Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सुब्रह्मण्यम् स्वामींचा लाखमोलाचा सल्ला !

संपादकीय
      निवडणुकीपूर्वी दिलेली आश्‍वासने निवडणुकीनंतर न पाळणे, हे जणू सर्वच राजकीय पक्षांनी जनतेला दिलेले एक अघोषित आश्‍वासनच असते ! विद्यमान राजकीय परिस्थितीत तरी त्यास कोणीही अपवाद नाही. अनेक ठिकाणी तर आपण मत दिलेला उमेदवार सध्या नेमक्या कोणत्या पक्षात आहे, याविषयी बिचारे मतदारच अनभिज्ञ असतात ! तत्त्वनिष्ठता वगैरे शब्द आता अडगळीतले झाले आहेत. लोकशाही व्यवस्थेत राजकीय क्षेत्रात तत्त्वनिष्ठता कधीच रूजली नाही. अशात तत्त्वमूल्यांचे किमान भान असणार्‍यांचा अपवाद निश्‍चितच आहे. भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी हे त्यातीलच एक म्हणावे लागतील. स्वातंत्र्यानंतर ‘निधर्मी’ भारताच्या आजवरच्या इतिहासाचे अवलोकन करता येथील राजकारण हे नेहमी धर्माभोवतीच फिरलेले आढळते. स्वातंत्र्यानंतर ‘निधर्मी’ काँग्रेसने देशावर सर्वाधिक काळ राज्य केले. त्यांनी त्यांची सर्व हयात अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आणि हिंदुद्वेष करण्यात खर्ची घातली. परिणामी त्यांच्या काळात देश किती रसातळाला गेला, हे वेगळे सांगायला नको. त्याची किंमत त्यांना वर्ष २०१४ मधील लोकसभेच्या निवडणुकीत मोजावी लागली. त्यानंतर लोकांनी भाजपच्या हाती सत्ता दिली. भाजपनेही सत्तेत येण्यापूर्वी हिंदूंना काही आश्‍वासने दिली होती. यामध्ये राममंदिर बांधणे, कलम ३७० रहित करणे, समान नागरी कायदा करणे आदी आश्‍वासनांचा समावेश आहे. भाजपचा आता अर्धाधिक सत्ताकाळ पूर्ण झाला आहे. अद्याप तरी या आश्‍वासनांची पूर्तता झालेली नाही. याविषयी भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी अवलोकन करणे पक्षासाठी हितकारक ठरेल.

सत्ता स्थापन झाल्यापासून सरकारनेे विकास हे कळीचे सूत्र बनवले आहे. सरकारने नुकतेच उचललेले नोटाबंदीचे पाऊलही निश्‍चितच स्वागतार्ह आहे. तथापि निम्मा सत्ताकाळ उलटून गेला, तरी हिंदूंना दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता न झाल्याने हिंदू अस्वस्थ आहेत. हिंदूंना विकास केव्हाही त्याज्य नव्हता; परंतु तो हिंदुत्व विरहित नसावा, तर हिंदुत्वासहित असावा, अशी हिंदूंची रास्त अपेक्षा आहे. हिंदूंच्या मनातील ही अस्वस्थता भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी अचूकपणे हेरली आणि त्यांनी सरकारला त्याविषयी स्पष्ट शब्दांत जाणीव करून देत सजग केले. स्वामी म्हणाले, ‘‘देशात आर्थिक विकास होणे आवश्यक आहेे; परंतु सरकारला आपल्या विचारधारेनुसार हिंदुत्व, तसेच भ्रष्टाचाराचे उच्चाटन या दोन सूत्रांचा विचारही करायला हवा. सध्या केवळ विकासाचीच भाषा बोलली जात आहे. आर्थिक विकास अनिवार्य आहे; परंतु पुरेसा नाही. त्या समवेत हिंदुत्वही हवे.’’ डॉ. स्वामींचे हे बोल म्हणजे भाजपसाठी खरेतर लाखमोलाचा सल्लाच आहे. त्यांनी भाजपला वेळीच सजगही केले आहे. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांनी हिंदूंचे संघटन करण्याची आवश्यकताही प्रतिपादित केली. वर्ष २०१४ मधील निवडणुकीत भाजपला हिंदूंची ३१ टक्के मते मिळाली. त्यांनी हिंदुत्वाच्या विचारधारेवरच वाटचाल केली, तर पुढील निवडणुकीत हिंदूंची ४० टक्क्यांहून अधिक मते मिळतील, असे त्यांनी सांगितले. यावरून भाजपने हिंदुत्वाच्या सूत्राचे महत्त्व जाणावे आणि वेळीच त्या दृष्टीने पावले उचलावीत. यातच त्याचे हित आहे.
      भाजपने त्यांच्या मागील सत्ताकाळात हिंदूंना राममंदिर बांधण्याचे आश्‍वासन देऊन हिंदूंची भरभरून मते झोळीत पाडून घेतली; पण संपूर्ण राममंदिर बांधलेच नाही. त्यामुळे रामभक्तांच्या मनात विश्‍वासघाताची भावना निर्माण झाली. सरकारमध्ये अन्य घटकपक्षही असल्याने राममंदिरासारखी आश्‍वासने पूर्ण करण्यात अडथळे येत असल्याचे कारण त्या वेळच्या भाजपच्या नेत्यांनी सांगितले. अर्थात् हिंदूंनी त्यांच्या हातून सत्ता काढून घेतली. यंदा हिंदूंनी मागील वेळची उणीव भरून काढत भाजपच्या झोळीत पूर्ण बहुमत टाकून आश्‍वासनपूर्तीचे उरलेसुरले सर्व अडथळे दूर केले आहेत. आता प्रश्‍न आहे तो केवळ राजकीय इच्छाशक्तीचा ! ही इच्छाशक्ती भाजप दाखवणार का, हे येणारा काळच सांगेल.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn