Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

प.पू. गुरुदेवांना स्थुलातून भेटण्यापेक्षा मानस भावाच्या स्तरावर भेटल्यामुळे सर्वाधिक आनंदाची अनुभूती येणे, याविषयी रामनाथी आश्रमातील कु. सोनम फणसेकर यांना आलेली अनुभूती

कु. सोनम फणसेकर
१. प.पू. गुरुदेवांना स्थुलातून भेटण्याची आणि त्यांच्याशी बोलण्याची तीव्र इच्छा होणे अन् प.पू. गुरुदेवांशी मनातून संवाद साधण्यास आरंभ केल्यावर त्यांना प्रत्यक्ष भेटल्याचा आनंद मिळणे : ‘साधारणतः दीड - दोन मासांपासून (महिन्यांपासून) मला प.पू. गुरुदेवांची पुष्कळ आठवण येत होती. त्यांना स्थुलातून भेटण्याची आणि त्यांच्याशी बोलण्याची तीव्र इच्छा व्हायची; पण मला प.पू. गुरुदेव दिसत नसल्यामुळे मन पुष्कळ अस्वस्थ व्हायचे. त्यांच्या आठवणीने मला पुष्कळ रडू यायचे. तेव्हा मला वाटू लागले, ‘निश्‍चितच ते माझ्यावर रागावले असतील; म्हणूनच एवढे दिवस झाले, तरी त्यांचे मला दर्शन होत नाही.’
      त्यानंतर मी मनातूनच प.पू. गुरुदेवांच्या खोलीत जायला आरंभ केला. त्यांना मानस जेवण भरवणे, त्यांना आत्मनिवेदन करणे, त्यांच्यासमवेत बसून सेवा करणे, लहान होऊन त्यांच्याशी खेळणे, असे करण्यास आरंभ केला. असे करतांना मला पुष्कळ आनंद मिळायचा आणि भावजागृतीही व्हायची. या वेळी मला प.पू. गुरुदेवांना प्रत्यक्ष भेटल्याचा आनंद मिळायचा. 
२. प.पू. गुरुदेव हे स्थुलातून दिसल्यावर ते सूक्ष्मातून भेटल्याप्रमाणे आनंद न मिळाल्याने आणि भावजागृतीही न झाल्याने आश्‍चर्य वाटणे : सूक्ष्मातून भेटले, तरीही माझ्या मनात ‘त्यांना एकदा तरी भेटूया’, असा विचार यायचा. काही दिवसांनी मला प.पू. गुरुदेव स्थुलातून दोनदा दिसले. तेव्हा प्रत्यक्षात भेट झाली नसतांनाही ‘अरे ! आताच तर आपण त्यांना भेटलो !’, असे वाटले. त्या वेळी मला काहीच वेगळे वाटले नाही. मला आश्‍चर्यच वाटले की, इतके दिवस त्यांना भेटावे म्हणून मला रडू येत होते. मग आता मला आनंद का होत नाही ? माझी भावजागृती का होत नाही ? असे काय होत आहे ? 
३.एका आध्यात्मिक कार्यक्रमात प.पू. गुरुदेवांचे दर्शन होणे आणि दर्शनाने काहीच न वाटणे : त्यानंतर ‘मला एका कार्यक्रमाला जायचे आहे’, असा अकस्मात् निरोप आला. त्या वेळीही माझे मन स्थिर होते. तेव्हा प्रत्यक्ष प.पू. गुरुदेव समोर दिसत असतांनाही मला वेगळे काहीच वाटत नव्हते. मी मनाला सांगत होते, ‘प्रत्यक्ष श्रीमत् नारायण आपल्यासमोर बसले आहेत. आपण ब्रह्मांडनायकाच्या समोर बसलो आहोत.’ मला आश्‍चर्य वाटले की, ज्या क्षणाची मी आतुरतेने वाट पहात होते, ज्यासाठी मी रडत होते, ते प्रत्यक्षात घडूनही मला काहीच कसे वाटत नाही ? 
४. सूक्ष्मातून प.पू. गुरुदेवांनी ‘स्थुलातून भेटण्यापेक्षा मानस भावाचे प्रयत्न केल्यावर पुष्कळ आनंद मिळतो ना ?’, असे विचारणे : या प्रसंगात मी मनाची ही स्थिती सूक्ष्मातून प.पू. गुरुदेवांना सांगितली. तेव्हा त्यांना पुष्कळ आनंद झाला. ते म्हणाले, ‘‘मानस भावाचे प्रयत्न केल्यावर किती आनंद मिळतो ना ! स्थूलदेहात कशाला अडकायचे ? स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ आहे.’’ या अनुभूतीवरून मला प.पू. भक्तराज महाराजांचे एक सुवचन आठवले, ‘इंतजारमें जो मजा हैं, वो मिलनेमें नहीं ।’
- कु. सोनम फणसेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.११.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn