत्र धरावेसे वाटणे अन् यातूनच प.पू. डॉक्टरांचे अवतारत्व लक्षात येणे
    देवळाच्या महंतबाईंनी आम्हाला देवीच्या अंगावरील वस्त्र प्रसाद म्हणून दिले. तसेच एक छोटेसे चांदीचे छत्रही दिले आणि हे छत्र देवीचा प्रसाद म्हणून आमच्या गाडीत लावण्यास सांगितले. परत जातांना देवीचे पुन्हा दर्शन घ्यावे म्हणून मी जेव्हा देवळात गेले, त्या वेळी मला प्रत्यक्ष देवी माझ्याशी बोलत असल्याचे जाणवले. ती म्हणाली, प.पू. डॉक्टरांच्या अमृत महोत्सवाच्या वेळी त्यांच्या डोक्यावर धरण्यासाठी मी तुला हे माझे छत्र दिले आहे. (खरंच, अमृत महोत्सवाच्या वेळी प.पू. डॉक्टरांच्या डोक्यावर जे मोठे लाल छत्र धरले होते, त्याच्या आत मध्यभागी आम्ही हे छोटे देवीचे छत्र अडकवले होते. - सौ. गाडगीळ) प.पू. डॉक्टरांच्या डोक्यावर प्रत्यक्ष देवतांनाही छत्र धरावेसे वाटणे, यातूनच प.पू. डॉक्टरांचे अवतारत्व लक्षात येते.
प्रार्थना ! : भगवंता, हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) स्थापनेचे हे ध्येय पुष्कळच मोठे आहे. यात तूच आमचा एकमेव आधार आहेस. तुझ्यामुळे आम्ही आनंदाने साधना करू शकत आहोत. तुझे संरक्षककवच सतत आमच्या भोवती टिकून राहू दे, हीच तुझ्या चरणी तळमळीची प्रार्थना आहे.
२. दिनांक २०.८.२०१६ - तिरुपति बालाजीच्या दर्शनासाठी परत परत पाठवण्यामागील महर्षींचा उद्देश - तिरुपति बालाजीचा आणि प.पू. डॉक्टरांच्या अवतारी कार्याचा घनिष्ठ संबंध असणे
     महर्षींच्या कृपेने आम्हाला कितीतरी वेळा तिरुमला डोंगरावरील या श्रीमत् नारायणाचे दर्शन होत असल्याने आम्ही महर्षींच्या चरणी कृतज्ञ आहोत. महर्षि नेहमी म्हणतात की, प.पू. डॉक्टरांचा आणि या बालाजीचा घनिष्ठ संबंध आहे; कारण प.पू. डॉक्टरांच्या वडिलांचे नावही बाळाजीच होते. तसेच बालाजीची प्रतिष्ठापना मकर राशीतच झालेली आहे आणि प.पू. डॉक्टरांची रासही मकरच आहे. आकाशमंडलात स्थापन झालेला वैकुंठलोकही मकर राशीतच आहे; म्हणूनही प.पू. डॉक्टरांच्या अवतारी कार्याला शक्ती पुरवणाराही तोच आहे; म्हणूनच आपल्याला या भूलोकातील वैकुंठ असलेल्या स्थानी परत परत दर्शनासाठी जायचे आहे.
३. दिनांक ११.९.२०१६ - ऋषीपंचमीच्या दिवशी महर्षींनी प.पू. डॉक्टरांना चंदनाचा हार घालून  त्यांचे औक्षण करण्यास सांगणे आणि या औक्षणातून आम्हीच त्यांना एक विशिष्ट प्रकारची शक्ती देणार आहोत, असेही सूचित करणे
    आम्ही महर्षींच्या सांगण्यावरून गोव्याहून ३ सप्टेंबर २०१६ या दिवशी जयपूर येथे आलो. येथे आम्ही सनातनच्या साधिका सौ. अर्चना खेमका यांच्याकडे उतरलो. येथे आम्हाला महर्षींनी आदेश दिला, तुम्हाला श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी, म्हणजे ५.९.२०१६ या दिवशी सवाई माधोपूर येथील त्रिनेत्र गणपतीच्या दर्शनाला जायचे आहे. त्यानंतर एक दिवस महर्षींनी अकस्मात्पणे दुपारी सांगितले, आज ऋषीपंचमी आहे. आजचा दिवस म्हणजे ऋषींच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस ! आजच्या दिवशी बरोबर तिन्हीसांजेच्या वेळी प.पू. डॉक्टरांच्या गळ्यात चंदनाचा हार घालून त्यांचे औक्षण करा आणि त्यांना ऋषींच्या चरणी प्रार्थना करण्यास सांगा. पुढे महर्षि म्हणाले, या दिवशी आम्हीच प.पू. डॉक्टरांचे एक प्रकारे औक्षण करणार आहोत आणि चंदनाच्या हारातून त्यांना विशिष्ट प्रकारची शक्तीही देणार आहोत. यामुळे त्यांचे आरोग्य सुधारेल आणि त्यांच्या अध्यात्मप्रसाराच्या कार्याचा वेगही वाढेल. (या दिवशी रामनाथी आश्रमात सनातनचे दहावे संत (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ यांनी प.पू. डॉक्टरांचे औक्षण केले आणि त्यांना चंदनाचा हारही घातला.)
४. दिनांक १५.९.२०१६ - १५.९.२०१६ या दिवशी प.पू. डॉक्टरांच्या डोळ्यांमध्ये विशिष्ट प्रकारची शक्ती देणार असल्याचे आणि त्यांच्या डोळ्यांतून  विश्‍वभर चैतन्याचे प्रक्षेपण होणार असल्याचे महर्षींनी नाडीवाचनातून सांगणे
    १५.९.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचनातून महर्षींनी सांगितलेेे, आज आम्ही परम गुरुजींच्या (प.पू. डॉक्टरांच्या) डोळ्यांमध्ये विशिष्ट प्रकारची शक्ती देणार आहोत. प.पू. डॉक्टरांचे डोळे चंद्र आणि सूर्य यांच्यासारखे आहेत. या डोळ्यांतूनच सार्‍या विश्‍वात चैतन्याचे प्रक्षेपण होणार आहे. (नाडीवाचन क्रमांक ९५, तिरुवनंतपूरम्, केरळ, १५.९.२०१६)
५. दिनांक १५.१०.२०१६ - महर्षींनी १०० व्या नाडीवाचनातून प.पू. डॉक्टर म्हणजेच सनातन धर्म आणि तेच अवतार असल्याचे सांगणे अन् त्या वेळी दैवी साक्ष म्हणून गणपतीच्या चित्राला वाहिलेले गुलाबाचे फूल खाली पडणे
    चेन्नई येथे झालेल्या १०० व्या नाडीवाचनात महर्षि म्हणतात, प.पू. डॉक्टर म्हणजेच सनातन धर्म आहे. सनातन धर्म काही त्यांच्यापेक्षा वेगळा नाही. परम गुरुजींना ठाऊक नाही की, तेच अवतार आहेत; परंतु श्रीमत् नारायणाला मात्र हे ठाऊक आहे.
    महर्षींचे नाडीवाचन चालू असतांनाच तेथे ठेवलेल्या गणपतीच्या चित्राला वाहिलेले गुलाबाचे फूल बरोबर याच वाक्याच्या वेळी खाली पडले. आम्हाला मिळालेली ही एक मोठी दैवी साक्ष होती.
- (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, कुंभकोणम्, तमिळनाडू.(१८.१०.२०१६, रात्री ९.१०) 
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn