Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

मोठे व्यावसायिक असूनही आश्रमात राहून भक्तीभावाने साधना करण्याचा आदर्श ठेवणारे रंजन देसाईकाका !

श्री अभय वर्तक 
      ‘रंजन देसाईकाका माझ्यापेक्षा वयाने मोठे होते. ते मला अगदी मुलाप्रमाणेच वागवायचे. नेहमी काही हवे-नको इत्यादी विचारायचे. काका देवद आश्रमात अनुमाने १२ वर्षांपासून असतील. काकांचा सहवास नेहमी आनंददायी असून हवाहवासा वाटायचा. काका कधीही भेटले की, हातात हात घेऊन बोलायचे. त्यांचे मन अतिशय मृदु, अगदी लहान मुलाप्रमाणे होते. काकांनी मनातून पैशांची निरर्थकता कधीच ओळखली होती; म्हणून काका आश्रमात पूर्णवेळ साधना करू शकले. त्यांच्या देहावसानानंतर माझ्या मनाला ‘ते गेले आहेत’, असे वाटत नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी पुढील सूत्रे लिहिण्यास मला स्फूर्ती येत नव्हती. तरीही मी देवाला प्रार्थना करून त्यांच्या सहवासातील काही अनुभव लिहीत आहे.
१. काकांच्या बोलण्यामुळे मन अंतर्मुख होणे 
     ‘सर्व साधकांची लवकर आध्यात्मिक प्रगती व्हावी’, असा विचार देसाईकाकांच्या मनात असायचा. मी त्यांना भेटल्यावर ते मला नेहमी म्हणायचे, ‘‘अभय, मनाची स्थिती कशी आहे ? साधना चालू आहे का ? ‘हार-तुरे’ ही माया आहे !’’ त्यांची ही वाक्ये ऐकल्यावर माझे मन लगेच अंतर्मुख व्हायचे. 
२. प्रत्येक कृती करतांना ‘श्रीगुरूंना काय अपेक्षित आहे ?’, याचाच विचार करणे 
       खरेतर पुष्कळ पैसे असणारा माणूस आपोआपच स्वतःला वेगळा समजू लागतो; पण काकांकडे पुष्कळ पैसे असूनही त्यांनी कधी त्यांच्या वागण्यातून तसे कधी जाणवू दिले नाही. ते एका आस्थापनाचे (कंपनीचे) मालक असूनही ते अतिशय साधेपणाने रहायचे. त्यांनी कधी मानसन्मानाची अपेक्षा केली नाही. त्यांच्या व्यवहारातील व्यापाच्या तुलनेत काकांकडे लहानशी सेवा होती, तरीही त्यांनी प्रत्येक कृती करतांना ‘श्रीगुरूंना काय अपेक्षित आहे ?’, याचाच विचार केला.
       काकांच्या खोलीत विविध सेवा करणारे साधक यायचे. बांधकामांतर्गत गवंडी सेवा करणारे साधक असो अथवा कोणीही असो, आलेल्या साधकांशी काकांची जवळीक असायची. खोलीत कोणीही आले, तरी काका त्याला खाऊ देऊन पाठवायचे. देसाईकाका हे मोठे व्यावसायिक असले, तरी ‘आश्रमात राहून साधना कशी करावी ?’, याचा आदर्श वस्तूपाठ होते.
३. ‘प.पू. गुरुदेव आणि सनातनचे संत यांच्यावर नितांत श्रद्धा असणे 
      त्यांचा ‘प.पू. गुरुदेवांचे प्रत्येक वाक्य ब्रह्मवाक्य आहे’, असा भाव असायचा. त्यांनी प.पू. डॉक्टरांना अपेक्षित अशी कृती करण्याचा प्रयत्न केला. देसाईकाका नेहमी ‘प.पू. गुरुदेव प्रत्येक साधकाची प्रगती करवून घेणार आहेत’ आणि ‘सद्गुरु (श्री.) राजेंद्र शिंदे यांच्यामुळे देवद आश्रमाचे कसे कल्याण झाले ?’ यांविषयी सांगत असत. सदगुरु (श्री.) राजेंद्र शिंदे यांच्यासह सनातनच्या अन्य संतांवरही त्यांची नितांत श्रद्धा होती.’
४. पूर्वी सक्रीय साधनारत असूनही आता साधनेत 
नसणार्‍या साधकांना पुन्हा साधनेत आणण्यासाठी प्रयत्न करणे 
       सनातनमध्ये पूर्वी सक्रीय साधनारत होते; पण काही कारणास्तव आता साधनेत नाहीत, अशा साधकांना काका पुन्हा साधनेत आणण्यासाठी अधून-मधून संपर्क करून प्रयत्न करायचे. तेव्हा ते अतिशय सोप्या शब्दांत श्रीगुरूंचे महत्त्व समजावून सांगायचेे; पण फार कोणाच्या मागेही लागायचे नाहीत.
५. काकांकडून ‘समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, नातेवाईक आदींना 
संपर्क करणे, धोरणे ठरवणे, निर्णयप्रक्रिया’ इत्यादी गोष्टी शिकायला मिळणे 
     काकांनी मला ‘तत्त्वनिष्ठ राहून तर्काच्या आधारे एखाद्याला अध्यात्म कसे सांगावे ? बँकेचे संस्थापक आणि अध्यक्ष यांसारख्या प्रतिष्ठित लोकांशी साधनेसंबंधी कसा संपर्क करावा ?’, याविषयी शिकवले. काही वेळा काका मला त्यांचे जुने मित्र किंवा नातेवाईक यांच्याकडेही संपर्कासाठी घेऊन जायचे. तसेच काका मोठे व्यावसायिक असल्याने ‘एखादे धोरण कसे ठरवावे ?’, हे मला त्यांच्या समवेत राहून अनेक वेळा शिकायला मिळाले. वेळ प्रसंगी एखाद्या सेवेसंबंधी निर्णयास विलंब झाला, तरी चालेल; पण सर्वांना विचारून आणि अभ्यास करून निर्णय घेण्याकडे त्यांचा कल असायचा.
६. स्वभावदोष आणि अहं निर्मूलनासाठी नियमित प्रयत्न करणे 
     स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेतील अनेक गोष्टी त्यांचे वय अन् प्रकृती यांना अनुसरून खरेतर अवघड होत्या, तरीही ते ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन सारणीत चुका लिहिणे, स्वयंसूचनासत्र करणे’ इत्यादी व्यष्टी साधनेचे प्रयत्न नियमित करत. 
७. काकांना प्रत्येक गोष्टीला साथ देणारे एक आदर्श कुटुंब लाभणे 
      कुडाळला गेल्यावर मी नेहमी काकांच्या घरी जायचो. त्या वेळी काका देसाईकाकूंना अनेक पदार्थ बनवण्यास सांगत. तेव्हा त्यांना ‘आम्हाला काय खायला घालू नि काय नको ?’, असे व्हायचे. काकांच्या सर्व मागण्या देसाईकाकू आनंदाने पूर्ण करत. काकांना प्रत्येक गोष्टीला होकार देणारे कुटुंब लाभले. देसाईकाकांवर त्यांची आई, पत्नी, दोन मुली, मेहुणे श्री. राजनभाई, दोन्ही जावई आणि नातवंडे पुष्कळ प्रेम करायचे. काका अनौपचारिक बोलतांना आम्हा साधकांना त्यांची आई आणि कुटुंबीय यांच्याशी संबंधित अनेक आठवणी सांगायचे अन् ‘त्यांच्याकडून त्यांना काय काय शिकायला मिळाले’ हेही आवर्जून सांगायचे. देवाने काकांना प्रत्येक क्षणाला साथ देणारे एक आदर्श कुटुंब दिले.
८. काका जीवनमुक्त झाल्याने पुष्कळ आनंद होणे 
     ‘काकांचा मृत्यू झाला’, ही गोष्ट मनाला स्पर्श का करत नव्हती किंवा मन ते का स्वीकारत नव्हते, हे आता लक्षात आले; कारण काका जीवनमुक्त झाले ! त्यामुळे त्यांना पुनर्जन्म नाही, त्यांची जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटका झाली, हे ऐकल्यावर मला पुष्कळ आनंद झाला. श्रीगुरुकृपेनेच मला काकांसारखे वडील आणि मित्र लाभले, त्याविषयी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो.’
- श्री. अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था. (२७.११.२०१६) 
नातेवाईक, साधक आदींशी जवळीक असणे 
     ‘देसाईकाका निर्मळ मनाचे होते. काका दूरभाषद्वारे सतत संपर्कात राहून ओळखीच्या व्यक्ती, नातेवाईक आणि साधक यांच्याशी जवळीक टिकवून ठेवत. ते सर्वांशी मिळून-मिसळून वागायचे. ते केव्हाही कोणत्याही साधकामध्ये भेदभाव करत नसत.
संतांविषयीचा भाव 
अ. त्यांचा ‘प.पू. गुरुदेव आणि संत यांच्या कृपेमुळेच आस्थापन (कंपनी) चालते’, असा भाव होता. 
आ. एकदा देसाईकाकांनी जांभळे आणली होती. तेव्हा प.पू. पांडे महाराजांनी त्यांना ‘जांभळे आवडली’, असा निरोप दिला. तेव्हा काकांची पुष्कळ भावजागृती झाली.
आ. शिकण्याची वृत्ती : ‘मी प.पू. पांडे महाराजांची सेवा करून आल्यावर ते मला शिकायला मिळालेली सूत्रे आवर्जून विचारायचे. ‘सेवा करतांना तुमच्याकडून झालेल्या चुका आणि प.पू. पांडे महाराजांच्या खोलीत घडलेले प्रसंग यांतून मलाही शिकायला मिळते’, असे ते नेहमी सांगायचे.
- श्री. सुरेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२४.११.२०१६)
     या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. - संपादक
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn