Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

समाजाला संयम शिकवायचा कि भोगवाद शिकवायचा, ते सरकारला ठरवावे लागेल ! - समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर

पू. सुनील चिंचोलकर
   गांधीजींनी ज्या रामराज्याचे स्वप्न पाहिले होते, तेच हे रामराज्य आहे का ? व्यसनाधीनतेच्या विरुद्ध गांधीजी होते. मग व्यसनाधीनतेला प्रोत्साहन देणारे कार्यक्रम ठेवणार का ? नंतर मणिभाई देसाई यांना ‘मॅगेसेस’ पुरस्कार मिळाला होता. त्यांनी गायींविषयी प्रयोग करून पाहिला होता. त्यांनी ५० देशी गायींचे २ गोठे १० मैलांच्या अंतरावर केले होते. एका गोठ्यात दूध काढण्याच्या आधी सकाळी ते पॉप गाणे लावायचे आणि दुसरीकडे कृष्णाची बासरी लावायचे. ज्या गोठ्यात पॉपगीत वाजायचे, त्या गायी अल्प दूध द्यायच्या, तर ज्या गोठ्यात बासरी वाजायची, त्या गायी जास्त दूध द्यायच्या. त्यानंतर त्यांनी एका मासानंतर उलट प्रयोग केला. त्या वेळी ज्या गोठ्यात बासरी लावायचे, तेथे ते पॉप गीत लावले. त्या गायींनी अल्प दूध दिले, तर ज्या ठिकाणी पॉप गीत लावले जायचे, तेथे बासरी लावल्यावर त्या गायींनी जास्त दूध दिले. त्यातून भारतीय संगीताची बरोबरी जगातील कोणतेही संगीत करू शकत नाही. 
   आमच्याकडे संत मीराबाई नृत्य करत होत्या. दक्षिणेकडे अनेक मंदिरांमध्ये नृत्य सेवा करण्यात येते. ती भगवंताची सेवा म्हणून नृत्य केले जाते. याचा अर्थ आम्हाला नृत्य किंवा रसिकता मान्य नाही, असे नाही. भारतातील अनेक सिनेअभिनेत्रींनी नृत्य केले आणि आम्ही ते स्वीकारले. कारण त्यात हिडीसपणा नव्हता, देहाचे प्रदर्शन नव्हते. त्या अभिनेत्रींनी भारतीय संस्कृतीला धरून सात्त्विक नृत्य केले. अशी नृत्य सेवा आमच्या मंदिरांमध्ये सगळीकडेच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रात एक प्रसंग आहे. ते जेव्हा आग्य्राला गेले होते, त्या वेळी जयसिंग राजाचा मुलगा रामसिंग याने त्यांना आपल्या घरी बोलावले होते. त्या वेळी रामसिंगाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ घरी नृत्य ठेवले होते. त्या वेळी महाराजांनी त्यांना सांगितले की, भाईजी याची काही आवश्यकता नाही. आपण केवळ सरबत घेऊन दरबारात जाऊ. असे सांगून त्यांनी नृत्य न पहाता ते सरबत घेऊन औरंगजेबाच्या दरबारात गेले. असे असतांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण कोणता आदर्श डोळ्यासमोर ठेवणार आहोत ? शिवजयंती कोणती साजरी करणार आहोत ? एकीकडे नाचगाणी करण्यास अनुमती द्यायची आणि दुसरीकडे अशा प्रकारे शिवजयंती साजरी करणार का ? छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक समुद्रात उभारून आपण काय साध्य करणार आहोत ? त्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांची तत्त्वे आचरणात आणणे महत्त्वाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सैनिकांमध्ये कधीही नर्तकी किंवा नाचगाणी नव्हती. औरंगजेबाने त्याच्याकडे नर्तकी आणि नाचगाणी ठेवली होती. ते साम्राज्य पुढे व्यसनापायी बुडाले. आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराज यशस्वी झाले. कारण ते चारित्र्यसंपन्न होते. त्यांनी कधीही सैनिकांना नाचगाणी आणि लावणी यामध्ये भाग घेऊ दिला नाही. त्यांनी गृहरक्षण केले आणि देशासाठी लढत राहीले. त्यांनी भोगवादाला आणि व्यसनाधीनतेला कोणतेच स्थान दिले नाही. मुख्यत्वे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासमवेत त्यांची नैतिक मूल्ये समाजात रुजवणे, ही खरी मोठी श्रद्धांजली आहे. ती सोडून आपण कोठे चाललो आहोत ? विद्येचे माहेरघर असलेले पुणे हे आपण अविद्येची राजधानी करणार आहोत का ?
   लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशभक्तीचे धडे येथे गिरवलेले आहेत. लोकमान्य टिळकांच्या एका खटल्यामध्ये एका स्त्रीने त्यांना प्रश्‍न विचारले होते. त्या प्रश्‍नोत्तराच्या अर्ध्या घंटाच्या कालावधीत टिळकांनी त्या स्त्रीकडे एकदाही मान वर करून पाहिले नव्हते. ती स्त्री गेल्यावर तेथे असलेल्या एकाने लोकमान्य टिळकांना विचारले की, तुम्ही त्या स्त्रीकडे एकदाही बघितलेले नाही, तर मग तुम्ही तिला कसे ओळखणार ? त्यावर टिळकांनी त्याला सांगितले की, मी तिला तिच्या एका वाक्याच्या आवाजावरून ओळखेन. इतक्या संयमी असलेल्या टिळकांनी पुणे वाढवले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या त्यागातून पुणे उभे राहिले आहे. चापेकर बंधूंच्या त्यागातून पुणे उभे राहिले आहे. व्यसनापायी पुण्याची अशी वाट लावणार का ? 
    या विरोधात तरुणांनी आंदोलन करून उभे राहिले पाहिजे. शिवसेनेने यामध्ये भाग घेतला पाहिजे. संभाजी ब्रिगेड या वेळी काय करत आहे ? ते छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतात ना ? शिवधर्मात हे मान्य आहे का ? अशी व्यसनाधीनता शिवधर्मात संभाजी ब्रिगेडला मान्य आहे का ? ते काही करणार आहेत कि नाहीत ? दादोजी कोंडदेव यांचा घाईघाईने पुतळा हालवणारे लोक गप्प का आहेत ? ते शहाजी महाराज यांचे सेवक होते, व्यसनी नव्हते. पुण्याचे दुर्दैव म्हणायचे! अशा स्वच्छंद आणि स्वैराचार यातून बलात्काराच्या घटना वाढणार आहेत. एकीकडे बलात्काराच्या घटनांच्या विरोधात ‘फास्ट ट्रॅक’ निर्णय घ्यायचा, तर दुसरीकडे ते वाढवून त्यासाठी ‘फास्ट टॅ्रक’ निर्णय सरकार घेणार का ? समाजाला संयम शिकवायचा कि भोगवाद शिकवायचा, ते सरकारने ठरवावे लागेल. - समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर, पुणे
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn