Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

‘हिंदु राष्ट्र’ : मूलभूत विचार

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसंदर्भातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन !
वाचा नवीन सदर
१. व्याख्या आणि समानार्थी शब्द 
१ अ. हिंदु राष्ट्र म्हणजे विश्‍वकल्याणार्थ कार्यरत सत्त्वगुणी लोकांचे राष्ट्र ! : ‘मेरुतंत्र’ या धर्मग्रंथात ‘हीनं दूषयति इति हिन्दुः ।’ म्हणजे ‘हीन किंवा कनिष्ठ अशा रज आणि तम गुणांचा ‘दूषयति’ म्हणजेच नाश करणारा, तो हिंदु’, अशी ‘हिंदु’ शब्दाची व्युत्पत्ती दिली आहे. जो रज-तमात्मक हीन गुण आणि त्यामुळे घडणारी कायिक, वाचिक आणि मानसिक स्तरांवरील हीन कर्मे यांचा तिरस्कार करतो; म्हणजेच सात्त्विक आचरण करतो, तो ‘हिंदु’ असतो. अशी सत्त्वगुणी व्यक्ती ‘मी आणि माझे’ असा संकुचित विचार त्यागून विश्‍वाच्या कल्याणाचा विचार करते. इतिहासात याची अनेक उदाहरणे आहेत.
१. आपले पूर्वज असलेल्या ऋषीमुनींची ‘कृण्वन्तो विश्‍वम् आर्यम् ।’, (ऋग्वेद, मंडल ९, सूक्त ६३, ऋचा ५) म्हणजेच ‘अवघे विश्‍व आर्य (सुसंस्कृत) करू !’ अशी घोषणा होती. 
२. उपनिषदांतील शिकवणीनुसार ‘अयं बन्धुरयं नेति गणना लघुचेतसाम् । उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम् ॥’ (महोपनिषद्, अध्याय ४, श्‍लोक ७१), म्हणजे ‘हा माझा, हा माझा नव्हे’ असा विचार क्षुद्र बुद्धी असलेल्यांचा असतो. उदार चारित्र्याच्या लोकांना, तर संपूर्ण पृथ्वी हीच स्वतःच्या कुटुंबाप्रमाणे वाटत असते.’ 
३. संत ज्ञानेश्‍वरांनी भावार्थदीपिकेत ‘हे विश्‍वचि माझे घर’ असे सांगितले आहे, तर ‘पसायदान’ या प्रार्थनेमध्ये विश्‍वकल्याणासाठी दान मागितले आहे.
४. समर्थ रामदासस्वामी म्हणाले होते, ‘चिंता करतो विश्‍वाची !’ 
     या धर्मधुरिणांना अभिप्रेत असलेल्या विश्‍वकल्याणासाठी कार्यरत असलेल्या सत्त्वगुणी लोकांचे (राज्यकर्ते आणि प्रजा यांचे) राष्ट्र, अशी ‘हिंदु राष्ट्र’ या शब्दाची खरी व्याख्या आहे. 
    ‘सनातन धर्म’ हाच नीतीशास्त्र आणि सत्त्वगुण यांचा मूलाधार आहे. त्यामुळे राष्ट्रीय जीवनात सत्त्वगुणी नैतिकतेचे (सत्य, सदाचार, परोपकार, इंद्रियनिग्रह इत्यादी) संवर्धन करण्यासाठी राज्यघटनेत ‘सनातन (हिंदु) धर्माधिष्ठित राज्यप्रणाली’ संबोधित होणे आणि त्यानुसार राष्ट्ररचना असणे अभिप्रेत आहे.’ (१९.१०.२०१५) 
१ आ. समानार्थी शब्द 
१ आ १. ईश्‍वरी राज्य : ‘मानव, पशू, पक्षी, किडा, मुंगी, झाडे आणि वेली यांपासून सूक्ष्मातीसूक्ष्म जिवांच्या उद्धाराचा विचार बाळगणारी एक ईश्‍वर-संकल्पित सामाजिक व्यवस्था म्हणजे ‘ईश्‍वरी राज्य’ !’ (२४.५.२०१२)
१ आ २. रामराज्य : ‘रामराज्य म्हणजे रामाचे, रामाकडून चालवले जाणारे आणि रामासाठी (रामभक्तांसाठी, म्हणजे सत्त्वगुणी लोकांसाठी) असणारे राज्य !’ (१९.१.२०१२) 
१ इ. हिंदु राष्ट्राची स्थापना म्हणजे रामराज्याची स्थापना ! : ‘साखर आणि तिची गोडी यांना अनुक्रमे ‘धर्मी अन् धर्म’ असे म्हणतात. या दोघांत अद्वैत असते. त्याचप्रमाणे ईश्‍वर (धर्मी) आणि त्याचा (सनातन) धर्म या दोघांत अद्वैत असते; म्हणूनच हिंदु राष्ट्र म्हणजे धर्मसंस्थापना, म्हणजेच ईश्‍वराची संस्थापना, म्हणजेच ईश्‍वरी राज्याची संस्थापना, म्हणजेच रामराज्याची स्थापना !’ (१०.९.२००७) (क्रमश:) 
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’) 
हा ग्रंथ ऑनलाइन खरेदीसाठीही उपलब्ध !
यासाठी ‘सनातन शॉप’ च्या संकेतस्थळावरील पुढील लिंकला भेट द्या : goo.gl/TxlFr0 
(टीप : या लिंकमधील काही अक्षरे ‘कॅपिटल’ असल्याची नोंद घ्यावी.)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn