Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

देवापर्यंत पोचण्यासाठी गाडीला लोंबकळून जाण्याचा विचार करत असतांना गरुड वाहनात बसण्याची संधी दिल्याने कु. सुप्रिया नवरंगे यांच्या वतीने साधिकेने व्यक्त केलेली कृतज्ञता !

कु. दीपाली पवार
      रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणार्‍या कु. सुप्रिया नवरंगे यांच्या मार्गशीर्ष कृष्ण पक्ष सप्तमी (२० डिसेंबर २०१६) या दिवशी वाढदिवस झाला, त्या निमित्त कु. दीपाली पवार यांनी केलेले लिखाण देत आहोत.
प.पू. डॉक्टरांच्या चरणी,
शिरसाष्टांग नमस्कार.
१. सुप्रियाच्या सहवासात तिचे प्रयत्न, तळमळ आणि भाव
जवळून पहायला मिळाल्यानेे तिच्या वतीने प.पू. डॉक्टरांना पत्र लिहावेसे वाटणे
      प.पू. डॉक्टर, हा नमस्कार माझ्या वतीने केला नाही, तर आपल्या कु. सुप्रिया नवरंगेताईच्या वतीने केला आहे. आज सुप्रियाताईचा वाढदिवस आहे. आज मला वाटले, सुप्रियाच्या वतीने तुम्हाला पत्र लिहावे; कारण आम्ही दोघी तुमच्या खोलीत (प.पू. डॉक्टर पूर्वी रहात असलेल्या खोलीत) एकत्र रहातो. त्यामुळे तिच्या सहवासात तिचे प्रयत्न, तळमळ आणि भाव हे जवळून पहायला अन् अनुभवायला मिळाले.
२. सुप्रियाताईची गुणवैशिष्ट्ये
२ अ. सर्व साधकांची लाडकी : सुप्रियाताई साधकांना आवडते; कारण ती वयाने मोठी असूनही आमच्यामध्ये लहान होऊन वागते. ती सर्वांचे कौतुक करते. खोलीत रहातांनासुद्धा ती खोलीत म्हणून न रहाता आपले घर आहे. घरातले आपण एकमेकांचे नातेवाइक आहोत, असे समजून आमच्याशी प्रेमाने बोलते आणि कौतुक करून प्रोत्साहन देते. तितक्याच प्रेमाने ती चुकाही सांगते. तिची चूक सांगण्याची पद्धतही पुष्कळ चांगली आहे. लहान मुलांना जसे समजावून सांगतात, तसे ती सांगते.
२ आ. बोलणे ऐकून आनंद मिळणेे : पूर्वी तिचे हसवणे त्रासामुळे असायचे; पण आताचे तिचे हसवणे देवावरून किंवा साधनेच्या प्रयत्नांवरून असते. त्यामुळे तिचे बोलणे ऐकून आनंद मिळतो. पूर्वी ती त्रासामुळे बडबडू लागली की, साधक तिला नामजप कर, असे सांगायचे; पण आता साधिका तिच्याशी मनमोकळेपणाने बोलतात.
२ इ. स्वतःला असलेल्या त्रासामुळे शारीरिक किंवा दायित्व घेऊन सेवा करण्यातला आनंद घेता येत नसल्याची खंत वाटणे आणि पुष्कळ सेवा करून त्यातील आनंद मिळवायचा असल्याने पुन्हा जन्माला घाल, असे देवाला सांगणे : प.पू. डॉक्टर, सुप्रियाताई स्वतःला न्यून लेखते. तिच्या स्वतःला न्यून लेखण्यात तिची (साधनेत) पुढे जाण्याची तळमळ जाणवते. तिला होणारे त्रास आणि शारीरिक व्याधी यांमुळे तिला अधिक सेवा करायला जमत नाही. ती म्हणते, मलाही अन्य साधिकांप्रमाणे दायित्व घेऊन सेवा करायला मिळाली असती, तर किती चांगले झाले असते ? मला कधीच शारीरिक किंवा दायित्वाची सेवा करण्यातला आनंद घेता आला नाही. माझा सर्व वेळ वैयक्तिक आवरण्यातच जातो. माझी केवळ तीन घंटेच सेवा होते. माझी ६० टक्के पातळी झाली आणि मला मृत्यू आला, तरी मला पुन्हा जन्माला घाल, असे मी देवाला सांगीन; कारण मला पुष्कळ सेवा करायची आहे आणि त्यातला आनंद घ्यायचा आहे.
३. देव आणि संत यांच्या आशीर्वादाने सुप्रियाताईचा वाढदिवस साजरा होणे
३ अ. सुप्रियाताईचा वाढदिवस साजरा करण्याची तीव्र इच्छा असल्याने आयत्या वेळी तिथी समजून शुभेच्छापत्राची संकल्पना सुचणे : प.पू. डॉक्टर, पुष्कळ दिवसांपूर्वी सुप्रिया म्हणाली होती, तुझे शुभेच्छापत्र पाहून असे वाटले की, माझा वाढदिवस सांगून ठेवावा. सुप्रियाचा वाढदिवस साजरा करावा, अशी देवाची इच्छा असेल, तर तुला माझी जन्मतिथी आपोआप कळेल. तिचा वाढदिवस साजरा करण्याची आमची इच्छा होती. मी काल ग्रंथ-कक्षात सेवेनिमित्त गेले असता कळले की, आजच तिचा वाढदिवस आहे. नंतर देवाने मला शुभेच्छापत्राची संकल्पना सुचवली.
३ आ. सकाळी ६.३० ते ९.३० या वेळेत शुभेच्छापत्र सिद्ध करून खोलीतील साधिका आणि तिच्या जवळच्या मैत्रिणी यांच्यासमवेत वाढदिवस साजरा करणे : प.पू. डॉक्टर, तुम्ही एकदा म्हणाला होता ना, जर मला संत तुकाराम महाराजांसारखे गरुड वाहन घेता आले असते, तर मी म्हटलेे असतेे, सर्व साधकांनी बसून घ्यावे. मी नंतर येतो. आज सुप्रियाताईच्या शुभेच्छापत्रावर प्रथमच तुमचे चित्र काढण्याची संधी मिळाली. मी यापूर्वी कधी तुमचे चित्र काढण्याचा प्रयत्न केला नव्हता. त्यामुळे जमेल कि नाही, असे दडपण होते; पण तुम्हीच योजल्यामुळे थोडे फार काढता आले. सकाळी ६.३० ते ९.३० या वेळेत हे शुभेच्छापत्र सिद्ध केले. त्यानंतर खोलीत रहाणार्‍या आणि इतर तिच्या जवळच्या मैत्रिणी यांना बोलावून वाढदिवस साजरा केला.
३ इ. वाढदिवसाला पू. संदीपदादांनी खाऊ देणेे : सुप्रियाताईला आज देवाचे तिच्याकडे लक्ष आहे, हे समजून पुष्कळ आनंद झाला. आज पुष्कळ साधकांनी तिला खाऊ देऊन तिचे लाड केले. ती म्हणाली, देव माझे किती लाड करत आहे. आता मी पुढच्या वर्षापर्यंत आणखी चांगले प्रयत्न करीन. माझा वाढदिवस इतका चांगला होईल, अशी मी अपेक्षाच केली नव्हती. वाढदिवस साजरा करण्याच्या वेळेतच पू. संदीपदादांनी सौ. अवनीताईंसमवेत खाऊ पाठवला आणि निरोप दिला, एवढ्या मोठ्या व्याकरणकाराला भेट देण्याची माझी पात्रता नाही; म्हणून मी छोटासा खाऊ पाठवला आहे. (सुप्रियाताईचे मराठी व्याकरण चांगले असल्याने शंका असल्यास सर्वजण तिलाच विचारतात.)
३ ई. देवाचे लक्ष आहे, हे समजल्यानेे प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा मिळणे आणि शुभेच्छापत्रातील लिखाणाप्रमाणे ध्येय ठरवून प्रयत्न करणार असल्याचे सांगणे : प.पू. डॉक्टर, ती आज पुष्कळ आनंदी होती. देवाच्या प्रेमाने साधकांची पुढे जाण्याची तळमळ लगेच वाढते. त्यांना प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा मिळते. ती सहसाधक श्री. चेतन राजहंस (आताचे सनातन संस्थेचे प्रवक्ता) यांच्याकडे नेहमी म्हणायची, माझे प्रयत्न अल्प असल्यामुळे देव मला त्याच्या समवेत नेईल कि नाही, हे मला माहिती नाही; पण आपण आगगाडीच्या डब्यामध्ये बसण्यासाठी प्रयत्न करत आहोत. संत, ६० टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक आणि गोपी यांना प.पू. डॉक्टर वातानूकुलीत आणि प्रथम श्रेणीच्या डब्यात बसवून नेतील. मला तर मालगाडीतसुद्धा बसायला मिळणार नाही. मी गाडीला लोंबकळून देवाच्या मागे लागून जाणारच आहे. आज तिला दिलेल्या शुभेच्छापत्रात तुम्ही तिला सर्वांत प्रथम गरुड वाहनात चढायला सांगितलेत, याचा तिला पुष्कळ आनंद झाला. ती म्हणाली, शुभेच्छापत्रातील लिखाणाप्रमाणे मी ध्येय ठरवून प्रयत्न करीन. माझ्यासाठी पुष्कळ मोठी अनुभूती आहे की, मी गाडीत बसण्याचा विचार करत होते; पण देवाने मला गरुड वहानात बसण्याची संधी दिली.
४. शुभेच्छापत्राच्या सेवेतून प.पू. डॉक्टर सर्व साधकांचा भाव आणि प्रयत्न उघड करत असणे
     प.पू. डॉक्टर, तुमचा प्रत्येक साधक आणि साधिका तुमच्यासारखेच वैशिष्ट्यपूर्ण आहेत. तसे तुम्ही प्रत्येकालाच घडवले आहे. या शुभेच्छापत्राच्या सेवेतून तुम्ही सर्व साधकांचा भाव आणि प्रयत्न उघड करत आहात. पुढे या साधकांच्या प्रयत्नांचा आणि भावाच्या प्रकाराचा इतिहास घडेल, असे वाटते.
५. कृतज्ञता
      प.पू. डॉक्टर, तिच्या वतीने मलाच तिचे पत्र लिहिण्याची संधी मिळाली, तसेच मलाही या सेवेतून आनंद दिला, यासाठी मी तुमच्या चरणी पुष्कळ कृतज्ञ आहे.
(प.पू. डॉक्टरांकडे येण्यासाठी धडपडणारी, - कु. सुप्रिया नवरंगे)
- तुमची कु. दीपाली पवार (२४.१२.२०१३)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn