Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना त्रास होऊ नये; म्हणून केवळ आनंदात असतांनाच त्यांचे स्मरण करण्याचे ठरवणार्‍या ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. उमा रविचंद्रन् !

सौ. उमा रविचंद्रन्
     ‘सप्तर्षींनी नाडीवाचनात म्हटले, ‘साधकांना त्रास झाल्यास किंवा कोणतीही समस्या उद्भवल्यास ते परम गुरुजींना हाक मारतात आणि परम गुरुजी त्यांच्या लाडक्या साधकांचे रक्षण करण्यासाठी सूक्ष्मातील सर्व भार आपल्यावर घेतात.’ पुढे सप्तर्षींनी विचारले, ‘त्यांच्या खांद्यांना भार सहन करतांना किती वेदना होत आहेत, याची तुम्ही कल्पना करू शकता का ?’ ही सप्तर्षींची दिव्य वाणी ऐकल्यानंतर मला अतिशय वाईट वाटले. त्या वेळी मला संत गोपाळकृष्ण भारती यांनी शिवावर रचून गायिलेल्या प्रसिद्ध तमिळ गीताची आठवण झाली.
१. देवाला भक्तांमुळे अनेक त्रास सहन करावे लागत 
असल्याने परमेश्‍वराविषयीच्या अपार प्रेमामुळे कवीला मातृवात्सल्यभाव जाणवणे
     या तमिळ गीताचा भावार्थ पुढीलप्रमाणे आहे - ‘हे शिवा, आमच्यासारख्या भक्तगणांमुळे तुला अनेक त्रास सहन करावे लागतात. सदैव तुझी काळजी घेण्यासाठी तुझे आईवडील असते, तर तुला एवढा त्रास सहन करावा लागला असता का ?’ याचा भावार्थ म्हणजे, परमेश्‍वराला जन्म-मृत्यू नसल्याने आई-वडील नाहीत. देवाला आपल्या प्रिय भक्तांसाठी अनेक त्रास सहन करावे लागत असल्याने परमेश्‍वराविषयी असलेल्या अपार प्रेमामुळे या भक्तामध्ये (संत गोपाळकृष्ण भारती यांच्यामध्ये) त्याच्याविषयी मातृवात्सल्यभाव जागृत झाला आहे. त्याचप्रमाणे साधकांचे रक्षण करण्यासाठी प.पू. गुरुदेव साधकांचे सर्व त्रास, साधनेतील अडचणी, कष्ट स्वतःवर ओढवून घेत असल्याने त्यांना पुष्कळ वेदना सहन कराव्या लागतात. त्यांची प्राणशक्तीही न्यून होते. सप्तर्षींचे गुरुदेवांविषयीचे प्रेमळ शब्द ऐकल्यानंतर माझी पुष्कळ भावजागृती झाली. साधकांचे नैसर्गिक आपत्तींसहित सर्व संकटांपासून रक्षण करण्यासाठी प.पू. गुरुदेवांना त्यांचा भार वाहतांना सहन कराव्या लागत असलेल्या वेदनांविषयी सप्तर्षींनी कळकळीने सांगितले आहे. (या संदर्भातील प्रसंग म्हणजे उज्जैन येथील कुंभमेळ्याच्या ठिकाणी झालेल्या वादळात केवळ सनातनचे ग्रंथप्रदर्शन आणि साधक यांचे रक्षण झाले आणि इतर कक्ष कोसळून त्यांची हानी झाली होती.) 
२. गुरुदेवांशी संबंधित प्रत्येक गोष्टीमध्ये 
साधकांचे रक्षण करण्याचे सामर्थ्य असल्याचे अनुभवणे
     गुरुदेवांशी संबंधित प्रत्येक गोष्टीमध्ये साधकांचे रक्षण करण्याचे सामर्थ्य असल्याचे मीही व्यक्तीगत जीवनात अनुभवले आहे. माझ्या त्वचेला तीव्र कंड सुटून खाजवावे लागत असे. हा त्रास विशेषतः सेवा करतांना आणि सत्संगाच्या वेळी तीव्रतेने जाणवत असे. त्यासाठी मी ‘७४’ हा अंकजप करत असे. त्या वेळी मला त्या अंकाचे महत्त्व ठाऊक नव्हते. सप्तर्षींची वाणी ऐकल्यानंतर अंक ७४ हा प.पू. गुरुदेवांचे आताचे वय असल्याचे माझ्या लक्षात आले. केवळ त्यांच्या वयाच्या जपानेही मला पुष्कळ बरे वाटले. त्याच वेळी मला ‘आपण त्यांना कोणताच त्रास देऊ नये’, असेही वाटले. त्यामुळे मला त्रास होत असतांना मी अंकजप करणे बंद केले; परंतु त्यांची अपार कृपा असल्याने त्यांच्या वयाचा जप न करताही मला होणार्‍या त्रासाचे निवारण होत आहे.
३. गुरुदेवांच्या दिव्य शरिराला साधकांमुळे त्रास सहन करावा 
लागत असल्यामुळे आनंदी असतांनाच त्यांना हाक मारण्याचा निश्‍चय करणे 
आणि सदैव त्यांचे स्मरण व्हावे, यासाठी आनंदी रहाता येण्यासाठी प्रार्थना करणे
     मी आनंदात असेन, तेव्हा मला गुरुदेवांना हाक मारायची आहे. आनंदावस्थेत असतांना मी त्यांच्या स्मरणात डुंबून जाते. ‘मला सतत आनंदी रहाता येऊ दे’, अशी त्यांच्या चरणकमली प्रार्थना आहे. 
      देवा, आपण हा अवतार घेतला असल्याने आपल्या दिव्य शरिराला आमच्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. ‘दुःखी असतांना किंवा कठीण प्रसंगात तुम्हाला प्रार्थना करायची नाही’, असे मी ठरवले आहे. हे प्रभो, तुम्ही काळजी करू नका. स्वतःच आध्यात्मिक त्रासांशी लढण्यासाठी पुरेशी सहनशक्ती आपल्या कृपेने आम्हाला मिळाली आहे. मी आनंदी असतांनाच तुमची आठवण काढेन. मला नेहमीच आनंदी रहायचे आहे, जेणेकरून मी सदैव तुमचे स्मरण करत राहीन. असे ठरवल्यामुळे आपल्या लाडक्या बाळाचा विचार करणार्‍या आईप्रमाणे मला वाटत आहे.’ 
- सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई (२१.६.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn