Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

एका पर्वाचा अंत !

संपादकीय
      तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूने देशभरात खळबळ माजली आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री यांच्यासह देशभरातील अनेक नेते त्यांच्या मृत्यूविषयी शोक व्यक्त करत आहेत. गत दोन दिवस तेथील जनता रस्त्यारस्त्यांवर धाय मोकलून रडतांना दिसत होती. आताही तमिळनाडूमध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवला गेला आहे. यापूर्वी अम्मांना अटक झाल्यानंतर कुणा कार्यकर्त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. अम्मा यांनी इतकी लोकप्रियता कमावली होती, हे खरे आहे. तरीही त्यांच्या कारकीर्दीतील काही अप्रिय प्रसंग विस्मरणात जात नाही. अम्मा काळाच्या पडद्याआड गेल्या असल्या, तरी हे डाग पुसले जाणार नाहीत. ‘गेलेल्या व्यक्तीचे दोष पाहू नये’, असे म्हणतात. आज त्या इतिहासावर कुणी प्रकाश टाकणार नाही; कारण प्रत्येकाला स्वतःचा राजकीय स्वार्थ साधायचा आहे. आम्हाला मात्र राष्ट्रहित साधायचे असल्यामुळे येथे काही गोष्टींचे जनतेला स्मरण करून देणे, हे आमचे कर्तव्यच आहे.
हिंदूंच्या धर्मगुरूंचा पराकोटीचा अवमान !
      ११ नोव्हेंबर २००४ या दिवशी ऐन दिवाळीच्या सणाच्या काळात केवळ संशयावरून जयललिता सरकारने कांची कामकोटी पीठाधीश्‍वर स्वामी जयेंद्र सरस्वती आणि त्यांचे उत्तराधिकारी स्वामी विजयेंद्र सरस्वती यांना शंकररमण हत्या प्रकरणात अटक केली. इतिहासात प्रथमच एका पीठाधीश्‍वर पदावरील श्रद्धेय विभूतीला अटक करून तमिळनाडू सरकारने त्या वेळी पराकोटीचा हिंदुद्वेष दाखवला. एका संन्यस्त व्यक्तीचे चारित्र्यहनन करणेही बाकी ठेवले नव्हते. या घटनेवरून तमिळनाडू सरकारवर देशभरातून बरीच टीका झाली. पंतप्रधानांच्या विनवणीलाही नकार देत सत्तेचा दुरुपयोग करत जयललिता यांनी त्यांच्या हिंदुद्वेषी भूमिकेत पालट केला नव्हता. नंतर तब्बल ९ वर्षे खटला चालल्यानंतर स्वामी जयेंद्र सरस्वती आणि त्यांचे उत्तराधिकारी यांची निर्दोष मुक्तता झाली. त्याही वेळी जयललिताच मुख्यमंत्री असूनही त्यांनी स्वामीजींचा नाहक छळ आणि अपकीर्ती केल्याच्या संदर्भात जराही खेद व्यक्त केला नाही. त्यामुळे जयललिता यांच्याविषयी हिंदूंच्या मनात निर्माण झालेल्या कटू भावना आजही ताज्या आहेत.
बेसुमार अवैध संपत्ती 
      जयललिता यांचे नाव उच्चारल्यानंतर आणखी काही प्रसंग आठवतात, ते म्हणजे त्यांच्या घरावर आयकर विभागाने घातलेल्या धाडीत सापडलेल्या त्यांच्या १० सहस्र साड्या, चपलांचे ७५० जोड, २८ किलो सोने इत्यादी इत्यादी... हे सर्व उघड झाल्यानंतरही देशभरातून बर्‍याच कालावधीपर्यंत प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. जुलै १९९१ मध्ये त्या प्रथम मुख्यमंत्री झाल्या. त्या वेळी त्यांच्याकडे २ कोटी १ लक्ष रुपये इतकी संपत्ती होती. सत्ताप्राप्तीनंतर पाचच वर्षांत वर्ष १९९६ मध्ये ती ६६.६५ कोटी रुपये झाली. याव्यतिरिक्त ७८ हून अधिक ठिकाणी संपत्ती, कित्येक किलो सोने, चांदी, हिरे हेही मोठ्या प्रमाणात सापडले होते. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे त्या वेळी त्या केवळ १ रुपया वेतन घेत होत्या, असे स्वतः जयललिता यांनीच घोषित केले होते. सप्टेंबर १९९५ मध्ये त्यांचा दत्तकपुत्र सुधाकरन् याचा विवाह झाला होता. त्या सोहळ्यासाठीही त्या वेळचे ७५ कोटी रुपये खर्च आला होता. त्यामुळेच तो विवाह गिनीज बूकमध्येही नोंद झाला होता.
      त्या वेळचे जनता दलाचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी जयललिता यांच्या उत्पन्नापेक्षा बेसुमार अधिक असलेल्या संपत्तीच्या विरोधात तक्रार केली होती. त्या प्रकरणी त्यांना वर्ष २०१४ मध्ये सत्ता सोडावी लागली होती. याच प्रकरणी त्यांना ४ वर्षे शिक्षाही भोगावी लागली होती. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सत्ता सोडावी लागलेल्या त्या पहिल्या मुख्यमंत्री होत्या. महिलाही किती पराकोटीच्या भ्रष्टाचारी असू शकतात, हेच त्यांनी जगाला दाखवून दिले, असे म्हणावे लागेल.
चांगल्या योजनांना भ्रष्टाचाराचे गालबोट !
      वर्ष १९९२ मध्येच जयललिता यांनी अनाथ मुलींसाठी चालू केलेली ‘क्रेडल बेबी योजना’, लॉटरीच्या तिकिटांवर बंदी, राज्यात चालू केलेले पहिले महिला पोलीस ठाणे, अम्मा कँटिन योजना (याअंतर्गत १ रुपयात इडली, तीन रुपयांत दोन पोळ्या, पाच रुपयांत सांबार-भात मिळत असे.), मद्यबंदी आदी काही योजना सामान्यांत प्रचंड लोकप्रिय होत्या. असे असले, तरी या सगळ्याला भ्रष्टाचारी कारकीर्दीचे गालबोट होते. सामान्यांच्या कळवळ्यापेक्षा विरोधकांना नामोहरम करण्याचे ते तंत्र होते. त्यांच्या सरकारने चालू केलेल्या जनतेला अन्न, इतर जीवनावश्यक वस्तू अत्यल्प दरात देण्याच्या योजना हेच त्यांच्या लोकप्रियतेचे गमक होते. 
     ‘प्रजेच्या सुखासाठी सर्वस्वाचा त्याग करणारा राजाच आदर्श असतो. राजाचा कोशसंग्रह हा सैन्य, प्रजा आणि धर्म यांच्या रक्षणासाठी आहे. तशा प्रकारे त्याने त्या कोशाचा उपयोग केल्यास तो सुखद ठरतो. दुरुपयोग केल्यास तो दुःखद होईल. जर राजा राजकोश स्त्री-पुत्रांसाठी आणि स्वतःच्या विषयोपभोगांसाठी उपयोगात आणील, तर त्याला दुःख होईल आणि तो नरकाला जाईल’, असे शुक्रनीतीत म्हटले आहे. धर्मनिष्ठ राहून प्रजेचे पालन करणे, हाच राजधर्म आहे. नेता श्रीमंत असावा, जनतेवर सवलतींची आणि योजनांची खैरात करणारा असावा कि आटोपशीर राहणीमान असलेला, जनतेला स्वावलंबी अन् सक्षम बनवणारा असावा, हेच यातून भारतियांनी शिकायचे आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn