Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सनातन संस्थेचे पहिले संतरत्न सद्गुरु विमल फडकेआजी यांना घडवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक अर्पिलेली शब्दसुमने !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
परात्पर गुरु
डॉ. जयंत आठवले
     दयासागर, कृपासिंधू, चैतन्यदायिनी अशी गुरूंची नानाविध वैशिष्ट्ये आहेत. याच वैशिष्ट्यांच्या जोडीला शिष्याचे बोट धरून त्याला अध्यात्ममार्गावरून नेऊन मोक्षाची प्राप्ती करून देणारीही एकमेव गुरुमाऊली असते. भवसागराच्या बंधनातून मुक्त करणार्‍या गुरूंचे ऋण फेडणे कोणत्याही शिष्याला अशक्यप्राय आहे. केवळ त्यांनी दिलेले निरपेक्ष प्रेम, तसेच प्रत्येक प्रसंगातून घडवले असल्याचे अनमोल क्षण आठवून त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणे हेच त्याच्या हातात असते. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपाछत्राखाली राहून त्यांना अनुभवण्याची संधीही अनेक जिवांना लाभली. प्रत्येक वेळी त्यांच्यातील भगवंताच्या रूपाचेच दर्शन झाले. सनातनच्या पहिल्या संतरत्न झालेल्या सद्गुरु विमल फडकेआजी यांना प.पू. डॉक्टरांचा लाभलेला सहवास, त्या माध्यमातून साक्षात् ईश्‍वराच्या गुणांचे झालेले दर्शन, साधक, तसेच संत यांविषयी त्यांना असणारी प्रीती, आजी संत झाल्यावर आणि अंथरुणाला खिळून असतांना त्यांना केलेले चैतन्यदायी साहाय्य हे सर्वच आठवून मन कृतज्ञतेने भरून येते. सद्गुरु आजींच्या माध्यमातून त्यांनी आम्हा सर्वांवर आतापर्यंत केलेल्या कृपेसाठी पुढील प्रसंग त्यांच्याच चरणी कृतज्ञतापूर्वक अर्पण !
१. प्रेमभावाचे बीज रोवणारे प.पू. डॉक्टर ! 
सद्गुरु विमल फडकेआजी
सौ. मनीषा अरविंद गाडगीळ
     वर्ष १९९० मध्ये मुंबईत विमल फडकेआजी या परात्पर गुरु आठवले यांच्या अभ्यासवर्गाला जात होत्या. त्या वेळी सर्व साधक त्यांना ‘डॉक्टर’ असे संबोधायचे. अभ्यासवर्गाची वेळ प्रत्येक रविवारी सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत असायची. सर्वजण घरून येतांना जेवणाचा डबा आणायचे. दुपारी जेवणाच्या वेळेत प.पू. डॉक्टरही सर्वांसमवेत जेवणासाठी बसायचे. स्वतः अभ्यासवर्ग घेत असूनही किंवा प्रमुख असूनही त्यांनी त्यात वेगळेपण कधीच जपले नाही. त्या काळातच प.पू. डॉक्टरांनी स्वतःच्या उदाहरणातूनच साधकांमध्ये सहजता, प्रेमभाव यांची बीजे रोवली. अभ्यासवर्गातून अध्यात्माचे विविध पैलू त्यांनी अगदी सहजसोप्या पद्धतीने उलगडले. त्यामुळे सकाळी १० ते संध्याकाळी ५ हा वेळ कधी संपायचा ते कळायचे नाही आणि सर्वच साधक पुढील रविवारची आतुरतेने वाट पहायचे. 
२. इतरांचा विचार करणारी प्रेमळ गुरुमाऊली ! 
अ. प.पू. डॉक्टरांना भेटायला अधूनमधून फडकेआजी जायच्या. त्या वेळी अनेकदा प.पू. डॉक्टर आजींच्या समवेतच जेवायला असायचे. तेव्हाही स्वतःपेक्षा त्यांचे लक्ष आजींच्या ताटातील कुठला पदार्थ संपला आहे, याकडेच अधिक असायचे. पदार्थ संपल्याचे लक्षात येताच ते जेवण वाढणार्‍या साधिकेला लगेच तशी कल्पनाही द्यायचे. ईश्‍वराच्या या प्रीतीला खरंच सीमा नाही ! 
आ. आजींच्या डोळ्यांचे मोतीबिंदूचे शस्त्रकर्म झाले होते. त्या वेळी आजी सेवाकेंद्रात वास्तव्यास होत्या. एक दिवस सकाळी उठल्यावर आजी लगेचच वैयक्तिक आवरण्यासाठी गेल्या. आजींनी परत आल्यावर पाहिले, तर साक्षात् प.पू. डॉक्टरच आजींच्या पांघरुणाची घडी घालत होते ! 
३. नामजपाचे महत्त्व सहजतेने बिंबवणे
      सद्गुरु फडकेआजींना त्या वेळी पुष्कळ अनुभूती यायच्या. आजी त्या अनुभूती प.पू. डॉक्टरांना सांगायच्या. त्या वेळी प.पू. डॉक्टर ‘हे नामामुळे झाले’, असे सांगत नामाचे महत्त्व आमच्या मनावर अगदी सहजतेने बोलता बोलता बिंबवायचे. 
४. परिपूर्णता आणि सर्वज्ञता या ईश्‍वरी गुणांचे प.पू. डॉक्टरांनी घडवलेले दर्शन ! 
    पू. फडकेआजींचा ‘ज्योतिषशास्त्र’ या विषयाचा चांगला अभ्यास असल्याने प.पू. डॉक्टरांनी त्यांना प.पू. भक्तराज महाराज यांची जन्मपत्रिका सिद्ध करण्यास सांगितले होते. एरव्ही कुणाचीही जन्मपत्रिका सिद्ध करायची असल्यास आजींना ८ दिवस लागायचे; परंतु ही पत्रिका सिद्ध करण्यास त्यांना २ मास लागले. आजी त्यांच्या ज्ञानानुसार पत्रिकेचा अभ्यास करून प.पू. डॉक्टरांना दाखवण्यासाठी जायच्या. प.पू. डॉक्टर त्यात काहीतरी पालट सांगायचे. असे प्रत्येक वेळी व्हायचे. आजी घरी येऊन ते पालट करायच्या आणि पुन्हा त्यांना दाखवण्यासाठी घेऊन जायच्या. प.पू. डॉक्टर परत त्यात पालट सांगायचे. ‘आपल्या गुरूंची पत्रिका परिपूर्णच असायला हवी’, हेच त्यांना अपेक्षित होते. त्याप्रमाणे त्यांनी आजींकडून तसे करवून घेतले. प्रत्यक्षात पहाता प.पू. डॉक्टर स्वतः ज्योतिषी नव्हते, तरीही ते पत्रिकेत पालट करण्यास सांगायचे. यावरून ईश्‍वराच्या (प.पू. डॉक्टरांच्या) सर्वज्ञतेचीच प्रचीती येते. 
५. प्रत्येक प्रसंगातून साधकांना शिकवणे
     वर्ष १९९३ मध्ये माझ्या वडिलांचे निधन झाले. त्या वेळी आजींच्या घरी प.पू. डॉक्टर त्यांना भेटायला आले होते. त्यांच्यासमवेत ५ - ६ साधकही होते. आजी यजमानांच्या मृत्यूविषयी केवळ २ मिनिटे बोलल्या. त्यानंतर त्यांनी प.पू. डॉक्टरांना सांगितले, ‘आता मी तेरा दिवसानंतर पुढील प्रवचने घेण्यास जाईन.’ हे ऐकल्यावर प.पू. डॉक्टरांनी लगेचच समवेत आलेल्या साधकांना आता काय शिकायला मिळाले, ते सांगण्यास सांगितले. त्यातील काही जणांनी सांगितले, ‘आजींनी यजमानांच्या मृत्यूकडे सहजतेने पाहिले. ‘घरात कुणाचा मृत्यू झाला आहे’, असे वाटत नाही. वातावरण चांगले आहे.’ ‘आजींनी यजमानांच्या मृत्यूकडे साक्षीभावाने पाहिले आणि आजी अध्यात्म जगल्या’, असे प.पू. डॉक्टरांनी सर्वांना सांगितले. त्यामुळे त्यांच्यासमवेत असलेल्या साधकांना आणि आम्हालाही शिकायला मिळाले. 
६. आजींना संत म्हणून घोषित केल्यावर पुष्कळ आनंद झाल्याचे प.पू. डॉक्टरांनी सांगणे
     १३ डिसेंबर २००२ या दिवशी प.पू. डॉक्टरांनी घरी येऊन श्रीमती विमल फडकेआजी यांना सनातनच्या पहिल्या संत म्हणून घोषित केले. आम्हा सर्वांनाच पुष्कळ आनंद दिला. तो दिवस आम्हा सर्वांसाठीच अविस्मरणीय होता. तेव्हा ते आजींना भेटवस्तू, प्रसाद इत्यादी समवेत घेऊनच आले होते. आजी त्यांना म्हणाल्या, ‘आज मला पुष्कळ आनंद झाला.’ तेव्हा प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘आजी, तुम्ही सनातनच्या पहिल्या संत झालात. मग मला किती आनंद झाला असेल !’ खरंच आहे, ज्या गुरुमाऊलीने सनातनचे छोटेसे रोपटे लावले, त्याचा मोठा वृक्ष होऊन त्यावर उमललेले पहिलेच फूल (संतरत्न) पाहून त्यांना पुष्कळ आनंद झाला असेल ! 
७. पू. आजींना वाकावे लागू नये, यासाठीच स्वतःचा 
पाय वर करून नमस्कार स्वीकारणारे प.पू. डॉक्टर ! 
     ७ जुलै २००३ या दिवशी मी आणि पू. फडकेआजी मिरज येथे आश्रम पहाण्यासाठी गेलो होतो. प्रवास करून आजी पुष्कळ दमल्या होत्या. काही वेळातच प.पू. डॉक्टर त्यांना भेटण्यासाठी खोलीत आले. आजी आसंदीतून लगेचच उठल्या आणि त्यांना नमस्कारासाठी खाली वाकत होत्या. आजी दमून आल्याचे प.पू. डॉक्टरांच्या लक्षात आले. त्या पूर्ण वाकण्याआधीच प.पू. डॉक्टरांनी त्यांचा एक पाय वर केला आणि ते म्हणाले, ‘मीच पाय वर करतोे म्हणजे तुम्हाला सोपे पडेल.’ त्यामुळे आजींना वाकावे लागले नाही आणि आजींनी त्यांना नमस्कार केला. असे गुरु कधीतरी कुठे पहायला मिळतील का ?
८. गुरुपौर्णिमेच्या दिवशी प.पू. डॉक्टरांना नमस्कार करता यावा, 
यासाठी पू. आजींनी अर्धांगवायूमुळे हात हलत नसल्याने प्रयत्न करणे आणि 
प.पू. डॉक्टरांनी त्यांचा एक हात दुसर्‍या हाताला जुळवून नमस्कार पोचल्याचे सांगणे
      ११ जुलै २००३ या दिवसापासून पू. आजींना अर्धांगवायूचा झटका असल्यामुळे झोपूनच होत्या. त्या वेळी आजींचा एक हात हलत नव्हता. १४ जुलै या दिवशी गुरुपौर्णिमा होती. सकाळपासून आजींना वाटत होते, ‘आज प.पू. डॉक्टर आपल्या खोलीत येतील; पण आपल्याला साधा हात जोडून नमस्कारही करत येत नाही.’ त्यामुळे त्यांना पुष्कळ वाईट होते. पू. आजी सकाळपासून अधूनमधून नमस्काराच्या मुद्रेत हात जोडण्याचा प्रयत्न करत होत्या. संध्याकाळी अचानक प.पू. डॉक्टर खोलीतील दरवाजाजवळ आले. तेव्हा आजींचे लक्ष नव्हते. त्या हात जोडण्याच्या प्रयत्नात इतक्या मग्न होत्या की, प.पू. डॉक्टर आल्याचे त्यांना कळलेही नाही. त्या वेळी प.पू. डॉक्टरांनी मला खुणेनेच विचारले, ‘हे काय चालू आहे ?’ मी सांगितले, ‘आई तुम्हाला नमस्कार करण्याचा प्रयत्न करत आहे.’ त्याक्षणी प.पू. डॉक्टरांनी पू. आजींचा एक हात दुसर्‍या हाताला जुळवला आणि म्हणाले, ‘आजी, तुमचा नमस्कार पोचला.’ त्या वेळी पू. आजींना पुष्कळ आनंद झाला. केवढे ते गुरु-शिष्याचे प्रेम ! अजूनही ते दृश्य आठवले, तरी कृतज्ञतेने मन भरून येते.
९. आजारी व्यक्तीची पूर्णपणे काळजी घेणे
     एक दिवस पू. आजींना एका जागेवर पुष्कळ वेळ झोपल्यामुळे त्रास होत होता. त्या वेळी मी त्यांना थोडे उचलण्याचा प्रयत्न करत होते. त्याच वेळी प.पू. डॉक्टर खोलीत आले आणि त्यांनी मला पू. आजींना उचलण्यासाठी साहाय्य केले. केवळ उचलून ते थांबले नाहीत, तर त्यांनी पू. आजींना विचारले, ‘तुम्हाला अजून थोडे वर उचलायला हवे का ? आता आरामदायी वाटते का ?’ त्यावर आजी ‘हो’ म्हणाल्या. 
     दुसर्‍या दिवशी आजींना श्‍वास घेण्यासाठी थोडा त्रास होत होता. आजींना त्रास होत असल्याचा निरोप मी प.पू. डॉक्टरांना दिला. ते लगेचच खोलीत आले. त्यांनी पू. आजींना स्टेथोस्कोप लावून तपासले. ते दृश्य पाहून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. त्रास पुष्कळच वाढल्याने काही वेळाने पू. आजींना रुग्णालयात भरती करावे लागले. रुग्णालयातही प.पू. डॉक्टर पू. आजींना भेटण्यासाठी २ वेळा येऊन गेले. पू. आजी रुग्णालयातून आश्रमात आल्यानंतरही ते नेहमी त्यांची काळजी घेत.
१०. साधकांना होणार्‍या त्रासापेक्षा देवाणघेवाण हिशोब 
फेडण्यास प्राधान्य देणे आणि त्याद्वारे अध्यात्माचेच महत्त्व बिंबवणे
     मिरज आश्रमात असतांना पू. आजींना उचलण्यासाठी साधक खोलीत यायचे. त्या संदर्भात पू. आजी आणि प.पू. डॉक्टर यांच्यात झालेले संभाषण पुढे दिले आहे. 
पू. आजी : साधकांना मला उचलावे लागते. त्यांना त्रास होत असेल.
प.पू. डॉक्टर : तुम्हाला देवाणघेवाण हिशोब फेडायचा आहे कि इथेच ठेवायचा आहे ?
पू. आजी : फेडायचा आहे.
प.पू. डॉक्टर : मग झाले तर. साधकांची त्यातून सेवा होते. 
११. शिष्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करणारे गुरुरूपी प.पू. डॉक्टर !
    काही दिवसांनी आम्ही मिरज आश्रमातून पनवेलला चारचाकीने घरी जाणार होतो. त्या वेळी आश्रमात दोन गाड्या होत्या. त्यातील एक गाडी प.पू. डॉक्टरांची होती आणि दुसरी गाडी अधिक आरामदायी होती. ‘आजी सतत झोपून असल्यामुळे आरामदायी गाडीतून गेल्यास सोयीचे होईल’, असे तेथील आधुनिक वैद्यांनी सांगितले. पू. आजींनी ‘मी प.पू. डॉक्टरांच्याच गाडीतून जाणार’, असे सांगितले. तेव्हा 
     प.पू. डॉक्टरांनी एका साधकाला सांगितले, ‘आजींची ज्या गाडीतून जाण्याची इच्छा आहे, त्यातूनच त्यांना जाऊ दे.’ त्याप्रमाणे आम्ही पू. आजींना घेऊन प.पू. डॉक्टरांच्या गाडीतून पनवेल येथे आलो. या प्रसंगात गुरूंचे शिष्याप्रतीचे प्रेम पाहून मला भावाश्रू अनावर झाले. 
१२. विविध माध्यमांतून साहाय्य करून चैतन्य प्रदान करणे
     आम्ही पनवेलला आल्यानंतर पू. आजींना पुष्कळ आध्यात्मिक त्रास व्हायचा. त्या वेळीही प.पू. डॉक्टरांनी सतत उपाय सांगणे, शारीरिक त्रास होत असतांना आधार देणे, पू. आजींना नेहमी प्रसाद पाठवणे अशा विविध कृतींतून साहाय्य केले आणि त्या माध्यमांतून वेळोवेळी चैतन्यही पुरवले. यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी तेवढी थोडीच ! 
१३. अनोळखी असलेल्या आधुनिक वैद्या पू. आजींचे डोळे 
पडताळण्यासाठी घरी येणे, कानाच्या आधुनिक वैद्यांनीही घरी येऊन 
पडताळण्याचे पैसे न घेणे आणि त्या वेळी प.पू. डॉक्टरांच्या कृपेची प्रचीती येणे
     एक दिवस पू. आजींच्या एका डोळ्यातून पुष्कळ पाणी येत होते. त्या वेळी तिने प.पू. डॉक्टरांना दूरभाष करून होणारा त्रास सांगितला. ते म्हणाले, ‘‘डोळ्यांचे आधुनिक वैद्य घरी येऊन डोळे तपासून जातात.’’ त्याप्रमाणे खरोखरच डोळ्यांच्या आधुनिक वैद्या ओळखीच्या नसूनही बोलावल्यावर लगेच घरी आल्या आणि त्यांनी पू. आजींचे डोळे तपासून औषध दिले अन् त्यांनी पडताळण्याचे पैसेही घेतले नाहीत. त्याचप्रमाणे एकदा कान दुखत असतांना कानाचेही आधुनिक वैद्य घरी आले आणि त्यांनीही पू. आजींचे कान पडताळल्यावर पैसे घेतले नाहीत. हे सर्व प.पू. डॉक्टरांच्या कृपेविना अशक्यच आहे. 
१४. स्थळ आणि काळ यांच्या पलीकडे नेऊन जीवनमुक्त करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
     वर्ष २००६ मध्ये प.पू. डॉक्टरांनी पू. आजींना सांगितले, ‘आता तुम्हाला स्थळ आणि काळ यांच्या पलीकडे जायचे आहे.’ प्रत्यक्षातही प.पू. डॉक्टरांनी पू. आजींकडून त्यासाठी प्रयत्न करवून घेतले. 
अ. आजींना काही नातेवाइकांची पुष्कळ आठवण यायची. त्यांचा दूरभाष आल्यानंतर त्या स्वतः न बोलता मला सांगायच्या, ‘तूच त्यांना माझा निरोप सांग.’ 
आ. अल्पाहार, भोजन या वेळेतही जे काही दिले असेल ते त्या आवडीने खायच्या. काहीही मागायच्या नाहीत किंवा ‘आता जेवणाची वेळ झाली. मला कधी देणार ?’, असेही विचारायच्या नाहीत. 
इ. दिवस किंवा रात्र या वेळेकडेही त्यांचे लक्ष नसायचे. 
ई. आधी विचारायच्या, ‘हा साधक आता या आश्रमात नसतो. तो कुठे असतो ?’ आता साधकांची आठवण येण्याचे प्रमाण न्यून झाले होते.
उ. त्या भेटायला येणार्‍या साधकांशी अगदी अल्प प्रमाणात बोलायच्या. 
ऊ. मी त्यांच्यासमोर गेल्यास मला ‘थोडा वेळ बस आणि बोल’, असे सांगायच्या. नंतर समोर आल्यास केवळ हसायच्या.
ए. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्या निर्विचार झाल्याचे जाणवायचे. 
     अशा प्रकारे देहत्यागापूर्वी हे सर्व प्रयत्न प.पू. डॉक्टरांंच्या कृपेमुळेच झाले आणि पू. आजी जीवनमुक्त झाल्या. प.पू. डॉक्टर, शब्दातीत कृतज्ञता !’ 
- सौ. मनीषा गाडगीळ, सनातन संकुल, देवद, पनवेल.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn