Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

६९ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. अनंत आठवले आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. सुनीती यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

श्री. अनंत आठवले आणि सौ. सुनीती आठवले
१. ती. भाऊकाका 
(श्री. अनंत बाळाजी आठवले) 
१ अ. एकाग्रता 
    ‘ती. भाऊकाका पुष्कळ एकाग्रतेने आणि मन लावून सेवा करतात. त्यांच्या समवेत सेवेला बसल्यावर त्यांच्यामुळे मनाची एकाग्रता साधली जात असल्याने आपल्याला विषयाचे सहजतेने आकलन होते.
१ आ. सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणे
१. एक दिवस भाऊकाकांचा भ्रमणभाष कंपन स्थितीत ठेवल्याने नंतर त्यांना तो पूर्वस्थितीत आणता येत नव्हता. मी त्यांना तसे करून दिल्यावर त्यांनी ‘कसे केले ?’ हे विचारून पुन्हा भ्रमणभाषवर त्याप्रमाणे करून दाखवायला सांगितले आणि ‘‘पुढे असे झाले, तर मला करता येईल’’, असे ते म्हणाले.
२. हिंदी भाषांतर पडताळतांना भाऊकाकांना एखाद्या शब्दाविषयी शंका वाटल्यास ते शब्दकोशातून पर्यायी शब्द शोधून वाक्य सोपे करतात. तसेच त्यांना एखादा शब्द नवीन वाटल्यावर ते म्हणतात, ‘मला नवीन गोष्ट शिकायला मिळाली.’
३. धारिकेतील त्यांनी सांगितलेले पालट करतांना एखादा शब्द पुन्हा आल्यास आणि तो पालटायचा राहिल्यास मी त्याविषयी त्यांना विचारते. तेव्हा ते म्हणतात, ‘‘तुमच्यामुळे हे लक्षात आले. कृतज्ञता !’’
४. सकाळी त्यांना दिलेली सर्व वर्तमानपत्रे ते पूर्ण वाचतात आणि त्यात ‘त्यांना काय चुकीचे वाटते ?’, त्याविषयी ते काकूंशी बोलतात.
१ इ. इतरांचा विचार 
     एक दिवस पावसात मी त्यांना सकाळची न्याहारी घेऊन गेल्यावर ते म्हणाले, ‘‘मी आताच भ्रमणभाष करणार होतो की, पाऊस पडत असल्याने यायला नको. नंतर जेवण घेऊनच या. तुम्ही पावसात का आलात ? भिजल्या आहात, तर पोशाख (ड्रेस) बदलून घ्या.’’
१ ई. सहजता
१. ज्या गीतेत अनंताचे ज्ञान सामावलेले आहे, त्याचे ज्ञानामृत ते सहज सोप्या भाषेत उलगडून सांगतात.
२. भाऊकाकांनी मला माझ्या नावाचा अर्थ विचारला. तेव्हा मला सांगता आला नाही. त्यावर ते म्हणाले, ‘‘तुम्हाला तुमच्या नावाचा अर्थ ठाऊक नाही का ?’’ यातून त्यांनी मला माझ्या चुकीची जाणीव करून दिली आणि काका-काकूंनी माझ्या नावाचा अर्थ ‘सोन्याची रेष, ओळ’, असे सांगितले.
३. मी एकदा त्यांच्याकडे सेवेला गेले होते. त्या दिवशी दैनिक सनातन प्रभातमध्ये माझा लेख प्रसिद्ध झाला होता. तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुला आकाशातही देव दिसतात. आम्हाला तसे दिसत नाही.’’ हे अगदी ते सहजतेने बोलले.
४. गंमत करणे : एक दिवस मी त्यांना सायंकाळी ५ वाजता चहा दिला आणि त्यानंतर साबुदाण्याचे वडे खाण्यास दिल्यावर ते म्हणाले, ‘‘चहा करतांना मी प्रार्थना केली नाही आणि साबुदाण्याचा वडा खातांना कृष्णाला प्रार्थना केली. असे का ? तर कृष्णाला चहा आवडत नाही; म्हणून मी प्रार्थना केली नाही.’’
५. सांगितलेले काम पूर्ण केल्यावर ते ‘कृतज्ञता’ किंवा ‘धन्यवाद’ असे म्हणतात.
१ उ. इतरांचे कौतुक करणे 
१. कौतुक करून प्रोत्साहन देणे : प्रारंभी मला चहा व्यवस्थित करता येत नव्हता. त्यामुळे एक दिवस चहा गोड झाला. त्यावर काकूंनी ‘चहा कसा करायचा ?’, हे सांगितले. त्यानंतर माझ्याकडून चहा चांगला बनू लागल्यावर ते दोघे माझे कौतुक करत. मी काकूंना म्हणायचे, ‘तुमच्यामुळे मला चहा करता येतो; म्हणून तो चांगला होतो’, तर ते म्हणत, ‘तुझ्यामुळे तो चांगला होतो.’
२. स्वयंपाक चांगला झाला असेल, तर काका-काकू आवर्जून स्वयंपाक करणार्‍यांचेे कौतुक करतात आणि त्यांना तसे सांगायलाही सांगतात. तसेच पुन्हा भेटल्यावर ‘त्यांना सांगितलेस का ?’, हे मला विचारतात.
३. दैनिक सनातन प्रभातमध्ये एखाद्या साधकाचा लेख आल्यावर ‘छान लिहिले आहे’, असे सांगून त्यांच्याविषयी ते विचारपूसही करतात. 
२. सौ. सुनीतीकाकूंकडून शिकायला मिळालेली सूत्रे
२ अ. काटकसर
१. एक दिवस श्रीविष्णूची चौकटीतील (‘फ्रेम’मधील) प्रतिमा घेऊन मी गेले. ती प्रतिमा चौकटीतून काढायची होती. त्या चौकटीला चिकटपट्ट्या लावल्या होत्या. तेव्हा काकूंनी ‘त्या चिकटपट्ट्या कुठे लावायच्या ?’ हे काकांना विचारायला सांगितले. ‘‘नंतर त्यांचा उपयोग करू’’, असे काकू म्हणाल्या.
२. पोशाख शिवण्यासाठी ‘कापड वाया जाणार नाही’ यादृष्टीने विचार करून मगच काकू कापडावर मापांच्या खुणा करत होत्या. तसेच त्यांच्याकडे जुन्या कापडाचे पुष्कळ तुकडे होते. त्यांचा उपयोग त्या पोशाख शिवण्यासाठी करणार होत्या.
२ आ. व्यवस्थितपणा 
     एक दिवस मी कपडे वाळत घालतांना एका कपड्याला घडी पडल्यावर काकूंनी माझ्याकडून ते व्यवस्थित करवून घेतले आणि ‘असे केल्याने कपड्याला घडी पडणार नाही’, असे सांगितले.
२ इ. योग्य पारख करणे 
     काकू समोरच्याचे कौशल्य पाहून त्यानुसार त्याच्याकडून कृती करवून घेतात.
२ ई. प्रेमभाव 
     त्या प्रेमाने माझ्या घरच्यांची चौकशी करतात. त्यांनी माझ्या लहान भावाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला शुभेच्छा देण्यास सांगितले.
२ उ. देवाची ओढ असणे 
     काकू कोणतीही कृती करतांना कृष्णाशी बोलूनच करतात. मी विष्णूची प्रतिमा घेऊन गेल्यावर त्यावरील कागद काढतांना त्या त्याच्याशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ‘‘तू मला कधी दर्शन देणार ? मला तुला पहायचे आहे !’’
२ ऊ. इतरांचा विचार
१. एक दिवस मला बरं वाटत नसल्याचे काकूंच्या लक्षात आल्यावर त्यांनी मी रात्रीचे जेवण घेऊन जायच्या आधीच जेवणाची सर्व सिद्धता स्वतः केली होती. तेव्हा मी त्यांना म्हटले, ‘‘काकू, मी केले असते. तुम्ही का केले ?’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘अगं तुला बरं नाही ना ! प्रतिदिन तूच करतेस. आज मी केले.’’ यावरून त्यांच्यातील ‘सहजता’ आणि ‘इतरांचा विचार करणे’, हे गुण मला शिकायला मिळाले. 
२. काकूंसाठी शिलाई यंत्राची सिद्धता करून देतांना माझी बांगडी फुटली आणि हाताला काच लागल्याने रक्त आले. तेव्हा काकूंनी लगेच माझ्या हाताला हळद लावून ती दाबून ठेवली आणि म्हणाल्या, ‘‘लवकर बरं होईल.’’ 
काका-काकू सहजतेने जवळीक साधून दुसर्‍यांना आपलेसे करून घेतात.
३. प.पू. डॉक्टरांनी काका-काकूंच्या माध्यमातून सतत त्यांच्या 
(परम पूज्यांच्या) अनुसंधानात ठेवून सेवेतील आनंद अनुभवण्यास देणे 
     प्रारंभी सेवेला जातांना ‘माझ्याकडून चूक तर होणार नाही ना ?’, या भीतीने मला सेवेतील आनंद घेता येत नव्हता आणि माझ्याकडून भावजागृतीचे प्रयत्नही अल्प होत होते. काका-काकूंना जेवण वाढतांना किंवा त्यांनी सांगितलेली कामे करतांना ‘परम पूज्य माझ्यासमवेत असून ते माझ्याकडून हे करवून घेत आहेत’, असे वाटून मला पुष्कळ आनंद मिळायचा. प.पू. डॉक्टरांनी काका-काकूंच्या माध्यमातून मला सतत त्यांच्या अनुसंधानात ठेवून सेवेतील आनंद अनुभवण्यास दिला. काका-काकूंची सेवा करतांना मला होणार्‍या गुडघ्याच्या त्रासाची मला जाणीवच होत नव्हती. सेवा झाल्यावर लक्षात यायचे की, गुडघा दुखत आहे. 
     परम पूज्यांनी या सेवेच्या माध्यमातून पुष्कळ गोष्टी शिकवल्या आणि आनंदही दिला. याविषयी मी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. ‘ही सेवा करतांना माझ्याकडून झालेल्या चुकांसाठी मला क्षमा करावी’, अशी प्रार्थना आहे.’
- कु. सोनाली तबाजी बधाले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.९.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn