Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सत्सेवेची तळमळ आणि प्रेमभाव या गुणांच्या बळावर ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झालेल्या कै. ठगूबाई भगवान वाघ !

कै. ठगूबाई वाघ
‘माझ्या सासूबाई कै. ठगूबाई भगवान वाघ यांचे ३१.८.२००९ या दिवशी निधन झाले. त्यांची माझ्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.
१. सत्सेवेची तळमळ 
१ अ. पतीचा विरोध असतांनाही सेवा करणे : सासूबाईंना सेवेची पुष्कळ आवड होती. त्या अध्यात्मप्रसार आणि गुरुपौर्णिमेचे अर्पण आणण्याची सेवा करायला बाहेर जायच्या. त्यांना साधना करण्यास सासर्‍यांचा पुष्कळ विरोध होता. ते त्यांना साधना किंवा सेवा करू देत नसत; तरीही त्या सेवेला वेळ द्यायच्या. 
१ आ. मुलाला पूर्णवेळ सेवा करण्यास पाठिंबा देणे : माझे यजमान पूर्णवेळ सेवा करायचे. ते देवासाठी सेवा करतात; म्हणून सासूबाईंना ते फार आवडायचे. सासर्‍यांचा सेवा करण्यास विरोध असूनही सासूबाई माझ्या यजमानांना सेवा करायला पाठिंबा देत असत.
२. संघभावना आणि जवळीकता 
सण वा उत्सव असेल, त्या वेळी त्या सर्व सुनांना एकत्र बोलावत असत. ‘सर्वांनी एकत्र येऊन पंचपक्वानांचा स्वयंपाक करायचा आणि एकत्र जेवण करून सण साजरा करायचा’, असा त्यांचा प्रघात होता. त्यामुळे सर्व नातेवाइकांची एकमेकांशी जवळीक रहायची. नातेवाईक कसेही वागले किंवा त्यांना काहीही बोलले, तरी त्या कधीच रागाने किंवा द्वेषाने बोलल्या नाहीत. 
३. प्रेमभाव
अ. नातेवाईक असू देत किंवा साधक असू देत, सासूबाई सर्वांशीच अतिशय प्रेमाने बोलायच्या. 
आ. त्या सुनांनाही स्वतःच्या लेकींप्रमाणेच प्रेम देत असत. त्यामुळे सुनांना त्यांच्यासमवेत वागतांना मोकळेपणा वाटायचा.
इ. सासूबाईंचे कुणाशी भांडण झाले किंवा त्यांचे कुणाशी पटले नाही, असे कधीच झाले नाही.
ई. घरी कुठलेही साधक आले की, सासूबाईंना फार आनंद व्हायचा आणि त्या पुष्कळ प्रेमाने त्यांची विचारपूस करायच्या. त्या साधकांना प्रेमाने खाऊ-पिऊ घालत असत.
४. नैमित्तिक साधना 
अ. सासूबाई प्रतिदिन सकाळी अंघोळ झाल्यावर नित्यनियमाने देवपूजा, आरती आणि तुळशीची पूजा करत असत. घरातले काम असो किंवा सेवा असो, त्या मनापासून करायच्या. 
आ. सासूबाई सतत हातात माळ घेऊन नामजप करत असत. सासर्‍यांना ते आवडायचे नाही; म्हणून सासरे आले की, त्या जपमाळ ठेवून मनातल्या मनात जप करायच्या.’ 
- सौ. जानकी वाघ (कै. ठगूबाई भगवान वाघ यांची सून), नांद्रा बुद्रुक, जळगाव. (३.७.२०१६) 
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn