Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

रामनाथी आश्रमात यज्ञस्वरूपी स्वयंपाकघराच्या पुनर्रचनेची सेवा करतांना श्री. सुदिश पुथलत यांनी अनुभवलेला एक अविस्मरणीय आनंदसोहळा !

श्री. सुदिश पुथलत
      ‘देवद आश्रमात सेवा करत असतांना मला रामनाथी आश्रमात स्वयंपाकघराच्या पुनर्रचनेच्या सेवेला यायची संधी मिळाली. या सेवेच्या संदर्भात मला फारसे काही ठाऊक नाही आणि तेवढा अनुभवसुद्धा नाही. ‘ही सेवा मी कशी काय करणार ?’, अशी चिंता मला वाटली नाही; कारण ‘प.पू. गुरुदेव हे सगळे करवून घेतील’, अशी श्रद्धा होती. ही सेवा करतांना मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि अनुभव लिहिण्याचा प्रयत्न करत आहे.
१. स्वयंपाकघरात बांधकाम तोडलेले असूनही सेवेला 
गेल्यावर आध्यात्मिक उपाय होत असल्याचे जाणवणे
    आरंभी मी स्वयंपाकघरात सेवेला आलो. त्या वेळी आतील सर्व बांधकाम तोडलेले होते, तरीही त्या दिवसापासून स्वयंपाकघरात गेल्यावर माझ्यावर आध्यात्मिक उपाय होत असल्याचे जाणवले. हे मला सतत जाणवत होते; कारण प.पू. गुरुदेवांचा संकल्प पूर्णपणे कार्यरत होता. दुसरे कारण म्हणजे शौर्यादीदींनी तळमळीने आणि भावपूर्णरित्या सिद्ध केलेला स्वयंपाकघराचा आराखडा (Drawing) बघूनच चैतन्य जाणवत होते.
२. प.पू. गुरुदेव आणि संत यांच्या चैतन्यामुळे स्वयंपाकघर चैतन्यदायी यज्ञशाळेप्रमाणे जाणवणे
     ज्या वेळी मला थकवा जाणवत असे, त्या वेळी मी स्वयंपाकघरात जात असे. तेव्हा मला चैतन्य आणि उत्साह अनुभवायला मिळायचा. ‘जणूकाही मी एखाद्या यज्ञशाळेत प्रवेश केला आहे’, असे वाटायचे. आश्रमातील अनेक संत तेथे येऊन बघून जायचे. त्यामुळे स्वयंपाकघर हे सजीव, जागृत आणि चैतन्यदायी यज्ञशाळेप्रमाणे जाणवत होते.
३. भगवंत पदोपदी समवेत असून तोच आपल्याकडून 
क्षमतेपेक्षा अधिक सेवा करवून घेत असल्याची अनुभूती येणे
     यज्ञाच्या कालावधीत मी स्वयंपाकघराच्या बांधकामाची सेवा करत असतांना मला माझ्या मर्यादा, माझ्यातील न्यूनता आणि दुर्बल स्थिती जाणवत होती. त्यासह माझे दोष अन् अहंचे पैलूही लक्षात येत होते. ते सर्व सेवा करता करता कुठल्या कुठे नाहीसे झाल्याचे लक्षात आले. सेवा करतांना माझ्याकडून एक चूक झाली. मी एकदम निराश झालो आणि श्रीकृष्णाला हाक मारून विचारले, ‘हे भगवंता, तू कुठे आहेस ?’ लगेच उत्तर आले, ‘मला सांग, मी कुठे नाही ?’ त्याच क्षणी कळून चुकले की, भगवंत पदोपदी आमच्यासमवेतच असतो. आमच्या जीवनात घडणारे प्रसंग तोच निर्माण करतो आणि तोच आम्हाला त्यातून सोडवतो. आम्हाला साधक बनवण्याच्या प्रक्रियेत तोच तर आमच्याकडून साधना करवून घेतो. या सेवेत साधकांचा उत्साह, तळमळ आणि आपल्या क्षमतेपेक्षा अधिक सेवा करणे, हे केवळ या यज्ञामुळेच शक्य झाले.
४. संतांच्या सामर्थ्याची आलेली प्रचीती
     आश्रमात ग्रॅनाईट (Granite) वापरून एक घडीचे पटल (Folding Table) बनवायचे ठरले. त्या वेळी मला आणि साधकांना ‘ते कठीण आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेरचे आहे’, असे वाटले. त्यामुळे ही गोष्ट आम्ही एका संतांना सांगितली आणि ‘दुसर्‍या कुठल्यातरी धातूचे आपण बनवू शकतो का ?’, असे विचारले. त्या वेळी ‘आपण ग्रॅनाईटचेच (Granite) बनवूया’, असे त्यांनी सांगितले. त्यांचे आज्ञापालन म्हणून साधकांनी ग्रॅनाईटचेच (Granite) घडीचे पटल (Folding Table) बनवायला चालू केले. प.पू. गुरुदेवांच्या कृपेने आमच्या कल्पनेबाहेरचे एक छानपैकी घडीचे पटल (Folding Table) सिद्ध झाले. त्या वेळी लक्षात आलेले सूत्र हे की, आरंभीला आमची देवावरील श्रद्धा अल्प पडली आणि संतांचे सामर्थ्य आम्हाला ओळखता न आल्याने आमच्या मनात संशय निर्माण झाला होता. 
५. स्वयंपाकघरात स्वच्छेतेची सेवा करतांना पू. बिंदाताईंच्या 
अस्तित्वाने साधकांचा उत्साह वाढून आनंदसोहळाच चालू असल्याचे जाणवणे
     या यज्ञाच्या शेवटच्या टप्प्यात लक्षात आले की, बरीच स्वच्छता करायची राहिली होती. ही सेवा लवकरात लवकर व्हावी, यासाठी आश्रमातील ५० ते ६० साधक आले होते. पू. बिंदाताई तेथे येऊन गेल्या होत्या. त्यानंतर ३ - ४ दिवस पू. ताईंचे अस्तित्व आणि साधकांचा उत्साह यांमुळे जणूकाही ‘आनंदसोहळाच चालू होता’, असे जाणवले.
६. यज्ञासारखा पवित्र आणि अविस्मरणीय सोहळा अनुभवण्यास मिळाल्याचे जाणवणे
     हा यज्ञ झाल्यानंतर त्याविषयी विचार केला असता यज्ञाविषयीचा प्रत्येक क्षण मोलाचा वाटला. असा पवित्र आणि अविस्मरणीय सोहळा आम्हा साधकांना अनुभवायला दिला, त्याविषयी प.पू. गुरुदेवांच्या चरणी जेवढी कृतज्ञता व्यक्त करावी, तेवढी अल्पच आहे. ‘अशा यज्ञस्वरूपी सेवांच्या माध्यमातून आमची साधना करवून घ्यावी’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
- श्री. सुदिश पुथलत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.२.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn