Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

संतांचा छळ करणार्‍या राजकारण्यांनो, संतांना वेळीच शरण जा आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार अन्याय, भ्रष्टाचार अशा गोष्टी नसलेले सनातन धर्म राज्य (हिंदु राष्ट्र) स्थापन करा !

सौ. शालिनी मराठे
  राजा विश्‍वामित्राने वसिष्ठऋषींकडे असलेली कामधेनू मिळवण्यासाठी त्यांच्यावर आपल्या सर्व सैन्यानिशी आक्रमण केले; पण तो वसिष्ठऋषींचा पराभव करू शकला नाही. पुढेही त्यांचा पराभव करण्याच्या हेतूने विश्‍वामित्र राजाने राज्य सोडून तपश्‍चर्येला आरंभ केला आणि तो राजर्षि झाला, तरीही त्यास वसिष्ठऋषींचा पराभव करता आला नाही, तिथे इतर राजांची काय कथा !
    क्षात्रतेजाने ब्राह्मतेज जिंकणे, हे सर्वथा अशक्य आहे. तरीही विश्‍वामित्र राजापासून आजपर्यंत अनेक राज्यकर्त्यांनी ऋषी, संत आदींचा, म्हणजे धर्मसत्तेचा द्वेष करणे चालूच ठेवले. सध्याच्या कलियुगातही राज्यकर्ते संतांचा का आणि कसा द्वेष करतात आणि ईश्‍वराचा कर्मफलन्यायाचा नियम अन् त्यातून राजकारण्यांनी लक्षात घ्यावयाचा बोध या लेखात देत आहोत. हा लेख वाचून काही राजकारण्यांनी तरी संतद्वेष करणे सोडले आणि त्यांनी संतांना शरण जाऊन त्यांची कृपा संपादन केली, तर हा लेख लिहिल्याचे सार्थक झाल्यासारखे होईल.
१. निधर्मी (केवळ जन्महिंदु असलेल्या) 
राजकारण्यांनी गुरुस्थानी असलेल्या संतांचा विद्वेष करणे
     ख्रिस्ती आणि मुसलमान आपल्या धर्मगुरूंचा आदर राखतात; पण धर्मशिक्षण, धर्माचरण आणि धर्माचा अभ्यास नसलेले भारतातील निधर्मी (केवळ जन्महिंदु असलेले) राजकारणी हे गुरुस्थानी असलेल्या संतांचा छळ करतात. एकवेळ शत्रू सुटला, तरी चालेल; पण संत सुटता कामा नयेत, अशी त्यांची विद्वेषी भूमिका असते. पेटलेला अग्नी भडकवण्यासाठी वारा साहाय्य करतो, त्याप्रमाणे पोलीस, बुद्धीप्रामाण्यवादी आणि पुरो(अधो)गामी, हे राजकारण्यांना संतद्वेष करण्यासाठी साहाय्यक होतात. त्यामुळे सूर्याचे ऊन परवडले, पण तापलेल्या वाळूचे चटके नकोत, अशी सज्जनांची अवस्था होते.
२. राजकारण्यांकडून संतांच्या संदर्भात विद्वेषापोटी 
केल्या जाणार्‍या कृती आणि त्यांचा त्यामागील वाईट हेतू !
     बहुतांश राजकारण्यांचे धर्मसत्ता मोडकळीस आणणे किंवा नष्ट करणे, हेच मुख्य ध्येेय असते. त्यामुळे राजकारणी काहीही करून संतांच्या आश्रमांना टाळे कसे लावता येईल ?, हाच ध्यास मनी बाळगतात. वेळ प्रसंगी ते दिवाळी, श्रीगणेश चतुर्थी, नवरात्र, असे सणांचे दिवस वा मध्यरात्र साधून असे काळे कृत्य करण्याचे योजतात. त्या वेळी ते कोणत्याही स्थितीत भाविक हिंदूंना सणांचा आनंद मिळणार नाही, याची दक्षता घेतात. त्या उद्देशाने ते संतांच्या संदर्भात पुढील द्वेषपूर्ण कृती करतात. 
अ. संतांवर तथ्यहीन, खोटे आणि भलते-सलते आरोप करतात. 
आ. संतांनी स्थापन केलेल्या संस्थेत गैरव्यवहार किंवा कायदाबाह्य कृत्य होत असल्याचा खोटा आरोप केला जातो.
इ. संतांच्या आश्रमावर छापा घालून संतांना आणि त्यांच्या अनुयायांना कारागृहात टाकले जाते. 
ई. आतंकवाद्यांना एक वेळ जामीन मिळतो; कारण त्यांचे राजकारण्यांशी साटे-लोटे असते; मात्र कोणत्याही परिस्थितीत संतांना जामिनावर सोडायचे नाही, याची दक्षता घेतली जाते. 
उ. अशा प्रसंगी प्रसारमाध्यमांच्या साहाय्याने संतांची अधिकाधिक अपकीर्ती केली जाते.
ऊ. संत आणि त्यांचे भक्त यांच्यामागे विविध चौकशींचा ससेमिरा लावला जातो. 
     अशा प्रकारे संत आणि त्यांचे भक्त यांना या ना त्या प्रकारे छळले जाते. सध्याच्या काळात राजकारण्यांनी वरील द्वेषपूर्ण कृती करून प.पू. तोडकर महाराज, कांची कामकोटी पीठाधीश्‍वर स्वामी जयेंद्र सरस्वती आदी संतांना कारावास भोगायला लावला. योगऋषी रामदेवबाबा यांचाही वेगळ्या प्रकारे छळ करण्यात आला. तसेच पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू गेली ३ वर्षे कारावासात आहेत, हे सर्वसामान्य भारतियांनाही ज्ञात आहे. शेवटी सत्यमेव जयति । या तत्त्वानुसार पुराव्याच्या अभावी सर्वच संत निर्दोष सुटतात. 
३. राजसत्तेकडून धर्मसत्तेचा द्वेष केला जाण्याची कारणे 
३ अ. राजकारण्यांना आपल्यापेक्षा कुणी वरचढ असून गुरुस्थानी आहे, ही गोष्ट सहन होत नसल्याने त्यांच्या मनात संतांविषयी असूया निर्माण होणे : ब्रह्म जानाति इति ब्राह्मणः ।, म्हणजे ब्रह्म जाणतो किंवा ज्याला आत्मज्ञान झाले आहे, तो ब्राह्मण. थोडक्यात साधना करून ज्यांनी ईश्‍वरप्राप्ती करून घेतली आहे, अशी कोणतीही व्यक्ती ब्राह्मणच आहे. त्या दृष्टीने ऋषी, मुनी आणि संत हे ब्राह्मण असून हिंदु समाजाला ते गुरुस्थानी आहेत. त्यांच्याकडे ब्राह्मतेज असते. राजकारण्यांचे क्षात्रतेज त्यांच्यापुढे टिकू शकत नाही. संत सत्त्वगुणी असतात, तर राजकारण्यामध्ये रजोगुण आणि अहंभावही असतो. तसेच महत्त्वाकांक्षा आणि सत्तेचा लोभ असतो. त्यामुळे आपल्यापेक्षा कुणी वरचढ असून गुरुस्थानी आहे, ही गोष्ट राजकारण्यांना सहन होत नाही. त्यामुळे त्यांच्या मनात संतांविषयी असूया निर्माण होते.
३ आ. काही प्रलोभन दाखवून संतांना जिंकणे किंवा रजोगुणाने त्यांचा पाडाव करणे शक्य होत नसल्याने राजकारण्यांमध्ये संतांविषयी शत्रुत्व जागृत होणे : संतांचे वैभव पारलौकिक आहे. ज्ञान, तेज, संयम, त्याग, प्रीती, संकल्पशक्ती, दया, क्षमा, शांती, करुणा, समाधान इत्यादी दैवी गुणांमुळे त्यांच्याकडे सामान्य लोक आकृष्ट होतात. संत सततच आत्मसंतुष्ट असतात. त्यामुळे काही प्रलोभन दाखवून त्यांना जिंकणे किंवा आपल्या रजोगुणाने त्यांचा पाडाव करणे, हे राजकारण्यांना शक्य होत नाही. त्यामुळे संतांचे वर्चस्व त्यांना निरुपायाने स्वीकारावे लागते. त्यामुळे त्यांचा अहं दुखावतो आणि संतांविषयी शत्रुत्व जागृत होते.
३ इ. संतांच्या लोकप्रियतेने राजकारण्यांचा मत्सर जागृत होणे : न बोलावताच संतांकडे लोकांच्या रांगा लागतात. संतांच्या संगतीत अनेक भाविकांच्या दुःखाचे निवारण होऊन त्यांना आनंद मिळतो. त्यामुळे संतांना अमाप लोकप्रियता मिळते. लक्षावधी लोक त्यांचे अनुयायी होतात आणि त्यांना देव मानून भजतात. याउलट राजकारण्यांना पैसे देऊन लोक गोळा करावे लागतात. संतांच्या लोकप्रियतेने राजकारण्यांचा मत्सर जागा होतो. 
३ ई. राजकारण्यांना संतांवर आपली सत्ता नाही, या गोष्टीचे वैषम्य वाटणे आणि त्यातून राजकारण्यांचा द्वेष बळावणे : संतांवर गुरुकृपा असल्यामुळे त्यांचे सर्व संकल्प तडीस जातात. संकल्पशक्ती ही कामधेनू असल्यामुळे संतांना कुणाकडे शरण जाऊन याचना करावी लागत नाही. ईश्‍वर त्यांना सर्वकाही पुरवत असतो. मी सत्ताधीश, मी एवढा वैभवशाली राजा; पण हे दरिद्री संत माझ्याकडे काही मागत नाहीत. माझ्याविना यांचे चांगले चालते. हे मला महत्त्वच देत नाहीत. यांच्यावर माझी सत्ता नाही, या गोष्टीचे राजकारण्यांना वैषम्य वाटते. त्यातून राजकारण्यांचा द्वेष बळावतो.
४. ब्राह्मणवर्ग (जात नव्हे), म्हणजे संत हे चारही वर्णांच्या गुरुस्थानी 
असून त्यांच्या आज्ञेनेच राजाने राज्य चालवायचे आहे, हा धर्मराज्याचा दंडक असणे
     असे असले तरी राजकारण्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की, भगवान श्रीकृष्णाने श्रीमद् भगवद्गीतेत चातुर्वर्णांची निर्मिती मीच (ईश्‍वरानेच) केली आहे, असे सांगितले आहे. समाजव्यवस्था सुस्थितीत रहाण्यासाठी ईश्‍वरानेच राजदंडावर धर्मदंड ठेवला आहे. तो स्वीकारण्यातच सर्वांचे हित आहे. तो नसेल, तर राजेलोक मदोन्मत्त होतील. त्यामुळे ब्राह्मणवर्ग (जात नव्हे) म्हणजे संत हे चारही वर्णांच्या गुरुस्थानी असून त्यांच्या आज्ञेनेच राजाने राज्य चालवायचे आहे, हा धर्मराज्याचा दंडक आहे. धर्मगुरूंना मदोन्मत्त राजासही शिक्षा द्यायचा अधिकार आहे. त्यामुळे अन्याय, भ्रष्टाचार अशा गोष्टी सनातन धर्म राज्यात (हिंदु राष्ट्रात) होत नाहीत. त्यामुळे ते कल्याणकारी राज्य असते.
५. संतांचा छळ करणार्‍यांनो, पेरले तसे उगवते, हा कर्मफलन्याय विसरू नका !
      संत शापवाणी उच्चारत नाहीत. असे असले, तरी संतांच्या छळाचे पापकर्म सर्व समाजाला भोगावे लागते. त्यामुळे संतांचा द्वेष करणार्‍या राजकारण्यांचे राज्य रसातळाला जाते. पेरले तसे उगवते, हा कर्मफलन्याय संतांचा छळ करणार्‍यांनी विसरू नये. संतद्वेष करणार्‍या राजकारण्यांनी देहान्तशासन घेतले, तरी त्यांचे पापक्षालन होऊ शकत नाही; कारण ते अक्षम्य पापकर्म आहे. 
     स्वतंत्र भारतात आजपर्यंत संतद्वेष केलेल्या राजकारण्यांपैकी किती जण धर्मदृष्ट्या अपराध म्हणून कठोर प्रायश्‍चित्त घ्यायला सिद्ध आहेत ? बरे त्यांनी प्रायश्‍चित घेतले नाही, तरी ईश्‍वरच धर्म असल्याने आणि तो न्यायी असल्याने प्रत्येकाच्या प्रारब्धाप्रमाणे तो संबंधित धर्मद्रोह्यांना निःसंशय शिक्षा देईलच ! 
    देवा, तू लिहून घेतलेस, ते लिहिले. यासाठी कोटी कोटी कृतज्ञ आहे. जे लिहिले, ते तुलाच अर्पण करते.
- श्रीगुरुचरणी शरणागत,
सौ. शालिनी मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(१३.१०.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn